

विवेक कुलकर्णी
क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवताना क्षणभर सगळे सोपे वाटते; पण त्या एका क्षणामागे अनेक वर्षांचा घाम, अश्रू आणि त्याग दडलेला असतो. नीरू धांडासाठी टिनचे डबे लक्ष्य होते, तर साताऱ्याच्या साहिल जाधवसाठी आईने आपले दागिने विकून घेतलेले धनुष्य स्वप्नाचे साधन ठरले. भारताच्या आशियाई सुवर्णपदकांची हीच खरी गोष्ट आहे. पदकांची नव्हे, तर परिस्थितीला हरवून स्वप्न प्रत्यक्षात साकारणाऱ्या या जिगरबाज खेळाडूंची!
आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ३० सप्टेंबरअखेर १० सुवर्ण, २१ रौप्य आणि २९ कांस्य अशी ६० पदकांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या १० सुवर्णपदकांमध्ये क्रिकेट, कबड्डी, नेमबाजी, ॲथलेटिक्स आणि तिरंदाजी अशा वेगवेगळ्या खेळांचा समावेश आहे.
टिनच्या डब्यांपासून आशियाई सुवर्णापर्यंत...
हरियाणाच्या जींदमधील नीरू धांडा हिची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेलाही मागे टाकणारी आहे. शूटिंगसारख्या महागड्या खेळासाठी ना महागडी बंदूक, ना आधुनिक शूटिंग रेंज. सुरुवातीला कुटुंबाच्या डबल बॅरल बंदुकीने ती टिनच्या डब्यांवर निशाणा साधायची. नंतर चुलत भाऊ लक्ष्य श्योराणची बंदूक तिला मिळाली. याच साध्या सुरुवातीने पुढे तिला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात नेले.
महिलांच्या ट्रॅपच्या अंतिम फेरीत ३० पैकी २८ अचूक निशाणे साधत नीरूने सुवर्ण जिंकले आणि आशियाई विक्रमही मोडला. त्यानंतर काइनान चेनाईसोबत मिश्र ट्रॅपमध्येही तिने आणखी एक सुवर्ण मिळवले. म्हणजेच टिनच्या डब्यांवर साधलेला तो पहिला निशाणा आता आशियाई सुवर्णावर पोहोचला आहे.
आईने दागिने विकले, मुलाने इतिहास रचला!
साताऱ्याचा साहिल जाधव हा भारताच्या तिरंदाजीतील सुवर्णकथेचा आणखी एक भावनिक अध्याय. कोरोना काळात वडिलांची नोकरी गेल्यानंतर कुटुंबासमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. साहिलच्या स्वप्नासाठी त्याच्या आईने स्वतःचे दागिने विकून कंपाऊंड बो घेतले. त्या धनुष्याने आज भारतासाठी आशियाई सुवर्ण जिंकले आहे.
चिकिथा तनिपार्थीची कहाणीही तितकीच प्रेरणादायी. तिच्या वडिलांनी मुलीच्या तिरंदाजीच्या स्वप्नासाठी कुटुंबाचे भाताचे शेत गहाण ठेवले आणि कर्ज घेतले. या त्यागातून उभ्या राहिलेल्या चिकिथाने ज्योती सुरेखा वेन्नम आणि पृथिका प्रदीपसोबत महिला कंपाऊंड सांघिक सुवर्ण जिंकले. त्यानंतर साहिलसोबत मिश्र सांघिक सुवर्णही मिळवले. पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत साहिल, गणेश मणी रत्नम थिरुमुरू आणि कुशल दलाल यांनीही सुवर्णावर नाव कोरले.
चार मुली, चार संघर्ष... एकच सुवर्ण!
महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिलेतील किरण पहल, एम. आर. पूवम्मा, प्राची चौधरी आणि विथ्या रामराज यांच्या सुवर्णकथेचे रंगही वेगळे आहेत. किरणला धावण्यापासून रोखणाऱ्या गावकऱ्यांशी तिच्या वडिलांना संघर्ष करावा लागला. एकेकाळी तिच्याकडे सरावासाठी योग्य बूटही नव्हते. आजीच्या पेन्शनच्या पैशातून तिला स्पाईक्स मिळाले. वडिलांच्या निधनानंतरही तिने ट्रॅक सोडला नाही.
