

विवेक कुलकर्णी
स्पेनचा फुटबॉल फक्त जिंकत नाही... तो पुढची पिढी घडवतो! दोन विश्वचषके, महिला विश्वविजेतेपद आणि जगभर यशस्वी ठरणारे प्रशिक्षक! २०१० मध्ये स्पेन प्रथमच विश्वविजेता बनला. अनेकांना वाटले, झावी-इनिएस्ता-पुयोल यांच्या सुवर्णपिढीमुळे हे शक्य झाले; पण २०२६ मध्ये पुन्हा ट्रॉफी स्पेननेच जिंकल्यानंतर एक गोष्ट निर्विवाद झाली, स्पेन विश्वविजेते खेळाडू तयार करत नाही, तो विश्वविजेते घडवणारी व्यवस्था उभी करतो.
१९ जुलै २०२६. न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियममध्ये अंतिम शिट्टी वाजली आणि स्पेन पुन्हा एकदा विश्वविजेता ठरला. लॅमिन यमालसारखे तरुण खेळाडू आनंदाश्रूंनी भारावून गेले, अनुभवी खेळाडूंनी प्रशिक्षक लुईस दे ला फुएंते यांना खांद्यावर घेतले आणि लाखो स्पॅनिश चाहत्यांनी जल्लोष केला; मात्र त्या क्षणाकडे बारकाईने पाहिले, तर विजय फक्त त्या ९० मिनिटांचा नव्हता. तो जवळपास दोन दशकांपूर्वी पेरलेल्या एका विचाराचा विजय होता.
आज जगातील प्रत्येक बलाढ्य फुटबॉल राष्ट्राची स्वतःची ओळख आहे. ब्राझीलची ओळख नैसर्गिक कौशल्य, अर्जेंटिनाची जिद्द, जर्मनीची शिस्त, फ्रान्सची अफाट प्रतिभा आणि इंग्लंडची वेगवान स्पर्धात्मकता. स्पेनची ओळख मात्र वेगळी आहे. स्पेनचा सर्वात मोठा सुपरस्टार कोणताही खेळाडू नाही, तर त्यांची फुटबॉल शिकवण्याची पद्धत आहे. फुटबॉल पायांनी कमी, डोक्याने जास्त खेळला जातो. स्पेनच्या फुटबॉल तत्त्वज्ञानाचा गाभा एका वाक्यात मांडता येतो- 'खेळाडूला काय करायचे हे सांगू नका. त्याला खेळ समजायला शिकवा.' जगभरातील अनेक अकादमींमध्ये लहान मुलांना ड्रिब्लिंग, पासिंग आणि शूटिंग शिकवले जाते. स्पेनमध्ये तेही शिकवले जाते; पण त्याआधी एक वेगळा प्रश्न विचारला जातो, 'तुझ्याकडे चेंडू आला; पण तो येण्याआधी तू मैदानात काय पाहिलेस?' हा प्रश्नच स्पेनच्या फुटबॉलचा पाया आहे.
स्पॅनिश प्रशिक्षक मुलांना चेंडू पायाशी असताना नव्हे, तर चेंडू नसतानाही कसे विचार करायचे हे शिकवतात. सहकारी कुठे धावणार? विरोधक कुठे जागा सोडणार? पुढचा पास कोणत्या दिशेला गेला, तर बचावफळी विस्कळीत होईल, या प्रश्नांची उत्तरे खेळाडू स्वतः शोधायला शिकतो. म्हणूनच स्पेनचा खेळाडू निर्णय घेत नाही. तो योग्य निर्णयाची तयारी आधीच करून ठेवतो. ते वर्ष होते २००८, जेव्हा स्पेनने स्वतःला ओळखले. स्पेनकडे प्रतिभा नवीन नव्हती; पण मोठ्या स्पर्धांमध्ये ती वारंवार अपयशी ठरत होती. युरोपियन स्पर्धांमध्ये किंवा विश्वचषकात स्पेनला 'अप्रतिम संघ; पण निर्णायक क्षणी अपयशी' अशी ओळख मिळाली होती. तेव्हा लुईस अरागोनेस यांना एक प्रश्न विचारला, 'आपण जर्मनीसारखे ताकदवान नाही, ब्राझीलसारखे सहज खेळणारे नाही. मग, आपली खरी ताकद काय?' त्यांचे उत्तर होते, 'तंत्रशुद्ध गुणवत्ता, सामूहिक बुद्धिमत्ता आणि चेंडूवरील नियंत्रण.' ही कल्पना क्रांतिकारी होती. स्पेनने विरोधकाला धडका देण्याऐवजी त्याला धावायला लावण्याचा निर्णय घेतला. चेंडू स्वतःकडे ठेवला की विरोधक थकतो, त्याची रचना तुटते आणि संधी आपोआप तयार होते.
