

स्टारशिप रॉकेटचे बूस्टर पुन्हा प्रक्षेपणस्थळी सुरक्षितपणे आणण्याची ऐतिहासिक कामगिरी, रोबोटॅक्सी, रोबोव्हॅन तसेच रोबो यांचे अभूतपूर्व सादरीकरण यामुळे एलन मस्क यांनी सार्या जगाचे लक्ष अलीकडे वेधून घेतले. त्यांच्या या मोहिमांमुळे अंतराळापासून शहरी वाहतुकीपर्यंत अनेक आमूलाग्र बदल भविष्यकाळात होणार आहेत. रोबोही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होण्याचे संकेत मिळत आहेत.
इलेक्ट्रिक ड्रायव्हरलेस कारपासून थेट अंतराळ प्रवासापर्यंत आणि न्युरोसायन्सपासून रोबोटिक्सपर्यंत अनेक क्षेत्रांत सातत्याने चर्चेत असलेले आणि आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनांनी स्वत:चा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे एलन मस्क . जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या या उद्योगपतीने अलीकडे केलेला रॉकेट फेरवापराबाबतचा यशस्वी प्रयोग, तसेच रोबोटॅक्सी, रोबोव्हॅन आणि रोबो यांचे केलेले सादरीकरण हे विज्ञानविषयक कपोलकल्पित कथा (सायन्स फिक्शन) प्रत्यक्षात आणल्या जात असल्याचा अनुभव देणारे होते. केवळ अमेरिकेतच नव्हे, तर सार्या जगाने श्वास रोखून हे आनंदाचे चित्तथरारक क्षण अनुभवले. रॉकेटच्या फेरवापराच्या प्रयत्नाला मस्क यांना मिळालेले यश हे ऐतिहासिक आणि भविष्यातील मानवी अंतराळ प्रवासात क्रांती घडवून आणणारे आहे. मस्क यांच्या खासगी स्पेस एक्स कंपनीच्या स्टारशिप रॉकेटचे बूस्टर सुरक्षितपणे पुन्हा त्याच लाँचपॅडवर परतणे ही अशक्यप्राय वाटणारी किमया मोहिमेला गती देणारी ठरेल. या कामगिरीमुळे अंतराळ मोहिमेचा खर्चही कमी होणार आहे.
स्टारशिप हे ‘टू स्टेज हेवी लिफ्ट व्हेईकल’ म्हणून ओळखले जाते. याची बूस्टर (सुपर हेवी) आणि वरचा भाग (स्टारशिप स्पेसक्राफ्ट) अशी रचना असून, त्याची उंची 120 मीटर एवढी आहे. इंधनासह त्याचे वजन 5 हजार टन इतके असून, एका दमात अवकाशात म्हणजे पृथ्वीच्या कक्षेबाहेर 100 किलोमीटर उंचीवर 100 टनांपेक्षा जास्त वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. याचा अर्थ एकाच वेळी किमान 100 अंतराळवीर ते नेऊ शकते. नील आर्मस्ट्राँगला चंद्रावर घेऊन जाणार्या सॅटर्न फाईव्ह (111 मीटर) पेक्षाही ते अधिक उंच आहे. कुतुबमिनारची उंची 72.5 मीटर इतकी आहे. म्हणजे 13 ऑक्टोबरच्या स्टारशिपच्या फर्स्ट स्टेज बूस्टरइतकी आहे. न्यूयॉर्कमधील स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्यापेक्षाही 90 फुटांनी म्हणजे सुमारे 27.4 मीटरने ते उंच आहे. ते पृथ्वीच्या कक्षेत तसेच चंद्र, मंगळ आदी ग्रहांवर वस्तू, माणसे घेऊन जाऊ शकते. या रॉकेटच्या प्रक्षेपणासाठी सुपर हेवी 33 मिथेन बर्निंग रॅप्टर इंजिनांचा वापर करण्यात आला. प्रक्षेपणानंतर 3 मिनिटे 40 सेकंदांनी बूस्टर स्टारशिपपासून अलग होऊन उलट्या दिशेने टेक्सास किनार्याच्या दिशेने निघाले. त्यासाठी 13 रॅप्टर इंजिन्स चालू झाली. एरव्ही अशी रॉकेटस् समुद्रात पडतात; पण यावेळच्या पाचव्या चाचणीत ते थेट लाँच पॅडच्या टॉवरमधील मॅकझिलच्या बाहूंमध्ये (मेकॅनिकल आर्म्स) विसावले. स्टारशिपचा प्रक्षेपणानंतरचा वेग प्रतिताशी 27 हजार 350 किलोमीटर होता; पण परतीच्या प्रवासात तो कमी करण्यात आला.
