टेलिग्राम संकटात का?

टेलिग्रामवरून प्रसारित होणार्‍या मजकुरावर नियंत्रण व नियमनाचा अभाव
Telegram is temporarily or permanently banned in 31 countries
टेलिग्राम संकटात का? Pudhari File Photo
Published on
Updated on
महेश कोळी, आय.टी. तज्ज्ञ

टेलिग्रामवरील समाजविघातक, गुन्हेविषयक मजकूर काढून टाकण्यात अपयशी ठरल्याच्या कारणावरून या सोशल मीडिया व्यासपीठाचा संचालक पॉवेल डुरोव्ह याला फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. या अटकेने आता एक वादळ निर्माण झाले आहे. वास्तविक टेलिग्रामला 31 देशांत तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपात बंदीचा सामना करावा लागला आहे. आज टेलिग्राम जगभरातील एक अब्ज वापरकर्त्यांच्या हातात पोहोचत आहे. पण त्यावरून प्रसारित होणार्‍या मजकुरावर नियंत्रण व नियमनाचा अभाव आहे.

Telegram is temporarily or permanently banned in 31 countries
टेलिग्राम आणि यूट्यूब वापरणे आता होणार अधिक सोपे; जाणून घ्या नवीन फीचर्स

जवळपास दहा वर्षांपूर्वी रशियाने पॉवेल डुरोव्ह निर्मित सोशल मीडियावरील एक पेज बंद करण्याबाबत दबाव आणला होता. हे पेज विरोधी पक्षाच्या नेत्यांचे होते आणि ते ‘व्हीकाँटॅक्ट’ या फेसबुकच्या धर्तीवर सुरू झालेल्या एका सोशल मीडियावर बनवण्यात आले होते. रशियाच्या दबावाला डुरोव्हने ऑनलाईन विश्वातच परखडपणे उत्तर देत एक हुडी घातलेला आणि जीभ बाहेर काढणारा श्वान असलेला फोटो शेअर केला आणि ‘सोशल मीडियावर समूहांना ब्लॉक करण्याची मागणी करणार्‍या रशियाच्या गुप्तचर सेवांना अधिकृत प्रतिक्रिया’ असे लिहिले. हाच डुरोव्ह पुढे ‘टेलिग्राम’ या सोशल मीडियाचा मुख्याधिकारी आणि संस्थापक बनला. आता 13 वर्षांनंतर याच सत्ताविरोधी प्रवृत्तीमुळे डुरोव्ह अडचणीच्या नव्या स्थितीत ढकलला गेला आहे. काही दिवसांपूर्वी त्याला टेलिग्रामवरील समाजविघातक, गुन्हेविषयक मजकूर काढून टाकण्यात अपयशी ठरल्याच्या कारणावरून फ्रान्समध्ये अटक करण्यात आली.

टेलिग्राम हे एक ऑनलाईन व्यासपीठ असून या माध्यमातून 2013 मध्ये त्याने सोशल मीडियाच्या जगात पाऊल टाकले. आज हे व्यासपीठ जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी डुरोव्हच्या अटकेचा उल्लेख करत फ्रान्स हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी गंभीर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. वास्तविक कायद्याचे काटेकोर पालन करणार्‍या देशात सोशल मीडियावरचे जग आणि प्रत्यक्षातील जीवन या दोन्हीत दिसणार्‍या स्वातंत्र्याला मात्र कायद्याच्या चौकटीतच ठेवले जाते. डुरोव्हच्या अटकेने आता एक वादळ निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सरकारी सेन्सॉरशिपसंदर्भात वेळोवेळी चिंता व्यक्त करणार्‍या मंडळीत डुरोव्ह नायक म्हणून नावारूपास आला आहे.

