

महेश शिपेकर, वाहन उद्योग अभ्यासक
पारंपरिक पेट्रोल-डिझेलच्या वाहनांचा काळ हळूहळू मागे सरत चालला असून सबंध जगभरामध्ये गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक कार, हायब्रीड कार, हायड्रोजन कार, सोलर कार यांची चलती दिसून येत आहे. भारतातही हायब्रीड वाहनांना सुगीचे दिवस आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमती पाहता हायब्रीड मोटार हा एक सक्षम पर्याय म्हणून समोर आला आहे. हायब्रीड तंत्रज्ञान वातावरणातील प्रदूषण कमी करते आणि कोणत्याही प्रकारच्या चार्जिंगच्या झंझटीविना इलेक्ट्रिक मोटारीचा अनुभवदेखील चालकाला देते. मारुती सुझुकी, हुंदाई आणि कियासारख्या कंपन्यांचे परवडणार्या श्रेणीत हायब्रीडची सुविधा देण्याबाबत सुरू असलेले काम पाहता हायब्रीड मोटारीचा ग्राफ आणखी वाढू शकतो.
वाहन उद्योगाच्या इतिहासात सध्या एक मोठे स्थित्यंतर पाहायला मिळत आहे. एकीकडे पारंपरिक पेट्रोल-डिझेल इंजिनच्या गाड्यांमधून निघणार्या धुरामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान चिंतेचा विषय ठरत आहे, तर दुसरीकडे पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) चार्जिंग पायाभूत सुविधांबाबत ग्राहकांच्या मनात अद्याप साशंकता आहे. या दोन टोकांच्या मध्ये एक सुवर्णमध्य म्हणून ‘हायब्रीड’ तंत्रज्ञान उदयाला आले आहे. हायब्रीड कार हा अभियांत्रिकी कौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे, जो इंधनाची बचत आणि पर्यावरणाचे रक्षण या दोन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरत आहे.
‘हायब्रीड’ या शब्दाचा अर्थच मुळी दोन भिन्न गोष्टींचा संगम असा होतो. मोटारींच्या संदर्भात ज्या वाहनांमध्ये इंधन जाळणारे इंजिन (इंटरनल कम्बशन इंजिन) आणि विद्युत ऊर्जेवर चालणारी मोटार अशा दोन्ही शक्तींचा वापर केला जातो, त्यांना हायब्रीड कार म्हटले जाते. हे तंत्रज्ञान अशाप्रकारे विकसित केले गेले आहे की, गाडी चालवताना परिस्थितीनुसार इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटार यांच्यात आपोआप अदलाबदल होते. कमी वेगाने गाडी चालवताना किंवा ट्रॅफिकमध्ये असताना गाडी बॅटरीवर चालते, तर अधिक वेग हवा असल्यास किंवा बॅटरीची ऊर्जा कमी पडत असल्यास इंजिन कार्यरत होते. या प्रक्रियेमुळे इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर कमी होतो आणि गाडीचे मायलेज कमालीचे वाढते. हायब्रीड तंत्रज्ञानामागील विज्ञानदेखील तितकेच रंजक आहे. ‘रिजनरेटिव्ह ब्रेकिंग’ हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. जेव्हा आपण गाडीला ब्रेक लावतो, तेव्हा निर्माण होणारी ऊर्जा वाया न घालवता ती पुन्हा बॅटरीमध्ये साठवली जाते. सामान्य गाड्यांमध्ये ही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात वाया जाते. हायब्रीड गाडी मात्र प्रत्येक ब्रेकला ऊर्जेत रूपांतरित करते. यामुळेच शहरात जिथे वारंवार ब्रेक लावावे लागतात, तिथे हायब्रीड गाड्या हायवेपेक्षाही जास्त मायलेज देतात. हे तंत्रज्ञान चालकासाठी अतिशय सुलभ असते. कारण, गाडी चालवताना आपल्याला इंजिन आणि मोटारमधील बदल जाणवतदेखील नाहीत. संगणकीय प्रणाली हे सर्व व्यवस्थापन अत्यंत अचूकपणे करते.
