

डॉ. संतोष काळे
आपण सुंदर दिसावे, यासाठी सिनेसेलिब्रिटी भरमसाट खर्च करीत आहेत. अर्थात, त्याचे दुष्परिणामही आहेतच. अलीकडेच वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी शेफाली जरीवाला हिचा मृत्यू झाला. ती तर अँटिएजिंग उपचार घेत होती. तिच्या मृत्यूमागे हाही घटक कारणीभूत असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
‘जर कोणी सुंदर दिसू इच्छित असेल, तर त्यात चूक काय आहे?’ हा दिवंगत अभिनेत्री शेफाली जरीवाला हीचा प्रतिप्रश्न. पहिल्यांदा अँटिएजिंग उपचार घेतल्यावर तिच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला तेव्हा तिने उत्तरादाखल हा प्रतिप्रश्न विचारला होता. हा प्रश्न झगमगत्या सिनेसृष्टीतील वास्तव उजागर करणारा आहे. सिनेसृष्टी किंवा एकूणच मनोरंजनविश्व हे फक्त अभिनय, गाणी, डान्स यापुरते मर्यादित नाही. येथे अभिनय कौशल्यापेक्षाही सौंदर्य, आकर्षकपणा, ग्लॅमर यांना विशेष महत्त्व आहे. ‘परफेक्ट स्किन’, ‘परफेक्ट बॉडी’, ‘एव्हरग्रीन लूक’ ही फक्त जाहिरातींतील वाक्ये नाहीत, तर या इंडस्ट्रीतील एक अघोषित अट असते. पूर्वी यासाठी तात्पुरत्या मेकअपची मदत घेतली जायची; पण आता दीर्घकालीन परिणाम मिळावेत, यासाठी महागडे उपचार व थेरपी घेतल्या जात आहेत. मॉडेल, अभिनेते, अभिनेत्रींसाठी हे उपचार जणू गरजेचेच बनल्याचे चित्र आहे. या उपचारांमुळे बरेच चांगले परिणाम मिळत असतीलही; परंतु त्याचे दुष्परिणाम नाकारता येणार नाहीत. शेफालीच्या अकाली मृत्यूच्या निमित्ताने या विषयाची चर्चा ऐरणीवर आली आहे.
फिल्मी कलाकार आपले सौंदर्य खुलवण्यासाठी आणि निरंतर तरुण दिसण्यासाठी ‘काय करतात’ याहीपेक्षा ‘काय करत नाहीत’ असा प्रश्न विचारणे आजच्या काळात अधिक संयुक्तिक ठरेल. यामध्ये अतिव्यायाम, अत्याधिक डाएटिंग, शस्त्रक्रिया, सौंदर्योपचाराच्या नव्या पद्धती किंवा बंदी असलेल्या औषधांचे सेवन यांचा समावेश होतो. याचे कारण, सेलिब्रिटींवर परफेक्ट दिसण्याचा सततचा दबाव असतो. शेफालीच्या मृत्यूस हा दबावच कारणीभूत ठरल्याचे मानले जाते. कारण, तिला कसलाही दीर्घ आजार नव्हता. असे सांगितले जाते की, शेफाली आपल्या वयापेक्षा तरुण दिसण्यासाठी मागील 5-6 वर्षांपासून एक विशिष्ट औषध घेत होती. हा एक स्किन ग्लो ट्रिटमेंटचा प्रकार होता. त्याचेच दुष्परिणाम तिला अकाली मृत्यूसमीप घेऊन गेले असे काहींचे म्हणणे आहे.
