

रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक
जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे झपाट्याने होत चाललेले हवामान बदल यांमुळे सबंध जगापुढे नवे आव्हान उभे झाले आहे. चक्रीवादळे, महापूर, दुष्काळ, अतिवृष्टी या घटनांची तीव्रता हे सातत्याने दर्शवत आहे. अलीकडेच फर्न नावाच्या हिमवादळामुळे जगाची महासत्ता असणारी अमेरिका गोठलेली दिसून आली. याचा आर्थिक फटका इतका मोठा आहे की, अमेरिकेच्या एकूण जीडीपीमध्ये 0.5 ते 1.5 टक्क्यांची घट होऊ शकते.
निसर्गाच्या प्रकोपापुढे मानवी प्रगती अनेकदा हतबल ठरते, याची प्रचिती सध्या अमेरिकेला येत आहे. अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीसह मोठ्या भूभागाला ‘फर्न’ नावाच्या भीषण हिमवादळाने कचाट्यात घेतले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे केवळ जनजीवनच विस्कळीत झाले नाही, तर जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. बर्फवृष्टी, गोठवणारी थंडी आणि वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती आधुनिक युगातील पायाभूत सुविधांच्या मर्यादांचे दर्शन घडवत आहे. ‘स्नो स्टॉर्म’ ही केवळ बर्फ पडण्याची प्रक्रिया नसून ती एक गुंतागुंतीची वातावरणीय घटना आहे. यासाठी तीन मुख्य घटकांची आवश्यकता असते. प्रथम म्हणजे आर्द्रता, जी ढग आणि अवर्षण निर्माण करण्यासाठी आवश्यक असते. दुसरे म्हणजे ‘लिफ्ट’ किंवा हवेचा वर जाणारा प्रवाह, जो आर्द्रतेला उंचावर नेऊन थंड करतो. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गोठवणारे तापमान. जेव्हा ढगांमधील आणि जमिनीजवळील तापमान 0 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असते, तेव्हा पावसाच्या थेंबांचे रूपांतर बर्फाच्या स्फटिकात होते.
जेव्हा उष्ण आणि आर्द्र हवा थंड हवेच्या दाबाखाली येते, तेव्हा हवेचा दाब कमी होऊन चक्रीवादळाची स्थिती निर्माण होते. अमेरिकेच्या बाबतीत उत्तरेकडील कॅनडातून येणारी थंड हवा आणि दक्षिणेकडील मेक्सिकोच्या आखातातून येणारी आर्द्र हवा जेव्हा एकमेकांना धडकतात, तेव्हा भीषण हिमवादळे निर्माण होतात. ‘फर्न’ वादळाच्या बाबतीतही हेच घडले असून, यामुळे अनेक राज्यांमध्ये विक्रमी बर्फवृष्टी झाली आहे.
मानवी इतिहासात काही हिमवादळांनी कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे. 1888 मध्ये आलेले द ग्रेट ब्लिझार्ड हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात घातक हिमवादळ मानले जाते. यामध्ये सुमारे 400 लोकांचा मृत्यू झाला होता आणि न्यूयॉर्कसारख्या शहरात 50 फुटांपर्यंत बर्फाचे ढिगारे साचले होते. याच घटनेनंतर शहरांमध्ये भुयारी रेल्वे बांधण्याची संकल्पना पुढे आली. स्टॉर्म ऑफ द सेंच्युरी म्हणून ओळखल्या जाणार्या 1993 मधील हिमवादळाने अमेरिकेतील 26 राज्यांना तडाखा दिला होता. यामध्ये 300 हून अधिक लोकांचा बळी गेला आणि सुमारे 5.5 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. 2021 मध्ये आलेल्या टेक्सस विंटर स्टॉर्म या वादळाला ‘व्हायोला’ असेही म्हटले जाते. यामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे प्रचंड नुकसान झाले होते. याचे एकूण आर्थिक नुकसान 24 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होते.
खासगी हवामान संस्था ‘अॅक्युवेदर’ च्या अंदाजानुसार, या वादळाचा प्राथमिक फटका 105 अब्ज ते 115 अब्ज डॉलर्स इतका असू शकतो. यामध्ये 11,400 हून अधिक विमान फेर्या रद्द झाल्यामुळे झालेले नुकसान, लाखो घरांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने झालेली व्यापारी हानी आणि रस्ते वाहतूक ठप्प झाल्यामुळे कोलमडलेली पुरवठा साखळी यांचा समावेश आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक उद्योग आठवडाभरासाठी बंद ठेवावे लागले आहेत, ज्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. चक्रीवादळ किंवा पुरामध्ये इमारतींचे होणारे नुकसान मोजणे सोपे असते. कारण, त्याचा विमा उतरवलेला असतो. मात्र, हिमवादळात होणारे नुकसान हे ‘संधींचे नुकसान’ असते. दुकाने बंद राहणे, लोकांनी खरेदीला न जाणे, कामाचे तास वाया जाणे या गोष्टींची मोजणी करणे कठीण असते. मात्र, काही क्षेत्रांना याचा फायदाही होतो. उदाहरणार्थ, बर्फ उपसण्याचे यंत्र, मीठ आणि गरम कपड्यांच्या विक्रीत मोठी वाढ होते. परंतु, हे फायदे झालेल्या एकूण नुकसानीच्या तुलनेत नगण्य असतात. हवामान बदलामुळे अशाप्रकारच्या आपत्तींची वारंवारता वाढत आहे. ‘ला निना’सारख्या जागतिक हवामान बदलांच्या प्रक्रियेमुळे 2026 चा हा हिवाळा अधिक तीव्र ठरला आहे.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण वादळाचा अंदाज वर्तवू शकतो; मात्र त्याच्या आर्थिक परिणामांपासून पूर्णपणे वाचणे आजही मानवासाठी मोठे आव्हान आहे. जागतिक व्यापार हा प्रामुख्याने सागरी मार्ग, हवाई वाहतूक आणि रस्ते दळणवळणावर अवलंबून असतो. हवामानातील टोकाचे बदल या तिन्ही माध्यमांना थेट तडाखा देत आहेत. यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होत आहे. सागरी व्यापाराचा विचार केल्यास समुद्राच्या पाणीपातळीत होणारी वाढ आणि वारंवार येणारी चक्रीवादळे बंदरांच्या कामकाजात अडथळे निर्माण करत आहेत. उदाहरणार्थ, पनामा कालव्यासारख्या महत्त्वाच्या जलमार्गावर पडणार्या दुष्काळामुळे पाण्याची पातळी खालावते. परिणामी, जहाजांची ये-जा मर्यादित करावी लागते. यामुळे मालाची वाहतूक मंदावते आणि वाहतूक खर्च वाढतो, ज्याचा अंतिम भार ग्राहकांवर पडतो. याउलट आर्क्टिक महासागरातील बर्फ वितळल्यामुळे नवे व्यापारी मार्ग खुले होत असले, तरी ते पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहेत.
शेती आणि अन्नसुरक्षा हा जागतिक व्यापाराचा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे. अनिश्चित पाऊस, अतिवृष्टी किंवा दीर्घकाळ चालणारा दुष्काळ यामुळे पिकांचे उत्पादन घटते. जेव्हा एखादा मोठा उत्पादक देश हवामान बदलामुळे पिकांचे नुकसान सोसतो, तेव्हा जागतिक बाजारपेठेत अन्नाचे भाव गगनाला भिडतात. यामुळे अनेक देश आपल्या निर्यातीवर बंदी घालतात, जसे की भारताने अलीकडे तांदूळ निर्यातीबाबत निर्णय घेतले होते. अशा निर्णयांचा जागतिक व्यापार संतुलनावर मोठा परिणाम होतो. थोडक्यात, हवामान बदल हा आता केवळ नैसर्गिक नसून तो एक आर्थिक मुद्दा बनला आहे. जागतिक व्यापाराचे भविष्य आता देश किती वेगाने ‘हरित ऊर्जा’ आणि ‘शाश्वत व्यापार’ धोरणांचा अवलंब करतात, यावर अवलंबून आहे. यासंदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. अनेकदा अशाप्रकारच्या हिमवादळांमुळे जागतिक तापमानवाढीसंदर्भातील वास्तवावर टीका केली जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः जागतिक तापमानवाढ न मानणार्यांपैकी एक आहेत. त्यांच्यासाठी अशाप्रकारचे हिमवादळ आपल्या पूर्वीच्या दाव्यांना पुष्टी देणारे ठरले आहे; परंतु प्रत्यक्षात हा दीर्घकालीन हवामान पद्धतींमधील बदल आहे. अशा टोकाच्या हवामान घटना किती वेळा घडतात, त्यांची तीव्रता किती आहे आणि एकूणच वातावरणाचे वर्तन कसे आहे, याचा अभ्यास केल्यास हवामान बदलाविषयी पूर्ण आकलन होऊ शकते. वातावरण जसजसे उबदार होते, तसतसे त्यामध्ये पाण्याची वाफ साठवण्याची क्षमता वाढते. जेव्हा तापमान कमी होते, तेव्हा हे जास्तीचे बाष्प नाहीसे होत नाही, तर ते पावसाच्या किंवा अतिवृष्टीच्या स्वरूपात खाली येते. हिवाळ्यात यामुळेच प्रचंड बर्फवृष्टी होते. काही ठिकाणी पाऊस आणि बर्फ यांचे मिश्रण किंवा गारपीट होऊन धोका वाढतो.
उत्तर ध्रुवावरील ‘पोलार जेट स्ट्रीम’ मुळे थंड हवा उत्तर ध्रुवाजवळ बंदिस्त राहते; मात्र आर्क्टिक क्षेत्र उर्वरित जगाच्या तुलनेत चार पटीने वेगाने तापत आहे. या उष्णतेमुळे ‘जेट स्ट्रीम’ कमकुवत होऊन उत्तरेकडील अतिशय थंड हवा दक्षिणेकडे सरकते आणि कडाक्याची थंडी निर्माण होते. पर्यावरण शास्त्रज्ञांच्या मते अतिउष्णता आणि अतिथंडी या एकमेकींच्या विरोधात नसून, त्या एकाच अस्थिर हवामान यंत्रणेचे दोन पैलू आहेत. वाढलेली बर्फवृष्टी आणि तापमानातील अचानक होणारे बदल हे तापत असलेल्या पृथ्वीचेच लक्षण आहे. वातावरण दिवसेंदिवस अधिक अनिश्चित होत चालले असून, याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात भीषण संकटाचा सामना करावा लागू शकतो.
आर्थिक फटका मोठा
सध्याच्या ‘फर्न’ हिमवादळामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे गणित बिघडले आहे. अर्थशास्त्रज्ञांच्या मते, या एका वादळामुळे अमेरिकेच्या एकूण जीडीपीमध्ये 0.5 ते 1.5 टक्क्यांची घट होऊ शकते. अमेरिकेची अर्थव्यवस्था साधारण 30 ट्रिलियन डॉलर्सची आहे, याचा विचार करता हे नुकसान 150 अब्ज डॉलर्सहून अधिक असू शकते.