ग्लॅडिएटर-2 : माणसांच्या सत्तास्पर्धेची गोष्ट

Gladiator-2 Movie Review | ऑस्कर विजेत्या सिनेमाचा दुसरा भाग तब्बल 24 वर्षांनंतर प्रदर्शित
Gladiator-2 Movie Review |
ग्लॅडिएटर-2 Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 
नीलेश बने

ग्लॅडिएटर या तुफान गाजलेल्या ऑस्कर विजेत्या सिनेमाचा दुसरा भाग तब्बल 24 वर्षांनंतर प्रदर्शित होतोय. सत्तेच्या सिंहासनासाठी झालेल्या रक्तरंजित स्पर्धेची ही गोष्ट आहे. दोन माणसांना मरेपर्यंत झुंजवून, टाळ्या वाजवणारा कोलोझियममधील थरार ही या सिनेमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. पण या हिंस्त्र स्पर्धेतून सत्ता मिळवण्याचा हा खेळ आता प्रत्यक्षात तरी खेळला जात नाही. याच रोमनं पुढं लोकशाहीची मांडणी केली. माणसातली ही स्पर्धा आता निवडणुकीपर्यंत आलीय. हा सिनेमा रिलिज होण्याच्या काही दिवस आधीच जगाची सुपरपॉवर असलेल्या अमेरिकेत सत्तापालट झाला. लोकशाही मार्गानं डोनाल्ड ट्रम्प याची निवड झाली. आजची लोकशाही ही खरंच लोकशाही आहे का, वगैरे चर्चा करायला कायमच संधी होती आणि यापुढेही राहील. पण एवढ्या मोठ्या देशात रक्ताचा थेंबही न सांडता सत्तापालट झाला, हे कोणालाही नाकारता येत नाही.

कोलोझियममधल्या तलवारबाजीपासून, निवडणुकीच्या मतपत्रिकेपर्यतचा माणसाचा हा प्रवास अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. त्यामुळे ग्लॅडिएटर-2 हा सिनेमा एक अ‍ॅक्शनपॅक्ड मनोरंजन वगैरे देईलच; पण त्यासोबत तो एक आणखी गोष्ट सांगतोय. ती गोष्ट आहे माणूस म्हणून आपण कुठून कुठपर्यंत आलोय त्याची. सिनेमातील अमानुष हिंसा आपल्याला हेच सतत सांगत राहते की, आपण आता उत्क्रांत झालेली सुसंस्कृत माणसं आहोत. त्यामुळे माणसा-माणसातील स्पर्धेचे नियम आपल्याला सातत्यानं नव्यानं ठरवावे लागणार आहेत.

ग्लॅडिएटर म्हणजे नक्की काय?

ग्लॅडिएटर या सिनेमाचा पहिला भाग प्रचंग गाजला होता. या सिनेमामुळे अनेकांना ग्लॅडिएटर हे काय प्रकरण आहे, ते कळले. रोमन साम्राज्यामध्ये कोलोझियम नावाची बारा मजली, भव्य मैदानवजा इमारत फक्त माणसांच्या झुंजीसाठी उभारली गेली. जवळपास पाच हजार माणसं या मैदानाच्या सभोवती असलेल्या इमारतीत एकाच वेळी बसून या झुंजी पाहू शकत होते. तिथं माणसांसोबत वाघ, सिंह, गेंडा असले हिंस्त्र पशूही झुंजत असत.

