

अनुराधा कदम
कुटुंबाची चौकट बदलते आहे आणि त्यासोबत पालकत्वाची व्याख्याही नव्याने आकाराला येत आहे. कुटुंबाची खरी समृद्धी घरात किती माणसं आहेत यात नसते, तर त्या घरात एकमेकांसाठी किती मनं उपलब्ध आहेत, यात असते. आजच्या काळात एकल पालकत्वाचा विचार करताना ‘आई की वडील’ हा प्रश्नही मागे पडायला हवा. कारण, आई असो वा वडील, दोघांचीही लढाई वेगळी असली, तरी मुलासाठी उभं राहण्याची जिद्द समान असते.
एक आई मुलाला थोपटत झोपवत असेल तेव्हा दिवसभर नोकरी, घर, मुलाची शाळा, अभ्यास, आजारपण, खर्च, भविष्याची चिंता आणि या सगळ्याच्या पलीकडे स्वतःच्या मनाशी सुरू असलेली झुंज… अशा कितीतरी विचारातून जात असेल. एका आईकडून दिवसभरात किती आयुष्यं जगली जात असतील? आपले बाबा सोबत का राहत नाहीत, असं वाटत असेल ना मुलग्याला? याच वेळी दुसऱ्या एखाद्या घरात एक वडील मुलीच्या केसांची वेणी घालत असतील, तिच्या शाळेच्या प्रकल्पासाठी साहित्य आणत असतील, डब्याची तयारी करत असतील आणि ऑफिसची वेळ सांभाळण्यासाठी घड्याळाकडे पाहत असतील. मुलगी शाळेत गेल्यावर त्यांना तिच्या अभ्यासाचीच नव्हे, तर तिच्या मनाचीही काळजी असेल. 'तिला आईची उणीव भासतेय का?', 'तिच्याशी काही बोलायचं राहून तर जात नाही ना?' अशा प्रश्नांनी कदाचित त्यांच्याही मनात वादळं उठत असतील. दृश्यं वेगळी; पण संघर्षाचा गाभा एकच. अपत्याला वाढवताना आई आणि वडील दोघांच्या भूमिका निभावून नेणे. एकट्याने कुटुंबाचं आभाळ पेलणारा एकल पालकत्व हा समाजाचा नवा आरसा ठरत आहे.
एकल पालकत्व ही आता एखाद्या अपवादात्मक कुटुंबाची गोष्ट राहिलेली नाही. घटस्फोट, विभक्त राहण्याचे निर्णय, जोडीदाराचे निधन, वैवाहिक नात्यातील ताणतणाव, किंवा इतर कौटुंबिक परिस्थिती यामुळे अनेक आई-वडील मुलांची जबाबदारी एकट्याने सांभाळताना दिसतात. त्यामुळे ‘एकल पालक’ म्हटलं की, केवळ एकटी आई डोळ्यांसमोर आणणं हे या वास्तवाचं अर्धवट चित्र आहे. मुलांना एकट्याने वाढवणारे वडीलही या बदलत्या कुटुंबव्यवस्थेचा तितकाच महत्त्वाचा भाग आहेत. एकल पालकत्व या संकल्पनेतून कुटुंबाची पारंपरिक चौकट बदलत आहे, हे लक्षात येते. आई, वडील आणि मुलं एवढ्यापुरती कुटुंबाची व्याख्या अनेक वर्षं परिचित होती. आज मात्र कुटुंबांची रचना अधिक विविधपूर्ण झाली आहे. काही घरांमध्ये आई-वडील असूनही वेगवेगळे राहतात. काही घरांमध्ये एक पालक आणि एक किंवा दोन अपत्ये असतात. कुटुंबाची चौकट बदलते आहे आणि त्यासोबत पालकत्वाची व्याख्याही नव्याने आकाराला येत आहे. या बदलाकडे आपण अजूनही जुन्या मापदंडांनी पाहणार की सामाजिक वास्तव म्हणून स्वीकारणार, हा प्रश्न आता अधिक महत्त्वाचा आहे.
