Virtual Lifestyle Brands | आभासी लाईफस्टाईल ब्रॅंड्स

Virtual Lifestyle Brands |
Virtual Lifestyle Brands | आभासी लाईफस्टाईल ब्रॅंड्स
Published on
Updated on

प्रमोद बेरी

अंदाजे पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि सौभाग्यवती पुण्याच्या एमजी रोडवरून चालत होतो. माझी नजर सहज एका हाय-एंड कपडे विकणार्‍या दुकानाच्या काचेच्या शोकेसमधील एका पुरुषाच्या डमीवर पडली. पाटीवर तथाकथित प्रसिद्ध ब्रॅंडचे नाव होते. त्या डमीने घातलेली जीन पॅंट ही अत्यंत विटलेली व विचित्र भोके-भोके असलेली दिसली. मी बराच विचार करून कुतूहलाने दुकानात शिरलो आणि तेथील एका विक्री प्रतिनिधीला विचारले, 'मॅडम तुमचा ‘प्रसिद्ध’ ब्रॅंड अलीकडे जुने कपडे पण केंव्हा विकू लागला?'

तिने माझ्याकडे वरून खाली पाहिले व थोड्या उपहासाने उत्तर दिले, 'काका, ही अलीकडची लेटेस्ट फॅशन आहे.'

दुकानातून बाहेर पडताना माझ्या डोळ्यांसमोरून कपड्यांच्या दुनियेतील पॅंट या ‘साहेबी इजारी’चा प्रवास डोळ्यांसमोरून झळकून गेला. खच्चून दोन मीटर कापड लागणार्‍या ‘बेल बॉटम’ पॅंट्स! त्यानंतर आलेल्या पावणे दोन मीटरमध्ये बेतलेल्या ‘रेग्युलर’ प्लीटेड पॅंट्स! त्यानंतर सव्वा मीटरमध्ये बसवलेली ‘नॅरो बॉटम’ पॅंट आली. (त्याचीच चिखललोळ उंची असलेली भिन्न अवताराची फॅशन पण काही काळासाठी आली.) आणि आता एक मीटरमध्ये बेतलेली सुपर टाईट बॉटम फिट पॅंट आली (त्यामध्येही चार इंच उंची कमी असलेला एक पर्यायी अवतार पण मिरवत आहे.). ही सुरवारीसारखी दिसणारी लेटेस्ट फॅशनची पॅंट हे तरुण लोक पायावर कशी चढवतात, हे अजूनही माझ्या लक्षात आलेले नाही.

या सर्व स्थित्यंतरांमध्ये कपडे तयार करणार्‍या कंपन्यांचा मात्र फायदाच झाला. पूर्वी शिलाईला लागणार्‍या दोन मीटर कापडाऐवजी आता जेमतेम एक मीटरमध्ये कशीतरी कोंबलेली ‘इन फॅशन’ पॅंट या कंपन्या आम जनतेच्या गळ्यात फॅशनच्या नावाखाली मारत आहेत, हे मात्र खरे! म्हणतात ना, ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहीए’! या सर्व पॅंट्सच्या बॉटममधील स्थित्यंतरांमुळे त्यावर मॅचिंग म्हणून वापरले जाणारे शर्टसपण मार्केटला आले. लूज फिट, रेग्युलर फिट व स्लिम फिट ही स्थित्यंतरे पॅंटवर ‘मॅचिंग’ म्हणून जनतेला घेण्यास भाग पाडण्यात आले. मला नेहमी भीती वाटते की, जरा ज्यादा सदृढ तरुण मुले असे टाईट शर्ट व सुपर टाईट पॅंट घालून बेढब दिसणे राहू दे, पण एखाद्या समारंभावेळी ती उसवली गेली तर?

एवढे सर्व बदलले तरी आम्हा सीनिअर सिटीझन्सना अजून एक दिलासा आहे. आम्हाला रुचणार्‍या जुनाट रेग्युलर प्लीट्सच्या पायघोळ पॅंट्स विकणारी मोजकी दुकाने अजूनही आहेत.

या आभासी ब्रॅंड्समुळे मला झालेल्या एका हादर्‍याचे उदाहरण! आम्ही दोघे पुण्यामध्ये एका उच्चभ्रू परिवाराच्या पार्टीला गेलो होतो, तेव्हा थोडा ज्यादाच मेकअप केलेली एक ललना तिच्या नवीन पर्सकडे सर्वांचे लक्ष जावे इतकी हलवत डुलवत हिंडत होती.

मी मिसेसला हळूच विचारले, 'हे काय प्रकरण आहे?'