या मैदानात योद्धे जेव्हा झुंजीसाठी उतरत, तेव्हा जो पराभूत होईल त्याचा मृत्यू निश्चित असे. तरीही या मैदानात विजयी होण्यासाठी अनेक योद्धे या झुंजीसाठी सज्ज होत. या झुंजीत भाग घेणार्‍या शस्त्रधारी योद्ध्यांना ग्लॅडिएटर असे म्हणत. त्याकाळी असलेल्या गुलामगिरीमधून, अनेक बलदंड गुलामांना या झुंजीसाठी ग्लॅडिएटर म्हणून विशेष प्रशिक्षण दिलं जात असे. समोर बसलेल्या राजाला, राजकुटुंबाला आणि जमलेल्या हजारो रोमन नागरिकांचं मनोरंजन करणं, हे या योद्ध्यांचं मुख्य उद्दिष्ट असे. त्यामुळे समोरच्या योद्ध्याला अधिकाधिक जखमी करून, हालहाल करून कसं मारलं जाईल, याची दक्षता या झुंजींमध्ये घेतली जायची. अनेकदा या झुंजी या सत्तांतरास कारणीभूत ठरत. ग्लॅडिएटर या सिनेमातील झुंज ही अशीच सत्तांतराची गोष्ट सांगणारी झुंज आहे.

सिनेमाची गोष्ट काय?

ग्लॅडिएटरचा पहिला भाग हा रोमन सम्राट मार्कस ऑरिलियसचा झुंजार सेनापती मॅक्सिमसच्या अतुलनीय शौर्याची गोष्ट आहे. रोमन राज्याचा उत्तराधिकारी म्हणून आपला मुलगा कमोडस हा असमर्थ आहे, असे सम्राट मार्कस याला वाटत असे. त्यामुळे तो सेनापती मॅक्झिमसला सम्राट होण्याची ऑफर देतो. हे जेव्हा कमोडसला कळते, तेव्हा कमोडस वडिलांचा सम्राट मार्कसचा खून करतो आणि तो अपघाती मृत्यू असल्याचा बनाव करतो. हा अपघाती मृत्यू नाही तर हा सत्तेसाठी झालेला खून आहे, हे मॅक्सिमसला ठाऊक असते. तो कमोडसविरोधात जाऊ नये, म्हणून कमोडस त्याला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतो. पण मॅक्सिमस आपली निष्ठा बदलत नाही. त्यामुळे त्याला कुटुंबासकट संपवण्याचे नियोजन केले जाते. यात त्याचे कुटुंब तो गमावतो, पण शिताफीने स्वतःचा जीव वाचवतो. त्यानंतर त्याला गुलाम म्हणून विकले जाते. तिथे तो ग्लॅडिएटर होतो आणि पुन्हा रोममध्ये परततो.

रोममधील भव्य अशा कलोझियममध्ये मॅक्सिमसची आणि कमोडसची झुंज होते. मॅक्सिमसला मारण्याचे सर्व कट तो उधळून लावतो आणि अखेर तो कमोडसला संपवतो. जुलमी कमोडसची सत्ता उलथवून लावण्यात मॅक्सिमसला यश आलेले असले तरी ही झुंज मॅक्सिमसला गंभीर जखमी करते आणि तिथेच त्याला वीरमरण येते. त्यावेळी तिथली जनता त्याचा मोठा जयजयकार करते. व्हिलन मरतो, हरतो आणि हिरो मरूनही जिंकतो. आता 15 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या दुसर्‍या भागात, पुढल्या पिढ्यांचा संघर्ष दाखवला आहे. याच्या कथानकाबद्दल प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. रोमन इतिहासात सिनेमॅटिक स्वातंत्र्य घेऊन हा सिनेमा केल्याचं, चित्रपटाचे दिग्दर्शक रिडले स्कॉट याचं म्हणणं आहे. या दुसर्‍या भागात प्रेक्षकांना तीच उत्कंठा आणि थरार अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अनुभवायला मिळेल, असे तो अनेक मुलाखतीतून सांगतोय.

ग्लॅडिएटर ते ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास

ग्लॅडिएटर सिनेमा जी गोष्ट सांगतोय, ती गोष्ट माणसांच्या सत्तेसाठी केलेल्या स्पर्धेची गोष्ट आहे. शेवटी गोष्टीच माणसाच्या आणि समाजाच्या धारणा निश्चित करत असतात. त्यामुळेच ग्लॅडिएटर ज्या रोमन साम्राज्यातील सत्तास्पर्धेची गोष्ट सांगतो, त्यातून रोमची आणि पर्यायाने पश्चिमी संस्कृतीची धारणा बनली आहे, हे समजून घ्यायला हवे. कशासाठी लढायचे तर जिंकण्यासाठी, ही या स्पर्धेची धारणा आहे. त्यातूनच पुढे ऑलिम्पिकचे खेळ सुरू झाले. माणसांच्या या लढाईला हिंसेपासून मुक्त करत या नव्या स्पर्धा आखल्या गेल्या, असेही काहींचे म्हणणे आहे.