एकल पालकत्वातील सर्वांत मोठी कसरत असते ती जबाबदाऱ्यांची सांगड घालण्याची. दोन पालक असतील, तर एखादा आजारी पडला, एखाद्याला ऑफिसमध्ये अडचण आली किंवा मुलाच्या शाळेत महत्त्वाचा कार्यक्रम असेल, तर दोघांपैकी कुणीतरी परिस्थिती सांभाळू शकतं. एकल पालकाच्या आयुष्यात मात्र प्रत्येक आकस्मिक प्रसंगाचा परिणाम थेट त्याच्यावर होतो. सकाळचा डबा, मुलाला शाळेत सोडणं, नोकरी, घर खर्च, अभ्यास, डॉक्टर, शाळेची पालकसभा, गृहपाठ, बाजारहाट, घरातील दुरुस्ती, फी, विमा, भविष्यासाठीची बचत आणि त्याच वेळी मुलाच्या चेहऱ्यावरचा बदल ओळखणं ही यादी संपतच नाही. एकल आईसाठी ही कसरत अनेकदा आर्थिक आणि सामाजिक दबावासह येते. कमावणं आवश्यक असतं; पण घर आणि मुलाची जबाबदारीही तिचीच असते. मुलगा आजारी पडला, तर रजा घ्यावी लागते. शाळेत कार्यक्रम असेल, तर ऑफिसमधून वेळ काढावा लागतो. अचानक मोठा खर्च आला, तर बजेट पुन्हा आखावं लागतं. स्वतःच्या गरजा पुढे ढकलण्याची सवय अनेकदा तिच्या जगण्याचा भाग बनते. एकल वडिलांचं जगणंही वेगळ्या प्रकारच्या आव्हानांनी भरलेलं असतं. घरकाम, स्वयंपाक, मुलांची दिनचर्या, शाळेतील उपक्रम, मुलीच्या पौगंडावस्थेतील बदल, तिच्या भावनिक प्रश्नांशी संवाद या सगळ्याबाबत पुरुषाला ‘हे काम स्त्रीचं’ असं शिकवणाऱ्या सामाजिक चौकटीतून बाहेर पडावं लागतं.
मुलगी पहिल्यांदा मासिक पाळीबद्दल बोलते तेव्हा काय सांगायचं, मुलगा मनाने खचलेला दिसतो तेव्हा त्याच्याशी संवाद कसा साधायचा, शाळेतील पालकसभेत आई-वडिलांच्या उपस्थितीची अपेक्षा असताना स्वतःची भूमिका कशी सहजपणे स्वीकारायची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकट्या वडिलांनाही शोधावी लागतात. म्हणून ‘हे पुरुषाला कसं जमणार’ हा प्रश्न विचारण्यापेक्षा ‘हे पालकत्व आहे, मग पुरुषाला का जमणार नाही’ या प्रश्नाचे आत्मभान आता समाजमनालाही येणे गरजेचे आहे. कारण, पालकत्वाला लिंग नसतं. आई शिस्त लावू शकते आणि वडील भावनिक आधार देऊ शकतात. आई आर्थिक निर्णय घेऊ शकते आणि वडील घरातील दैनंदिन जबाबदाऱ्या पेलू शकतात. मुलाच्या आयुष्यातील ‘आईची भूमिका’ आणि ‘वडिलांची भूमिका’ अशा दोन चौकटी करण्यापेक्षा त्याला सुरक्षितता, माया, शिस्त, संवाद आणि विश्वास देणारा पालक महत्त्वाचा असतो.
