

सुचित्रा दिवाकर
दुकानांमध्ये गर्दीच्या वेळी शिरून हातोहात वस्तू लंपास करणार्यांना गुन्हेगार म्हटले जाते. बहुतांश वेळा पोटाची भूक भागवण्यासाठी, व्यसनांसाठी किंवा वाईट संगतीमुळे अशा प्रकारच्या चोर्या केल्या जातात; पण शॉपलिफ्टिंग हा प्रकार चोरी या श्रेणीतील असला, तरी काहीसा वेगळा मानला जातो. यामध्ये व्यक्ती दुकानातून वस्तू चोरते; पण तिच्याकडे त्या वस्तू खरेदी करण्याची आर्थिक क्षमता असते. अलीकडेच अमेरिकेत एका सधन भारतीय महिलेने स्टोअरमधून एक लाख रुपयांच्या वस्तू चोरल्याची घटना समोर आली आणि शॉपलिफ्टिंग या विषयाची चर्चा सुरू झाली.
अलीकडे अमेरिकेतून एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला, ज्यात एका भारतीय महिलेला दुकानातून वस्तू चोरण्याचा आरोप लावण्यात आला होता. ही महिला दिसायला सधन आणि सभ्य वाटत होती. तिने चूक कबूल करत नुकसानभरपाई देण्याची तयारीही दर्शवली होती; मात्र या घटनेच्या निमित्ताने सोशल मीडियावर भारतीय संस्कृती, सवयी आणि प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. खरं तर, अशा प्रकारच्या शॉपलिफ्टिंग प्रकरणांची संख्या भारतात नव्हे, तर प्रगत आणि संपन्न देशांत अधिक असल्याचं विविध अभ्यास आणि अहवाल सांगतात. ही चर्चा सुरू झाली होती अमेरिकेतील इलिनॉय राज्यात घडलेल्या एका घटनेमुळे! तिथे एका भारतीय महिलेला एका स्टोअरमधून सुमारे एक लाख रुपयांच्या वस्तू चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. स्थानिक पोलिसांच्या मते, त्या महिलेनं स्वतः गरोदर असल्याचं भासवून स्टोअरमध्ये काही तास घालवले आणि त्यानंतर कोणतीही रक्कम न भरता बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. ही घटना काही वर्षांपूर्वीची असली, तरी त्याचा व्हिडीओ अलीकडेच व्हायरल झाला. याआधीही टेक्सासमध्ये एका भारतीय विद्यार्थ्यांवर अशाच स्वरूपाचा आरोप झाला होता. अशा घटनांमुळे देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा डागाळू शकते, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
तथापि, शॉपलिफ्टिंग म्हणजेच दुकानांमधून वस्तू चोरून नेण्याच्या घटनांबाबतच्या आकडेवारी मात्र काही वेगळं चित्र दाखवते. ‘नॅशनल असोसिएशन फॉर शॉपलिफ्टिंग प्रिव्हेन्शन’च्या (छअडझ) अहवालानुसार, दर 11 अमेरिकन नागरिकांमागे एक व्यक्ती अशाप्रकारे कधी ना कधी, काही ना काही वस्तू दुकानातून चोरून नेत असतो. त्यातल्या 75 टक्के लोकांनी हे चोरीचं कृत्य पूर्वनियोजित नसतं, ते अचानक घडतं, असंही म्हटलं गेलं आहे. फक्त अमेरिका नाही, तर युरोपातील अनेक देशांमध्ये शॉपलिफ्टिंग ही मोठ्या प्रमाणात आढळणारी समस्या आहे. उदाहरणार्थ, युनायटेड किंगडममध्ये गेल्या वर्षी दुकानांमधून वस्तू चोरी होण्याच्या घटनांनी विक्रमी पातळी गाठली होती. ब्रिटिश रिटेल कॉन्सोर्टियमच्या आकडेवारीनुसार, यामुळे दरवर्षी झालेलं नुकसान 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जर्मनी, स्वित्झर्लंड आणि प्रचंड प्रामाणिक समजल्या जाणार्या जपानसारख्या देशांमध्येही शॉपलिफ्टिंगच्या घटना वाढतच आहेत.
शॉपलिफ्टिंग म्हणजे काय, याचा नेमका अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. ही सामान्य चोरीपेक्षा थोडी वेगळी गोष्ट आहे. शॉपलिफ्टिंग म्हणजे अशी चोरी ज्यामध्ये व्यक्ती दुकानातून वस्तू चोरते; पण तिच्याकडे त्या वस्तू खरेदी करण्याची आर्थिक क्षमता असते. ती ग्राहक असल्याचा आव आणते आणि नकळत वस्तू उचलून बाहेर पडते. काही वेळा हे एका मानसिक स्थितीमुळे घडते, ज्याला क्लेप्टोमेनिया म्हटले जाते. ही एक प्रकारची मानसिक विकृती आहे, ज्यामध्ये व्यक्तीला काहीतरी चोरण्याची अनिवार इच्छा होते. ही गोष्ट प्रत्येक वेळी लागू होत नाही; पण काही केसेसमध्ये तसं घडतं.
19व्या शतकात फ्रान्समध्ये श्रीमंत घरातील काही महिलांना दुकानांमधून वस्तू चोरताना पकडण्यात आलं. त्यावेळी ही सवय लेडीज डिसीज म्हणून ओळखली जाऊ लागली. कारण, त्या महिलांना शिक्षा होऊ नये म्हणून असा सामाजिक समज निर्माण झाला; पण नंतर हीच सवय पुरुषांमध्येही दिसून येऊ लागली आणि त्यावर शास्त्रीय संशोधन झाल्यावर क्लेप्टोमेनियाचा उलगडा झाला. ही एक इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर मानली जाते. म्हणजेच मेंदूतील विशिष्ट भागाचा ताबा सुटल्याने व्यक्तीला अचानक काहीतरी चोरण्याची तीव्र इच्छा होते.
शॉपलिफ्टिंग मात्र क्लेप्टोमेनियापेक्षा थोडी वेगळी गोष्ट आहे. शॉपलिफ्टिंगमध्ये अनेकदा हे कृत्य आधीच ठरवलेलं असतं. कधी स्वतःला काही फायदा करून घेण्यासाठी, तर कधी फक्त ‘थ्रिल’ अनुभवण्यासाठी. काही लोक अॅड्रेनलिन रशसाठीही हे करतात. म्हणजेच धोकादायक किंवा निषिद्ध गोष्ट करताना जो मानसिक उत्तेजनाचा अनुभव येतो, त्यासाठी. त्यामुळे काहींना हे एक प्रकारचं कोपिंग मेकॅनिझम वाटतं. म्हणजेच मानसिक ताण किंवा एकटेपणा दूर करण्यासाठी असा प्रकार केल्यासारखा. अशा प्रकारचा ‘कोपिंग’ काही लोकांमध्ये जास्त खाण्याच्या सवयीच्या रूपात दिसतो, काहीजण नशा करतात, तर काहीजण चोरण्यासारखे गुन्हे करतात. नंतर त्यांना या कृतीचा पश्चातापही होतो. त्यामुळे शॉपलिफ्टिंग हा गुन्हा असला, तरी त्यामागचं मानसशास्त्र आणि सामाजिक पार्श्वभूमी अधिक गुंतागुंतीची आहे.
अशा स्थितीत प्रश्न उपस्थित होतो की, मग शॉपलिफ्टिंग ही चोरीच नाही का? याचं उत्तर आहे, हो, शॉपलिफ्टिंग हीसुद्धा चोरीचाच एक प्रकार आहे; पण नेहमीची चोरी आणि शॉपलिफ्टिंग यामध्ये फरक आहे. साधारण चोर कुठूनही, कुणाचीही मालमत्ता चोरू शकतो आणि त्यात सातत्य असतं; पण शॉपलिफ्टिंगमध्ये सामान्यपणे दुकानांतील वस्तूंवर लक्ष केंद्रित असते आणि त्यामागे मानसिक किंवा भावनिक कारणं असण्याची शक्यता असते.
अमेरिकेमध्ये शॉपलिफ्टिंगला सौम्य गुन्ह्यांच्या श्रेणीत टाकलं जातं. वेगवेगळ्या राज्यांमध्ये याबाबतच्या शिक्षा वेगवेगळ्या असतात. अनेकदा किरकोळ चोरी प्रकरणांत फक्त तंबी देऊन सोडून दिलं जातं. युनायटेड किंगडममध्ये याला ‘थेफ्ट अॅक्ट’च्या अंतर्गत सामावले जाते आणि शिक्षेऐवजी दंड लावण्यात येतो. काही देशांत पहिल्यांदा पकडले गेल्यास समुपदेशन किंवा ‘कम्युनिटी सर्व्हिस’सारख्या पर्यायांचा अवलंब केला जातो. आरोपी खरोखर ‘क्लेप्टोमेनिया’ या विकाराने त्रस्त असेल, तर कोर्ट त्याला शिक्षा देण्याऐवजी उपचारांची सोय करून देते. एकूणच, शॉपलिफ्टिंग ही सामाजिक गुंतागुंत आणि मानसिक आरोग्य यामधील दुवा आहे. त्यामुळे अशा घटना घडल्यावर त्यावर केवळ ‘भारतीयांची सवय’ म्हणून हसण्याऐवजी व्यापक द़ृष्टिकोनातून विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. हे समजून घेणं आवश्यक आहे की, शॉपलिफ्टिंग ही एक जागतिक समस्या असून तिचं मूळ केवळ गरिबी नाही, तर माणसाच्या मनात खोलवर दडलेली विचित्र अस्वस्थता आहे.