२०१० मध्ये जगाने या शैलीला 'टिकी-टाका' असे नाव दिले; पण इथेच जगाची चूक झाली. स्पेनचा खरा मंत्र 'टिकी-टाका' नव्हता. अनेकांना वाटते स्पेन म्हणजे शेकडो पासेस. प्रत्यक्षात पास हा उद्देश नसतो. ते एक साधन असते. स्पेनचा खरा हेतू असतो, विरोधकाला अशा ठिकाणी हलवणे की, त्याच्या बचावात एक छोटीशी फट निर्माण व्हावी. म्हणूनच स्पेनचे प्रशिक्षक खेळाडूंना पासिंग शिकवत नाहीत. ते जागा निर्माण करायला शिकवतात. २०२६ च्या उपांत्य फेरीत फ्रान्सविरुद्ध पेद्रो पोरोने केलेला गोल हे त्याचे जिवंत उदाहरण होते. सलग पासेस पाहून प्रेक्षक टाळ्या वाजवत होते; पण त्या गोलमागील खरी कला होती चेंडू नसलेल्या खेळाडूंच्या धावा. प्रत्येक हालचाल आधीच नियोजित होती. म्हणूनच स्पेनमध्ये एक म्हण लोकप्रिय आहे, 'चेंडू धावू द्या; खेळाडू कमी धावतील.'
स्पेनचा फुटबॉल फक्त जिंकत नाही... तो पुढची पिढी घडवतो! फुटबॉलमध्ये यशाचे श्रेय सहसा स्टार खेळाडूंना मिळते. स्पेनमध्ये मात्र समीकरण उलटे आहे. तेथे खेळाडूंपेक्षा प्रशिक्षक घडवण्याला अधिक महत्त्व दिले जाते. स्पॅनिश फुटबॉल महासंघाच्या कोचिंग अभ्यासक्रमात प्रशिक्षकाला फक्त सराव कसा घ्यायचा, संघाची रचना कशी करायची किंवा फॉर्मेशन कसे बदलायचे, हे शिकवले जात नाही. त्याला सर्वप्रथम शिकवले जाते, खेळ समजून घेणे. म्हणजेच खेळाडूने कोणता पास दिला यापेक्षा तो पास का दिला, याचे उत्तर प्रशिक्षकाला देता आले पाहिजे.
यासाठी स्पेनमध्ये सरावादरम्यान खेळ वारंवार थांबवला जातो. एखादी हालचाल योग्य होती का? दुसरा पर्याय कोणता असू शकला असता? विरोधकाला वेगळ्या पद्धतीने कसे अडकवता आले असते? अशा चर्चांमधून खेळाडूंची विचारशक्ती विकसित केली जाते. राफेल बेनिटेझ लिव्हरपूलचे प्रशिक्षक असताना एक मनोरंजक किस्सा समोर आला होता. इंग्लिश खेळाडूंना सराव सतत चालू ठेवण्याची सवय होती; पण बेनिटेझ वारंवार खेळ थांबवून एखादी टॅक्टिकल कल्पना समजावून सांगत. सुरुवातीला ते अनेकांना विचित्र वाटले; पण हीच स्पॅनिश प्रशिक्षण पद्धत होती, प्रत्येक कृतीमागे कारण समजून घेण्याची.
आजही स्पेनचा खेळाडू चेंडू मिळण्यापूर्वी दोन-तीन पर्यायांचा विचार करून तयार असतो. हीच त्यांची खरी ताकद आहे. म्हणूनच फुटबॉलचा सर्वात मोठा धडा हा की, स्पेनची कथा एका विश्वचषकाची नाही. ती एका विचाराची आहे. तुम्ही विश्वविजेता संघ विकत घेऊ शकत नाही. तुम्ही जगातील सर्वोत्तम खेळाडूही विकत घेऊ शकत नाही; पण तुम्ही अशी व्यवस्था उभी करू शकता जी दर पाच-दहा वर्षांनी नवे विश्वविजेते निर्माण करेल. स्पेनने हेच केले.
त्यांनी ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न केला नाही; ट्रॉफी जिंकणारी संस्कृती निर्माण केली. आज म्हणूनच स्पेनची खरी ताकद लॅमिन यामाल, रोड्री किंवा पेद्रो पोरो नाही. त्यांची खरी ताकद आहे, हजारो प्रशिक्षक, शेकडो अकादमी, लाखो मुलांना दिले जाणारे एकसंध फुटबॉल शिक्षण आणि 'फुटबॉल हा फक्त खेळ नाही, तो विचार करण्याची पद्धत आहे' हा विश्वास!
स्पेनचे यशाचे रहस्य दडले आहे ते या विचारसरणीत!
बार्सिलोना हा पाया; पण संपूर्ण स्पेन ही इमारत
२०१० च्या विश्वविजेत्या संघाकडे पाहिले तर बार्सिलोनाच्या 'ला मासिया' अकादमीची छाप स्पष्ट दिसते. झावी, इनिएस्ता, पिके, बुस्केटस् अशा अनेक खेळाडूंनी त्या मॉडेलला जागतिक दर्जा मिळवून दिला; मात्र २०२६ च्या विश्वचषकाने एक महत्त्वाचा संदेश दिला. आजचा स्पेन एका क्लबवर अवलंबून नाही. रॉड्री मँचेस्टर सिटीच्या पद्धतीत घडला, फॅबियन रुईझने इटली आणि फ्रान्समध्ये स्वतःला घडवले, पेड्रो पोरोचा विकास वेगळ्या प्रणालीत झाला, तर लॅमिन यामाल बार्सिलोनातून आला. क्लब वेगवेगळे; पण राष्ट्रीय संघात आल्यानंतर सर्वजण एकाच फुटबॉल भाषेत बोलतात. याचे कारण म्हणजे, वर्षानुवर्षे उभी केलेली समान फुटबॉल तत्त्वज्ञानाची साखळी. क्लब वेगळे असले, तरी खेळ समजून घेण्याचा समान पाया!