Decline of Critical Thinking | धोका विचारशक्तीच्या आकुंचनाचा

Decline of Critical Thinking |
Decline of Critical Thinking | धोका विचारशक्तीच्या आकुंचनाचा
Published on
Updated on

शहाजी शिंदे, संगणक प्रणालीतज्ज्ञ

वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित 'द लँसेट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड हेपॅटोलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यास अहवालाची सध्या जगभरात चर्चा होत आहे. या संशोधनात असे आढळून आले की, डॉक्टरांनी एआयआधारित सहायक साधनांचा नियमित वापर केल्यानंतर सुरुवातीला निदान अधिक अचूक झाले; मात्र नंतर त्यांना एआयच्या मदतीशिवाय तपासणी करावी लागली, तेव्हा अ‍ॅडिनोमा ओळखण्याची त्यांची नैसर्गिक क्षमता सुमारे 20 टक्क्यांनी कमी झाली होती.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही मानवी इतिहासातील सर्वांत प्रभावी तांत्रिक क्रांतींपैकी एक मानली जाते. काही क्षणांत माहिती मिळवून देणे, गुंतागुंतीची कामे सोपी करणे, निर्णय प्रक्रियेला गती देणे, लेखन, भाषांतर, संशोधन, वैद्यकीय निदान, शिक्षण अशा असंख्य क्षेत्रांत सहाय्य करणे या क्षमतांमुळे एआय आज दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे; परंतु प्रत्येक क्रांतीसोबत काही अनपेक्षित परिणामही येतात. गेल्या काही महिन्यांत जगभरातील अनेक संशोधन संस्थांनी व्यक्त केलेली चिंता याच संदर्भातील आहे. एआय माणसाचे काम सोपे करत असला, तरी तो हळूहळू मानवी मेंदूची विचारशक्ती, चिकित्सक दृष्टी आणि स्वतंत्र निर्णय क्षमता कमकुवत करत आहे का, हा प्रश्न आता गंभीरपणे उपस्थित केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित 'द लँसेट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड हेपॅटोलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासाने लक्ष वेधले आहे. या संशोधनात असे आढळून आले की, डॉक्टरांनी एआयआधारित सहायक साधनांचा नियमित वापर केल्यानंतर सुरुवातीला निदान अधिक अचूक झाले; मात्र नंतर जेव्हा त्यांना एआयच्या मदतीशिवाय तपासणी करावी लागली, तेव्हा कर्करोगपूर्व अवस्था असलेल्या अ‍ॅडिनोमा ओळखण्याची त्यांची नैसर्गिक क्षमता सुमारे 20 टक्क्यांनी कमी झाली होती. याचा अर्थ एआय उपयुक्त असला, तरी त्याच्यावर सातत्याने अवलंबून राहिल्यास मानवी कौशल्याची धार बोथट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विचार करण्याची जबाबदारी कोणाची?

मॅसॅच्युसेटस्‌ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) अलीकडील संशोधनाने या चर्चेला आणखी बळ दिले आहे. संशोधकांनी असे निरीक्षण नोंदवले की, जे लोक माहिती समजून घेणे, पडताळणी करणे किंवा निष्कर्ष काढणे यांसारख्या बौद्धिक प्रक्रियांसाठी नियमितपणे एआयवर अवलंबून राहतात, त्यांच्यात खरी आणि खोटी माहिती स्वतंत्रपणे ओळखण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते. चॅटबॉटस्‌ क्षणार्धात उत्तरे देतात. त्यामुळे वेळ आणि श्रम वाचतात, हे खरे; पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तयार स्वरूपात मिळू लागले की, प्रश्न विचारण्याची, विश्लेषण करण्याची आणि तर्क लावण्याची मानसिक प्रक्रिया मागे पडते. संशोधनात सहभागी असलेल्या प्रमुख संशोधक अंकु रानी यांच्या मते, एआयमुळे आपण अधिक सक्षम होत असल्याचा भास निर्माण होतो. प्रत्यक्षात मात्र स्वतंत्र विचार करून निष्कर्ष काढण्याची क्षमता कमी होण्याचा धोका वाढतो.