एकल पालकत्वाचा सर्वांत नाजूक पैलू मात्र मुलांच्या मनाचा. मुलांना घरातील बदल समजत नाहीत, असं मोठ्यांना वाटतं. प्रत्यक्षात मुलं शब्दांपेक्षा वातावरण अधिक बारकाईने वाचतात. शाळेत मित्रांच्या पालकांशी स्वतःच्या कुटुंबाची तुलना होते. ‘मदर्स डे’ किंवा ‘फादर्स डे’च्या उपक्रमांमध्ये स्वतःच्या कुटुंबाची वेगळी रचना जाणवते. एखादा मित्र सहज विचारतो, तुझे बाबा कुठे आहेत? किंवा मैत्रीण विचारते , तुझी आई तुझ्यासोबत का राहत नाही? आणि एका साध्या प्रश्नाने मुलाच्या मनात असंख्य विचारांचे दरवाजे किलकिले होतात; पण मुलाला पालक एक आहे म्हणून त्रास होतो असं नाही. त्याला अधिक त्रास होतो तो असुरक्षिततेचा. घरात सतत संघर्ष असेल, एका पालकाविषयी दुसरा पालक कटुता निर्माण करत असेल, पालकाच्या वैयक्तिक दुःखाचं ओझं मुलाच्या मनावर टाकलं जात असेल, तर परिस्थितीचा परिणाम मुलावर होऊ शकतो. याउलट घरात संवाद, प्रेम, स्थैर्य आणि स्वीकार असेल, तर एकल पालकत्वात वाढणारं मूलही तितक्याच आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतं. काही मुलांमध्ये परिस्थितीमुळे स्वावलंबन, संवेदनशीलता, जबाबदारी आणि संकटांशी जुळवून घेण्याची क्षमता लवकर विकसित होते.
मात्र, इथेही एक सूक्ष्म सीमारेषा आहे. मुलाला परिस्थितीची जाणीव करून देणं आणि त्याच्यावर परिस्थितीची जबाबदारी टाकणं यात फरक आहे. आईसाठी मला मजबूत राहायला हवं, बाबांना माझ्यामुळे आणखी त्रास होऊ नये, अशा भावनेतून काही मुलं स्वतःच्या भावनांना, इच्छांना मुरड घालतात. पालकाच्या संघर्षाची जाणीव मुलाला असावी; पण त्या संघर्षाची किंमत त्याने आपलं बालपण गमावून चुकवू नये, हेही तितकच खरं. एकल पालकत्वासोबत वाढणाऱ्या मुलांबाबत हा विचार थोडा अधिक प्रकर्षाने करण्याची गरज आहे. 'तूच माझा आधार आहेस', 'तुझ्यासाठी मी सगळं केलं' किंवा ‘तू नसतास तर माझं काय झालं असतं' ही वाक्यं प्रेमातून जन्माला येतात; पण नकळत मुलाच्या मनावर अपराधगंडाचं ओझं ठेवू शकतात. मुलाने पालकाच्या आयुष्याची भावनिक जबाबदारी उचलण्याऐवजी त्याला स्वतःचं आयुष्य जगण्याची मोकळीक मिळणं आवश्यक आहे.
एकल पालकत्वाभोवतीचा आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे समाजाची नजर. म्हणजे परिस्थिती बदलते; पण समाजाच्या चौकटी तितक्या वेगाने बदलत नाहीत. कदाचित म्हणूनच एकल पालकांना समाजाकडून, नातेवाईकांकडून सहानुभूतीपेक्षा स्वीकाराची गरज आहे. त्यांना सतत ‘बिचारा’ किंवा ‘बिचारी’ म्हणून पाहण्याची गरज नाही. त्यांच्या आयुष्याचा इतिहास उलगडून पाहण्याचा अधिकार समाजाला नाही. त्यांना हवी आहे ती समानतेची वागणूक, सुरक्षित सामाजिक वातावरण आणि आवश्यक वेळी मिळणारी संवेदनशील मदत.
शाळांनीही या बदलत्या वास्तवाचा विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक कुटुंबात आई-वडील दोघेच असतील, या गृहितकातून शालेय उपक्रम आखणे आता पुरेसं नाही. शाळेच्या फॉर्मपासून पालकसभेपर्यंत, विविध कार्यक्रमांपासून संवादाच्या पद्धतीपर्यंत कुटुंबांच्या बदलत्या रचनेला जागा देणं आवश्यक आहे. कार्यालयीन कामाच्या ठिकाणीही एकल पालकांसाठी लवचिकता महत्त्वाची आहे. मुलाच्या आजारपणात रजा, शाळेच्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी वेळ, आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य या सुविधा ‘विशेष सवलत’ नसून बदलत्या सामाजिक वास्तवाची गरज म्हणून पाहायला हव्यात.
