

शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल मागील आठवड्यात जाहीर करण्यात आला. त्यात फक्त 3.38 टक्के उमेदवार पात्र ठरले आहेत. येणार्या काळात उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षकांची मागणी देशात सातत्याने वाढत जाणार आहे. मात्र, त्यासाठीची व्यवस्था आपण उभारू शकलो नाही, तर भविष्यात शिक्षण क्षेत्रात अनेक गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. हा निकाल नेहमीप्रमाणेच तीन ते चार टक्क्यांच्या पुढे गेला नाही. यापूर्वी शिक्षक भरतीसाठी केवळ शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असली, तरी सहजपणे शिक्षक होता येत होते. मात्र, केंद्र सरकारने केलेल्या बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 च्या कायद्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली. तेव्हापासून देशभरामध्ये या परीक्षेला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, नोकरीच्या शोधात असलेल्या आणि शैक्षणिक पात्रता धारण करणार्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेची गरज भासू लागली. त्यामुळे ही परीक्षा देणार्या परीक्षार्थ्यांच्या संख्येत वाढ होत गेली. मात्र, पात्रता परीक्षेच्या निकालाचा आलेख अजूनही फारसा उंचावू शकला नाही, हे वास्तव आहे. या निकालाचा अर्थ शिक्षणशास्त्र अध्यापक विद्यालयाचा दर्जा घसरला आहे का? की, शिक्षणशास्त्र अध्यापक विद्यालय आणि महाविद्यालयांत प्रवेश घेणारे विद्यार्थी केवळ पदवीसाठी शिक्षण घेत आहेत, असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. अंतिम निकालाचा विचार करता, पहिली ते पाचवी गटासाठी आणि सहावी ते आठवी गटासाठीच्या परीक्षेचा निकाल लक्षात घेता, 3.38 टक्के उमेदवार पात्र ठरले आहेत. या परीक्षेला राज्यातून एकूण 3 लाख 53 हजार 952 परीक्षार्थ्यांपैकी 11 हजार 168 जण पात्र ठरले होते. पहिली ते पाचवी गटासाठी 1 लाख 52 हजार 605 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यातील 4 हजार 709 उमेदवार पात्र ठरले. पेपर 2 गणित, विज्ञान या विषयांच्या सहावी ते आठवीच्या गटासाठी 75 हजार 599 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील 21 हजार 414 विद्यार्थी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. पेपर 2 सामाजिकशास्त्र सहावी ते आठवी गटासाठी 1 लाख 25 हजार 748 विद्यार्थी उमेदवार प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 4,045 उमेदवार पात्र ठरले आहेत. या परीक्षेचा निकाल इतका कमी का लागतो, याचा विचार करण्याची गरज आहे. गेली काही वर्षे निकाल कमी लागतो आहे. पदवी असूनही पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी असल्याने या अभ्यासक्रमांकडे असणारा विद्यार्थ्यांचा ओढा हळूहळू कमी होत चालला आहे.
शासनाच्या वतीने पहिल्या गटासाठी शिक्षणशास्त्र पदविका डीटीएड प्रवेश होताना इयत्ता बारावीनंतर गुणवत्तेच्या आधारे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतात. हे प्रवेश देताना 45 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांची अट कायम आहे. शिक्षणशास्त्र महाविद्यालयासाठी अर्थात बीएडसाठी सर्व शाखांतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येते. ती परीक्षा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतरच शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश दिले जातो. असे असताना शिक्षणशास्त्राच्या द़ृष्टीने भविष्याची वाट दिवसेंदिवस कठीण का बनत चालली आहे? त्याचाही विचार करण्याची वेळ आता आली आहे.
एकीकडे शिक्षणाची गुणवत्ता उंचवावी म्हणून शासन विविधस्तरावर प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जाहीर झाल्यानंतर बीएड अभ्यासक्रम शासनाने चार वर्षांचा निश्चित केला आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल लक्षात घेता, शिक्षकांची गुणवत्ता उंचावण्याच्या द़ृष्टीने अजूनही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे समोर येते. शंभर टक्के विद्यार्थ्यांनी पदवी धारण करूनही केवळ 3 ते 4 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात. याचा अर्थ पदवीला मार्क मिळूनही पात्रता परीक्षेसाठीच्या तयारी संबंधित अभ्यासक्रमाचा अभ्यास करताना होत नाही. पदवी धारण करताना घोकमपट्टी, परीक्षेची तयारी आणि गुण यापलीकडे पदवी अभ्यासक्रमातही विचार होताना दिसत नाहीत. त्यामुळे परीक्षेला गुण मिळतात. मात्र, परीक्षेनंतर पात्रता परीक्षेसारख्या त्याच अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेत मात्र उत्तीर्ण होता येत नाही, हे वास्तव लक्षात घेऊन वर्गातील अध्ययन, अध्यापन प्रक्रियेच्या द़ृष्टीने विचार करायला हवा. विद्यार्थ्यांचे विषयज्ञान समृद्ध करण्याबरोबरच उपयोजनात्मक क्षमतांचा विचारही होण्याची आवश्यकता आहे. शेवटी माहितीच्या आधारे ज्ञानासाठीची प्रक्रिया घडली नाही, तर ती केवळ माहितीच राहते. त्या द़ृष्टीने प्रक्रियेसाठी जाणीवपूर्वक पावले टाकायची गरज आहे.
