

डॉ. संजय गायकवाड
यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मेरी ई. ब्रंकॉ, फ्रेड राम्सडेल आणि शिमोन साकागुची या तीन प्रमुख वैज्ञानिकांना संयुक्तरीत्या देण्यात आला आहे. या तिघांनी मिळून मानवी शरीरातील प्रतिरक्षा प्रणाली म्हणजेच इम्यून सिस्टम स्वतःला कसे नियंत्रित करते आणि आपल्या अवयवांवर हल्ला का करत नाही, याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले आहे. या संशोधनामुळे केवळ जैवशास्त्राच्या क्षेत्रातच नव्हे, तर आधुनिक औषधनिर्मिती, जीन थेरपी आणि कर्करोग उपचाराच्या दिशेनेही नवे दरवाजे खुले झाले आहेत.
मानवी शरीरातील इम्यून सिस्टम म्हणजे एक अत्यंत गुंतागुंतीची पण कार्यक्षम यंत्रणा आहे. ती शरीराला जीवाणू, विषाणू, परजीवी, बुरशी यांसारख्या बाहेरील आक्रमकांपासून संरक्षण करते. आपले हृदय, यकृत, मूत्रपिंड किंवा मेंदू यांच्यावर हे परकीय घटक हल्ला करतात तेव्हा इम्यून सिस्टम त्वरित ओळख करून त्यांना नष्ट करते; पण कधी कधी हीच इम्यून सिस्टम गोंधळते आणि स्वतःच्या अवयवांवर हल्ला करते. यालाच ऑटोइम्यून आजार असे म्हटले जाते. रुमेटॉईड आर्थरायटिस, टाईप-1 मधुमेह, ल्युपस, मल्टिपल स्क्लेरोसिस यांसारखे आजार त्याचे उदाहरण आहेत. हे आजार शरीरातील चुकीच्या प्रतिरक्षा प्रतिसादामुळे निर्माण होतात.
यंदाच्या वर्षी ज्या तीन शास्त्रज्ञांना वैद्यकीय शास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे, त्यात तिन्ही वैज्ञानिकांनी या चुकीच्या प्रतिसादाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ते शोधण्यात यशस्वी झाले की, शरीरात अशा काही विशिष्ट पेशी असतात ज्या आक्रमक टी-सेल्सना नियंत्रित ठेवतात. या विशेष पेशींना नियामक टी-कोशिका किंवा टिरेग्स (टी-रेग्युलेटरी सेल्स) असे नाव देण्यात आले.
जपानचे शिमोन साकागुची यांनी 1995 मध्ये या नियामक पेशींचे अस्तित्व प्रथम ओळखले. त्यांनी प्रयोगांच्या माध्यमातून दाखवले की, या टिरेग्स पेशी इम्यून सिस्टममधील ‘ब्रेक’ म्हणून काम करतात. त्या आक्रमक पेशींना स्वतःच्या ऊतकांवर हल्ला करण्यापासून रोखतात आणि शरीरात समतोल राखतात. यानंतर अमेरिकन वैज्ञानिक मेरी ब्रंकॉ आणि फ्रेड राम्सडेल यांनी 2001 मध्ये या नियामक टी-कोशिकांना नियंत्रित करणार्या जनुकाचा शोध लावला. या जनुकाला एफ-ओ-एक्स-पी-थ्री (ऋजदझ3) असे नाव देण्यात आले. त्यांनी प्रयोगांद्वारे दाखवले की, या जनुकात दोष निर्माण झाला, तर टिरेग्स पेशी नीट विकसित होत नाहीत आणि परिणामी शरीराची इम्यून सिस्टम स्वतःच्या पेशींवर हल्ला करते. या दोषामुळे त्वचेवर पुरळ, ग्रंथींची सूज, अवयवांमध्ये दाह अशा समस्या निर्माण होतात. पुढे साकागुची यांनी 2003 मध्ये या सर्व संशोधनांना एकत्र करून पेरिफेरल इम्यून टॉलरन्स ही संकल्पना मांडली.
पूर्वी वैज्ञानिकांचे मत असे होते की, इम्यून सिस्टमला ‘थायमस’ या अवयवात प्रशिक्षण दिले जाते आणि ती केवळ तिथेच परकीय व स्वकीय घटकांची ओळख शिकते; पण या संशोधनामुळे स्पष्ट झाले की, शरीरात थायमस व्यतिरिक्त इतर ऊतकांमध्येही टिरेग्स सतत काम करत असतात आणि प्रतिरक्षा प्रतिसादाचे संतुलन राखतात. हीच प्रक्रिया पेरिफेरल टॉलरन्स म्हणून ओळखली जाते. म्हणजेच, इम्यून सिस्टम स्वतःलाच नियंत्रित करण्याची क्षमता शरीराच्या प्रत्येक भागात आहे. नोबेल समितीच्या निवेदनानुसार, या शोधामुळे मानवजातीला समजले की, प्रतिरक्षा प्रणाली केवळ संरक्षणासाठी नव्हे, तर आत्मसंयमनासाठीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. हे नियंत्रण हरवले, तर आपली इम्यून सिस्टम आपल्याच पेशींवर हल्ला करते आणि अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरते. त्यामुळे ही शोधयात्रा आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक मूलभूत प्रगती मानली जाते.