‘स्पेस एक्स’ला यापुढे चंद्रावर, मंगळावर अंतराळवीर पाठविण्याची जी महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घ्यायची आहे त्यासाठी स्टारशिप एचएलएस व्यवस्था (ह्युमन लँडिंग सिस्टीम) वापरावी लागेल. अर्टिमिस 3 मिशन अंतर्गत ‘स्पेस एक्स’ आणि ‘नासा’ यांना 2026 पर्यंत मंगळावर पहिला माणूस पाठवायचा असल्याने या कामगिरीसाठी अमेरिकन सरकारने 4 अब्ज डॉलरचे कंत्राट या कंपनीला दिले आहे. ही मोहीम हाती घेण्यापूर्वी स्टारशिप ही कमी खर्चाची; पण भरवशाची आणि सुरक्षित यंत्रणा आहे, याची खात्री त्यांना ‘नासा’ आणि सरकारला द्यावयाची आहे. परग्रहावर मानवी वस्ती तयार क रण्याच्या द़ृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. वर्षातून त्यांना या रॉकेटची अशी अनेक उड्डाणे करावयाची आहेत. अर्थात, याचा पर्यावरणावरही परिणाम होणार; पण रॉकेटचा फेरवापर झाल्यास त्याची तीव्रता कमी होऊ शकते. अंतराळातील नवीन व्यावसायिक संधींचे दालनही यामुळे खुले होणार आहे. अंतराळवीरांसाठी आणि नव्या पिढीतील संशोधकांसाठी हा प्रकल्प स्फूर्ती आणि प्रेरणा देणारा म्हणावा लागेल. विजेच्या दिव्याचा शोध लावणार्या थॉमस एडिसनसारखी चिकाटी आणि सातत्य मस्क आणि त्यांच्याबरोबर काम करणार्या वैज्ञानिकांकडे आणि तंत्रज्ञांकडे आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द असेल तर यशस्वी होता येते. गरज असते ते सातत्याने काम करण्याची, हा मस्क यांचा सल्लाही तितकाच मोलाचा आहे. ‘वन स्मॉल स्टेप फॉर अ मॅन, वन जायंट लीप फॉर मॅनकाईंड’ हे पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलेल्या नील आर्मस्ट्राँगने 20 जुलै 1969 या दिवशी काढलेले उद्गार आहेत. त्या दिवशी माणसाने पहिले पाऊल चंद्रावर ठेवल्याचा रोमहर्षक क्षण होता. तसेच वातावरण चिका बोसा या प्रक्षेपणस्थळी 13 ऑक्टोबरला होते.