'अहो! तिच्या पर्सवरचे नाव तुम्ही नाही का पाहिले? तिची पर्स जगप्रसिद्ध ‘गुची’ ब्रॅंडची आहे. ‘गुची’ या कंपनीची सर्वात स्वस्त पर्स सत्तर हजारला मिळते.'

मी मनात अर्थात स्वगत म्हणालो, 'कुठलाही प्रसिद्ध परदेशी ब्रॅंड का असेना, महिला घरातून बाहेर पडल्यावर त्यांना रोजच्या लागणार्‍या चार वस्तू, पैसे, किल्ल्या इत्यादी ठेवण्यासाठी सत्तर हजार रुपये का खर्च करावेत?'

माझा संभ्रमी चेहरा पाहून ती पुढे म्हणाली….

‘अहो अलीकडे ब्रॅंड महत्त्वाचा आहे. त्यावरून प्रत्येक माणसाचा स्टेटस ठरतो! एवढेच नाही तर ‘गुची’ची नवीन महागडी ‘ड्रॉ स्ट्रिंग पर्स’ (आपला आजीबाईचा दोरीचा बटवा हो) घेण्यासाठी अनेक बायका उत्सुक आहेत.

मला नेहमी वाटायचे, माणसाचा ‘स्टेटस’ त्याच्या सुसंस्कृतपणावर ठरतो; पण ‘वस्तू’ बाळगल्यामुळे व्यक्ती मोठी होते ही संकल्पना मात्र मला नवीन होती.

असो, तेव्हापासून मी फॅशन व ‘आभासी’ जीवनमान उंचावणार्‍या विविध उत्पादनांच्या लाईफस्टाईल ब्रॅंड्सची माहिती समस्त तरुण मंडळींकडून गोळा करू लागलो.

जसा काळ गेला तसे कळाले की, रोज वापरातील अतिसामान्य वस्तूंचा जरा अवतार बदलून त्याचे ‘अतिरंजित’ वर्णन करून माल विकण्याचा व ते मुर्खासारखे विकत घेण्याचा जमानाच आला आहे.

माझ्या ज्ञानात भर पडतच होती. ‘झारा’, ‘डायर’, ‘चॅनेल’, ‘हरमिस’, ‘प्राडा’ इत्यादी विचित्र नावाखाली साधी वस्त्र प्रावरणे पाचपट किमतीला विकली जात होती. मायक्रोसेकंद वेळ दाखवणारे हाताला बांधायचे रिस्टवॉचेस ‘रोलेक्स’ या नावाखाली वीस लाखाला विकली जात होती. (कोल्हापूर स्टँडर्ड टाईम पाळणार्‍या आपल्यासारख्या सर्व पामरांना मायक्रोसेकंद डोळ्यांसमोर तरी आणता येईल का?)

एका घड्याळाची अफाट किंमत ऐकल्यावर मात्र मला मनोमन वाटले की, एवढ्या किमतीमध्ये मस्तपैकी एक ‘स्कोडा’ गाडी दारात आली असती!

माझ्या ज्ञानात अधिकाधिक भर पडत गेली. खाण्यापिण्याच्या क्षेत्रामध्ये ‘स्टारबक्स’ नावाच्या उपहारगृहामध्ये कमीतकमी साडेतीनशे रुपयाला कॉफी मिळत होती. फक्त पाच टक्के बाजरी पीठ घातलेला ‘मल्टीग्रेन’ आटा, घरातील गव्हाच्या पिठापेक्षा दुप्पट महाग होता. दीडशे रुपयाला असलेली अमुक एक मल्टिव्हिटॅमीन गोळी खाल्ली, तर तुमचे वय तीन महिन्यांत दहा वर्षे कसे कमी दिसेल याची गॅरंटी एक कंपनी देत होती. एका आठवड्यात गोरे दिसाल, पंधरा दिवसांत तारुण्यपिटीका जाईल असे छातीठोकपणे सांगणारी चित्रविचित्र ‘रसायने’ तरुण मुली बळी पडून वापरत होत्या.

अफाट जनसंख्येच्या जोरावर आपल्या देशात एकदा विकत घेऊन फसणारे ‘बकरे’ असल्यामुळे हा गोरखधंदा चालूच राहणार आहे. या सर्व जाहिरातबाजीमध्ये थोडे ‘सज्ञान’ झाल्यावर मला लक्षात येऊ लागले की, ‘बुटिक’ असे नामकरण केलेल्या दुकानांमध्ये ऐंशी टक्के मोकळी जागा असते व फक्त वीस टक्के जागेमध्ये चित्रविचित्र संकल्पनेचा तेवढाच विक्षिप्तपणे रचलेला माल मांडलेला असतो.

