

अलीकडील काळात जातीय ध्रुवीकरणामुळे बीडमध्ये वर्षानुवर्षांपासून असणारी सामाजिक वीण उसवत चालली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अत्यंत अमानवी, अमानुष आणि हृदय पिळवटून टाकणार्या हत्येमुळे बीडमधील सामाजिक वातावरण कमालीचे अस्वस्थ बनले आहे. अशावेळी सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी समाजातील बुद्धिवंत, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांनी एकत्र येऊन शांततावादी, समन्वयवादी विचारांची पेरणी करुन सामाजिक दुहीचा धोका टाळणे गरजेचे आहे.
विविधतेत एकता हे भारतीय संस्कृतीचे आधारसूत्र आहे. भौगोलिक, आर्थिक, जातीय, धार्मिक विविधता-विषमता असूनही साडेसात दशकांहून अधिक काळ संविधानाने स्थापन केलेल्या देशात भारतीय जनता एकात्म भावाने राहात आहे, याचे संपूर्ण जगाला अप्रूप वाटते. या एकात्म भावामुळेच गेली 75 वर्षे भारत नावाचा देश अखंडित लोकशाही टिकवू शकला. भारतासोबत किंवा त्याआधी व नंतर उदयास आलेल्या अन्य देशांमध्ये लोकशाही व्यवस्था एक तर रुजली नाही किंवा टिकली नाही. पाकिस्तान, बांगला देश, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका या देशांमधील स्थिती आपण पाहात आहोत. या सर्व देशांना भारताच्या अखंडत्वाचे सदैव आश्चर्य वाटते. भारताची एकात्मता यातील काही देशांच्या डोळ्यांत खुपतेही. त्यामुळे त्यांच्याकडून इथल्या एकात्मतेला सुरुंग लावण्याचे प्रयत्नही होत असतात. परंतु ‘वी द पीपल ऑफ इंडिया’ एकजुटीने असे प्रयत्न असफल ठरवतात, हा इतिहास आहे. थोडक्यात, एकात्मता हे आपले सर्वोच्च बलस्थान आहे. परंतु अलीकडील काळात जातीय, धार्मिक, प्रांतीय अस्मिता टोकाच्या बनल्यामुळे ही एकात्मता भंग करणार्या संघर्षाच्या घटना वाढत चालल्या आहेत. यामध्ये काही वेळा समाजकंटकांकडून केले जाणारे प्रयत्न कारणीभूत असतात तर काही वेळा राजकीय नेत्यांचे स्वार्थी राजकारण कारणीभूत असते. पण या दोन्हींमुळे समाजात तणाव वाढत जातो. अलीकडील काळात महाराष्ट्रातही अशा प्रकारचा तणाव मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर, मालेगावसह काही भागात मागील काळात झालेल्या दंगली याची साक्ष देणार्या आहेत.
सद्य:स्थितीत मराठवाड्यातील बीडमध्ये अशाच प्रकारचा सामाजिक तणाव दिसून येत आहे. बीड हा मराठवाड्यातील दुष्काळी जिल्हा. महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडकडे पाहिले जाते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीडला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. परंतु अलीकडील काळात बीड वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत येत चालला असून ती कारणे गंभीर स्वरूपाची आहेत. महिनाभरापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अत्यंत निर्घृण आणि कोणाही संवेदनशील व्यक्तीचे हृदय पिळवटून जावे इतक्या अमानुषपणे हत्या करण्यात आली आणि बीडमध्ये धुमसत असलेल्या जातीय तणावाला नवी फोडणी मिळाली.
