

डॉ. राहुल रनाळकर
मराठी रंगभूमीवरील ज्वलंत आणि वादग्रस्त विषयांची परंपरा जपणार्या लेखकांमध्ये विजय तेंडुलकर हे सर्वोच्च नाव. त्यांच्या धारदार लेखणीने जन्माला आलेले ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक 1972 मध्ये प्रथम रंगमंचावर आले आणि अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली. हे नाटक आता पुन्हा रंगमंचावर आलेले आहे.
समाजातील दडवलेल्या लैंगिक विकृती, स्त्रियांची अगतिकता, पुरुषी हिंसा आणि अंतर्विरोध यांचे निर्व्याज चित्रण नाटकाने थेट प्रेक्षकांच्या घरात आणले. पन्नास वर्षांनंतरही या नाटकाचं अस्तित्व तेवढंच ताजं आहे. याच नाटकाची नव्या मांडणीने पुन्हा रंगमंचावर दमदार एन्ट्री केली असून प्रेक्षक हाऊसफुल्ल गर्दीने तेंडुलकरांच्या लिखाणाला पुन्हा सलाम करत आहेत.
1972 मध्ये हे नाटक जेव्हा पहिल्यांदा सादर झाले तेव्हा अनेकांनी यावर कुटुंबसंस्थेवर घाला घातल्याचा आरोप केला. नाट्य परीक्षण मंडळाने आक्षेप घेतले, विधानसभेत चर्चा रंगली, युवक काँग्रेसने प्रयोग बंद पाडले. इतकेच नव्हे, तर न्यायालयातही खटला भरला गेला; मात्र नाटक पाहिल्यानंतर न्यायमूर्तींनी बंदी उठवली आणि कलेवरचा विश्वास पुन्हा द़ृढ झाला. ज्या काळात विवाहबाह्य संबंध किंवा लैंगिक दडपशाहीबद्दल सार्वजनिकपणे बोलायचीही हिंमत नसायची, त्या काळात तेंडुलकरांनी समाजातील गलिच्छ वास्तव रंगमंचावर आणण्याचे धाडस केले होते.
सखाराम हा समाजातील ‘टाकून दिलेल्या’ स्त्रियांना आसरा देतो; पण त्यामागे त्याची स्वतःची वासना आणि पुरुषी अहंकार दडलेला आहे. स्त्रियांच्या संरक्षणाच्या नावाखाली होणारी मानसिक, शारीरिक व भावनिक पिळवणूक नाटक प्रभावीपणे दाखवते. स्त्री-पुरुष संबंधातील असंतुलन, पितृसत्ताक वर्चस्व, स्त्रीची घुसमट आणि तिच्या जगण्याचा गुंता हे सगळं आजच्या काळातही तितकंच लागू पडतं. सध्याच्या वेबसीरिजमध्ये हिंसा आणि सेक्सचं बोल्ड चित्रण सहज दिसतं; पण सखाराम बाइंडर ही कलाकृती प्रेक्षकास थेट वास्तवाच्या डोळ्यात डोळे घालायला भाग पाडते.
आजच्या पिढ्यांना मोबाईलवर उपलब्ध असलेली अर्वाच्य सामग्री, शाळकरी मुलांमध्ये वाढणारी शिवराळ भाषा, नात्यातील भावनिकता तुटणं या सर्वांमुळे समाजातील विकृती कमी झाल्या की वाढल्या, हा प्रश्न अधिक तीव्र बनतो. या पार्श्वभूमीवर ‘सखाराम’चे पुनरागमन समाजाला स्वतःकडे पुन्हा पाहायला भाग पाडते. तेंडुलकर यांनी एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे, हिंसा किंवा सेक्स या गोष्टी नाटकातील आवश्यकतेनुसारच येतात; पण त्या संहितेला अधिक प्रभावी बनवण्याचं काम करतात. त्यांच्या लेखणीतील धाडस आजही हे नाटक पाहताना तीव्रतेनं जाणवतं.
सखाराम बाइंडर - सयाजी शिंदे निळू फुले यांच्या अमर भूमिकेनंतर सखाराम साकारणार्या अभिनेत्याला मोठं आव्हान होत. सयाजी शिंदे यांनी मात्र हे आव्हान केवळ स्वीकारलं नाही, तर ते अचूकपणे पेललं आहे. त्यांच्या भेदक, वर्चस्व दाखवणार्या नजरा, संवादातील धार आणि प्रेक्षकांना अस्वस्थ करणारी देहबोली सगळंच पात्राला जिवंत करतं. जवळजवळ 35 वर्षांपूर्वी त्यांनी या नाटकात भूमिका केली होती. त्यावेळी 55 प्रयोग केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा नाटक वाचलं आणि आपल्याला तेव्हा सखाराम समजलाच नव्हता, असं त्यांना जाणवलं. प्रिया तेंडुलकर व लालन सारंग यांच्यासोबत केलेला अनुभव नव्या सादरीकरणात वेगळ्या परिपक्वतेने उमटतो.
