

श्रीराम ग. पचिंद्रे
जगाच्या इतिहासात टायटॅनिक हे जहाज बहुचर्चित आहे. कधीही न बुडणारे जहाज अशी त्याची जाहिरात करण्यात आली होती. तथापि, स्वीडनच्या वासा नामक युद्धनौकेचा इतिहास हा टायटॅनिकपेक्षा चित्तथरारक आहे. कधीही पराभूत न होणारी युद्धनौका अशी तिची चर्चा होती. समुद्रात बुडून 300 वर्षे समुद्र तळाशीच पडून अगदी जसंच्या तसं राहिलेल्या ‘वासा’ जहाजाची कथा मोठी रंजक आहे.
चारशे वर्षांपूर्वी 1625 मध्ये ऑगस्ट महिन्यात ‘वासा’ जहाजाची बांधणी सुरू झाली. हे जहाज चारशे वर्षांपूर्वीचं अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण असं जहाज आहे. रात्रंदिवस काम करून हे जहाज बांधायला तीन वर्षे लागली. पोलंड-लिथुएनियाशी स्वीडनचं 30 वर्षं यद्ध सुरू होतं. त्या देशांचा दारुण पराभव करण्यासाठी आपल्या नाविक दलात एक भव्य आणि शस्त्रांनी सुसज्ज असे जहाज बांधण्याची स्वीडनचा राजा दुसरा डॉल्फस गुस्तावस याची इच्छा होती, म्हणून त्यानं 226 फूट लांबीचं हे सात मजली जहाज बांधून घेतलं. ‘वासा’वर कांस्य धातूमध्ये ओतवलेल्या 64 तोफा ठेवण्यात आल्या. जहाजावर अनेक नकाशे कोरण्यात आले. प्रामुख्याने हे युरोपचे नकाशे आहेत. अनेक आकृत्या कोरण्यात आल्या. स्वीडनच्या राजघराण्यातील महत्त्वाच्या मंडळींचे पुतळे जहाजावर कोरण्यात आले. स्वीडनच्या राजघराण्याचा इतिहास जहाजावर सर्व बाजूनं कोरलेला आहे. हे शिडाचं जहाज होतं. त्याच्या डोलकाठ्यांसह ते जतन करून ठेवलेलं आहे.
त्या सर्व तोफा, नकाशे, आकृत्या आजही चांगल्या स्थितीत अस्तित्वात आहेत. तोफा ठेवण्यासाठी दोन डेक बनवण्यात आले. अत्यंत मजबूत आणि कशानेही खराब न होणार्या लाकडापासून हे जहाज बांधण्यात आलं. जहाजावर कप्तान, सेनापती, सैनिक, खलाशी अशा विविध पदांवरील 150 स्वीडिश लोक तैनात होते. सातही मजल्यांवरील अधिकारी आणि कर्मचारी यांची श्रम विभागणी चोख पद्धतीने करण्यात आली होती. प्रयाणाला आरंभ झाल्यानंतर अवघ्या वीस मिनिटांनी हे जहाज बुडून समुद्राच्या तळाशी गेलं. युद्धात सहभागी होण्यासाठी 1628 मध्ये स्टॉकहोमच्या खाडीतून ‘वासा’ जहाजाच्या प्रवासाला आरंभ झाला. सुमारे 4 हजार 265 फूट अंतर कापल्यानंतर त्याचा पाण्यातल्या पाण्यात तोल गेला आणि पूर्णपणे बुडून ते समुद्राच्या तळाशी गेलं. मात्र, 150 पैकी 30 जणांचा बुडून मृत्यू झाला, तर 120 जण वाचले. हे जहाज बुडालेल्या ठिकाणी 300 वर्षे पडून होतं.
‘वासा’ जहाज बुडालं हे जगाच्या इतिहासातील एक मोठं रहस्य आहे. या जहाजाचं बुडणं ही एक राष्ट्रीय आपत्ती मानली गेली. हे जहाज म्हणजे स्वीडनच्या राजाची आणि उभ्या देशाची अस्मिता मानली गेली होती; पण हे अत्याधुनिक, सुसज्ज, वजनदार जहाज असंतुलित होतं. सातव्या मजल्याजवळ ते अधिक जड होतं. त्याचा प्रवास सुरू झाला तेव्हा समुद्रात वादळी वारे वाहत होते. तोफा लावण्यासाठी ज्या पोकळ्या तयार करण्यात आल्या, त्यातल्याच काही उघड्या राहिल्या आणि त्यातून समुद्राचं पाणी जोरात आत घुसलं असंही चौकशी समितीतल्या काही सदस्यांचं मत पडलं. जहाजावर असलेल्या 64 तोफांच्या वजनाचा समतोल साधला गेला नाही आणि त्या विषम वजनानं जहाज बुडालं असंही काही तज्ज्ञांचं मत आहे.
