AI-Generated Images Dangers | कृत्रिम छायाचित्रांचा खरा धोका!

AI-Generated Images Dangers |
AI-Generated Images Dangers | कृत्रिम छायाचित्रांचा खरा धोका!
Published on: 
Updated on: 

महेश कोळी, आय.टी. तज्ज्ञ

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वास्तवात अस्तित्वात नसलेली दृश्ये तयार करणे शक्य झाल्यामुळे छायाचित्रांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. वैज्ञानिक संशोधनातील सूक्ष्मदर्शकीय चित्रफितीपासून वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठांपर्यंत या समस्येची व्याप्ती वाढत चालली आहे. जगप्रसिद्ध कॅमेरा उत्पादक कंपनीच्या छायाचित्रण स्पर्धेत घडलेल्या प्रकाराने या धोक्याचे स्वरूप पुन्हा स्पष्ट केले आहे.

छायाचित्राला वस्तुस्थितीचा पुरावा मानण्याच्या परंपरेपुढे आता गंभीर आव्हान उभे आहे. एखादी घटना प्रत्यक्ष घडली की नाही, याची खातरजमा करण्यासाठी छायाचित्र किंवा चित्रफीत पाहिली जाते. न्यायालयीन कामकाज, वैज्ञानिक संशोधन, पत्रकारिता आणि ऐतिहासिक दस्तावेजीकरणात दृश्य पुराव्याला विशेष महत्त्व असत; मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने वास्तवात अस्तित्वात नसलेली दृश्ये तयार करणे शक्य झाल्यामुळे छायाचित्रांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. वैज्ञानिक संशोधनातील सूक्ष्मदर्शकीय चित्रफितीपासून वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठांपर्यंत या समस्येची व्याप्ती वाढत चालली आहे. जगप्रसिद्ध कॅमेरा उत्पादक कंपनीच्या छायाचित्रण स्पर्धेत घडलेल्या प्रकाराने या धोक्याचे स्वरूप पुन्हा स्पष्ट केले आहे.

निकॉन कंपनीतर्फे आयोजित केल्या जाणार्‍या ‘स्मॉल वर्ल्ड इन मोशन’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यंदा एका वैज्ञानिक चित्रफितीला प्रथम क्रमांक देण्यात आला होता. या चित्रफितीत दुर्मीळ आनुवंशिक श्वसनविकार असलेल्या बालकाच्या श्वसनमार्गातील सूक्ष्म केसांसारख्या रचनांची हालचाल दाखविण्यात आली होती. या रचनांना ‘सिलिया’ असे म्हणतात. श्वसनमार्गातील श्लेष्मा आणि त्यातील अनावश्यक कण बाहेर काढण्यासाठी त्यांची हालचाल महत्त्वाची असते. या हालचालींमध्ये बिघाड झाल्यास श्वसनाशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात. निंग शू या संशोधकाने तयार केलेल्या चित्रफितीला १५ सप्टेंबर रोजी प्रथम पारितोषिक जाहीर झाले. स्पर्धेत ४० देशांमधून ३४७ चित्रफिती आल्या होत्या. सूक्ष्मदर्शकाखाली दिसणार्‍या अत्यंत लहान रचनांचे आकर्षक चित्रण केल्यामुळे संबंधित चित्रफितीचे कौतुक झाले; मात्र काही वैज्ञानिकांनी तिचे बारकाईने परीक्षण केल्यानंतर चित्रफितीतील रचनांच्या हालचालींबाबत शंका उपस्थित केल्या. काही रचना अचानक दिसू लागतात किंवा अदृश्य होतात, तर काहींचे आकार आणि हालचाली प्रत्यक्ष जैविक प्रक्रियांशी सुसंगत वाटत नाहीत, असे निरीक्षण नोंदविण्यात आले.