हायब्रीड तंत्रज्ञान वातावरणातील प्रदूषण कमी करते आणि कोणत्याही प्रकारच्या चार्जिंगच्या झंझटीविना इलेक्ट्रिक मोटारीचा अनुभवदेखील चालकाला देते. अलीकडील काळात मारुती सुझुकी, हुंदाई आणि कियासारख्या कंपन्या परवडणार्या श्रेणीत हायब्रीडची सुविधा देण्यावर काम करत आहेत. यामुळे येणार्या काळात हायब्रीड मोटारीचा ग्राफ आणखी वाढू शकतो. मागील वर्षी हायब्रीड मोटारींची एकूण विक्रीतील वाढ पाहता ती इलेक्ट्रिक मोटारींच्या तुलनेत अधिकच राहिली आहे. 2025 मध्ये 2 लाख 48 हजार 673 माईल्ड हायब्रीड मोटारींची विक्री झाली, तर स्ट्राँग हायब्रीड मोटारींच्या विक्रीत तब्बल 83 टक्के वाढ नोंदविली गेली. हायब्रीड श्रेणीत भारतात टोयोटाची इनोव्हा हायक्रॉस, अर्बन क्रुझर हायरायडर, कॅमरी आणि वेलफायरचा उल्लेख करता येईल, तर मारुती सुझुकीची ग्रँड व्हिटारा आणि इनव्हिक्टो तसेच होंडा कार्स इंडियाची होंडा सिटी ई-एचईव्हीसारख्या मॉडेलचा समावेश करता येईल.
विशेष म्हणजे, एकीकडे इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी केवळ पाच टक्के असताना दुसरीकडे हायब्रीड मोटारीचा आकार आणि अधिभारावर आधारित अशी गोळाबेरीज करत एकूण कर 43 टक्क्यांपर्यंत जातो, तरीही त्याची मागणी वाढताना दिसते. एवढेच नाही, तर सध्या बाजारात 40 पेक्षा अधिक इलेक्ट्रिक मोटारींची मॉडेल्स उपलब्ध आहेत. हायब्रीड सेगमेंटमध्ये अजूनही पर्याय कमीच आहेत. या पार्श्वभूमीवर मागील वर्षात हायब्रीड मोटार विक्रीत उल्लेखनीय वाढ नोंदली गेली आणि एकप्रकारे या श्रेणीवरचा लोकांचा वाढता विश्वास स्पष्ट होतो.
झुकते माप कशामुळे?
तज्ज्ञांच्या मते, हायब्रीड मोटारींच्या जबरदस्त विक्रीमागे इलेक्ट्रिक वाहनांच्या मायलेज संबंधित व्यक्त होणारी चिंता, चार्जिंगबाबतचे आव्हाने, इंधन क्षमतेबाबत सांशकता या कारणांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ज्या मंडळींना ई-मोबिलिटीवर संशय आहे ते प्रदूषणाबाबत सजगता आणि खिशाला परवडणारी किंमत यातील मध्यममार्ग म्हणून हायब्रीडची निवड करत आहेत. पेट्रोल मोटारीच्या तुलनेत हायब्रीड मॉडेल साधारणपणे तीस ते चाळीस टक्के अधिक मायलेज देतात.
जागतिक पातळीवर अजूनही मागे
जागतिक पातळीवरचा विचार केल्यास भारत अजूनही हायब्रीड श्रेणीत मागे असला, तरी ही कसर भरून निघत आहे. बाजारात तीन प्रकारची हायब्रीड वाहने असतात. माईल्ड, सेल्फ चार्जिंग आणि प्लग इन्स. भारतात माईल्ड हायब्रीड आणि सेल्फ चार्जिंग हायब्रीड मोटारीचा वापर होताना दिसत आहे. सेल्फ चार्जिंगमध्ये बॅटरी ही इंजिनकडून ऊर्जा घेत रिचार्ज होत राहते. सध्या हे तंत्रज्ञान महागड्या मोटारींपुरतेच मर्यादित आहे. आता बजेट मोटारीतही सेल्फ चार्जिंग तंत्रज्ञान आणण्यावर काम केले जात आहे. कदाचित या वर्षाच्या अखेरीस किंवा 2027 च्या आर्थिक वर्षात सेल्फ चार्जिंग हायब्रीड मोटारी भारताच्या वाहन बाजारातील एक महत्त्वाचा घटक होताना दिसतील.
कमी किमतीतील हायब्रीड मोटार
मारुती सुझुकीचे हायब्रीड तंत्रज्ञान हे परवडणार्या श्रेणीसाठी विकसित करण्यात येत आहे. उदा. फ्रॉन्क्स, बलेनो हायब्रीड आदी. या मोटारी यावर्षी किंवा पुढील वर्षापर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. वास्तविक वाहन कंपन्या स्थानिक पातळीवरच हायब्रीड किट असेंब्लिंग आणि मेकिंगवर भर देत आहेत. होंडा सिटी तर त्याचे चांगले उदाहरण आहे. हुंदाई, क्रेटा किंवा कियासारख्या परकी कंपन्या सेल्टॉससारखे मॉडेल हायब्रीड श्रेणीत विकसित करताना त्यात स्थानिक जुळवणीवर काम करत आहेत. यानुसार खरेदीदारांना कमी किमतीत हायब्रीड तंत्रज्ञान उपलब्ध होईल. परिणामी, आगामी काळात अनेक हायब्रीड मोटारीच्या किमती पेट्रोल मोटारीच्या आसपास राहू शकतात.