लोकसभा निवडणुकांदरम्यान बीडमध्ये महायुतीच्या पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली. या लढतीवेळी काही प्रमाणात मराठा-वंजारी वाद स्थानिक पातळीवर दिसून आला. निवडणुकांनंतरही तो जातीय वाद पुन्हा उफाळत असल्याचे दिसून आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी केल्या गेलेल्या आंदोलनादरम्यान बीडमध्ये काही लोकप्रतिनिधींची घरे जाळल्याची घटना घडली होती. त्यानंतर बीडसह मराठवाड्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. मध्यंतरीच्या काळात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यानही या दोन समाजातील तणाव कायम राहिल्याचे दिसून आले. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राजकीय नेत्यांसह काहीजणांकडून याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला गेला आणि गेल्या 30 दिवसांमध्ये वातावरण अधिक बिघडत गेले. माध्यमे, वाहिन्या, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून या हत्येबाबत विविध राजकीय नेत्यांकडून केल्या गेलेल्या जातीय विधानांच्या सततच्या उजळणीमुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणि तणाव निवळण्याऐवजी अधिकच वाढत चालला आहे. काही आठवड्यांपूर्वी परभणीमध्ये भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केल्याची घटना घडली. याच्या निषेधार्थ मोठे आंदोलन झाले. त्यानंतर हिंसेच्या घटनाही घडल्या. याचा तपास सुरू असताना पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. या कारवाईत सोमनाथ सूर्यवंशी या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले. यादरम्यान त्यांचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. वस्तुतः ही नासधूस करणारी व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु तरीही त्यानंतर राजकीय नेत्यांचे परभणी दौरे सुरू झाले. अगदी राहुल गांधींनीही परभणीला भेट दिली आणि राजकीय आरोप केले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन पातळीवर सुरू आहे. या प्रकरणादरम्यान सहाजणांना अटकही झाली आहे. संतोष यांची हत्या नेमकी कशामुळे झाली, त्यामध्ये नेमके कोण कोण गुंतलेले आहे, या सर्व गोष्टी तपासातून समोर येत आहेत आणि येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून या प्रकरणातील दोषी, मग तो कुणीही असला तरी त्याला सोडणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे. असे असताना या प्रकरणाला जातीय रंग देऊन केल्या जाणार्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आधीपासून असणारी सामाजिक दुही वाढत चालली आहे. मनोज जरांगे यांनी वंजारी समाजाबाबत अप्रत्यक्षरीत्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ या समाजाने अलीकडेच मोर्चा काढला. दुसरीकडे लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजानेही अलीकडेच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात ओबीसी समाजाला टार्गेट केले जात असल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पुन्हा संतापजनक टिप्पणी केली गेली आणि त्याला प्रत्युत्तरादाखल टीका सुरू झाली. थोडक्यात वार-पलटवार असे करत करत सामाजिक तणावात दिवसागणिक भर पडत चालली आहे. दुर्दैवाने, या सर्व कलूषित आणि गढूळ बनत चाललेल्या वातावरणामध्ये राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती, विचारवंत, बुद्धिवंत, शांततावादी व्यक्ती या पुढे येऊन उसवत चाललेली दोन समाजांमधील वीण सांधण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. कदाचित त्यांच्याही मनात आपल्या जातीचा अडसर असावा, असे दिसत आहे. पण यामुळे आज बीडमधील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बहुतेकदा राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी सामाजिक विभाजनाला चालना देतात आणि हेच नेते पुढे आपल्या सोयीसाठी क्षणार्धात यू टर्न घेऊन भूमिका बदलतात. पण कार्यकर्त्यांमध्ये, समाजामध्ये पडलेली फूट अशी चटकन कधीच सांधली जात नाही. मांडीला मांडी लावून जेवणारे, एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे तरुण जातिधर्माच्या नावाखाली विभागले जाऊ लागले तर अराजक उद्भवू शकते याचे गांभीर्य कुणालाच नसावे हे सर्वांत मोठे वैषम्य आहे. तरुणाईचा देश, विकसित भारत बनण्याचे उद्दिष्ट ठेवून पुढे जाणारा देश, चंद्राला-मंगळाला गवसणी घालणारा देश असा जातिपातींच्या संघर्षामुळे दुभंगला गेला तर भयावह स्थिती उद्भवण्याचा धोका आहे. महात्मा गांधीजी म्हणत असत, डोळ्यांच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल. याच तत्त्वज्ञानानुसार एकमेकांना काटशह देण्यासाठी प्रत्येक मुद्द्याकडे जातिधर्माच्या चष्म्यातून पाहिले जाऊ लागले तर वैचारिक अंधःकार पसरेल. संतोष देशमुखांच्या हत्येमुळे आज बीडमधील सामाजिक तणावाची स्थिती समोर आली असली तरी उर्वरित महाराष्ट्रातही फारसे आशादायक चित्र नाही. विज्ञान-तंत्रज्ञान, एआय यांमुळे जगाचा प्रवास एका वेगळ्या दिशेने होत असताना, पर्यावरणीय बदल झपाट्याने होत असताना नवनवी आव्हाने उभी राहणार आहेत. त्यांचा विचार करून विकासात्मक कार्य करण्याऐवजी अंतर्गत कलहांमध्ये आपण गुंतून पडलो तर आपला भविष्यकाळ कसा असेल हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज भासणार नाही.