आजकाल साध्या-साध्या वस्तू अनावश्यकपणे आकर्षक आणि गुंतागुंतीच्या बनवून वाढीव किमतीला खपवल्या जात आहेत. साध्या रोजच्या वापरातील खाद्य वस्तू वानगीदाखल क्रंबी कुकीज (खडबडीत बिस्किटे), प्रोटीन बार्स (ऊर्फ दाण्याची चिक्की), मोरिंगा पावडर (शेवग्याच्या शेंगाची पावडर), अनियन रिंग्ज (कांद्याचे तळलेले काप), सीसॅमे ब्रेड (दोन-चार तीळ चिटकवलेला नेहमीचा पाव) अशा अतिरंजित वस्तूंच्या रांगाच्या रांगा तुम्हाला ‘डी मार्ट’ मध्ये दिमाखाने मांडलेल्या दिसतील.

साधे पिण्याचे पाणीसुद्धा आता ‘ग्लेशियल स्प्रिंग’, ‘इलेक्ट्रोलाईट-इन्फ्युज्ड’ अशा नावांनी विकले जाते. आमची पूर्वीची पिढी कोल्हापूरच्या कुंभार गल्लीतील मस्तपैकी मातीच्या माठातील पाणी पिऊन वाढली. त्यांना ही नवी नावे काय समजणार?

दोन कोटींच्या ‘मर्सिडिज’मध्ये वीस लाखांच्या स्कोडापेक्षा दहापट काय श्रेष्ठ आहे, हे अजूनही मला समजलेले नाही. दुर्दैवाने, या दिखाऊ व्यापार विश्वामध्ये सौंदर्य आणि उपयोगिता यांचा समतोल बिघडत चालला आहे. वस्तू अधिक आकर्षक बनवण्याच्या प्रयत्नात त्या ओळखू न येण्याइतक्या बदलल्या जात आहेत.

आमच्या पिढीतील सर्व मित्रांची घरची आर्थिक स्थिती उत्तम असली, तरी अजूनही आमच्या पिढीला कुठलीही वस्तू विकत घेताना ‘व्हॅल्यू फॉर मनी’ (पैशाचे योग्य मूल्य) पडताळून घेण्याची सवय लागली आहे. ती तशीच राहणार आहे. कुठलीही वस्तू विकत घेताना जास्तीत जास्त काय दाम द्यावे, ही लक्ष्मण रेषा ओलांडायचे आम्हाला धैर्य होत नाही. वानगीदाखल चांगली लेदर सॅंडल विकत घेताना तीन हजारांच्या आतली दाखवा, चप्पल घेताना दीड हजारच्या पलीकडची नको असे आम्ही दुकानदाराला आवर्जून सांगतो.

या सर्व कोलाहलामध्ये अलीकडेच घडलेला एक आशेच्या किरण दाखवणारा प्रसंग आठवतो.

आमच्या घरोब्यातील एका श्रीमंत कुटुंबांमध्ये मी गेलो होतो. त्यांच्या चिरंजीवाबरोबर बोलता बोलता कोल्हापुरातील हजारो तरुणांच्या पायात दिसणार्‍या फॅशन ‘इन-फॅशन’च्या पांढर्‍या बुटाबद्दल चर्चा निघाली. तेव्हा त्याने सहजपणे सांगितले, 'अलीकडे आम्ही तरुणांनी ‘ब्रिंग बॅक ग्रीन’ नावाची पर्यावरण संवर्धन संस्था काढली आहे. या संस्थेच्या सर्व सदस्यांनी कमीतकमी गरजांत व योग्य बजेटमध्ये वर्तन करण्याची कसम खाल्लेली आहे. उदाहरणार्थ शर्ट-पॅंटच्या नेहमीच्या वापरातील जोड्या सहापेक्षा ज्यादा घ्यायच्या नाहीत; पण एखादा नवा शर्ट विकत घेतला, तर जुन्यातला एक शर्ट ‘रोटरी'च्या जुन्या कपड्यांच्या बॅंकेमध्ये आम्ही जाणीवपूर्वक जमा करतो.

मी देवाकडे प्रार्थना केली की, स्वत:चा स्मार्ट फोन कमीतकमी पंधरा वर्षे वापरणार्‍या अशा तरुण मुला-मुलींची संख्या वाढत राहो आणि देशाचे व जगाचे कल्याण होवो! मी दिवास्वप्ने तर पाहत नाही ना!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news