खरे तर पदवी धारण करणारे विद्यार्थी उत्तम दर्जाचे शिक्षक असतीलच, असे नाही. शिक्षक होण्यासाठी शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता गरजेची आहे; पण या पात्रता पुरेशा आहेत, असे नाही. त्यापलीकडे शिक्षक म्हणून संबंधित विषयाचे आशयज्ञान, विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, प्रभावी कथन शैली, त्याचबरोबर सादरीकरण कौशल्य उपयोजन क्षमता यासारख्या कौशल्यांचीदेखील गरज असते. शिक्षणशास्त्र पदविका अथवा पदवी अभ्यासक्रमामध्ये अध्यापन पद्धतीचा जितका गंभीरपणे विचार होतो इतक्या मोठ्या प्रमाणावर उपयोजन कौशल्य आणि आशयज्ञानसमृद्ध करण्याच्या द़ृष्टीने फारसे प्रयत्न होता दिसत नाहीत. सध्याचा प्रचलित असलेला अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी असलेला कालावधी याचे गणित जुळवणेदेखील अवघड आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या प्रात्यक्षिक तासिका, विविध उपक्रम, वर्गातील अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन या सर्व गोष्टी निर्धारित कालखंडात पूर्ण करायच्या असतील, तर सध्याचा निश्चित केलेला कालावधी पुरेसा ठरणार नाही. मुळातच शिक्षक समृद्ध होण्यासाठी वाचन, ग्रंथालय तासिका या द़ृष्टीने फारसे प्रयत्न होत नाहीत. शिक्षक होण्याच्या द़ृष्टीने शिक्षकाची जडणघडण अध्यापक विद्यालयात व महाविद्यालयात वर्तमानात होत नाही.
गेली काही वर्षे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षणशास्त्र अध्यापक विद्यालय व महाविद्यालयांची संख्या निर्माण झाली आहे. विनाअनुदानित स्वरूपाची विद्यालये, महाविद्यालये निर्माण झाली. महाविद्यालयांची संख्या वाढल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे लागणारे अध्यापक, अध्यापकाचार्य यांची उपलब्धता निर्माण करणे मोठे आव्हानात्मक होते. त्यामुळे केवळ पदवी असली तरी नोकरी मिळू लागली होती. अनेकदा आवश्यक असलेल्या सुविधाही उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. परवानगी आली आहे म्हटल्यावर महाविद्यालये सुरू झाली. मात्र, त्यानंतर पुढे गुणवत्तेच्या द़ृष्टीने पावले पडण्याची गरज असताना तसे घडले नाही. हळूहळू याकडील ओढा आटू लागला. कधीकाळी या अभ्यासक्रमांना परीक्षा मंडळाच्या गुणवत्तेच्या यादीत येणारे विद्यार्थी प्रवेश घेत होते. अलीकडे मात्र तसे घडताना दिसत नाही. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा कल कमी होत चालला आहे. नोकरी नाही म्हणून अभ्यासक्रमाला प्रवेश नाही. अभ्यासक्रमाला विद्यार्थी नाहीत म्हणून सुविधा नाही. सुविधा नाही म्हणून गुणवत्ता नाही, असे एका दुष्टचक्रामध्ये हे सर्व सापडलेले आहेत. त्यामुळे एकूण शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम विद्यालय, महाविद्यालयासंदर्भात पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षकांची मागणी देशात सातत्याने वाढत जाणार आहे. ही मागणी पूर्णत्वाला घेऊन जाणारी व्यवस्था आपण उभारू शकलो नाही, तर भविष्यात शिक्षण क्षेत्रात अनेक गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच यासंदर्भाने अधिक विचार करण्याची आवश्यकता आहे.