आज जगभरात ऑटोइम्यून आजार झपाट्याने वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी अशा आजारांचे प्रमाण सुमारे 20 टक्क्यांनी वाढत आहे. रुमेटॉईड आर्थरायटिसचे सुमारे 8 लाख रुग्ण आहेत, तर टाईप-1 मधुमेहाने प्रभावित झालेल्या मुलांची संख्या एक लाखांच्या आसपास आहे. ताणतणाव, प्रदूषण, चुकीचा आहार आणि झोपेचा अभाव हे या वाढीमागील प्रमुख घटक मानले जातात. अशा पार्श्वभूमीवर या वर्षीचा नोबेल पुरस्कार भारतासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण, तो आपल्या संशोधन संस्थांना नवीन दिशा देऊ शकतो. दिल्लीतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्यूनोलॉजी’ आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ सध्या टिरेग्स आणि एफओएक्सपीथ्री जनुकावर आधारित संशोधन करत आहेत. या संशोधनांमुळे भविष्यात जीन थेरपीच्या माध्यमातून ऑटोइम्यून आजारांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होईल, अशी आशा आहे. तसेच कर्करोगाच्या उपचारांतही या पेशींचा वापर करण्याचे प्रयोग सुरू आहेत. कारण, कधी कधी टिरेग्स पेशी कर्करोगाच्या पेशींना देखील संरक्षण देतात. त्यामुळे त्यांचे संतुलन राखणे, हे उपचारातील एक महत्त्वाचे आव्हान आहे.
या शोधाचे दुसरे महत्त्वाचे उपयोग क्षेत्र म्हणजे इम्यून थेरपी. आधुनिक औषधशास्त्रात इम्यून थेरपी म्हणजे शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला बळकट करून आजारांवर मात करणे. कर्करोग, क्षयरोग, मलेरिया, तसेच विविध विषाणूजन्य संसर्गांवर लस तयार करताना या संशोधनांचा आधार घेतला जात आहे. विशेषतः भारतासारख्या देशात, जिथे टीबी आणि मलेरिया अजूनही गंभीर समस्या आहेत, तिथे टिरेग्सच्या नियमनावर आधारित नवीन लस किंवा औषधे विकसित होऊ शकतात. कोव्हिड-19 महामारीदरम्यान प्रतिरक्षा प्रणालीच्या असंतुलनामुळे लाखो लोक गंभीर आजाराने ग्रस्त झाले. काही रुग्णांमध्ये इम्यून सिस्टम इतकी अतिसक्रिय झाली की, तिने स्वतःच फुफ्फुसांसारख्या अवयवांवर हल्ला केला. या घटनांनीच वैज्ञानिकांना इम्यून सिस्टमच्या ‘सेल्फ-रेग्युलेशन’ क्षमतेचा अभ्यास करण्यास प्रवृत्त केले. आज मेरी ब्रंकॉ, राम्सडेल आणि साकागुची यांच्या संशोधनाने हे स्पष्ट केले आहे की, टिरेग्स पेशी योग्यप्रकारे कार्य करत राहिल्या, तर अशा संकटांपासून शरीर आपोआप बचाव करू शकते.
मानवी आरोग्य टिकवण्यासाठी मजबूत इम्यून सिस्टम राखणे अत्यावश्यक आहे. यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावाचे व्यवस्थापन हे घटक महत्त्वाचे ठरतात. आहारात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि झिंकयुक्त पदार्थांचा समावेश करावा. रोज तीस मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम केल्याने शरीरातील प्रतिरक्षा पेशी सक्रिय राहतात. तसेच सात ते आठ तासांची झोप टिरेग्सच्या संतुलनासाठी आवश्यक असते, असे वैद्यकीय संशोधनातून दिसून आले आहे. या वर्षीच्या नोबेल पुरस्कारामुळे विज्ञानाला एक नवा द़ृष्टिकोन मिळाला आहे. हे संशोधन फक्त रोगांवर उपाय शोधण्यापुरते मर्यादित नाही, तर ते मानवाच्या अस्तित्वाशी जोडलेले आहे. कारण, प्रत्येक सजीवात आत्मसंरक्षणाची प्रवृत्ती असते; पण त्याचवेळी आत्मनियंत्रणाचीही गरज असते. रोगप्रतिकारक प्रणाली ही दोन्ही तत्त्वे एकत्र आणते. शरीराला रोगांपासून वाचवणे आणि स्वतःच्या पेशींवर नियंत्रण ठेवणे ही तिची सर्वात मोठी जबाबदारी आहे.
या तिघा वैज्ञानिकांच्या कामामुळे पुढील दशकात वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः जीन एडिटिंग, ऑटोइम्यून थेरपी आणि कर्करोगावरील वैयक्तिकृत औषधोपचार या क्षेत्रांत नवे प्रयोग सुरू होतील. भविष्यात अशा तंत्रज्ञानामुळे एकाच जीनच्या बदलाने संपूर्ण शरीराचा समतोल पुनर्स्थापित होऊ शकतो अशी नवी वैद्यकीय क्रांती घडेल. सारांशतः 2025 चा वैद्यकीय नोबेल पुरस्कार केवळ तिन्ही वैज्ञानिकांचा सन्मान नाही, तर तो मानवी शरीराच्या अद्भुत संरचनेचा गौरव आहे. इम्यून सिस्टम ही केवळ एक संरक्षण व्यवस्था नाही, तर ती एक बुद्धिमान आणि संयमी प्रणाली आहे, जी सतत जागरूक राहते; परंतु आवश्यकतेनुसार स्वतःला थांबवतेही. हाच आत्मसंयम म्हणजेच आरोग्याचे खरे गूढ आणि या शोधाने मानवजातीला ते अधिक स्पष्टपणे समजावून दिले आहे.