प्रामुख्याने जागतिक पातळीवर ऑनलाईन घडामोडींवरील देखरेख वाढलेली असताना डुरोव्हचे पाठीराखेही तितकेच वाढले आहेत. ‘एक्स’चे मालक एलॉन मस्क आणि एडवर्ड स्नोडेन यांनी डुरोव्हचा बचाव करण्यात पुढाकार घेतला आहे. यादरम्यान ‘एक्स’वर ‘फ्री पॉवेल’ या हॅशटॅगची सर्वत्र छाप पडली होती. या पार्श्वभूमीवर टेलिग्रामने जारी केलेल्या निवेदनात आपले माध्यम युरोपीय संघाच्या कायद्याचे पालन करते. आपले प्लॅटफॉर्म किंवा कंपनीचे पालक या प्लॅटफॉर्मच्या दुरुपयोगाबद्दल जबाबदार असल्याचा दावा बिनबुडाचा आहे, असे स्पष्टपणे सांगितले. पॉवेल डुरोव्ह याच्यासाठी वाद आणि कायदेशीर खटले या काही नवीन गोष्टी नाहीत. ‘टेलिग्राम’सारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यानंतर तो कोणत्या ना कोणत्या वादात सतत सापडला आहे. टेलिग्राम हे दीर्घकाळापासून संस्थापक डुरोव्हच्या सत्ताविरोधी जनमताशी आणि स्वतंत्र अभिव्यक्तीशी नेहमीच कटिबद्ध राहिले आहे. या भूमिकेमुळेच टेलिग्राम हे रशिया, इराण, सत्ताधारी लोकांशी संबंधित राहणार्‍या अन्य लोकांसाठी एक लोकप्रिय चॅट अ‍ॅप म्हणून नावारूपास येण्यास मदत झाली. परंतु या प्लॅटफॉर्मवर देखरेख न करण्याच्या डुरोव्हच्या द़ृष्टिकोनाने दहशतवादी, कट्टरपंथीय, शस्त्र तस्कर, गैरव्यवहार करणारे आणि अमली पदार्थाच्या तस्करांना आकर्षित केले. यासंदर्भातही टेलिग्राम असे म्हणते की, गोपनीयता ही ऑनलाईन अभिव्यक्तीवरील देखरेखीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.

अलीकडेच डुरोव्ह याने एका पोस्टमध्ये आपण 15 वर्षांत शुक्राणू दाताच्या रूपाने 12 देशांत शंभरपेक्षा अधिक जैविक मुलांना जन्म दिला असल्याचे म्हटले होते; मात्र डुरोव्हच्या अजेंड्यावर टेलिग्रामच राहिले आहे. 2014 मध्ये रशियाच्या सुरक्षा संस्थांची वाढती करडी नजर पाहता त्याने रशियाला सोडचिठ्ठी दिली अणि दुबईत बस्तान हलविले. सरकारने आपल्या व्यवसायात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका डुरोव्ह याने मांडली. यानंतरच त्याचा कंटेंटवरील नियंत्रणासंदर्भात अ‍ॅपल आणि प्रमुख सरकारशी संघर्ष सुरू झाला.

टेलिग्रामला 31 देशांत तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपात बंदीचा सामना करावा लागला आहे. डुरोव्हने टेलिग्रामच्या एका प्रोग्रॅमरला एफबीआयने कामावर ठेवण्याच्या प्रयत्न केल्याचा आरोप केला. या आधारावर टेलिग्रामच्या वापरकर्त्यांच्या डेटापर्यंत सहजपणे पोहोचण्याचा अमेरिकन सरकारचा डाव असल्याचे डुरोव्ह याचे म्हणणे होते. विशेष म्हणजे एफबीआयने या आरोपावर कोणतेही उत्तर दिलेले नाही.