या आक्षेपांनंतर संबंधित संशोधकाने चित्रफितीच्या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्याचे मान्य केले; मात्र मूळ वैज्ञानिक माहिती किंवा सिलियाची हालचाल कृत्रिमरीत्या तयार केलेली नसून दृश्य अधिक स्पष्ट करण्यासाठी एआयचा वापर झाल्याचे त्याचे म्हणणे होते. त्यानंतर निकॉनने स्वतंत्र तपासणी केली आणि कंपनीने संबंधित चित्रफीत स्पर्धेच्या जनरेटिव्ह एआयसंबंधी नियमांशी विसंगत असल्याचे स्पष्ट करून प्रथम पारितोषिक रद्द केले. व्हिएतनामच्या न्गुयेन नाम न्हात यांच्या चित्रफितीला नवा प्रथम क्रमांक देण्यात आला. निकॉनने संबंधित संशोधकाच्या वैज्ञानिक कामगिरीवर किंवा हेतूवर कोणताही अंतिम आक्षेप नोंदविलेला नाही. निर्णय स्पर्धेच्या नियमांपुरता मर्यादित असल्याचे स्पष्ट केले आहे.

या घटनेने वैज्ञानिक चित्रणातील मूलभूत प्रश्न समोर आणला आहे. सूक्ष्मदर्शकातून मिळणार्‍या प्रतिमांवर प्रक्रिया करणे ही विज्ञानातील सामान्य बाब आहे. रंगछटा बदलणे, प्रकाशातील त्रुटी कमी करणे आणि विशिष्ट रचना अधिक स्पष्ट करणे यांसाठी संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर केला जातो; मात्र प्रत्यक्ष माहितीमध्ये नसलेल्या रचना नव्याने तयार झाल्या, तर ती वैज्ञानिक नोंद कितपत विश्वासार्ह राहते? संशोधनातील चित्रफीत आकर्षक दिसणे महत्त्वाचे की ती मूळ निरीक्षणाशी प्रामाणिक असणे महत्त्वाचे, हा प्रश्न निर्णायक ठरतो. छायाचित्रांमधील फेरफारचा इतिहास कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयापूर्वीच सुरू झाला होता. २०१५ मधील प्रतिष्ठित ‘वर्ल्ड प्रेस फोटो’ स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या सुमारे २० टक्के छायाचित्रांना नियमबाह्य डिजिटल फेरफारामुळे अपात्र ठरविण्यात आले होते. स्पर्धेच्या आयोजकांनी मूळ कॅमेर्‍यातील नोंदी आणि सादर केलेल्या प्रतिमांची तुलना केली होती. त्यात काही छायाचित्रांमधील घटक काढून टाकल्याचे, काहींच्या दृश्यात्मक स्वरूपात अतिप्रमाणात बदल केल्याचे आढळले. या घटनेनंतर स्पर्धेच्या आचारसंहितेत आणि तपासणी प्रक्रियेत सुधारणा करण्यात आल्या.

यापूर्वी २००३मध्ये इराक युद्धाच्या वार्तांकनादरम्यान अमेरिकेतील 'लॉस एंजेलिस टाईम्स' या वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या एका छायाचित्रावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ब्रिटिश सैनिक आणि इराकी नागरिकांचे दृश्य अधिक परिणामकारक करण्यासाठी छायाचित्रकार ब्रायन वॉल्स्कीने काही क्षणांच्या अंतराने काढलेली २ छायाचित्रे एकत्र केली होती. परिणामी, प्रत्यक्षात एकाच क्षणी न घडलेले दृश्य तयार झाले. छायाचित्रातील काही व्यक्तींच्या प्रतिमा पुन्हा दिसत असल्यामुळे फेरफार उघडकीस आला. वृत्तपत्राने संबंधित छायाचित्रकाराला सेवेतून काढून टाकले आणि आपली चूक सार्वजनिकरीत्या मान्य केली. त्याहीआधी १९८२मध्ये 'नॅशनल जिऑग्राफिक' नियतकालिकाने इजिप्तमधील पिरॅमिडचे छायाचित्र मुखपृष्ठावर प्रसिद्ध करताना त्यातील दोन पिरॅमिड प्रत्यक्ष अंतरापेक्षा अधिक जवळ आणले होते. आडव्या स्वरूपातील छायाचित्र उभ्या मुखपृष्ठात बसविण्यासाठी हा बदल करण्यात आला होता; मात्र त्यामुळे मूळ दृश्यातील भौगोलिक वास्तव बदलले. या प्रकारावर मोठी टीका झाल्यानंतर नियतकालिकाने छायाचित्रांच्या सत्यतेसंबंधी अधिक कठोर भूमिका स्वीकारली.