वाहन कंपन्या हायब्रीड मोटारीची किंमत कमी करण्याबरोबरच त्याचा मायलेज वाढविण्यावर देखील काम करत आहेत. मारुती सुझुकी सीरिज ही हायब्रीडच्या माध्यमातून मायलेजबाबतचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून मायलेज 35 किलोमीटर प्रतिलिटर मिळू शकते.
प्लग इन हायब्रीडवर संशोधन
तज्ज्ञांच्या मते, आगामी काळ प्लग इन हायब्रीड मोटारीचा आहे. परदेशात सध्या याच श्रेणीतील हायब्रीड मोटारींचे प्रस्थ अधिक आहे. या श्रेणीतील मोटारींना अन्य ई-मोटारीप्रमाणे बाहेरून चार्ज करावी लागते. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी हा चांगला आणि परवडणारा पर्याय मानला जातो आणि सुरक्षाही मिळते; मात्र या श्रेणीवर सध्या भारतात संशोधन आणि चाचणी सुरू आहे. म्हणूनच त्याचा व्यापक प्रमाणात उपयोग करण्यास काही वेळ लागू शकतो. परदेशात हे तंत्रज्ञान बर्याच अंशी उपयुक्त ठरले आहे. सध्या भारतात स्ट्राँग हायब्रीड किंवा सेल्फ चार्जिंग हायब्रीड मोटारींचे प्रमाण अधिक आहे. त्या महागड्या असल्या, तरी इंधन दक्षता आणि मायलेजमुळे त्याची लोकप्रियता वाढत आहे. प्लग इन हायब्रीड मोटारीचा विचार केल्यास सध्या हा पर्याय आलिशान मोटारीपुरताच मर्यादित आहे. बीएमडब्लू, व्हॉल्वोमध्ये ही सुविधा दिसते. टोयोटाने महागड्या श्रेणीतील प्रियस प्लग इन हायब्रीड मोटार सीएट चालू वर्षी पुण्यात सादर केली. ही मोटार फ्लेक्स फ्युअलवरदेखील (इथेनॉल) धावते. त्याची किंमत आणि लाँचिंगची तारीख अजूनही निश्चित झालेली नाही.
नवीन हायब्रीड मोटारी
रेनॉल्टने लोकप्रिय डस्टरची हायब्रीड श्रेणी नुकतीच सादर केली आहे. ती स्ट्राँग हायब्रीडमध्ये देखील उपलब्ध आहे. मारुती सुझुकी यावर्षी स्विफ्ट आणि डिझायरमध्ये हायब्रीड श्रेणी आणणार आहे. शिवाय मारुती कंपनी ही नवीन 1.2 लिटर झेड मालिकेत सक्षम इंजिनसह स्ट्राँग हायब्रीड तंत्रज्ञान आणत आहे. फ्रॉक्सचीदेखील हायब्रीड श्रेणी प्रतीक्षेत आहे. ती परवडणार्या श्रेणीत तसेच मायलेज आणि आकर्षक लुकमध्ये मिळू शकेल. त्याचवेळी महिंद्रा ही त्यांची ‘एक्सयूव्ही थ्री एक्स ओ’ला हायब्रीडमध्ये आणू शकते. कदाचित यावर्षी ती बाजारात येईल. हुंदाईची योजना 2030 पर्यंत त्यांच्या उत्पादनात आठ हायब्रीड श्रेणींचा समावेश करण्याची आहे. या श्रेणीत पुढील वर्षीच्या प्रारंभीपर्यंत हुंदाईची क्रेटा हायब्रीड श्रेणीत येऊ शकते. ही स्ट्राँग हायब्रीडमध्ये राहू शकते. शिवाय हुंदाईची नवीन पाच किंवा सात आसनी हायब्रीड मोटार येऊ शकते. ही मोटार अल्काझार मॉडेलच्या वरच्या श्रेणीत राहू शकते. हुंदाईची आय 20 आधारित बेयॉन क्रॉसओव्हर मोटार यावर्षीच्या अखेरीस बाजारात येऊ शकते. ती टर्बो पेट्रोल हायब्रीड श्रेणीत असेल. कियाची सेल्टॉस हायब्रीड देखील पुढील वर्षाच्या प्रारंभी रस्त्यावर धावू शकते.