

हवाईदलाच्या स्क्वाड्रन लीडर मोहना सिंग या लढाऊ विमान ‘तेजस’ उडवणार्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. हे फायटर विमान देशातच विकसित करण्यात आले आहे. स्क्वॉड्रन लीडर भावना कंठ आणि अवनी चतुर्वेदी यांच्यासोबत, मोहना सिंग भारतीय हवाईदलात सामील झालेल्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहेत. या महिला लष्करी अधिकार्यांचे कर्तृत्व ऐतिहासिक आहे.
साधारणतः दशकभरापूर्वी भारतीय वायुदलात महिला वैमानिकांना लढाऊ विमाने उडविण्याची संधी का दिली जात नाही, असा प्रश्न विचारला जात होता. त्यावर उत्तर देताना नैसर्गिकरीत्या महिलांचे शरीर लढाऊ विमान उडविण्यासाठी सक्षम नसते. त्यामुळे उड्डाणादरम्यान त्यांना काही अवघड समस्यांना सामोरे जावे लागू शकते. लढाऊ विमाने उडविणे एक मोठे आव्हान आहे. बर्याच कालावधीसाठी महिला लढाऊ विमान उडवू शकत नाहीत. गर्भवती असताना किंवा प्रकृती अस्वस्थ असताना तर ही विमाने उडविणे जवळपास अशक्य आहे, असे मत वायुदलातील अधिकार्यांकडून केले जात असे. दुसरीकडे, हवाईदलातील हेलिकॉप्टर तसेच प्रवासी विमाने चालवण्याची मात्र त्यांना परवानगी होती. अनेक देशांचा हवाला देत अनेक महिला संघटनांनी याविरोधात कोर्टातही लढा सुरू केला. त्यानंतर हवाईदलाने लढाऊ विमानांत महिलांना भरारी घेण्यास मान्यता देण्यात आली.
हवाईदलाच्या स्क्वाड्रन लीडर मोहना सिंग या लढाऊ विमान ‘तेजस’ उडवणार्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. हे फायटर विमान देशातच विकसित करण्यात आले आहे. स्क्वॉड्रन लीडर भावना कंठ आणि अवनी चतुर्वेदी यांच्यासह मोहना सिंग भारतीय हवाईदलात सामील झालेल्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहेत. कंठ आणि चतुर्वेदी या ‘सुखोई’ लढाऊ विमानाच्या पायलट आहेत. भावना कंठ ‘मिग-21’मधून उड्डाण करणार्या पहिल्या महिला वैमानिक आहेत; तर शिवांगी सिंह या ‘राफेल’ हे बहुचर्चित आणि अत्याधुनिक विमान उडवणार्या पहिल्या महिला पायलट आहेत. मोहना सिंग या आतापर्यंत ‘मिग फायटर’ उडवत असत. फ्लाईट लेफ्टनंट असताना त्यांनी अत्याधुनिक ‘हॉक जेट’ विमान उडवून इतिहास रचला होता. हे विमान उडवणार्या देशातील त्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या. आज मोहना सिंग या भारतीय हवाईदलातील एक प्रमुख महिला लढाऊ पायलट आहेत. त्यांचा जन्म 22 जानेवारी 1992 रोजी राजस्थानमधील झुंझुनू येथे झाला. त्यांचे वडील प्रताप सिंग हे निवृत्त हवाईदल अधिकारी आहेत आणि आई मंजू सिंग या शिक्षिका आहेत. मोहना सिंग यांनी दिल्लीतील एअर फोर्स स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण घेतले आणि नंतर पंजाबमधील अमृतसर येथील ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीजमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बी.टेक. पदवी प्राप्त केली. जून 2016 मध्ये त्या भारतीय हवाईदलात सामील झाल्या आणि अवनी चतुर्वेदी आणि भावना कंठ यांच्यासह पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांच्या गटाचा भाग बनल्या. 2020 मध्ये त्यांना नारीशक्ती पुरस्कारानेही गौरविण्यात आले. मोहना सिंग यांचे आजोबा लान्स नाईक लाडुराम 11 फेब्रुवारी 1948 रोजी 1948 च्या लढाईत शहीद झाले होते. थोडक्यात काय, तर देशसेवेसाठी जीवन समर्पण करण्याचा वारसाच मोहना यांना लाभलेला आहे.