अर्थात, यापूर्वी केलेल्या अथक प्रयोगांनंतर हे यश मिळाले आहे. अंतराळाच्या गर्भात प्रवास करता यावा, यासाठी त्यांच्या कंपनीने 2016 मध्ये बिग फाल्कन रॉकेट या स्पेसक्राफ्टनिर्मितीची योजना आखली. 2018 मध्ये या योजनेवर काम करीत असताना त्याचे नामांतर ‘स्टारशिप’ असे करण्यात आले. रॉकेटचा पुनर्वापर करून खर्चात बचत व्हावी हा या प्रयत्नांमागचा उद्देश होता. रॉकेट प्रक्षेपण ही खूप खर्चिक बाब असल्याने ही गरज मस्क यांना जाणवू लागली. 2019 पासून रॉकेटच्या प्रोटोटाईप चाचणीला सुरुवात झाली. स्टारहॉपर या रॉकेटच्या चाचणीने पुढील वाटचाल सुकर केली. त्यानंतर त्यांनी स्टारशिप कॅप्सूल आणि हेवी बूस्टर या साहसी मोहिमांवर लक्ष केंद्रित केले. एप्रिल 2023 मध्ये ‘स्टारशिप’च्या सर्वात शक्तिशाली रॉकेटची चाचणी घेण्यात आली. पृथ्वीची एक फेरी हे रॉकेट पूर्ण क रेल, अशी अपेक्षा होती; पण रॉकेटच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ही मोहीम बारगळल्याचे सांगितले जाते; पण या अपयशामुळे आपले मनोधैर्य त्यांच्या टीमने खचू दिले नाही. याच वर्षी नोव्हेंबरमध्ये आखलेल्या मोहिमेत पहिल्या खेपेसारखी हानी झाली नाही. उलट पुढील चाचण्यांसाठी आवश्यक असणारी माहिती यातून मिळाली. चाचणीमध्ये ‘स्टारशिप’च्या हीटशिल्डचे नुकसान झाले. त्यामुळे सॉफ्ट लँडिंगमध्ये अडथळे आले. या तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी वैज्ञानिकांनी तब्बल 12 हजार तास हिटशिल्डच्या सुधारणांसाठी काम केले. ‘स्टारशिप’च्या हेवी बूस्टर रॉकेटचा परतीचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मेकॅझिल या विशेष टॉवर्सचा वापर करण्यात आला. या टॉवर्समुळे बूस्टरच्या लँडिंगमध्ये आणि अंतराळात पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी मदत झाली. मॅकझिलचे बलदंड धातू (चॉपस्टिक्स) इथे महत्त्वाचे ठरले. त्यांच्यामुळे बूस्टरला सुरक्षितपणे पकडण्यात आणि लँडिंगस्थळी रॉकेटला आणून सोडण्यात मदत झाली. यामुळे रॉकेटच्या पुनर्वापराचा मार्ग आणखी सोपा होईल. 13 ऑक्टोबर 2024 च्या प्रयोगात हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. या उपक्रमात वेगवेगळ्या खासगी संस्थांनी तब्बल साडेतीन अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
या उत्तुंग कामगिरीपूर्वी दोन दिवस आधी मस्क यांनी हॉलीवूडच्या वॉर्नर ब्रदर्सच्या स्टुडिओत ‘वुई रोबॉट’ या बहुप्रतीक्षित कार्यक्रमात सायन्स फिक्शन प्रत्यक्षात कसे येऊ शकते, हे दाखवून देताना भविष्यकाळात एआय, रोबोटिक्सची दुनिया कोणती जादू करू शकते, याची अनोखी झलक सादर केली. हॉलीवूडच्या वातावरणाला साजेसा झगमगाट आणि जादुमयी माहोल या कार्यक्रमाला होता. ड्रायव्हरलेस कार क्षेत्रात टेस्लाने सुरुवातीपासून आघाडी घेतली असल्याने यावेळी सादर करण्यात आलेल्या रोबोटॅक्सी आणि रोबोव्हॅन यांच्याविषयी कमालीची उत्सुक ता होती. आपोआप उघडल्या जाणार्या दोन दारांच्या या टॅक्सीला स्टेअरिंग व्हील किंवा पॅडल नव्हते. या गाडीतून मस्क यांनी फेरफटका मारून दाखविला. त्याचप्रमाणे 20 प्रवाशांना घेऊन जाणारी ड्रायव्हरलेस रोबोव्हॅनही भविष्यकाळातील शहरी वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्यास पूरक ठरेल, अशी आशा निर्माण करणारी वाटली. रोबोटॅक्सीची किंमत सुमारे 30 हजार डॉलर म्हणजे सुमारे 25 लाख 20 हजार रुपये इतकी होते. इंडक्टिव्ह तंत्रज्ञानाच्या मदतीने वायरलेस चार्जिंगची सुविधा हे याचे आणखी एक आकर्षण. कार चालवताना ड्रायव्हर ज्या अनेक चुका करू शकतात, त्या या यंत्रणेत खरोखरच टळतील का, त्या तुलनेत हा प्रवास दसपट किंवा वीसपट सुरक्षित होईल का? अशा प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देऊ शकतो. कारण, मधल्या काळात टेस्लाच्या अशा कारचे बरेच अपघात झाले आहेत; शिवाय आता या कंपनीकडून प्रतीक्षा आहे, ती ऑटोनॉमस आणि अनसुपरव्हाईज्ड ड्रायव्हिंग सुविधा असणार्या मॉडेल्सची. मात्र, अशा कार उपलब्ध झाल्या तर लोक आपल्या प्रवासाच्या वेळेत पुस्तके वाचू शकतील अथवा आवडीचा चित्रपट पाहू शकतील वा अन्य कामे करू शक तील. ड्रायव्हरलेस कारनिर्मितीत वायमो आणि क्रूझ यासारख्या कंपन्यांनी अलीकडील काळात बर्याच चाचण्या घेतलेल्या आहेत, त्यांच्याशी आता मस्क यांना स्पर्धा करावयाची आहे.
