Sports Stars Personal Life Failures | अधुरी एक कहाणी..!

खेळाच्या मैदानात विजय मिळवणारे हे तारे वैयक्तिक आयुष्याच्या मैदानावर अपयशी
sports stars personal life failures
player divorce | अधुरी एक कहाणी..!Pudhari File Photo
Published on
Updated on

व्ही. एस. कुलकर्णी

नाते कोणतेही असो, ते सांभाळण्यासाठी वेळ द्यावा लागतो. कारण, ‘ताजमहल जगाने पाहिला आहे, मुमताजने नाही’ हे त्रिकालाबाधित सत्य कोणालाच विसरून चालत नाही. मग, ते सामान्य असोत किंवा सेलिब्रिटीज! याचकडे दुर्लक्ष करणारे अन् विभक्त होणारे सेलिब्रिटी जोडपे म्हणजे भारतीय बॅडमिंटनची सुवर्णकन्या सायना नेहवाल व तिचा एकेकाळचा खेळातीलही जोडीदार परुपल्ली कश्यप. खेळाच्या मैदानात देशासाठी विजय मिळवणारे हे तारे वैयक्तिक आयुष्याच्या मैदानावर मात्र अपयशी ठरताहेत, हाच त्याचा मथितार्थ.

सायना नेहवाल व परुपली कश्यप ही जोडी एकत्र आली त्यावेळी ‘मेड फॉर ईच ऑदर’ असे का म्हणतात, त्याचाच प्रत्यय होता जणू! कोर्टवर रॅकेटच्या तालावर जुळलेली मैत्री, यातून फुललेलं प्रेम आणि एकमेकांच्या विजयात मनापासून आनंदी होणारं एक सुंदर नातं. सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप हे केवळ पती-पत्नी नव्हते, तर ते एकमेकांचे सर्वात मोठे चाहते, टीकाकार आणि पाठीराखे होते. लहानपणापासून एकत्र सराव करताना, एकमेकांना प्रतिस्पर्धी म्हणून आणि मित्र म्हणून पाहताना त्यांच्यातील बंध अधिक घट्ट होत गेले. बॅडमिंटनच्या कोर्टवर एकमेकांना सामना जिंकण्यासाठी मदत करणारे हे जोडीदार, खर्‍या आयुष्यातही एकमेकांचा हात धरून चालतील, हाच विश्वास त्यांच्या विवाहाच्या रेशीम गाठींच्या माध्यमातून प्रतित होत होता; पण आयुष्याचा खेळ हा बॅडमिंटनच्या 2822 फुटी कोर्टपेक्षा खूपच वेगळा आणि गुंतागुंतीचा असतो, याचा प्रत्यय त्यांना लवकरच आला असावा.

ज्या भागीदारीने त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बरेच यश मिळवून दिले, तीच भागीदारी वैवाहिक जीवनातील अपेक्षा, जबाबदार्‍या आणि प्रसिद्धीच्या प्रचंड दबावापुढे कमी पडली. कोर्टवर प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी आखलेले डावपेच वैयक्तिक आयुष्यातील मतभेदांपुढे निष्प्रभ ठरले. त्यांनी जितक्या सहजतेने कोर्टवरची मैत्री प्रेमात आणि नंतर विवाहात बदलली, तितक्या सहजतेने वैवाहिक जीवन निभावणे त्यांना शक्य झाले नाही. ज्या नात्याचा पाया मैत्री आणि समान ध्येयावर रचला गेला होता, तेच नातं अखेर घटस्फोटाच्या कटू वास्तवावर येऊन संपलं. त्यांची ही कहाणी प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या नात्यांची कसोटी किती खडतर असते, हेच अधोरेखित करते.

आता सायना व परुपल्ली हे घटस्फोट घेणारे क्रीडाविश्वातील पहिले सेलिब्रिटी अजिबात नव्हेत. यापूर्वीही अशी अनेक वादळे बरेच काही उद्ध्वस्त करून गेली आहेत. भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट हा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजला. मुळात सानियाने शोएबबरोबर गुपचूप विवाह केला, त्यावेळीदेखील प्रचंड वादंग झडले होते. सानिया ज्यावेळी शोएबसह हैदराबादमधील आपल्या निवासस्थानी आली, त्यावेळी तिच्या घराबाहेर पोलिसांना खडा पहारा द्यावा लागला. पुढे काही वर्षांच्या संसारानंतर आणि दीर्घकाळ चाललेल्या विभक्त होण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत शोएबने तिसरे लग्न केले आणि या नात्याचा नकळत शेवट झाला.

भारतीय क्रिकेट संघाचा ‘गब्बर’ म्हणून ओळखला जाणारा शिखर धवन आणि त्याची ऑस्ट्रेलियन पत्नी आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोटही अत्यंत वादळी ठरला. अनेक आरोप-प्रत्यारोपांनंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि अखेरीस शिखरला घटस्फोट मिळाला. या प्रकरणात एका यशस्वी खेळाडूची वैयक्तिक आयुष्यातील लढाई आणि त्यातील गुंतागुंत सर्वांसमोर आली.