माहितीचा स्फोट आणि विवेकाचा र्‍हास

एमआयटीच्या अभ्यासात असे दिसून आले की, एआयचा नियमित वापर करणार्‍या व्यक्तींनी माहितीची स्वतंत्र पडताळणी करण्याऐवजी एआयने दिलेल्या उत्तरांवर अधिक सहज विश्वास ठेवला. परिणामी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती खरी असल्याचा स्वीकार करण्याची शक्यता त्यांच्यात तुलनेने जास्त होती. माहिती सहज उपलब्ध होणे आणि माहितीची सत्यता तपासणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पहिली प्रक्रिया एआय सुलभ करतो; मात्र दुसरी जबाबदारी अजूनही मानवी विवेकावरच अवलंबून आहे.

‘कॉग्नेटिव्ह ऑफलोडिंग’चा वाढता परिणाम

मानसशास्त्रात ‘कॉग्निटिव्ह ऑफलोडिंग’ ही संकल्पना परिचित आहे. म्हणजे एखादे काम स्वतः न करता बाह्य साधनांवर सोपविणे. पूर्वी लोक फोन क्रमांक पाठ करत. आज ते मोबाईलमध्ये साठवले जातात. आता विचार करण्याची, माहितीची सांगड घालण्याची आणि निष्कर्ष काढण्याची जबाबदारीही हळूहळू एआयकडे सोपविली जात आहे. यामुळे मेंदूला तात्पुरती विश्रांती मिळत असली, तरी दीर्घकाळात विचारशक्तीचा नियमित व्यायाम कमी होतो. कोणत्याही स्नायूप्रमाणेच मेंदूची क्षमता देखील सातत्याने वापरल्याने विकसित होते. वापर कमी झाला की, त्याची कार्यक्षमताही कमी होण्याचा धोका असतो.

विद्यार्थ्यांसाठी अधिक मोठे आव्हान

जनेरेटिव्ह एआयमुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. निबंध, प्रकल्प, सादरीकरणे, प्रोग्रामिंग किंवा संशोधनाची प्राथमिक रूपरेषा तयार करण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर एआयचा वापर करत आहेत. ही सुविधा नाकारता येणार नाही; मात्र तिचा अतिरेक चिंताजनक ठरत आहे. काही संशोधनांत असे दिसून आले आहे की, जे विद्यार्थी स्वतः माहिती शोधून, संदर्भ वाचून आणि स्वतःच्या शब्दांत लेखन करतात, त्यांची विश्लेषण क्षमता अधिक सक्षम राहते. उलट प्रत्येक टप्प्यावर एआयवर अवलंबून राहणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक मेहनत घेण्याची तयारी कमी होत जाते. माहिती मिळविणे आणि ज्ञान आत्मसात करणे यामध्ये मूलभूत फरक असतो. एआय पहिली प्रक्रिया वेगवान करतो; पण दुसरी प्रक्रिया मानवी प्रयत्नांशिवाय शक्य नाही.

मेंदूचा ‘शॉर्टकट’ आणि मानवी स्वभाव

फ्रान्समधील राष्ट्रीय वैज्ञानिक संशोधन संस्था सीएनआरएसनेही मानवी वर्तनातील एका महत्त्वाच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकला आहे. माणूस स्वभावतः कमी श्रमात अधिक परिणाम मिळविण्याचा प्रयत्न करतो. एआय हीच प्रवृत्ती अधिक बळकट करतो. जेव्हा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काही सेकंदांत मिळते, तेव्हा विचार करण्यासाठी वेळ देण्याची किंवा विविध स्रोत तपासण्याची प्रेरणाच कमी होते. ही सवय सोयीची वाटत असली, तरी तिचा दीर्घकालीन परिणाम बौद्धिक आळशीपणात होऊ शकतो. निर्णयक्षमता, सर्जनशीलता, चिकित्सक दृष्टी आणि समस्या सोडविण्याची क्षमता या सर्व गोष्टी सातत्याने सरावाने विकसित होतात. त्यांचा पर्याय कोणतेही तंत्रज्ञान ठरू शकत नाही.

