Pre-marriage Background Check | लग्नाआधीची गुप्त चौकशी

Pre-marriage Background Check |
Pre-marriage Background Check | लग्नाआधीची गुप्त चौकशी
Published on
Updated on

कावेरी गिरी

महानगरांसह मध्यम शहरांमध्येही 'प्री-मॅरिटल इन्व्हेस्टिगेशन' हा स्वतंत्र व्यवसाय म्हणून पुढे येत आहे. लग्नानंतर होणारी फसवणूक, खोटी माहिती, आर्थिक गैरव्यवहार, व्यसनाधीनता किंवा पूर्वीचे वैवाहिक संबंध लपविल्याच्या घटनांनी अनेकांना सावध केले आहे.

'मुलगा नेमका कुठे काम करतो?', 'त्याचा पगार खरंच एवढाच आहे का?', 'त्या-तिचे आधी काही रिलेशनशिप होते-आहेत का?', 'दारूचे व्यसन आहे का' असे प्रश्न आजकाल अनेक घरांमध्ये सहज ऐकायला मिळतात. एकेकाळी या प्रश्नांची उत्तरे नातेवाईक, ओळखीचे लोक किंवा गावातील विश्वासू व्यक्ती शोधून देत असत; पण आता काळ बदलला आहे. नातेसंबंधांचे स्वरूप बदलले, विवाहाची माध्यमे बदलली आणि त्याचबरोबर विश्वास ठेवण्याची पद्धतही बदलली. त्यामुळे अनेक कुटुंबे लग्न ठरण्यापूर्वी खासगी गुप्तहेरांच्या माध्यमातून वधू किंवा वराची गुप्तपणे चौकशी करून घेत आहेत.

काही वर्षांपूर्वी हा प्रकार फारसा ऐकिवात नव्हता; पण आज महानगरांसह मध्यम शहरांमध्येही 'प्री-मॅरिटल इन्व्हेस्टिगेशन' हा स्वतंत्र व्यवसाय म्हणून पुढे येत आहे. लग्नानंतर होणारी फसवणूक, खोटी माहिती, आर्थिक गैरव्यवहार, व्यसनाधीनता किंवा पूर्वीचे वैवाहिक संबंध लपविल्याच्या घटनांनी अनेकांना सावध केले आहे.

चौकशीची गरज का वाटू लागली?

आज विवाह जुळवण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूप बदलली आहे. नोकरीच्या निमित्ताने मुलं-मुली वेगवेगळ्या शहरांत, राज्यांत किंवा परदेशात असतात. अनेक विवाह मॅट्रिमोनियल वेबसाईटस्‌, सोशल मीडिया किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून जुळतात. अशावेळी समोरच्या व्यक्तीबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळवणे सहज शक्य होत नाही. याचाच गैरफायदा घेऊन काहीजण शिक्षण, पगार, नोकरी, मालमत्ता किंवा वैवाहिक स्थितीबाबत चुकीची माहिती देतात. काही प्रकरणांमध्ये आधीचे लग्न, घटस्फोट, मोठे कर्ज किंवा व्यसनाधीनता लपविली जाते. अशा घटना समोर आल्यानंतर अनेक कुटुंबांनी आधी पडताळणी, मगच निर्णय हे धोरण स्वीकारले आहे.

पूर्वीही चौकशी होत होती; पण पद्धत वेगळी

पूर्वी मुलाच्या गावात चौकशी करणे, शेजाऱ्यांना विचारणे, नातेवाईकांकडून माहिती घेणे हीच पडताळणीची पद्धत होती. गावातील एखादी विश्वासू व्यक्ती दोन दिवसांत बरीच माहिती मिळवून आणायची. आज स्थिती वेगळी आहे. नोकरी एका शहरात, कुटुंब दुसऱ्या शहरात आणि शिक्षण तिसऱ्या राज्यात असे चित्र दिसते. त्यामुळे पारंपरिक चौकशी पुरेशी ठरत नाही. ही जागा आता खासगी गुप्तहेरांनी घेतली आहे.

गुप्तहेर नेमके काय तपासतात?

प्री-मॅरिटल चौकशीमध्ये सामान्यतः काही मुद्द्यांवर भर दिला जातो. दिलेली नोकरी आणि कंपनी खरी आहे का? शैक्षणिक पात्रता योग्य आहे का? आर्थिक स्थिती किंवा मोठी कर्जे आहेत का? पूर्वीचे लग्न, घटस्फोट किंवा इतर संबंध लपविले आहेत का? व्यसनाधीनता किंवा संशयास्पद सवयी आहेत का? कुटुंबाची पार्श्वभूमी आणि सामाजिक वर्तन कसे आहे? घर स्वतःचेच आहे का?

अनेक संस्था संबंधित व्यक्तीच्या परिसरात जाऊन शेजाऱ्यांशी बोलतात, कार्यालयाजवळ चौकशी करतात आणि उपलब्ध सार्वजनिक माहितीची पडताळणी करतात; मात्र ही चौकशी कायदेशीर मर्यादेतच असणे आवश्यक आहे. खासगी आयुष्यात बेकायदेशीर हस्तक्षेप करणे किंवा फोन, संदेश हॅक करणे कायद्याने गुन्हा ठरू शकतो.

