VIP number plates | चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला!
प्रसाद पाटील
जवळ पैसा आला अन् माणसाची मती बदलली. त्यासोबत मान-सन्मानाच्या कल्पनाही. इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळे आहोत, हे दर्शविण्यासाठी मग नाना फंड्यांचा वापर. त्यातलाच एक फंडा म्हणजे, गाडीच्या एकाद्या विशिष्ट नंबरसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम मोजणं. हिमाचल प्रदेशातील एका व्यक्तीने तर एक लाख रुपये किमतीच्या स्कूटीच्या नंबरसाठी तब्बल चौदा लाख रुपये मोजले. विकत घेतलेल्या या सामाजिक प्रतिष्ठेच्या पाठीमागची मानसिकता काय, हा प्रश्न आपसूकच उभा राहतो. तसेच तो चिंताही वाढवतो.
‘मॅन इज अ सोशल अॅनिमल’ हा अॅरिस्टॉटलसारख्या पाश्चिमात्य तत्त्वज्ञाचा सिद्धांत कालातीत आहे. माणसाची ओळख ही केवळ त्याच्या शरीराने किंवा बुद्धीने नाही, तर तो समाजात कसा राहतो, यावरून ठरत असते. माणूस इतर प्राणिमात्रांपेक्षा वेगळा असला, तरी मानवी समूहांमध्येही मी वेगळा आहे, खास आहे, हे दाखवण्याची मानसिकता त्याच्यात असते. यासाठी जमेल त्या मार्गाने आपल्या सामर्थ्याचे, संपत्तीचे दर्शन घडवणारे अनेक जण समाजात दिसतात. त्यात आलिशान वाहन विकत घेणे, त्याच्या नंबर प्लेट वगैरेसारख्या बाबीही अपवाद नाहीत. भारतात वाहन विकत घेणे ही केवळ वाहतूक साधनाची निवड नसून, अनेक वेळा ती वैयक्तिक प्रतिष्ठा, सामाजिक ओळख आणि आर्थिक सामर्थ्य यांची झलक ठरते. या प्रतीकात्मकतेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, व्हीआयपी नंबर प्लेटस्. वाहनाच्या नोंदणी क्रमांकातील काही विशिष्ट आकडे (उदा. 0001, 9999, 7777, 1234 इ.) मिळविण्यासाठी काही व्यक्ती लाखो रुपये खर्च करतात; पण हा केवळ शौक आहे की, यामागे काही खोल सामाजिक व आर्थिक कारणे असतात? जिथे सर्वसामान्यांना लाखाच्या घरात गेलेल्या दुचाकी खरेदी करताना उसनवार्या कराव्या लागतात, बँकांचे कर्ज घ्यावे लागते, तिथे केवळ मनासारखा वाहन क्रमांक मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, हे आर्थिक विषमतेचे विदारक वास्तव आहे.
भारतीय समाजात अंकशास्त्र, सौंदर्यद़ृष्टी व व्यक्तिमत्त्व दर्शविण्याची इच्छा यांना महत्त्व दिले जाते. चारचाकी वाहनाच्या नंबर प्लेटवरील 0001 अथवा 0786 हे आकडे एखाद्याच्या धार्मिक श्रद्धा, व्यावसायिक आत्मविश्वास किंवा राजकीय ओळखीचे संकेत ठरतात. या क्रमांकांकडे पाहणारा समाज त्या व्यक्तीचा दर्जा, त्याची सामाजिक प्रतिष्ठा किंवा त्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज बांधतो. अशा प्रकारच्या उधळपट्टीला प्रदर्शनीय उपभोग म्हणजेच कॉन्स्पिशियस कन्झम्प्शन म्हटले जाते. महागड्या घड्याळांची किंवा लक्झरी गाड्यांची खरेदी या श्रेणीत येते. दिखाऊपणासाठी केला जाणारा वारेमाप खर्च अशी याची सोपी व्याख्या करता येईल. अर्थशास्त्रज्ञ थॉर्स्टीन वेब्लेन यांनी त्यांच्या 1899 च्या पुस्तकात ‘द थिअरी ऑफ द लेजर क्लास’ ही संकल्पना मांडली होती. वेब्लेन यांच्या मते, समाजातील श्रीमंत वर्ग किंवा उच्चवर्ग इतर लोकांना आपली श्रीमंती, सत्तास्थान किंवा प्रतिष्ठा दाखवण्यासाठी काही वस्तूंचा किंवा सेवांचा भडकपणे उपभोग घेतो.
अधिकृत लिलाव प्रक्रिया आणि उत्पन्नाचा स्रोत
आज भारतातील अनेक राज्यांमध्ये वाहन नोंदणीसाठी विशेष व्हीआयपी नंबर लिलाव पद्धतीने दिले जातात. उदा. दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब इ. राज्यांमध्ये 0001, 0009, 0786 यासारख्या नंबरसाठी बोली लावली जाते. या लिलाव प्रक्रियेत काही वेळा लाखो रुपयांपर्यंत बोली जाते. 2023 मध्ये पंजाबमध्ये 0001 क्रमांकासाठी एका व्यावसायिकाने 22 लाख रुपये मोजल्याची बातमी झळकली होती. हे सरकारसाठी उत्पन्नाचे एक माध्यम असले, तरी यात उच्चभ्रू वर्गाचे वर्चस्व स्पष्ट दिसते.
अलीकडेच, हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील संजीव कुमार यांनी एक लाख रुपये किमतीच्या स्कूटीसाठी तब्बल 14 लाख रुपये खर्च करून 0001 क्रमांक घेतला. त्यांच्या आधीही देशभरातील अनेक उदाहरणे आहेत, जिथे फक्त नंबर प्लेटसाठी 10-20 लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली गेली आहे. या कृतीचा उगम एका मूलभूत विचारसरणीत आहे, ती म्हणजे ‘मी काहीतरी वेगळं, उठून दिसणारं करत आहे.’ समाजाच्या नजरेत उठून दिसण्यासाठी काही लोक वाहनाची किंमत नव्हे, तर त्यावरील नंबरच जास्त मौल्यवान मानतात. 2023 मध्ये दुबईत ‘पी 7’ ही नंबर प्लेट तब्बल 122 कोटी रुपयांना विकली गेली. ही आतापर्यंतची जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्येही तिची नोंद झाली आहे.
भारतात प्रत्येक वाहनासाठी आरटीओद्वारा (प्रादेशिक परिवहन कार्यालय) 0001 ते 9999 या मालिकेतील क्रमांक जारी केले जातात. त्यामधील 0001, 007, 7777, 9999, 420 यासारख्या खास व लक्षवेधी क्रमांकांना ‘व्हीआयपी’ किंवा फॅन्सी नंबर म्हणतात. या क्रमांकांची नोंदणी सर्वसामान्य प्रक्रियेनुसार न होता, ती ऑनलाईन लिलावाच्या (ई-ऑक्शन) प्रक्रियेद्वारे होते. इच्छुक व्यक्तींना ही संख्या मिळवण्यासाठी बोली लावावी लागते.
केंद्र सरकारच्या ‘फॅन्सी डॉट परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर नोंदणी करून इच्छुक ग्राहक आपल्याला हवे असलेले फॅन्सी नंबर निवडू शकतात. त्यानंतर संबंधित राज्य, आरटीओ कार्यालय निवडून त्यासाठी लिलावामध्ये सहभागी होता येते. सर्वात जास्त बोली लावणार्या व्यक्तीला तो क्रमांक मिळतो.
यासाठी बेसप्राईस निर्धारित करण्यात आलेली आहे. त्यानुसार दुचाकींसाठी 5,000 ते 50,000 रुपये, चारचाकी वाहनांसाठी : 20,000 ते 1,00,000 रुपये, कमर्शियल वाहनांसाठी दहा हजार ते पन्नास हजार, सुपर व्हीआयपी क्रमांकांसाठी (0001, 007 यासारखे क्रमांक) 50,000 ते 2,00,000 रुपये बेसप्राईस आहे. राज्यनिहाय ही किंमत वेगवेगळी असते. उदा. दिल्लीत 0001 क्रमांकासाठी एक लाख रुपयांपासून लिलाव सुरू होतो, तर केरळमध्ये 50,000 पासून लिलाव सुरू होतो.
प्रशासकीयद़ृष्ट्या पाहता व्हीआयपी नंबर मिळाल्यानं कोणतीही विशेष सवलत, कायदेशीर लाभ अथवा अधिकृत अधिकार मिळत नाहीत; पण समाजाच्या नजरेत यातून एक ‘प्रभाव’ निर्माण होतो. व्यक्तीला स्टेटस सिम्बॉल लाभतो. अनेक जण अशा क्रमांकाचा वापर व्यावसायिक प्रचारासाठी, सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी करतात. असे आकडे विकत घेणारे लोक बहुधा धनाढ्य, राजकीय किंवा सिनेसृष्टीशी संबंधित असतात. उदाहरणार्थ सलमान खानचे वाहन ‘2727’ किंवा महेंद्रसिंग धोनीचा ‘0007’ क्रमांक. या नमुन्यांमुळे सामान्य लोकांमध्येदेखील व्हीआयपी नंबर म्हणजे प्रतिष्ठा असा समज तयार होतो.
अनेकदा व्हीआयपी नंबर निवडण्यामागे ज्योतिषशास्त्रीय गणना, लकी नंबर, मुलांचा जन्मदिनांक किंवा धार्मिक विश्वास कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, मुस्लीम समाजात 786 या नंबरला धार्मिक महत्त्व आहे. बरेच हिंदू लोक 9, 1 किंवा 3 यांना शुभ मानतात. या श्रद्धाळूपणाला व्यावसायिक भांडवलशाहीने तिला बाजारात विक्रीयोग्य उत्पादनात रूपांतरित केलं आहे.
गंभीर बाब म्हणजे, काही वेळा या ‘विशेष’ नंबरचा गुन्हेगारी कारणांसाठी गैरवापर होतो. खोट्या ओळखीपासून ते पोलिसांच्या लक्षातून बचावासाठी महागडा व्हीआयपी नंबर हे वाहन सामान्य वाटू नये म्हणून वापरला जातो. यामुळे वाहतूक नियंत्रण यंत्रणेसाठी अडचणी निर्माण होतात.
विकसनशील राष्ट्रांमध्ये बहुधा स्वतःच्या अस्मितेचे प्रदर्शन बाह्य साधनांद्वारे केले जाते. ज्यात भारदस्त पेहराव, महागडी घड्याळं, आलिशान कार, आकर्षक मोबाईल नंबर आणि आकर्षक वाहन नंबर यांचा समावेश आहे. सरकार आणि समाज व्यक्तीला आत्मसमाधान देणारी किंवा गुणवत्तेवर आधारित प्रतिष्ठा पुरवू शकत नाही, तेव्हा अशी बाह्य चिन्हं त्यासाठी वापरली जातात, असे समाजशास्त्र अभ्यासकांचे म्हणणे आहे.
व्हीआयपी नंबरसाठी लाखो रुपये खर्च करणे ही व्यक्तीची खासगी पसंती असली, तरी यातून आर्थिक व सांस्कृतिक वर्चस्व जपण्याची मानसिकता दिसून येते आणि हा सामाजिक समतेच्या प्रक्रियेतील मोठा अडसर आहे.