अर्थात, ही काही आजची टूम नाही. अनेक दशकांपासून केवळ बॉलीवूडच नव्हे, तर हॉलीवूडमध्येही अनेक कलाकार व सेलिब्रिटी सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी ड्रग्जच्या साहाय्याने जीव धोक्यात घालत आले आहेत. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2023 मध्ये ‘मिस युनिव्हर्स’ व बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिला हृदयाशी संबंधित समस्या उद्भवली. तिने नेहमीच आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं होतं. इतकं व्यायाम करूनही तिला आरोग्यविषयक धक्का बसणं, हे आश्चर्यकारक होतं. अशाच प्रकारे 2022 मध्ये हरियाणाच्या एक अभिनेत्री व नेत्या यांचा अचानक संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिस तपासात असं समोर आलं की, त्यांनी एका पार्टीमध्ये बंदी असलेल्या औषधांचं सेवन केलं होतं. अभिनेत्रींचा सामना नेहमीच फिल्म इंडस्ट्रीच्या आणि मीडियाच्या दबावाशी होत असतो, ज्यामध्ये सतत तरुण आणि ग्लॅमरस दिसण्याची अपेक्षा असते. 2008 मध्ये हॉलीवूड अभिनेता हीथ लेजर यांनी ‘द डार्क नाईट’मध्ये जोकरच्या भूमिकेत अद्वितीय अभिनय करून चाहत्यांचं मन जिंकलं होतं; मात्र मानसिक थकव्यामुळे त्यांना सतत झोपेच्या गोळ्या आणि अँटिडिप्रेसंटस् घ्यावे लागत होते. या औषधांच्या ओव्हरडोसमुळे त्यांचा मृत्यू झाला.
पंधरा वर्षांपूर्वी ब्रेकडान्समध्ये जगातील सम्राट मानल्या जाणार्या मायकेल जॅक्सन यांचा मृत्यू झाला. ते त्वचा गोरी करण्याच्या नादात वाजवीपेक्षा जास्त औषधांचे सेवन करत होते. 70 च्या दशकात अमेरिकन पॉप सिंगर करेन कारपेंटर या सडपातळ दिसण्यासाठी वेड्यापिश्या झाल्या होत्या. त्या एनोरेक्सिया नेर्वोसा या विकृतीच्या शिकार बनल्या. फ्रान्सच्या अभिनेत्री जेलेनो ब्लोंट यांनी आपल्या चेहर्यावर तारुण्य टिकवण्यासाठी इतक्या वेळा बोटॉक्स सर्जरी केली होती की, शेवटी त्यांचा चेहरा विद्रूप झाला. परिणामी, त्या नैराश्यात गेल्या आणि त्यांनी आत्महत्या केली.
‘बालिका वधू’ या टीव्ही शोमधील सुंदर अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जी हिने केवळ 24 वर्षांची असतानाच आत्महत्या केली. हा मृत्यू संशयास्पद मानला जातो. असं म्हटलं जातं की, ती सोशल मीडिया ट्रोलिंग व करिअरच्या दबावाने त्रस्त होती. खरं तर, ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी लूक आणि वजनावर सतत लक्ष ठेवावं लागतं. कोलकाताची इन्स्टाग्राम मॉडेल रिया घोष हिचा मृत्यू किडनी फेल्युअरमुळे झाला; मात्र पोस्टमार्टम अहवालात समोर आलं की, ती सडपातळ दिसण्यासाठी दीर्घकाळ स्टेरॉइडस् व औषधे घेत होती. अभिनेत्री अनुष्का शर्मा काही वर्षांपूर्वी तिच्या ओठांमध्ये झालेल्या ‘फिलर ट्रिटमेंट’मुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली होती. तिने स्वतः मान्य केले की, अभिनयाच्या गरजेसाठी ही ट्रिटमेंट करून घेतली होती; मात्र यामुळे चेहर्याचे नैसर्गिक सौंदर्य बिघडले होते. करिना कपूर, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींनी त्यांच्या चेहर्यावर ‘बोटॉक्स’, ‘फेस लिफ्टिंग’, स्किन ट्रिटमेंट घेतल्याच्या चर्चा अनेक वेळा माध्यमांत झळकल्या आहेत. काहींनी याची कबुली दिली, तर काहींनी त्यावर मौन बाळगले. सौंदर्याचा अप्रत्यक्ष व सततचा दबाव सेलिब्रिटी व सिनेकलाकारांसाठी घातक ठरू शकतो, हे दर्शवणारी अशी अनेक उदाहरणे आहेत.