ऑलिम्पिकमधील अनेक प्रतीके याच रोमन स्पर्धांशी नाते सांगणारी आहे. त्यामुळेच ऑलिम्पिकचा उगम याच माणसांमधील स्पर्धा करण्याच्या वृत्तीत आहे, हे विसरून चालणार नाही. ग्लॅडिएटरपासून ऑलिम्पिकपर्यंत झालेला हा प्रवास माणसाच्या स्पर्धेचा प्रवास आहे. हिंसेपासून अहिंसेपर्यंतचा प्रवास आहे. स्पर्धेपासून सहकार्यापर्यंतचा हा प्रवास आहे. माणसाच्या उत्क्रांतीचा हा प्रवास आहे. कारण स्पर्धा आणि सहकार्य या दोनच प्रेरणा आजवर माणसाला कायमच उत्क्रांत करत आल्या आहेत. त्यामुळे हा सिनेमा फक्त मनोरंजन म्हणून न पाहता हिंसेपासून माणूस कुठवर आला या दृष्टीनेही पाहायला हवा.

मत्स्य न्याय की अंध पंगू न्याय?

न्यायशास्त्रामध्ये मत्स्य न्याय आणि अंध पंगू न्याय असे दोन न्याय सापडतात. मत्स्य न्याय म्हणजे मोठा मासा छोट्या माशाला खाऊन जगतो, एवढा त्याचा साधा अर्थ आहे. निसर्गात, रानटी प्राण्यांमध्ये आपल्याला कायम मत्स्य न्याय आढळतो. तिथं शक्तिशाली कायमच शक्तिहिनाच्या जीवावर आपलं पोट भरतो. पण माणूस जसजसा उत्क्रांत होत गेला तशी त्याला सहकार्याची किंमत कळत गेली. त्यातूनच पुढे अंध पंगू न्याय मांडला गेला. एका अंध व्यक्तीला दिसत नाही आणि पांगळ्याला चालता येत नाही. पण दोघे मिळून जर चालू लागले तर आंधळा पांगळ्याला खांद्यावर घेऊन नदी पार करू शकतो, असा हा न्याय सांगतो. माणसाला सहकार्याची ही गंमत कळली आणि आज आपण जे काही जग पाहतो आहोत, ते त्यातूनच घडले.

तरीही माणसामधला रानटी प्राणी अद्यापही संपलेला नाही. अनेकदा माणसातला हा रानटी प्राणी जागा होतो. मग तो कधी साम्राज्याचा राजा असतो तर कधी ऑफिसमधला साहेब असतो. कधी राजकीय नेता असतो तर एखाद्या दुकानाचा मालक असतो. ज्याच्या हातात सत्ता असते, तो सत्ता नसलेल्याला वापरून घेत असतो. यातून कधी मत्स्य न्याय तर कधी अंध पंगू न्याय दोन्ही प्रत्यक्षात येत असतात. ग्लॅडिएटर हा सिनेमा या दोन्ही न्यायाचं भव्य-दिव्य असे सिनेमॅटिक दर्शन घडवतो. पहिल्या भागातच त्यानं अनेकांची मनं जिंकली आहेत. सत्ता आणि सत्तेचा अनिर्बंध वापर यावर मानवी इतिहासाची लक्षावधी पाने लिहिलेली आहेत. यातील प्रत्येक सत्तांतर हे काही प्रमाणात हिंसा हे घडवतेच. पण आता माणसानं या सत्तांतरासाठीही नवे नियम ठरवलेत. लोकशाही हे त्याचेच एक प्रारूप आहे. ते समृद्ध करणं म्हणजेच भविष्यातील कोलोझियम टाळणं असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news