ढिसाळ व्यवस्थापनाने घेतलेले बळी

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन अकरा लोकांना आपला जीव गमवावा लागला
stampede-outside-chinnaswamy-stadium-11-dead
ढिसाळ व्यवस्थापनाने घेतलेले बळीPudhari File Photo
Published on
Updated on
प्रा. विजया पंडित

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने रॉयल चॅलेंजर्स संघाचा ऐतिहासिक विजय काळवंडला गेला. गर्दीत व्यक्तींची वैयक्तिक बुद्धी आणि निर्णयशक्ती मंदावते. त्याऐवजी समूह भावना निर्माण होते, जिच्यावर तत्काळ प्रतिक्रिया, अफवा आणि भावनाविवशता सहजगत्या प्रभाव टाकते. त्यामुळेच एखादी अफवा संपूर्ण नियंत्रण मोडून टाकू शकते. आजवरच्या अनेक दुर्घटनांनी हे दाखवून दिले आहे. भविष्यात असे प्रकार घडू द्यायचे नसतील, तर लोकप्रबोधनाबरोबरच राज्य शासनांनी पब्लिक इव्हेंट मॅनेजमेंट गाईडलाईन्स तयार करणे आवश्यक आहे.

क्रिकेटविश्वातील सर्वात मोठा वार्षिक मेळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 18 व्या पर्वाची नुकतीच सांगता झाली. यंदाच्या स्पर्धेमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेरचा सामना जिंकत आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले. हा विजय आयपीएलमधून निवृत्त होत असलेल्या विराट कोहलीसाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा ठरला. जणू त्याला भावनिक निरोप देणारी ही एक अनमोल भेट ठरली; मात्र त्याच वेळी या विजयाच्या आनंदावर विरजण टाकणारी एक भयावह घटना घडली. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन अकरा लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने पुन्हा एकदा आपल्या देशातील अपुर्‍या आणि बेशिस्त गर्दी नियंत्रण व्यवस्थेतील गंभीर उणिवा समोर आल्या आहेत. त्याचबरोबर गर्दीमध्ये शिरल्यानंतर विवेकाचे भान हरपत जाणार्‍या लोकमानसिकतेचे दर्शनही या निमित्ताने पुन्हा एकदा घडले आहे.

जगभरामध्ये फुटबॉलपटूंना जशी लोकप्रियता लाभते किंवा स्टारडम मिळते, तसाच प्रकार भारतात क्रिकेटपटूंबाबत दिसून येतो. त्याचप्रमाणे सिनेसृष्टीतील आघाडीच्या तारे-तारकांनाही अशाच प्रकारची लोकप्रियता लाभते. साहजिकच, या सेलिब्रेटींना पाहण्यासाठी त्यांचे ‘डाय हार्ट फॅन्स’ म्हणजेच चाहते हे कमालीचे उतावळे झालेले असतात. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अशा सेलिब्रेटींना मोबाईल कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी किंवा ते उपस्थित असलेल्या ठिकाणची गर्दी टिपण्यासाठी चाहत्यांमध्ये अक्षरशः आसुसलेपण दिसून येते.

बंगळुरूमधील दुर्घटना घडण्याच्या आधी पुण्यातील एका मॉलमध्ये अभिनेता अक्षयकुमारच्या ‘हाऊसफुल्ल 5’च्या प्रमोशनचे आयोजन करण्यात आले होते. मॉलच्या सर्व मजल्यांवर आणि गॅलर्‍यांमध्ये लोकांनी या चित्रपटातील कलाकारांना बघण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यामुळे चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. महिलांचा आणि लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. या प्रसंगाचे गांभीर्य ओळखत अक्षय कुमारने तत्काळ माईकवरून हात जोडून सर्व लोकांना शांत राहण्याचे आणि ढकलाढकली टाळण्याचे आवाहन केले. एक लहान मुलीची तिच्या आई-बाबांपासून चुकामुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जॅकलिन फर्नांडिस आणि सोनम बाजवा यांनी त्या मुलीला शांत केले आणि तिच्या पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिला असता सेलिब्रेटींच्या प्रेमापोटी माणसे कशी वेडी होताहेत आणि भान हरपत आहेत, हे लक्षात येते. मागील काळात ‘पुष्पा 2’च्या प्रीमियरच्या वेळीही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

