Sidance AI tool: ‘सिडान्स‌’चा धमाका आणि धास्तीचा भयकंप

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पोतडीतून निघणाऱ्या नवनवीन आविष्कारांमुळे सध्या जगभरात सर्वच क्षेत्रांत कोलाहल माजला आहे.
Sidance AI tool
Sidance AI toolPudhari
Published on
Updated on
महेश कोळी, संगणक अभियंता

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पोतडीतून निघणाऱ्या नवनवीन आविष्कारांमुळे सध्या जगभरात सर्वच क्षेत्रांत कोलाहल माजला आहे. विशेषतः निर्मितीच्या, सर्जनशीलतेच्या क्षेत्रात एआयने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हॉलीवूड इंडस्ट्रीसह जगभरातील मनोरंजनविश्वात सध्या ‌‘सिडान्स 2.0‌’ या एआय टूलच्या किमयेने अनेकांची झोप उडवली आहे. केवळ दोन ओळींच्या सूचनांवरून (प्रॉम्प्ट) तयार झालेल्या या व्हिडीओने हॉलीवूडमधील नट, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. हे ॲप कोणत्याही कॅमेऱ्याशिवाय, नटांशिवाय आणि महागड्या सेटशिवाय अवघ्या काही मिनिटांत उच्च दर्जाचे व्हिडीओ तयार करू शकते. अशाप्रकारे चित्रपट बनू लागले, तर सिनेसृष्टीतील लाखो तंत्रज्ञ आणि कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल.

हॉलीवूडमध्ये सध्या एकामागून एक धक्कादायक घडामोडी घडत आहेत; पण यावेळी हे संकट कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचे किंवा आर्थिक मंदीचे नसून कृत्रिम बुद्धिमत्तेचे म्हणजेच एआयचे आहे. गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर एका व्हिडीओने प्रचंड खळबळ माजवून दिली. या व्हिडीओमध्ये हॉलीवूडचे दोन दिग्गज सुपरस्टार, ब्रॅड पिट आणि टॉम क्रूझ, एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. या दोघांमधील हाणामारीची दृश्ये, त्यांच्या हालचालींमधील अचूकता आणि संवादाची फेक इतकी जबरदस्त होती की, पाहणाऱ्याला क्षणभर वाटले की, हा त्यांच्या आगामी मोठ्या चित्रपटाचा एखादा ट्रेलर आहे; मात्र हा कोणताही प्रत्यक्ष चित्रित केलेला व्हिडीओ नव्हता, तर सिडान्स 2.0 या एआय ॲपद्वारे तयार केलेली एक कलाकृती होती. केवळ दोन ओळींच्या सूचनांवरून (प्रॉम्प्ट) तयार झालेल्या या व्हिडीओने हॉलीवूडमधील नट, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

सिडान्स 2.0 हे एक चिनी एआय ॲप असून त्याची निर्मिती बाईटडान्स या कंपनीने केली आहे. याच कंपनीने जगप्रसिद्ध टिकटॉक बनवले होते. हे ॲप जुलै 2025 मध्ये लाँच झाले असले, तरी 24 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे त्याचे जागतिक लाँचिंग सध्याच्या वादविवादामुळे लांबणीवर पडले. आजवर ओपन एआय, गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या बलाढ्य कंपन्यांनी एआय व्हिडीओ निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे; परंतु सिडान्स 2.0 ने या सर्वांना मागे टाकले आहे. या ॲपद्वारे तयार केलेले व्हिडीओ इतके वास्तववादी असतात की, त्यातील पात्रे आणि पार्श्वभूमी ओळखणे कठीण होते. आयर्लंडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते रौरी रॉबिन्सन यांनी 11 फेब्रुवारी रोजी या ॲपचा वापर करून हा व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर प्रसारित केला. हा व्हिडीओ व्हायरल होताच चित्रपटसृष्टीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