छायाचित्रांमध्ये फेरफार करण्याची पद्धत डिजिटल युगापूर्वीही अस्तित्वात होती. सोव्हिएत संघातील स्टॅलिनच्या राजवटीत राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या प्रतिमा ऐतिहासिक छायाचित्रांतून काढून टाकण्याचे प्रकार घडले. १९४५ मध्ये बर्लिनमधील राइखस्टाग इमारतीवर सोव्हिएत ध्वज फडकाविल्याचे प्रसिद्ध छायाचित्रही नंतर बदलण्यात आले होते. छायाचित्रातील एका सैनिकाच्या हातावरील घड्याळासारखा दिसणारा तपशील काढून टाकण्यात आला आणि पार्श्वभूमीतील धूर अधिक गडद करण्यात आला. युद्धातील विजयाचे प्रतीक बनलेल्या छायाचित्राच्या दृश्यात्मक स्वरूपातही संपादकीय हस्तक्षेप झाला होता.

या सर्व घटनांमध्ये एक समान धागा दिसतो. छायाचित्र अधिक आकर्षक, परिणामकारक किंवा विशिष्ट संदेशाला पूरक बनविण्यासाठी मूळ वास्तवात बदल करण्यात आला; मात्र जनरेटिव्ह एआयमुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. पूर्वी छायाचित्रात फेरफार करण्यासाठी किमान मूळ दृश्य किंवा प्रतिमा आवश्यक असे. आता प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली व्यक्ती, घटना किंवा परिस्थिती संपूर्णपणे नव्याने निर्माण करता येते. त्यामुळे एखादे दृश्य खरे आहे की कृत्रिमरीत्या तयार केलेले आहे, हे सामान्य प्रेक्षकांना ओळखणे अधिक कठीण झाले आहे. राजकीय प्रचार, निवडणुका, युद्ध, सामाजिक संघर्ष आणि सार्वजनिक व्यक्तींच्या प्रतिमांबाबत या तंत्रज्ञानाचा गैरवापर गंभीर परिणाम घडवू शकतो. बनावट दृश्य प्रसारित झाल्यानंतर त्याचे खंडन झाले, तरी सुरुवातीला निर्माण झालेला गैरसमज पूर्णपणे दूर होईलच असे नाही. या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्था, छायाचित्रण स्पर्धांचे आयोजक आणि वैज्ञानिक नियतकालिकांना अधिक कठोर पडताळणी व्यवस्था स्वीकारावी लागेल. मूळ कॅमेरा फाईल, चित्रफितीची निर्मिती प्रक्रिया आणि त्यावर केलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या डिजिटल बदलाची माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला असल्यास त्याचे स्वरूप स्पष्टपणे नमूद केले पाहिजे. दृश्य स्पष्ट करण्यासाठी केलेली प्रक्रिया आणि वास्तवात नसलेला घटक निर्माण करणारी प्रक्रिया यात स्पष्ट फरक करावा लागेल.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या दृश्यांची कलात्मक उपयुक्तता असू शकते. चित्रपट, जाहिराती, मनोरंजन आणि सर्जनशील निर्मितीत त्यांचा वापर करता येतो; मात्र वास्तवाचे दस्तावेजीकरण करण्याचा दावा करणार्‍या प्रतिमांसाठी वेगळे निकष आवश्यक आहेत. वैज्ञानिक संशोधन आणि पत्रकारितेतील दृश्य पुराव्याची विश्वासार्हता टिकवायची असेल, तर मूळ नोंदींची पडताळणी, डिजिटल बदलांची पारदर्शकता आणि नियमभंगावरील कारवाई या बाबींना प्राधान्य द्यावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news