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची सर्बियन मॉडेल पत्नी नताशा स्टँकोविच यांच्यातील दुरावा, त्यांना काडिमोड घेण्यापर्यंत घेऊन गेला. नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘पंड्या’ हे आडनाव हटवणे आणि आयपीएल सामन्यांमध्ये तिची अनुपस्थिती यांसारख्या गोष्टींमुळे त्याचा पर्दाफाश झाला आणि नंतर याची परिणती घटस्फोटात झाली. युझवेंद्र चहल हा ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये फिरकीचा जादूगर, त्याचप्रमाणे बुद्धिबळातीलदेखील मास्टर! आयुष्याच्या पटावर मात्र प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्माशी त्याला विवाहाचे पवित्र नाते अर्ध्यावरच सोडून द्यावे लागले.

खरं तर, ही जोडी ऊर्जा, ग्लॅमर आणि सोशल मीडियावरील फॉलोअर्सची उत्तम केमिस्ट्री होती. त्यांच्या लग्नाने आणि त्यानंतरच्या त्यांच्या एकत्रित व्हिडीओंनी चाहत्यांची मने जिंकली होती; पण कुठे तरी माशी शिंकली. धनश्रीने तिच्या नावातून ‘चहल’ हे आडनाव वगळले आणि पुढे हा प्रवासदेखील अर्ध्यावरच मोडला.

या सर्वांपेक्षा वेगळा आणि अधिक संघर्षमय प्रवास राहिला आहे तो वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा. त्याची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसारखे अत्यंत गंभीर आरोप केले. हे प्रकरण केवळ कौटुंबिक वादापुरते मर्यादित न राहता एक मोठी कायदेशीर आणि सार्वजनिक लढाई बनली. मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला धक्के देणारा शमी, वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक वर्षांपासून या वादळाचा सामना करत आहे, जो त्याच्या कारकिर्दीवर आणि मानसिकतेवर परिणाम करणारा ठरला.

यामागची कारणे काय?

एकापाठोपाठ एक अशा घटना घडत असताना यामागची कारणे शोधणे महत्त्वाचे ठरते. या सेलिब्रिटी जोडप्यांची नाती का टिकत नाहीत? यामागे केवळ एकच कारण नसून अनेक सामाजिक, मानसिक आणि वैयक्तिक पैलू जबाबदार असू शकतात. एका शायरने म्हटले आहे,‘गुरूर किस बात का साहब? आज मिट्टी के ऊपर, तो कल मिट्टी के नीचे!’ हा शेर अहंकार आणि गर्वाच्या निरर्थकतेवर बोट ठेवतो. अनेकदा या नात्यांमध्ये ‘अहंकार’ हा सर्वात मोठा खलनायक ठरतो. जेव्हा पती आणि पत्नी दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आणि प्रसिद्ध असतात, तेव्हा ‘मी’पणा वाढण्याची शक्यता असते. दोघांच्याही करिअरला महत्त्व देणे, एकमेकांच्या यशाचा सन्मान करणे आणि प्रसंगी एकाने माघार घेणे हे आवश्यक असते; पण सततच्या स्पर्धेत आणि प्रसिद्धीच्या झोतात हा समतोल साधणे कठीण होऊन जाते.

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, ‘स्वकेंद्रित व्यक्तिमत्त्व.’ खेळाडूंना त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत, शिस्त आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करावे लागते. ही सवय हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनते. त्यामुळे वैवाहिक जीवनात आवश्यक असलेला त्याग, समर्पण आणि दुसर्‍याच्या मताचा आदर करण्याची वृत्ती कमी पडू शकते. याशिवाय वेळेचा अभाव आणि प्रसिद्धीचा दबाव हीदेखील मोठी कारणे आहेत. खेळाडूंना सतत दौरे, सराव आणि सामन्यांमध्ये व्यस्त राहावे लागते. त्यामुळे कुटुंबाला आणि जोडीदाराला पुरेसा वेळ देता येत नाही. त्यातच त्यांच्या प्रत्येक हालचालीवर मीडिया आणि चाहत्यांची नजर असते. सोशल मीडियामुळे तर हे अधिकच वाढले आहे. एक छोटीशी गोष्ट किंवा फोटोदेखील त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना खतपाणी घालतो.

सरतेशेवटी एक लक्षात घ्यायला हवे की, नियतीचा खेळही अजब असतो. जे धागे मोठ्या प्रेमाने आणि विश्वासाने विणले जातात, तेच कधीकधी अहंकार आणि गैरसमजाच्या एका छोट्याशा धक्क्याने उसवून जातात. प्रेमाची, विश्वासाची ही वीण उसवू देऊ नये, हा जगरहाटीचा सहजसोपा नियम विसरावा तरी कसा, हा प्रश्न उरतोच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news