1984 मध्ये सोव्हिएत रशियात जन्मलेला डुरोव्ह हा चार वर्षाचा असताना आपल्या कुटुंबीयांसह उत्तर इटलीत स्थलांतरित झाला. 1990 च्या दशकाच्या प्रारंभी सोव्हिएत रशियाचे पतन झाल्यानंतर तो सेंट पिटस्बर्ग येथे परतला. कॉलेजमध्ये एका मित्राने डुरोव्ह याला फेसबुकची बाल्यावस्थेतील आवृत्ती दाखविली. मार्क झुकेरबर्ग या नवतरुणाने फेसबुकची पायाभरणी केली होती. या प्लॅटफॉर्मपासून प्रेरणा घेत डुरोव्ह याने स्वत:चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा निर्धार केला. त्याने 2006 मध्ये ‘व्हीके’ची सुरुवात केली आणि काही काळातच हे माध्यम रशियात लोकप्रिय ठरले. एवढेच नाही तर क्रेमलिनचेदेखील या माध्यमाने लक्ष वेधून घेतले. क्रेमलिनने ‘व्हीके’च्या वापरकर्त्यांची माहिती मागितली. तेथेच डुरोव्ह याला रशियाच्या हेतूबद्दल शंका आली. डुरोव्ह याच्या मते, 2011 च्या काळात रशियाच्या सुरक्षा दलाने त्याच्या घराजवळ गस्त घालण्यास सुरुवात केली तेव्हाच त्यांचे मनसुबे कळू लागले. त्याचवेळी डुरोव्ह याने टेलिग्रामची सुरुवात केली. डुरोव्ह याचा अंदाज खरा ठरला. रशियन सरकारने त्याला व्हीके वापरकर्त्यांचा डेटा द्यावा आणि देश सोडून जावे असा अल्टीमेटम दिला. रशियाशी नाते तोडल्यानंतर डुरोव्ह टेलिग्राम अभियंत्यांच्या घोळक्यात राहू लागला. डुरोव्ह याने काही महिने राहण्याची जागा सतत बदलत ठेवली. कधी बार्सिलोना, बाली, बर्लिन, हेलसिंकी तर कधी सॅनफ्रान्सिस्को अशी भटकंती करत काही काळ घालविला. डुरोव्ह याच्याकडे संयुक्त अरब अमिराती आणि फ्रान्सचे नागरिकत्व आहे. अर्थात तो खासगी विमानाने प्रवास करतो. मात्र बाजारात जाण्यापासून तो लांब राहतो. जगभरात फिरण्यासाठी तो स्वत:च्या खात्यात कोट्यवधी डॉलर आणि बिटकॉईन बाळगतो. ब्लूमबर्गच्या अंदाजानुसार त्याची एकूण मालमत्ता नऊ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे.

टेलिग्राम आज जगभरातील एक अब्ज वापरकर्त्यांच्या हातात पोहोचले आहे. हा आकडा ‘एक्स’ला मागे टाकणारा आहे. टेलिग्रामचा वापर जसजसा वाढत गेला, तसतशी यातील कंटेंटवरील देखरेख ठेवण्याची डुरोव्ह याची यंत्रणा किती कुचकामी आहे, याबाबत टीका होऊ लागली. धोरणकर्ते, कायद्याची अंमलबजावणी करणारे, सुरक्षा दले यांनी या निष्काळजीपणाबद्दल टेलिग्रामला अनेकदा इशारे दिले. हे अ‍ॅप चुकीची माहिती, दहशतवादाचा प्रसार, कट्टरपंथीय विचासरणीचा प्रसार, अमली पदार्थांच्या तस्करीसाठीचे संप्रेषण, चाईल्ड पोर्नोग्राफी आणि बेकायदा शस्त्रविक्रेते यांचा अड्डा ठरला आहे, असे आरोप होऊ लागले. चौकशीचा ससेमिरा असतानाही डुरोव्हने अनेक वर्षे सिलिकॉन व्हॅलीतील आपल्या साथीदारांप्रमाणेच शासकीय यंत्रणांपासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी झुकेरबर्ग, गुगलचे सुंदर पिचाई, टिकटॉकचे शू च्यू यांना अमेरिकी संसदेसमोर बोलण्यासाठी पाचारण करण्यात आलेले होते. डुरोव्ह आणि त्याच्या अभियंत्यांनी चालता बोलता ‘टेलिग्राम’ला सक्रिय ठेवले आणि अपडेट करत राहिले. एकदा तर ईशान्य आशियातील समुद्रात एका नौकेतून प्रवास करताना टेलिग्रामच्या अभियंत्यांनी हे अ‍ॅप अपडेट केले होते. गेल्या काही वर्षांत टेलिग्रामने बर्‍यापैकी वादग्रस्त मजकूर वगळला आहे. त्यात लैंगिंक शोषण किंवा हिंसेला चिथावणारी देणार्‍या पोस्टस्चा समावेश आहे. परंतु आजही या माध्यमाचा वापर अवैध कृत्यांसाठी मोठ्या प्रमाणावर होतो हे वास्तव आहे.