मस्क यांना टेस्ला ही केवळ इलेक्ट्रिक वाहननिर्मितीपुरती मर्यादित न ठेवता ती रोबोटिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून विकसित करावयाची आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर करून आधुनिक रोबो तयार करावयास लागतील. त्याचे प्रतिबिंब या कार्यक्रमात पडणे स्वाभाविक होते. इथे जे रोबो आणले होते, ते प्रेक्षकांमध्ये मिसळत होते. त्यांच्याशी गप्पा मारत होते. पार्टीत लोकांना विविध पेये एकत्र करून ‘ड्रिंक्स’ तयार करून देत होते. पोर्चमध्ये आलेली वस्तू उचलून योग्य जागी ठेवण्यासारखी प्रात्यक्षिकेही यावेळी पाहता आली. भविष्यकाळात हे यंत्रमानव घरातील छोटी-मोठी कामे सहज करू शकतील. बागेतील झाडांना पाणी घालणे, कुत्र्याला फिरायला घेऊन जाणे, घराबाहेरची हिरवळ व्यवस्थित कापून ती आखीव-रेखीव करणे इत्यादी अनेक कामे ते करू शकतात आणि कामाचा भार हलका करू शकतात. सुमारे 20 हजार डॉलर किमतीत ते काही वर्षांत मिळूही लागतील. इथे जे बोलणारे, हातवारे वा नाच करणारे रोबो दाखविले गेले होते, त्यांना टेस्लाचे कर्मचारी एआय आणि रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित करीत होते, अशी टीकाही नंतर झाली; पण त्याबाबतचा वादाचा भाग बाजूला ठेवला तरी यापुढच्या काळात ते मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होतील, अशी खूणगाठ बांधता येते.
मस्क यांच्या अनेक नवनव्या बाबी आणि संशोधने अचंबित करणार्या आहेत. विशेषत:, वाहतुकीच्या साधनांच्या क्षेत्रात तर त्यांनी क्रांती घडविली आहे. जेट फायटरसह इलेक्ट्रिक विमान तयार करण्याचे काम ‘स्पेस एक्स’ने केले आहे. त्यांनी बनविलेले फायटर जेट ताशी 4,600 मैल एवढ्या हायपरसॉनिक वेगाने उड्डाण करू शकते. एकूण मस्क यांची झेप आणि आवाका प्रचंड असल्याचे यावरून दिसून येते. टेस्ला, स्पेस एक्स, एक्स (पूर्वीचे ट्विटर) या कंपन्यांबरोबरच त्यांनी इतर धाडसी व्यवसायातही मोठी गुंतवणूक केली आहे. पोकळीच्या बोगद्यात द्रुतगती ट्रेनचे मार्ग त्यांना बांधायचे आहेत. कृत्रिम प्रज्ञा मानवी मेंदूशी एकात्म करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. सौरऊर्जा आणि बॅटरी उद्योग त्यांना भरभराटीला आणावयाचे आहेत. म्हणूनच त्यांच्या कंपन्यांच्या यादीत बोअरिंग कंपनी (पायाभूत सुविधा आणि बोगदे बांधकाम व्यवसाय), स्टारलिंक (ग्लोबल इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी उपग्रह वापर), टेस्ला रोबोटिक्स (रोबोटिक्स आणि ऑटोमेशन इनिशिएटिव्ह), न्युरोलिंक (ब्रेन-मशिन इंटरफेसवरील न्युरोटेक्नॉलॉजी कंपनी) इत्यादींची नावे आढळतात. त्यांच्या अनेक जमेच्या बाजू असल्या तरी मस्क हे विक्षिप्त, लहरी म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अलीकडे डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीत पूर्ण पाठिंबा देऊन त्यांना आपले अर्थबळ, ब्रँड, एक्सची ताकद दिली आहे. त्याबद्दल त्यांना टीका सहन करावी लागत आहे. ट्रम्प सत्तेवर आले तर त्यांना सरकारी खर्च योग्य पद्धतीने करण्यासाठी जो आयोग नेमला जाईल त्याचे अध्यक्षपद मिळणार आहे.