स्वीडनची राजधानी स्टॉकहोम हा एक द्वीपसमूह आहे. येथे जुर्गार्डन या एका बेटावर रॉयल नॅशनल सिटी पार्क या ठिकाणी ‘वासा’ जहाजाचं एकट्याचंच एक संग्रहालय आहे. तिथं बोटीनं जावं लागतं. मी माझ्या कुटुंबीयांसोबत हे संग्रहालय पाहायला गेलो, तेव्हा एकाच जहाजाचं हे संग्रहालय पहायला आम्हांला सहा तास लागले. जहाजावर जे नकाशे आणि विविध घटनांचे पुतळे कोरण्यात आले आहेत, त्याच्या प्रतिकृती संग्रहालयाच्या सर्व बाजूंनी लावलेल्या आहेत. जहाज सर्व बाजूंनी पाहता येतं. जहाजाच्या उंचीएवढे मजले सगळीकडून बांधलले आहेत. त्यावर जाऊन जहाजाच्या सातही मजल्यांची बाहेरून पाहणी करता येते. या संग्रहालयाच्या उभारणीसाठी स्वीडन सरकारनं एक स्पर्धा जाहीर केली. त्यात 384 वास्तुविशारदांनी भाग घेतला. त्या स्पर्धेत मॅटियन डाहलबॅक आणि गोरान मानसन यांनी सादर केलेल्या मॉडेलला पुरस्कार मिळाला आणि त्यानुसार संग्रहालयाची उभारणी याच वास्तुविशारदांकरवी करण्यात आली.
1628 मध्ये बुडालेल्या जहाजाचा त्या ठिकाणी 300 वर्षांनंतर 1956 मध्ये शोध सुरू झाला. हा शोध पूर्ण होऊन 1961 मध्ये ते जसंच्या तसं बाहेर काढण्यात आलं. जहाजावर कोरलेले नकाशे आणि पुतळे जसेच्या तसे असल्याचं आढळून आलं. हे जहाज सुरक्षित अगदी 98 टक्के जसंच्या तसं असण्याची दोन कारणं सांगितली गेली. एक म्हणजे जहाजाचं लाकूड एका विशिष्ट पद्धतीचं मजबूत आणि टिकाऊ आहे. जहाज 300 वर्षे पाण्याखाली राहूनही त्याच्या बांधणीला कसलाही धक्का लागलेला नाही. दुसरं कारण असं की, हे जहाज बुडालं तो बाल्टिक समुद्र आहे. बाल्टिक समुद्रात थंडगार पाणी नाही आणि जीवाणूही कमी आहेत. तसेच लाकूड खाणारे किडेही त्या पाण्यात नाहीत. काही तज्ज्ञांनी हे मत मांडलेलं आहे. पूर्ण खार्या पाण्यात लाकूड निकामी करण्याचे जे घटक असतात, ते बाल्टिक समुद्राच्या पाण्यात नसतात. जहाज समुद्राच्या बाहेर काढण्याची जी काही प्रक्रिया पाच वर्षे चालली, त्याचा एक छानसा माहितीपट संग्रहालयात उपलब्ध आहे. तो आम्ही पाहिला.
जहाजावरील कप्तान आणि इतर काही अधिकारी यांच्या चेहर्याच्या हुबेहूब प्रतिकृती तयार करून काचेच्या पेटीत ठेवलेल्या आहेत. काही खलाशांचे सापळे पेटीत ठेवलेले आहेत. जहाज समुद्राच्या बाहेर काढण्यासाठी जे काही साहित्य वापरण्यात आले होते, ते जपून ठेवलेलं आहे. ‘वासा’ जहाजाची देखभाल रोजच्या रोज केली जाते; पण ठेवलेल्या ठिकाणी हे जहाज हळूहळू कलत आहे. वर्षाला एक मिलिमीटर या प्रमाणात ते झुकत आहे. त्यासाठी संग्रहालयाचे व्यवस्थापन योग्य ती दक्षता घेत आहे. ‘वासा’ हे जहाज युद्धात पराक्रम गाजवण्याठी बांधण्यात आलं होतं; पण हे इच्छित स्थळापर्यंत पोहोचूदेखील शकलं नाही. तथापि, ते स्वीडनच्या नागरिकांना अतिशय प्रिय आहे, हे खरं!