एकल पालकत्व ही मात्र केवळ संघर्षाची कथा नाही. अनेकदा ती स्वतःला पुन्हा उभं करण्याचा प्रवास असतो. परिस्थितीने आयुष्याची दिशा बदलली, तरी अनेक आई-वडील मुलांसोबत नव्याने जगणं शिकतात. काही करिअरमध्ये पुढे जातात, काही व्यवसाय उभा करतात, काही शिक्षण पूर्ण करतात, तर काही स्वतःच्या अस्तित्वाकडे नव्याने पाहू लागतात. मुलंही या प्रवासाची साक्षीदार असतात. त्यांना पालकांच्या अडचणी दिसतात; पण त्याचबरोबर प्रयत्न करण्याची वृत्ती, पडून पुन्हा उभं राहण्याची ताकद आणि परिस्थितीसमोर न झुकण्याची जिद्दही दिसते. म्हणून एकल पालकत्वाकडे पाहताना ‘त्या मुलाचं काय होणार’ हा प्रश्न विचारण्यापेक्षा ‘त्या मुलाला आपण काय देऊ शकतो’ हा प्रश्न पालकत्वाच्या दृष्टिकोनातून अधोरेखित होतो. कारण, मुलाच्या आयुष्यावर कुटुंबाची रचना परिणाम करते; पण त्याहून खोल परिणाम होतो तो घरातील भावनिक वातावरणाचा. दोन पालक असलेलं प्रत्येक घर आनंदी असेलच असं नाही. तसेच एका पालकाचं घर दुःखी असेलच असंही नाही. काही मुलं दोन पालकांच्या उपस्थितीतही भावनिकदृष्ट्या एकटी असतात, तर काही मुलांना एका पालकाच्या घरातही अमाप माया, सुरक्षितता आणि आत्मविश्वास मिळतो.
म्हणून पालकांची संख्या हा मुलाच्या भवितव्याचा अंतिम निकष असू शकत नाही. कुटुंबाची खरी समृद्धी घरात किती माणसं आहेत यात नसते, तर त्या घरात एकमेकांसाठी किती मनं उपलब्ध आहेत, यात असते. आजच्या काळात एकल पालकत्वाचा विचार करताना ‘आई की वडील’ हा प्रश्नही मागे पडायला हवा. कारण, आई असो वा वडील, दोघांचीही लढाई वेगळी असली, तरी मुलासाठी उभं राहण्याची जिद्द समान असते.
एका आईला स्वतःचा थकवा लपवून मुलाच्या चेहऱ्यावरचं हसू जपावं लागतं. एका वडिलांना स्वतःच्या असहायतेवर मात करून मुलाच्या मनाला धीर द्यावा लागतो. दोघांनाही आर्थिक चिंता असतात, सामाजिक प्रश्न असतात, भविष्याची काळजी असते आणि कधी कधी स्वतःच्या एकटेपणाशीही सामना करावा लागतो, तरीही या सगळ्याच्या पलीकडे एक स्वप्न असतं, आपल्या अपत्याने भविष्यात स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःचे निर्णय घ्यावेत आणि आयुष्याकडे भीतीने नव्हे, तर विश्वासाने पाहावं. कदाचित एकल पालकत्वाची खरी ताकद हीच आहे की परिस्थितीने पालकाला एकटं केलं असलं, तरी त्या परिस्थितीत मुलाला एकटं पडू न देणं. म्हणून एकल पालकत्वाकडे ‘अपूर्ण कुटुंब’ म्हणून पाहण्याची गरज नाही. ते बदलत्या समाजाचं वास्तव आहे. कुटुंबाच्या पारंपरिक चौकटीपलीकडे उभं राहिलेलं एक नवं घर आहे आणि त्या घरात पालक एक असला, तरी मायेची, सुरक्षिततेची आणि स्वप्नांची जागा कमी असायलाच हवी, असं नाही.
शेवटी एकल पालकत्वासोबत वाढलेल्या मुलगा किंवा मुलगीला त्याच्या घरात किती पालक होते, हे आठवत नाही, तर त्याला आठवतं ते अडचणींच्या प्रत्येक वळणावर एकट्या आईने किंवा एकट्या बाबांनी त्याचा हात धरला होता... आणि तो हात, परिस्थिती कोणतीही असो, कधीच सुटला नव्हता. एकल पालकत्वाच्या यशाचा सर्वात अविस्मरणीय क्षण इथेच असतो.