तंत्रज्ञान क्षेत्रही झाले सावध

विशेष म्हणजे, ही चिंता केवळ मानसशास्त्रज्ञ किंवा शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत नाहीत. तंत्रज्ञान विकसित करणार्‍या कंपन्याही आता अधिक जबाबदार भूमिका घेऊ लागल्या आहेत. मायक्रोसॉफ्टने आपल्या को-पायलट प्रणालीमध्ये वापरकर्त्यांनी एआयच्या उत्तरांची पडताळणी करावी, त्यावर चिकित्सक दृष्टीने विचार करावा, असा स्पष्ट सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. याच उद्देशाने कंपनीने ‘सॉक्रेटिक’ पद्धतीवर आधारित काही फिचर्स विकसित केली आहेत. या पद्धतीत एआय सरळ उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न विचारतो, पर्याय सुचवतो आणि वापरकर्त्याला स्वतः विचार करून उत्तरापर्यंत पोहोचण्यास प्रवृत्त करतो. यामागील उद्देश स्पष्ट आहे. एआयने उत्तर द्यावे; पण विचार करण्याची जबाबदारी माणसाकडून हिरावून घेऊ नये.

उपाय काय? बंदी की संतुलित वापर?

एआयचा विरोध करणे हा या समस्येचा उपाय नाही. उलट त्याचा योग्य वापर शिकणे हीच खरी गरज आहे. एआय हा सहायक असावा. पर्याय नव्हे. माहिती मिळविण्यासाठी त्याचा वापर करावा; पण अंतिम निष्कर्ष स्वतःच्या विवेकाने काढावा. एखाद्या उत्तराची पडताळणी अनेक स्रोतांतून करावी, प्रश्न विचारण्याची सवय जपावी, नियमित वाचन करावे, स्वतः लेखन करावे आणि समस्या स्वतः सोडविण्याचा प्रयत्न करावा.

शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी एकत्र येऊन एआयच्या जबाबदार वापरासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करणेही तितकेच आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना एआयचा वापर ‘उत्तर मिळविण्यासाठी’ नव्हे, तर ‘समज वाढविण्यासाठी’ कसा करायचा, याचे प्रशिक्षण देणे, ही काळाची गरज ठरत आहे.

विचारशक्ती जपणे हीच खरी प्रगती

एआय हे निःसंशयपणे मानवी प्रगतीचे शक्तिशाली साधन आहे; परंतु कोणतेही साधन तेवढ्याच मर्यादेत उपयुक्त ठरते, जोपर्यंत त्याचे नियंत्रण वापरणार्‍याच्या हातात असते. विचार करण्याचे, प्रश्न विचारण्याचे, शंका घेण्याचे आणि सत्य पडताळून पाहण्याचे काम आपण पूर्णपणे यंत्रांकडे सोपविले, तर आपण माहितीने समृद्ध पण विवेकाने बेताचा असणारा समाज निर्माण करण्याचा धोका पत्करत आहोत.

येणारा भविष्यकाळ एआयचा असेल, यात शंका नाही; पण त्या भविष्यामध्ये मानवी बुद्धिमत्ता केवळ एआयची ग्राहक बनणार की तिची दिशा ठरविणारी शक्ती राहणार, हे आज आपण घेत असलेल्या निर्णयांवर अवलंबून असेल. तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक आहे; परंतु त्याहून अधिक आवश्यक आहे तो स्वतःच्या विचारशक्तीवरचा विश्वास जपणे. कारण, यंत्रे माहिती देऊ शकतात; परंतु विवेक, सर्जनशीलता आणि मूल्याधिष्ठित निर्णय क्षमता ही मानवी मेंदूचीच वैशिष्ट्ये आहेत आणि ती जपणे हीच खरी प्रगती ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news