बंगळुरूमधील गर्दीचे मुख्य आकर्षण होते टीम इंडियाचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी सिनेअभिनेत्री अनुष्का शर्मा. या जोडगोळीला पाहण्यासाठी आणि रॉयल चॅलेंजर्सच्या या ऐतिहासिक विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी समर्थकांची, बघ्यांची, चाहत्यांची प्रचंड गर्दी स्टेडियमबाहेर जमली होती. सुरुवातीला अंदाजे एक लाख लोक या विजयाच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी जमले होते; पण नंतर उत्साह इतका वाढला की, दोन लाखांहून अधिक लोक स्टेडियम परिसरात एकत्र जमले. अशा वेळी तेथील व्यवस्थापन करणार्‍या यंत्रणेची जबाबदारी शतपटींनी वाढते; परंतु नियोजनाचा अभाव, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि अफवा यामुळे परिस्थिती अलगदरीत्या हाताबाहेर गेली. गेट क्रमांक 7 जवळ मोफत पास वाटप होत असल्याची अफवा पसरली आणि त्या दिशेने हजारोंचा लोंढा एकाच वेळी धावू लागला. यामुळे स्टेडियमबाहेर अफरातफरी माजली. वास्तविकता अशी होती की, गेटजवळ कोणतेही अधिकृत पास वाटप नव्हते; पण अफवांची ताकद आणि व्यवस्थेतील तुटवडा यामुळे काही क्षणांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. स्टेडियमकडे जाणारा रस्ता संकुचित होता आणि एवढ्या मोठ्या गर्दीचा अंदाज आयोजकांना नव्हता. कोणत्याही प्रकारचे रस्ते-वळण नियंत्रण, जमाव व्यवस्थापनासाठी पोलिसांची पुरेशी संख्या, नोंदणीकृत प्रवेश यंत्रणा किंवा तत्काळ आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा या कोणत्याच बाबींचा पुरेसा विचार करण्यात आलेला नव्हता. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही गर्दीचा योग्य अंदाज प्रशासनाला लावता आला नाही, हे स्वीकारले आहे. स्टेडियमची क्षमता सुमारे 35,000 असून प्रत्यक्षात 2 ते 3 लाख लोक कार्यक्रमस्थळी आले असतील, तर अशा प्रकारची दुर्घटना घडण्याचा धोका वाढतो, हे आज सामान्य माणूसही सांगू शकेल. मग, सरकारने हा कार्यक्रम स्थगित केला नाही किंवा मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आणि नियोजन का करण्यात आले नाही? लाखो लोकांच्या जीवाशी खेळण्याइतकी निष्काळजी वृत्ती प्रशासन दाखवत असेल, तर अशा दुर्घटना अपरिहार्य होतात.

मुळात बंगळुरूमध्ये घडलेली दुर्घटना हे चेंगराचेंगरीचे पहिले प्रकरण नाही. उलट गेल्या पाच वर्षांमध्ये सातत्याने अशा घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभानंतर रेेल्वेस्थानकावर झालेली चेंगराचेंगरी असो किंवा याच उत्तर प्रदेशातील एका तथाकथित बाबाच्या आध्यात्मिक सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये झालेला भक्तांचा मृत्यू असो किंवा अगदी काही आठवड्यांपूर्वी गोव्यामध्ये झालेली चेंगराचेंगरी असो, या सर्वांच्या मुळाशी समान कारणे असतात.

एक म्हणजे, अशा कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍यांचा बेफिकीरपणा. दुसरे म्हणजे, गर्दी नियंत्रणाची जबाबदारी असणार्‍या यंत्रणांचा किंवा व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा आणि तिसरे म्हणजे, प्रशासनाचे किंवा पोलिसांचे सर्व आदेश पायदळी तुडवून वेडेपिसे होऊन जल्लोष करणारे किंवा तारतम्य हरपून बसलेले नागरिक. दुर्दैवाची बाब म्हणजे असंख्य दुर्घटना घडूनही या तिन्ही घटकांमध्ये तसूभरही फरक पडत नाही. दरवेळी अशा चेंगराचेंगरीनंतर व्यवस्थेला, शासनाला, प्रशासनाला, पोलिसांना दोष देऊन, त्यांच्याकडे चार बोटे करताना अशा कार्यक्रमांना जाणार्‍या नागरिकांनीही सुजाणपणाचे दर्शन घडवणे अपेक्षित आणि आवश्यकच असते. बंगळुरूच्या दुर्घटनेमध्ये पोलिसांकडून गर्दीला पांगवण्यासाठी आवाहन केले जात होते; पण आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना पाहण्याच्या वेडापायी आतूर झालेले चाहते त्या आवाहनाकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नव्हते. ही स्थिती सर्वदूर दिसून येते. याचे कारण, गर्दीत व्यक्तीची वैयक्तिक बुद्धी आणि निर्णयशक्ती मंदावते. त्याऐवजी समूह भावना निर्माण होते, जिच्यावर तत्काळ प्रतिक्रिया, अफवा आणि भावनाविवशता सहजगत्या प्रभाव टाकते. त्यामुळेच एखादी अफवा (जसे की गेटवर मोफत प्रवेश आहे.) संपूर्ण नियंत्रण मोडून टाकू शकते. हे लक्षात घेता आयोजक आणि प्रशासनाने दक्ष राहणे गरजेचे असते.

सततच्या या घटना रोखण्यासाठी लोकप्रबोधनाबरोबरच राज्य शासनांनी पब्लिक इव्हेंट मॅनेजमेंट गाईडलाईन्स तयार करणे आवश्यक आहे. तामिळनाडूमध्ये 2011 नंतर अशा मार्गदर्शक तत्त्वांचे नियम बनवण्यात आले आहेत; पण अशा दुर्घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी स्वतंत्र गर्दी व्यवस्थापन युनिट प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करणे, सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना पूर्व परवानगी आणि ‘रिस्क ऑडिट’ सक्तीची करणे, प्रशिक्षित स्वयंसेवक दल तयार करणे (एनसीसी, स्काऊटचा उपयोग), गर्दीची सूचना देणारे मोबाईल अ‍ॅप तयार करणे, प्रत्येक मोठे स्टेडियम, मंदिर, रेल्वे स्थानकात नियमित इमर्जन्सी ड्रील करणे यांसारख्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. सार्वजनिक सुरक्षेचा पाया हा व्यवस्थापनात आहे. या व्यवस्थापनामध्ये समाजशास्त्र, मानसशास्त्र, तंत्रज्ञान, प्रशासन आणि कायदा या सर्वांचा समन्वय आवश्यक असतो. प्रत्येक घटना, अपघात किंवा शोकांतिका हे आपल्याला हेच शिकवत असतात; पण आपण त्यातून बोधच घेत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news