Navratri Festival | लोकजीवनाचा उत्सव

Navratri Festival |
Navratri Festival | लोकजीवनाचा उत्सव
Published on: 
Updated on: 

सुनील हिंगणे,अध्यात्म अभ्यासक

वर्षभरातील चार नवरात्रांपैकी शारदीय नवरात्र जनमानसात सर्वाधिक रुजले आहे. कारण, ते कृषी क्षेत्राशी, लोकजीवनाशी आणि स्त्रीशक्तीच्या लढाऊ रूपाशी थेट नाते सांगणारे आहे. भारतीय लोकजीवनात ऋतूचक्राच्या संक्रमणाशी जोडलेले हे पर्व आदिशक्तीच्या पूजनाचा अध्याय म्हणून मोलाचे आहे. अंतर्मनातील नकारात्मकता दूर सारून नव्या संकल्पाने उभे राहण्याची ऊर्जा नवरात्रौत्सव देतो.

भारतीय संस्कृती ही मुळातच निसर्ग, चैतन्य आणि पराशक्तीची निरंतर उपासना करणारी एक उन्नत जीवनप्रणाली आहे. हिंदू संस्कृतीमधील सण, उत्सव हे केवळ लौकिक आनंद व्यक्त करण्याचे साधन नसून आत्मिक उन्नतीचे, आत्मपरीक्षणाचे आणि वैश्विक शक्तीशी तादात्म्य पावण्याचे साधन मानले गेले आहेत. अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणारा नवरात्रौत्सव हा याच आदिशक्तीच्या विविध रूपांचा, तिच्या अलौकिक पराक्रमाचा आणि विश्वातील मातृत्वाचा उत्सव म्हणून शतकानुशतके श्रद्धाभावाने साजरा केला जात आहे.

नवरात्रीचे पौराणिक संदर्भ

नवरात्राचा इतिहास आणि त्याचे मूळ थेट मार्कंडेय पुराणातील ‘देवी माहात्म्य’ म्हणजेच ‘दुर्गा सप्तशती’मध्ये आढळते. पौराणिक कथेनुसार, जेव्हा महिषासुर नावाच्या दैत्याने तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला, तेव्हा देवलोकातील इंद्रादी देवतांचे अस्तित्वही धोक्यात आले. तेव्हा एका अद्‌भुत, असीम आणि दिव्य शक्तीचा उगम झाला आणि ती ‘आदिशक्ती महादुर्गा’ म्हणून ओळखली गेली. सर्व देवांनी आपापली आयुधे अर्पण करून या जगज्जननीची आराधना केली. देवीने सलग नऊ दिवस आणि रात्री महिषासुराशी भीषण युद्ध केले आणि दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला त्याचा संहार करून धर्माची पुनर्स्थापना केली. महादैत्याच्या वधाचा हा उत्सव मानवी चित्तात ठाण मांडून बसलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या आंतरिक षड्‌रिपूंवर मिळवलेल्या विजयाचे शाश्वत प्रतीक मानला जातो.

सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन मूलभूत अवस्थांचे नियंत्रण करणार्‍या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन दैवी रूपांची अनुभूती या नऊ रात्रींमध्ये घेतली जाते. पहिले तीन दिवस हे तमोगुणाचा आणि अंतर्बाह्य दुष्ट प्रवृत्तींचा संहार करणार्‍या संहारक शक्तीच्या म्हणजेच दुर्गेच्या उपासनेसाठी समर्पित असतात. पुढील तीन दिवस हे चित्ताला स्थैर्य, ऐश्वर्य, आंतरिक तृप्ती आणि समृद्धी प्रदान करणार्‍या महालक्ष्मीच्या साधनेचे असतात. शेवटचे तीन दिवस हे आत्मज्ञान, प्रज्ञा आणि बुद्धीला विशुद्ध प्रकाशाने उजळून टाकणार्‍या महासरस्वती देवीच्या चिंतनासाठी असतात. अशा प्रकारे अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या परम प्रकाशाकडे होणारा आत्मिक प्रवास म्हणजेच नवरात्र होय.

नवदुर्गेचे नऊ मंगलमय आविष्कार

आदिशक्तीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा या उत्सवात केली जाते, ज्यामध्ये निसर्गाच्या वेगवेगळ्या अवस्था आणि साधनेचे टप्पे सामावलेले आहेत. प्रथम दिवस हा पर्वतराज हिमालयाची कन्या शैलपुत्रीदेवीला समर्पित असतो. हा दिवस साधनेच्या प्रारंभाचा, मूलाधार चक्राच्या जागृतीचा आणि दृढनिश्चयाचा मानला जातो. दुसर्‍या दिवशी तप आणि संयमाची मूर्ती असलेल्या ब्रह्मचारिणी देवीची उपासना होते, जी आंतरिक साधनेचे तेज वाढवते. तिसर्‍या दिवशी मस्तकावर चंद्रकोर धारण करणार्‍या चंद्रघंटादेवीचे ध्यान धरले जाते, जे साधकाला भयमुक्त करून त्याच्यात पराक्रम आणि एकाग्रतेचा संचार करते. चौथ्या दिवशी आपल्या मंद हास्याने विश्वाची उत्पत्ती करणार्‍या कुष्मांडादेवीची आराधना केली जाते. पाचव्या दिवशी वात्सल्याची मूर्ती असलेल्या स्कंदमातेचे पूजन होते, जी भक्ताच्या अंतःकरणात करुणा आणि मातृत्वाचा झरा वाहता ठेवते. सहाव्या दिवशी महर्षी कात्यायनांच्या आश्रमात अवतरलेल्या कात्यायनीदेवीची उपासना होते, जी अधर्माचा संहार करण्यासाठी आवश्यक असलेले नैतिक बळ प्रदान करते. सातव्या दिवशी कालरात्रीदेवीचे भयानक पण पापविनाशी रूप पूजले जाते, जे अज्ञानाचा अंधःकार नष्ट करते. आठव्या दिवशी शंखासारखी धवल कांती असलेल्या महागौरीदेवीचे ध्यान केले जाते, ज्यामुळे साधकाचे अंतःकरण पूर्णतः निष्पाप आणि पवित्र बनते. नवव्या दिवशी सर्व सिद्धींची दात्री असलेल्या सिद्धिदात्रीदेवीची आराधना केली जाते, जिच्या कृपेने मानवाला जीवनातील सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक सिद्धींची प्राप्ती होते.