पेपरफुटीच्या प्रकरणात टेलिग्रामचा वापर

भारतातही याबाबत अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठीच्या नीट-यूजी 2024 परीक्षेचे पेपर फुटल्याचे प्रकरण बरेच गाजले. याबाबत बिहार, हरियाणा, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आदी राज्यांतून अनेकांची धरपकड झाली. या प्रकरणाच्या चौकशीत टेलिग्राम अ‍ॅपवरून फोडण्यात आलेल्या पेपरचे वितरण झाल्याची माहिती पुढे आली. पेपर फोडणार्‍या रॅकेटने किमान 700 विद्यार्थ्यांकडून 200 ते 300 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट ठेवले होते. अनेक विद्यार्थ्यांना टेलिग्रामवरूनच परीक्षेच्या दोन तास आधी प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या. टेलिग्रामवरूनच प्रश्नपत्रिकांचा ‘व्यवहार’ झाला होता. याखेरीज पायरसी उद्योगासाठीही टेलिग्राम सहाय्यभूत ठरले आहे. टेलिग्रामच्या असंख्य चॅनेलवर हॉलीवूड, साऊथ सिनेमे, इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये डब केलेले सिनेमे, नवे रिलिज झालेले पायरेटेड सिनेमे यूजर्सना विनामूल्य डाऊनलोड करून बघता येतात. पायरेटेड कंटेंटसोबतच पोर्नोग्राफी, वुमन-चाईल्ड सेक्शुअल अब्युजिंग कंटेंटही टेलिग्रामच्या वेगवेगळ्या चॅनेलवरून पसरवला जातो. टेलिग्रामचे काही चॅनेल तर असे आहेत, ज्यावरून ड्रग्जची खरेदी-विक्रीही चालते. ह्युमन ट्रॅफिकिंगचे व्यवहारही होतात. जुगाराच्या लिंक शेअर करून अनेकांना आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात ओढले जाते. खंडणीखोरी, हेट स्पीच, जातीय द्वेष, दहशतवादी कारवाया असे अनेक भयंकर उद्योग टेलिग्राम प्लॅटफॉर्मचा वापर करून चालत असल्याचे अनेक देशांनी केलेल्या चौकशीत उघड झालंय.

गेल्या वर्षी केंद्राच्या माहिती तंत्रज्ञान आणि प्रसारण मंत्रालयाने ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटिसा जारी केल्या होत्या, त्यात टेलिग्रामच्या नावाचाही समावेश होता. टेलिग्रामच्या यूजर्सना सिक्रेट चॅटचा तसेच आपला नंबर लपवण्याचा पर्याय मिळतो. अशा एक ना अनेक पर्यायांमुळे गोपनीय काम करणार्‍यांमध्ये टेलिग्राम प्रसिद्ध होत गेले. डार्क वेबच्या विश्वातही टेलिग्राम यामुळेच लोकप्रिय आहे. गोपनीयतेच्या बाबतीत नेहमीच सजग असलेल्या युरोपियन युनियनने टेलिग्रामचा सीईओ पॉवेल डुरोव्ह याला कंटेंटवर नियंत्रण ठेवण्याविषयी अनेकदा इशारे जारी केले होते, परंतु याकडे त्याने नेहमीच दुर्लक्ष केले. पण त्यामुळेच त्याला अटक करण्यात आली. या अटकेनंतर अद्याप तरी टेलिग्राम सुव्यवस्थित सुरू आहे. उद्याच्या भविष्यात काय होईल हे मात्र सांगता येणार नाही!

Telegram is temporarily or permanently banned in 31 countries
पुणे : आता विद्या प्राधिकरणाचेही ’टेलिग्राम’ चॅनेल; पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार लाभ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news