एरव्ही एखाद्या रॉकेटचे प्रक्षेपण होते, त्यावेळी त्याचा खालचा भाग तुटून वेगळा होताना खाली कोठेही पडतो; पण स्टारशिपच्या 13 ऑक्टोबरला सकाळी 8.25 वाजता बोका चिका, टेक्सास इथे झालेल्या प्रयोगात प्रथमच वेगळे घडले. रॉकेटचा हा भाग आकाशातच वळला आणि तो पृथ्वीच्या दिशेने परत येऊ लागला. त्याचा वेग कमी करण्यासाठी इंजिन्स पुन्हा सुरू झाली. ते हळूहळू लाँचपॅडजवळ पोहोचले, तसे इंजिन पुन्हा बंद झाले आणि लाँचपॅडवरच्या भुज्यांनी ते अलगदपणे जमिनीला स्पर्श होण्यापूर्वीच पकडले. एखाद्या गोलंदाजाने आकाशात उंच उडालेला चेंडू शिताफीने पकडावा तशा स्वरूपाचा हा क्षण उपस्थितांच्या शरीरावर रोमांच उभे करणारा होता. स्वत: मस्क आणि त्यांच्या सहकार्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्रक्षेपण के लेली रॉकेटस् सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याची क्षमता ‘स्पेस एक्स’ने यापूर्वीच प्राप्त केली आहे; पण जिथून रॉकेटचे प्रक्षेपण झाले, तिथेच ते परत सुरक्षितपणे आणले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मंगळावर वस्ती करण्याचे मस्क (वय 53) यांचे गेल्या 20 वर्षांपासूनचे स्वप्न आहे. आयझॅक असिमोव्ह या लेखकाच्या 1951 च्या ‘फाऊंडेशन’ या सायन्स फिक्शनने त्यांना लहान वयात मंगळाकडे आकर्षित केले. यातील नायक मानवी सृष्टी वाचविण्यासाठी मंगळावर वसाहत निर्माण करतो. हे कथानक त्यांच्या मनात घर करून बसले आहे. पृथ्वीवरील जीवन संपुष्टात आणणारी घटना मानवतेचा अंत घडवून आणू शकते; पण आपण मंगळावर तळ बनविला, तर माणसे टिकून राहू शकतात, असे त्यांना वाटते. पृथ्वीवरील डायनासोरदेखील जीवन समाप्तीच्या घटनेने संपले. ते टाळण्यासाठी ही वस्ती तिथे निर्माण करायला हवी, अशी त्यांची इच्छा दिसते. तिथे शहर वसविण्याच्या द़ृष्टीने त्याचे डिझाईन आणि आराखडे तयार करण्यास त्यांनी यापूर्वीच सुरुवात केली आहे. तिथे घरे कशी बांधता येतील, त्यासाठी कोणते साहित्य वापरता येईल, यावर त्यांची टीम अहोरात्र काम करत आहे. तेथील प्रतिकूल हवामानाला तोंड देण्यासाठी स्पेससूटस् तयार करण्यावरही भर आहे. तिथे मुले होऊ शकतील का, यावर त्यांची वैद्यकीय तुकडी संशोधन करीत असून, आपले स्पर्मही त्यासाठी देण्याची मस्क यांची तयारी आहे. तिथे मानवी वस्ती करण्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत, असे म्हणता येईल. किंबहुना, तिथे आपल्याला शेवटचा श्वास घ्यायचा आहे, असेही ते एकदा म्हणाले होते. येत्या 20 वर्षांत तिथे 10 लाख लोकांची वस्ती असेल, असा त्यांचा अंदाज आहे. जगातील या सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतीची संपत्ती 270 अब्ज डॉलर असून (47 अब्ज डॉलर टेस्ला पे पॅकेजसह) आपण आपल्या मंगळ ग्रहावरील वस्तीच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याचा वापर करू इच्छित आहोत, असे त्यांनी एकदा बोलून दाखविले होते.