पूवम्माने डोपिंग बंदीनंतर पुन्हा उभे राहत सुवर्णापर्यंत मजल मारली. या कठीण काळात पतीने तिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली, तर आईने सरावासाठी मदत केली. प्राची शेतकरी कुटुंबातून आली आणि पोलीस सेवेत जाण्याचे स्वप्न घेऊन धावत राहिली. विथ्यानेही वैयक्तिक स्पर्धेतील संघर्षातून मार्ग काढत रिलेच्या अखेरच्या टप्प्यात भारताला सुवर्णरेषा ओलांडून दिली.
अपघाताने शरीर मोडले; जिद्दीने करिअर उभे केले
१० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक सुवर्ण विजेते सुरुची सिंह आणि कमलजीत यांची गोष्ट अपयशातून पुनरागमन शिकवते. सुरुचीने सुरुवातीला कुस्तीचा सराव केला. कॉलरबोन फ्रॅक्चर झाल्यानंतर तिने नेमबाजी स्वीकारली. तिच्या वडिलांनी बचत खर्च केली, कर्ज घेतले आणि अगदी लाकडी तुकड्यांपासून सरावासाठी लक्ष्य तयार केले.
कमलजितचा २०२३ मधील अपघात जीवघेणा ठरू शकला असता. दोन सहप्रवाशांचा मृत्यू झाला, तर त्याच्या पायाचे हाड मोडले. उपचारासाठी कुटुंबाला कर्ज घ्यावे लागले. खाटेवर असतानाही त्याने खोलीच्या भिंतीवर लक्ष्य लावून सराव केला. पुढे आशियाई स्पर्धेच्या वैयक्तिक पात्रता फेरीत तो एका गुणाने अंतिम फेरीपासून दूर राहिला; पण अखेरच्या क्षणी मिश्र सांघिक संघात संधी मिळाली आणि त्याने ती सुवर्णसंधीत बदलली.
कबड्डीच्या मातीतील जिद्द
कबड्डीत भारताने महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांत सुवर्ण मिळवले. पुष्पा राणा, सोनाली शिंगाटे आणि सहकाऱ्यांनी इराणला ३७-३४ असे हरवून महिला सुवर्ण कायम ठेवले. पुरुष संघाने सुनील कुमार, पवन सेहरावत, अर्जुन देशवाल, देवांक दलाल, आशू मलिक, अयान लोहचब, जयदीप दहिया, सुमीत, अस्लम इनामदार आणि सहकाऱ्यांच्या जोरावर इराणला ४०-३४ असे नमवले. दोन्ही संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिले.
क्रिकेटच्या सुवर्णातही संघर्षाचीच चमक
भारताच्या सुवर्णयात्रेची सुरुवात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला क्रिकेट संघाने केली. स्मृती मानधना, शेफाली वर्मा, ऋचा घोष, दीप्ती शर्मा, भाटी फुलमाली, जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर, राधा यादव, अरुंधती रेड्डी, कॅप्टन हरमनप्रीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रीलंकेचा १४७ धावांनी धुव्वा उडवत सलग दुसरे आशियाई सुवर्ण मिळवले. अंतिम सामन्यात स्मृतीने ७९, शेफालीने ४८ आणि ऋचाने नाबाद ४९ धावा केल्या.
ही १० सुवर्णपदके म्हणूनच केवळ पदकतालिकेतील आकडे नाहीत. कुणाच्या हातात सुरुवातीला टिनचा डबा होता, कुणाच्या घरात आईचे दागिने विकले गेले, कुणासाठी शेत गहाण पडले, कुणाला आजीच्या पेन्शनने बूट मिळाले, कुणी अपघातानंतर पुन्हा लक्ष्यावर नजर रोखली, तर कुणी गावाच्या विरोधाला धावण्याच्या वेगाने उत्तर दिले.
सुवर्णपदक गळ्यात पडते तेव्हा देशाला चमक दिसते; पण त्या चमकेमागे कुटुंबाचा त्याग, खेळाडूचा घाम आणि वर्षानुवर्षांची न दिसणारी धडपड असते. आयची-नागोयातील भारताची सुवर्णपदके ही याच संघर्षाची सुवर्णाक्षरे आहेत.