सोशल मीडियामुळे संशय वाढला

आज प्रत्येकजण सोशल मीडियावर आपली एक वेगळी प्रतिमा तयार करत असतो. महागड्या गाड्या, परदेश दौरे, आलिशान जीवनशैली दाखवणारी छायाचित्रे पाहून समोरच्या व्यक्तीबद्दल एक ठरावीक मत तयार होते; पण प्रत्यक्ष वास्तव अनेकदा वेगळे असते.

काही जण बनावट प्रोफाईल तयार करतात, नोकरीबद्दल चुकीची माहिती देतात किंवा स्वतःला वेगळ्या स्वरूपात सादर करतात. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्याऐवजी प्रत्यक्ष पडताळणी करण्याकडे कल वाढला आहे.

महिलाच नाहीत, पुरुषही चौकशीच्या कक्षेत पूर्वी अशी चौकशी प्रामुख्याने मुलाबद्दल केली जात असल्याची धारणा होती; पण आता परिस्थिती बदलत आहे. मुलीच्या शिक्षणापासून नोकरीपर्यंत, तसेच तिच्या सांगितलेल्या माहितीत तथ्य आहे का, याचीही पडताळणी केली जाते. म्हणजेच ही चौकशी केवळ एका बाजूची राहिलेली नाही. दोन्ही कुटुंबे स्वतःची खात्री करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा व्यवसायही वाढतो आहे

विवाहपूर्व चौकशीची मागणी वाढल्यामुळे अनेक खासगी गुप्तहेर संस्थांनी ही सेवा स्वतंत्रपणे सुरू केली आहे. काही संस्थांच्या मते त्यांच्या एकूण कामांपैकी लक्षणीय हिस्सा आता विवाहपूर्व चौकशीचा असतो. या सेवेसाठी काही हजार रुपयांपासून ते मोठ्या रकमांपर्यंत शुल्क आकारले जाते. चौकशीचे स्वरूप, शहर, प्रवास आणि माहितीची व्याप्ती यावर खर्च अवलंबून असतो. यामुळे हा व्यवसाय अधिक संघटित स्वरूपात विकसित होत असल्याचे चित्र दिसते; मात्र या क्षेत्रातही कोणतीही एकसमान नियामक व्यवस्था नसल्याने ग्राहकांनी संस्था निवडताना काळजी घेणे आवश्यक आहे.

चौकशीने फसवणूक टळतेच असे नाही

खासगी चौकशी हा अंतिम उपाय नाही; कारण अनेक गोष्टी व्यक्तीच्या स्वभावाशी आणि भविष्यातील वर्तनाशी संबंधित असतात. चौकशीत उपलब्ध माहिती खरी असली, तरी भविष्यात परिस्थिती बदलू शकते. म्हणूनच केवळ गुप्तहेरांच्या अहवालावर अवलंबून राहणे योग्य ठरत नाही. दोन्ही कुटुंबांतील मोकळा संवाद, प्रत्यक्ष भेटी, अपेक्षांवर चर्चा आणि आवश्यक ते प्रश्न स्पष्टपणे विचारणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक नात्याचा पाया विश्वासावर उभा असतो; पण विश्वास म्हणजे डोळे झाकून स्वीकार करणे नव्हे. त्याचवेळी प्रत्येक गोष्ट संशयाच्या नजरेतून पाहिली, तर नात्याची सुरुवातच अविश्वासाने होते. आजचा समाज या दोन टोकांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. पडताळणीची गरज मान्य करतानाच समोरच्या व्यक्तीच्या गोपनीयतेचाही आदर राखणे आवश्यक आहे. प्री मॅरिटल इन्व्हेस्टिगेशन हा केवळ नवीन ट्रेंड नाही, तर बदलत्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब आहे. वाढत्या फसवणुकीच्या घटना, बदललेली जीवनशैली, ऑनलाईन विवाह, शहरांमधील अंतर आणि माहितीची सहज पडताळणी न होणे या सगळ्यामुळे हा पर्याय अनेकांना सुरक्षित वाटत आहे; मात्र प्रत्येक विवाह संशयाच्या पायावर उभा राहू नये. चौकशीचा उद्देश व्यक्तीची बदनामी करणे नसून चुकीची माहिती टाळणे असा असायला हवा. विश्वास, संवाद, पारदर्शकता आणि आवश्यक तेवढी पडताळणी या चार गोष्टींचा समतोल साधला, तर विवाहासारखा महत्त्वाचा निर्णय अधिक सजगपणे घेता येईल. आजचा प्रश्न एवढाच आहे की, लग्न जुळवताना आपण विश्वास ठेवावा की पडताळणी करावी? कदाचित बदलत्या काळाने याचे उत्तर दिले आहे, विश्वास ठेवा; पण खात्री करून.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news