धार्मिक विधी आणि व्रतसाधना

नवरात्रौत्सवाचा प्रारंभ घटस्थापनेने होतो. या दिवशी मातीचा एक सुंदर वेदीसारखा चौथरा तयार करून त्यात सप्तधान्ये पेरली जातात. त्यावर तांब्याचा किंवा मातीचा मंगल कलश स्थापित केला जातो. त्यामध्ये तीर्थोदक, दुर्वा, नाणी आणि सुपार्‍या ठेवल्या जातात. त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवून अखंड दीप प्रज्वलित केला जातो. नऊ दिवस अंकुरित होणारे धान्य हे समृद्धी, सुफलामता आणि पृथ्वीच्या नवनिर्मिती क्षमतेचे प्रतीक मानले जाते, तर अखंड दीप हा आत्मज्ञानाच्या अविनाशी ज्योतीचे रूप असतो.

या काळात उपवास करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. ऋतूबदलाच्या काळात शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे आणि मनाला शुद्ध, सात्विक विचारांकडे वळवणे ही त्यामागची मूळ भूमिका आहेे. अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन विधी केला जातो. लहान बालिकांमध्ये साक्षात आदिशक्तीचे स्वरूप पाहून त्यांचे चरण प्रक्षालन केले जाते, त्यांना भोजन अर्पण करून त्यांचा सत्कार केला जातो. हा विधी भारतीय संस्कृतीतील स्त्रीत्वाचा, मातृशक्तीचा आणि बालभावाचा सर्वश्रेष्ठ आदर मानला जातो.

लोकसंस्कृती, गरबा आणि वैश्विक बंधुभाव

नवरात्राची धार्मिक बाजू जितकी गंभीर आणि अंतर्मुख करणारी आहे, तितकीच तिची सामाजिक बाजू अत्यंत उल्हासित, चैतन्यमय आणि रंगीबेरंगी आहे. नवरात्रामध्ये गुजरात आणि महाराष्ट्रासह देशभर सादर होणारे गरबा आणि दांडिया हे नृत्याविष्कार भक्तीची एक लयबद्ध अभिव्यक्ती आहेत. मध्यभागी ठेवलेला दिवा किंवा देवीची प्रतिमा केंद्रस्थानी ठेवून गोलाकार फेर धरून टाळ्यांच्या लयीवरही गरबा खेळला जातो. हा वर्तुळाकार फेर मानवी जीवनचक्र आणि विश्वाचा केंद्रबिंदू असलेला ईश्वर दर्शवतो. हातातील रंगीबेरंगी काठ्यांच्या आघातातून निघणारा नाद हा दुर्गा आणि महिषासुराच्या युद्धातील खड्गांच्या संघर्षाची स्मृती जागवणारा असतो.

या महोत्सवामध्ये पारंपरिक वस्त्रे परिधान करून, जात, पात आणि भेद विसरून लोक एकत्र येतात. संपूर्ण समाजात एकतेची आणि सौहार्दाची भावना निर्माण करण्याचे अद्‌भुत कार्य हा उत्सव करतो. आपापसातील स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी एकमेकांना फळे, मिठाई, पूजेची पवित्र द्रव्ये आणि मंगल भेटवस्तू देण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. परस्परांप्रति असलेला आदर आणि आदिशक्तीच्या आशीर्वादाची देवाणघेवाण म्हणून त्याचे मोल आधुनिक काळातही तितकेच आहे.

नवसर्जनाचा आणि विजयाचा संदेश

नवरात्रोत्सवाचा परमोच्च बिंदू हा दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला येतो, ज्याला दसरा असेही म्हटले जाते. प्रभू श्रीरामचंद्रांनी दशानन रावणाचा वध करून सीतामातेची मुक्तता केली, तो हा दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त म्हणून दसर्‍याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने वाटली जातात, शस्त्रांचे आणि यंत्रांचे पूजन केले जाते आणि नवीन कार्याचा संकल्प केला जातो.

नवरात्र हा आपल्या अंतर्मनातील नकारात्मकतेला जाळून नवचैतन्याची आणि सदाचाराची पेरणी करण्याचा महाउत्सव आहे; पण आदिशक्तीची पूजा करतानाच संपूर्ण समाज जेव्हा स्त्रीशक्तीचा सन्मान करेल, तिच्यातील बुद्धी, सामर्थ्य आणि करुणेचा आदर करेल, तेव्हाच या नवरात्रौत्सवाचे खरे आध्यात्मिक उद्दिष्ट साध्य होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news