चित्रपटसृष्टीसाठी हा व्हिडीओ इतका भीतीदायक का आहे, याचे उत्तर या उद्योगाच्या रचनेत दडलेले आहे. एक व्यावसायिक चित्रपट तयार करण्यासाठी शेकडो लोकांचे मनुष्यबळ आणि अफाट वेळ खर्ची पडतो. स्क्रिप्ट लिहिण्यासाठी महिने लागतात, शूटिंगच्या वेळी कला दिग्दर्शन, छायांकन, संपादन आणि ध्वनी मुद्रण यासाठी तज्ज्ञांची फौज लागते. एका मोठ्या चित्रपटासाठी हजारो कोटी रुपयांचे बजेट असते आणि त्याचे काम पूर्ण व्हायला वर्षे लागतात. याउलट सिडान्ससारखे ॲप कोणत्याही कॅमेऱ्याशिवाय, नटांशिवाय आणि महागड्या सेटशिवाय अवघ्या काही मिनिटांत उच्च दर्जाचे (हाय क्वालिटी)व्हिडीओ तयार करू शकते. अशाप्रकारे चित्रपट बनू लागले, तर सिनेसृष्टीतील लाखो तंत्रज्ञ आणि कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल. भविष्यात केवळ एका कल्पनेवर आधारित सूचना दिल्यास संपूर्ण चित्रपट तयार होईल, जिथे एआय स्वतः संवाद लिहून दृश्यांची मांडणी करेल. यात मानवी नटांची गरजही उरणार नाही. केवळ काही तज्ज्ञ एआयच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी उरतील.

हॉलीवूडमधील प्रसिद्ध पटकथा लेखक आणि निर्माते रीट रीज, ज्यांनी ‌‘डेडपूल‌’सारख्या चित्रपटांसाठी काम केले आहे, त्यांनी या व्हिडीओवर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, ही क्रांती आहे की विनाशाची सुरुवात, हे सांगणे कठीण आहे. ऑस्कर विजेता अभिनेता मॅथ्यू मॅककॉग्नी यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणतात की, केवळ शांतपणे हे सर्व पाहत राहणे पुरेसे नाही. कारण, एआय प्रचंड उत्पादक आहे आणि त्यात मोठी आर्थिक गुंतवणूक आहे. अभिनेत्यांनी आता आपल्या चेहऱ्याचा, आवाजाचा आणि प्रतिमेचा वापर एआय कंपन्यांकडून केला गेल्यास त्यासाठी मानधन किंवा रॉयल्टी घेण्याची मागणी केली पाहिजे.

हॉलीवूडमधील काही मोठ्या निर्मिती संस्थांनी ही परिस्थिती ओळखून आता एआयशी जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ, डिसेंबर 2025 मध्ये डिस्नेने ओपनएआय या कंपनीशी 9,000 कोटी रुपयांचा करार केला, ज्या अंतर्गत सोरा या व्यासपीठाला डिस्नेच्या 200 पेक्षा जास्त पात्रांवर व्हिडीओ बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कॉपीराईटचा मुद्दा हा या वादाचा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला आहे. सिडान्सवर असा आरोप आहे की, त्यांनी विविध प्रॉडक्शन हाऊसच्या पात्रांचा वापर त्यांच्या परवानगीशिवाय आणि कोणत्याही मोबदल्याशिवाय केला आहे. डिस्ने आणि पॅरामाऊंट स्टुडिओने या चिनी कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. हॉलीवूडच्या मोशन पिक्चर असोसिएशननेदेखील याविरोधात आवाज उठवला असून त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिव्हकिन यांनी म्हटले आहे की, सिडान्सने अमेरिकेच्या कॉपीराईट नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केले आहे. निर्मात्यांच्या हक्कांची पायमल्ली करून लाखोंच्या नोकऱ्या धोक्यात घालण्याचे काम या ॲपमुळे होत आहे. सिडान्सच्या प्लॅटफॉर्मवर मार्वल सुपरहिरोंचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, जे पूर्णपणे मूळ चित्रपटांसारखे दिसतात. यामुळे कायदेशीर पेच अधिकच वाढला आहे.

सध्याच्या घडीला एआय आणि कॉपीराईट संदर्भात जागतिक स्तरावर कोणतेही ठोस कायदे किंवा मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध नाहीत. सिडान्स 2.0 ने एआय व्हिडीओनिर्मितीला ज्या उंचीवर नेऊन ठेवले आहे, ते पाहता आगामी काळात मानवनिर्मित आणि एआयनिर्मित व्हिडीओ यातील फरक ओळखणे अशक्य होईल. काही महिन्यांपूर्वी हॉलीवूडमधील लेखकांनी एआयच्या वाढत्या वापरामुळे प्रदीर्घ संप केला होता. आता केवळ लेखकच नाही, तर संपूर्ण चित्रपटसृष्टीशी संबंधित प्रत्येक घटकाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही केवळ तंत्रज्ञानाची प्रगती नाही, तर एक सांस्कृतिक आणि आर्थिक बदल आहे. चित्रपटनिर्मितीची ही पारंपरिक पद्धत आता पूर्णपणे बदलणार आहे आणि ही एआय क्रांती सिनेसृष्टीला कोणत्या दिशेला घेऊन जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news