सध्या हवाईदलात 1,300 महिला अधिकारी कार्यरत आहेत. भारत-चीन सीमेवर भारतीय महिला वैमानिक विमान आणि हेलिकॉप्टर उडवत देशाच्या संरक्षणासाठी मोलाची कामगिरी बजावत आहेत. या महिला लष्करी अधिकार्यांचे कर्तृत्व ऐतिहासिक आहे. कारण, त्या भविष्याचा भक्कम पाया रचत आहेत. भविष्यात सशस्त्र दलात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या रणरागिणींच्या कार्यकर्तृत्वाचा हातभार लागेल. गेल्या काही वर्षांत महिला आपल्या कर्तृत्वाने त्या जिथे जातील तिथे आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. देशातील सर्वोच्च पदेदेखील अनेकदा महिलांनी भूषवली आहेत. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या सगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत; पण अशा काही घटना या महिलांची दुर्दम्य इच्छाशक्ती दर्शवतात. मुळातच जे करायचं, ज्याची इच्छा बाळगायची, ते झोकूनच करायचं ही महिलांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि त्यामुळेच कोणत्याही क्षेत्रात असल्या तरी त्या आपल्या याच वृत्तीने काम करत राहतात.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर महिलांना लष्करी सेवेत नियमित कमिशन म्हणून समाविष्ट करण्याची प्रक्रिया 1958 मध्ये सुरू झाली; परंतु सुरुवातीला त्यांची भूमिका वैद्यकीय सेवेपुरती मर्यादित होती. प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांना 1992 मध्ये अल्पसेवेची संधी मिळाली. तरीही त्यांचा आजपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. जीवनाच्या इतर क्षेत्रांप्रमाणेच, सशस्त्र दलात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी महिलांना खूप संघर्ष करावा लागला आहे. आजही सैन्यात त्यांची संख्या केवळ चार टक्क्यांच्या आसपास आहे. भारताच्या 1 कोटी 30 लाख एवढ्या सैन्यात 59 हजार 400 अधिकारी असून, त्यातील महिलांची संख्या तीन हजारांच्या आसपास आहे.
2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अल्प सेवा महिला अधिकार्यांना कायमस्वरूपी कमिशन मिळण्याचा अधिकार असल्याचा निर्णय दिला. सध्या वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त, महिला लष्कराच्या दहा विभागांत काम करू शकतात, ज्यात अभियांत्रिकी, सिग्नल, आर्मी एअर डिफेन्स, आर्मी सर्व्हिस कॉर्प्स, आर्मामेंट, आर्मी एव्हिएशन कॉर्प्स, इंटेलिजन्स कॉर्प्स, शिक्षण आणि न्याय विभाग यांचा समावेश आहे. लष्कर आणि हवाईदल तसेच नौदलात महिलांसाठी सेवा क्षेत्रांचा विस्तार होत आहे. 2019 मध्ये शुभांगी स्वरूप यांना नौदलासाठी डॉर्नियर सर्व्हिलन्स विमान उडवण्याची पहिली संधी मिळाली. त्यानंतर आता या तीन वायुकन्यांनी लढाऊ विमाने उडवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एनडीए आणि सीडीएससारख्या परीक्षांचे दरवाजे उघडल्यानंतर महिला-तरुणींची भरती वाढली आहे. यावर्षी मार्चमध्ये सेवेत रुजू झालेल्या 2,630 अग्निवीर सैनिकांच्या तिसर्या तुकडीत 396 महिलांचा समावेश होता. लष्करी पोलिस दलातील महिलांची उत्साहवर्धक कामगिरी पाहून लष्कराने अधिकाधिक महिला सैनिकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक दुराग्रह आणि महिलांबद्दलचा भेदभाव यांचा पगडा असणार्या पुुरुषसत्ताक व्यवस्थेला या रणरागिणींची भरारी चपराक देणारी आहे. वास्तविक, आज पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंतच्या लष्करात गेल्या कित्येक वर्षांपासून महिला लढाऊ विमाने उडवीत आहेत. युद्धनौका असोत की पाणबुड्या, रणगाडे असोत की कमांडो दल, लष्करातील प्रत्येक क्षेत्रात आज महिला काम करू शकत आहेत, करीत आहेत. स्क्वाड्रन लीडर मोहना सिंह, भावना कंठ आणि अवनी चतुर्वेदी यासारख्या रणरागिणींनी भारतातील महिलाही तितक्याच सक्षम असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे.