

शरयु माने
आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि विकासाच्या नावाखाली लाखो प्रमाणात वृक्षतोड होत आहे. मानवाच्या वाढत्या गरजा वृक्षतोडीस कारणीभूत ठरत आहेत. 2015 पासून 2017 पर्यंत ओसाड पडलेले जंगल हिरव्यागार देवराईत रूपांतरित झाले. हे सयाजी शिंदेंना मिळालेलं मोठं यश आहे.
गेल्या काही वर्षांत सावली देणार्या झाडांची संख्या कमी झाली. पक्ष्यांची घरटी त्यामुळे दिसेनाशी झाली. कडुनिंब, शिसम, जांभूळ ही झाडे शेताच्या बांधावर दिसायची. कोकिळा, चिमण्यांची घरटी या झाडांवर दिसायची. शेतकर्यांना शेतीमध्ये अडथळा येऊ लागला. आधुनिकीकरणामुळे बांध रिकामे होऊन कुंपणांना अधिक वाव मिळू लागला. पक्षी घरट्यातून खाली शेतातल्या पिकांत उतरून कीटक खाऊन टाकायचे. आता तसे न होता कीटकनाशके वापरून पिकं वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. इतर देशांनी ज्या कीटकनाशकांवर बंदी घातली ती कीटकनाशकं आज भारतात विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापरली जातात. अशा कीटकनाशकांमुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. अशी एकूण 53 लाख सावली देणारी झाडे गायब आहेत, हे डेन्मार्क येथील कोपनहेगन विद्यापीठातील संशोधनाने अहवालात नमूद केलेले आहे.
आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि विकासाच्या नावाखाली लाखो प्रमाणात वृक्षतोड होत आहे. मानवाच्या वाढत्या गरजा वृक्षतोडीस कारणीभूत ठरत आहेत. प्रामुख्याने शेतीचा विस्तार, लाकूडतोड, औद्योगिकीकरण, रस्ते आणि शहर विकास ही प्रमुख कारणे वृक्षतोडीस जबाबदार आहेत. याचा दुष्परिणाम म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, ऑक्सिजनची कमतरता, मातीची धूप आणि प्राण्यांचा निवारा अगर अधिवासच नष्ट होणे आणि सरतेशेवटी पावसाचे प्रमाण कमी होणे, अल निनोसारखे प्रादुर्भाव अशा गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे. कोणत्याही कारणासाठी झाडे तोडण्यापूर्वी कायदेशीर परवानगी घेणे फायद्याचे ठरते. झाड तोडल्यावर त्या ठिकाणी पर्यायी झाड लावणे बंधनकारक असून निव्वळ वृक्षतोड हा एकप्रकारे गुन्हाच आहे. शेतीचा जसजसा विस्तार होत आहे, तशी जंगलं नष्ट होत चालली आहेत. एकोणिसाव्या शतकापासून ब्रिटिशकालीन व्यावसायिक वनशेती अस्तित्वात येऊन भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, केरळमच्या पर्वतीय भागातील जंगलं नष्ट करण्यात आली.
मानवी स्वार्थ, लोकसंख्येत वाढ आणि पर्यायाने विकास साधण्यासाठी जंगल नष्ट करून इमारती कारखाने बांधण्यात आले आहेत. खाणकामासाठीही जंगलतोड होत आहे. जंगलतोडीमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. पूरस्थितीमध्ये झाडे पाण्याला रोखण्याचा अगर त्याचा वेग कमी करण्याचे काम करतात. जंगलं नष्ट होत चालल्याने पाणी थेट वाहून येत आहे. जंगलतोड थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि वनीकरण करणे गरजेचे झाले आहे. जगात सर्वाधिक वृक्षतोड अमेझॉनच्या पर्जन्यवनात म्हणजे ब्राझीलमध्ये तसेच नायजेरियामध्ये होते. लाकूडतोड ही फर्निचर आणि कागद बनविण्यासाठी तसेच पशुपालन या मुख्य व्यावसायिक हेतूने केली जाते. आज भारतात केवळ 20 टक्के वनक्षेत्र शिल्लक आहे. जमिनीचा 31 टक्के भाग जंगलांनी व्यापलेला होता. तो आता एक तृतीयांशने कमी झाला आहे. सरासरी प्रत्येक मिनिट याप्रमाणे दोन हजारांपेक्षा जास्त वृक्षतोड होते. या जागेचा इतर कारणांसाठी उपयोग करून सुमारे 420 दशलक्ष हेक्टर जंगलं साफ म्हणजे नष्ट झाली. जोडीला वणवे, दुष्काळ या गोष्टीही घडतच आहेत.
या सर्व समस्या लक्षात घेऊन प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराई हा प्रकल्प हाती घेतला. एका स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. नामशेष होत चाललेल्या झाडांनाही ही संस्था वाचवण्याचे काम करते. पुनर्रोपण करणे, ओसाड जमिनीवर घनदाट जंगले म्हणजेच देवराई निर्माण करणे ही कामे या संस्थेद्वारे होतात. देशी वृक्षांचे संवर्धन, वड, पिंपळ, चिंच, आंबा यांसारख्या देशी आणि औषधी वनस्पतींची लागवड करून देखभाल करणे ही कामेही संस्था करते. रस्ते रुंदीकरण आणि इतर कारणांमुळे तोडलेले वृक्ष, जुनी झाडं सुरक्षितपणे मुळासकट उचलून इतरत्र लावून त्यांना जीवदान दिले जाते.
यामागचा सयाजी शिंदेंचा द़ृष्टिकोन हा आहे की, झाडं लावल्यामुळे भूजल पातळी वाढते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देऊन गावोगावी देवराई निर्माण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. सयाजी शिंदे यांनी अभिनय क्षेत्रात कार्यरत राहून आपल्या आईच्या स्मरणार्थ या महत्त्वाच्या मोहिमेस 2015 मध्ये प्रारंभ केला. महाराष्ट्रात आता ठिकठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवराई प्रकल्प उभारण्यात आले आहेत, ज्यामध्ये सातारा आणि बीड येथील पालवन डोंगर प्रकल्पांचा प्रामुख्याने समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत लाखो देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे आणि सर्वात आगळी संकल्पना इथे राबविण्यात आली, ती म्हणजे पुनर्रोपित वृक्षाचा दरवर्षी देवराईत सभोवती रांगोळ्या काढून वाढदिवस साजरा करण्यात येतो. समारंभ आयोजित केला जातो. दोनशे ते तीनशे वर्षांपूर्वीच्या झाडाला पुणे येथील हडपसर मधून उचलून आणण्यात आले आणि देवराईमध्ये पुनर्रोपित करण्यात आले. या वडाच्या झाडाला नवीन पालवी फुटली आहे. याचा वाढदिवस सयाजी शिंदे देवराईवर मोठ्या उत्साहात साजरा करतात.
देवराईवर वृक्ष संमेलन भरते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बियाणे, रोपे यांना समाविष्ट केले जाते. स्टॉल लावले जातात आणि त्याची माहितीही दिली जाते. फुलांच्या झाडांचाही समावेश असतो. 2015 पासून 2017 पर्यंत ओसाड पडलेले जंगल हिरव्यागार देवराईत रूपांतरित झाले. हे सयाजी शिंदेंना मिळालेलं मोठं यश आहे. आतापर्यंत त्यांनी सहकार्यांच्या मदतीने 20 ते 30 देवराई स्थापन केल्या आहेत. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेले हिरवेगार जंगल, जिथे वृक्षतोडीस सक्त मनाई असते. अशा विकासासाठी उजाड झालेल्या जंगलांना सयाजी शिंदे यांच्या एनजीओने म्हणजे सह्याद्री देवराई या प्रकल्पाने महाराष्ट्राला पुन्हा हिरवाई बहाल केलेली आहे. अशा देवराई पूर्वीपासून महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पट्ट्यात, कोकणात घाटमाथ्यावर स्थित आहेत; पण आता जवळपास त्या उजाड होत चलल्यामुळे त्या पुनर्जीवित करण्याचे काम सह्याद्री देवराईसारख्या संस्था करत आहेत आणि त्यांना अपेक्षित यश मिळत आहे. अनाथ झालेली झाडं या देवराईंनी पुन्हा सामावून घेऊन जंगलांचे रूपांतर हिरव्या देवराईत झाले आहे.