शेफाली जरीवाला त्वचेचा रंग गोरा राहावा, यासाठी ग्लुटाथियोनचे डोस घेत होती, अशी माहिती पुढे आली आहे. त्वचा उजळवण्यासाठी आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर हे औषध घेतात. शेफाली जरीवालाच्या मृत्यूमध्ये या औषधाचा काही संबंध आहे का, याबाबत समाजमाध्यमांवर बर्याच तज्ज्ञांनी मते व्यक्त केली आहेत. ग्लुटाथियोन हे एक नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असून ते आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आढळते. शरीरातून विषारी घटक बाहेर टाकणे, पेशी दुरुस्त करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करणे यामध्ये ग्लुटाथियोन महत्त्वाची भूमिका बजावते. हे सिस्टीन, ग्लायसिन आणि ग्लुटामिक अॅसिड या तीन अमिनो अॅसिडपासून बनलेले असते. गेल्या काही वर्षांत चिरतरुण कांती मिळवण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. ग्लुटाथियोन टायरोसिनेज नावाच्या एंझाईमच्या क्रियेलाही रोखते. परिणामी, मेलानिन तयार होणे कमी होऊन हळूहळू त्वचेचा रंग उजळत जातो. वय वाढण्याची प्रक्रियादेखील मंदावते. तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यामध्येही ते प्रभावी ठरते.
ग्लुटाथियोन थेरपीमध्ये सामान्यतः आठवड्यातून एक किंवा दोन वेळा इंजेक्शन दिले जाते. 4-6 सेशन्सनंतर त्वचेमध्ये थोडी चमक दिसू लागते आणि चांगले परिणाम मिळावेत, यासाठी 2-3 महिने नियमितपणे सेशन्स घ्यावे लागतात. ही थेरपी घेताना डोकेदुखी, मळमळ, पोटात मुरडा येणे, त्वचेवर रॅशेस, काही प्रकरणांमध्ये अॅलर्जी येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्याही दिसू शकतात. अतिप्रमाणात हे औषध घेतल्यास याचा यकृत आणि मूत्रपिंडांवर (किडनी) परिणाम होऊ शकतो. सबब, ही थेरपी प्रत्येकासाठी उपयुक्त नसते. वास्तविक, गोरेपणा, सौंदर्य या सर्व गोष्टींबाबत सजग असणे यामध्ये गैर काही नाही; पण त्यासाठीचा अट्टाहास जीवावर बेतत असेल, तर निश्चितच ते चुकीचे आहे. सिनेकलाकारांचे अनुकरण करणारा प्रचंड मोठा वर्ग समाजात आहे. ही मंडळी जेव्हा खुलेपणाने अशा प्रकारच्या सौंदर्योपचारांबाबत बोलतात तेव्हा त्याच्या दुष्परिणामांविषयी फारसे भाष्य करत नाहीत. परिणामी, सामान्य व्यक्तीही त्याचे अनुकरण करण्याची शक्यता असते. किंबहुना करतातच. त्यामुळेच आज या उपचारांचे पेव फुटले आहे. वास्तविक, वैद्यकशास्त्र, शरीरशास्त्र किंवा सौंदर्यशास्त्र असे सांगतात की, पोषणयुक्त आहार, पुरेशी झोप, नियमित योगसाधना व व्यायाम यांच्या साहाय्याने अंगीकारलेली सुयोग्य जीवनशैली, तणावविरहीत मन, शरीरशुद्धी या साहाय्याने तेजस्वी कांती मिळवता येते; पण ही दीर्घकालीन प्रक्रिया असून त्यात सातत्य गरजेचे आहे. आजच्या झटपट यशाच्या जमान्यात ते अप्रस्तुत ठरवले जात असले, तरी अशी काही प्रकरणे समोर आली की त्यांचे मोल लक्षात येते.