नाशिकची गुणी अभिनेत्री नेहा जोशी हिने परंपरागत, भेदरलेल्या आणि अंतर्मुख स्त्रीची भूमिका कौशल्याने साकारली आहे. तिचा रंगमंचावरील वावर अत्यंत परिणामकारक. ती जणू भीतीच्या आणि अन्यायाच्या जाळ्यात अडकलेली स्त्री म्हणून प्रेक्षकाशी संवाद साधते. नेहाने भूमिकेत ओतलेला जीव प्रत्येक द़ृश्यात दिसून येतो.
‘चंपा’ ही भूमिका स्त्रीच्या दुसर्या टोकाचे प्रतिनिधित्व करते. बंडखोर, तडफदार पण आतून जखमी. अनुष्का विश्वासने या पात्राला केवळ उभं केलं नाही, तर त्याच्या भावनिक सूक्ष्मता प्रभावीपणे मांडल्या.
दाऊदची भूमिका नाटकाला सामाजिक वास्तवाचा आणखी एक आयाम देते. चरण जाधवने मर्यादित जागेतही व्यक्तिमत्त्व ठसवणारा अभिनय सादर केला आहे.
नाटकातील ‘इसम’ हे पात्र अल्प असलं, तरी त्याची उपस्थिती परिस्थितीची गंभीरता दाखवते. दिग्दर्शक अभिजित झुंजारराव यांनी स्वतःच ही भूमिका साकारत कथानकाला आवश्यक वजन दिलं आहे.
दिग्दर्शक - अभिजित झुंजारराव
तेंडुलकरांच्या धारदार संहितेला साजेशी गती, अंधार आणि प्रकाशाचा टोन आणि पात्रांच्या मनोभूमिकेचा प्रवास या सगळ्याचं उत्तम संतुलन त्यांनी साधलं आहे. प्रेक्षकाला अस्वस्थ करणं, विचार करायला लावणं आणि नाटक संपल्यानंतरही मनात घोळ निर्माण करणं हे दिग्दर्शक म्हणून त्यांनी साध्य केलं आहे.
नेपथ्य - डॉ. सुमीत पाटील
सखारामचं घर, त्यातील ओलावा, अंधार, घुसमट हे सगळं नेपथ्यातून अचूक उभं राहतं. वास्तववादी तपशील पाहून प्रेक्षक पात्रांच्या जगात शिरतात.
प्रकाश योजना - शाम चव्हाण
प्रकाशाचा खेळ नाटकातील ताण, भीती आणि अस्वस्थता अधिक तीव्र करतो. प्रत्येक द़ृश्याचा मूड बदलण्यासाठी प्रकाशयोजनेची नेमकी मदत जाणवते, ती जबाबदारी चव्हाण यांनी पेलली आहे.
संगीत - आशुतोष वाघमारे
पार्श्वसंगीत नाटकात संवादाइतकंच महत्त्वाचं. तणाव वाढवणारे, कधी दडपण निर्माण करणारे संगीत नाटकाला वेगळा स्तर देते, हा अनुभव अनेक प्रसंगांमध्ये हे नाटक पाहताना येतो.
वेषभूषा - तृप्ती झुंजारराव
सत्तरच्या दशकातील सामाजिक वास्तव आणि पात्रांची मानसिकता याला साजेशी वेषभूषा नाटकाला विश्वासार्ह बनवते.
रंगभूषा - शरद सावंत
पात्रांच्या मानसिक स्थितीचे प्रतिबिंब रंगभूषेत दिसते. सखारामचा थोडा रापलेला, तर स्त्रियांचा थकलेला भाव निर्मितीला अधिक खोली देतो. त्याला सावंत यांच्या रंगभूषेची साथ मिळते.
निर्मिती - समुख चित्र
उत्तम संकल्प, समर्पित टीम आणि नाटकाचा आत्मा जपत नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निर्मिती संस्थेने उत्कृष्टरीत्या निभावला आहे.
रिल्सच्या आणि क्षणिक मनोरंजनाच्या काळात अडीच तास रंगमंचाशी खिळवून ठेवणारं नाटक आज दुर्मीळ आहे; पण ‘सखाराम बाइंडर’ हा अपवाद आहे. नाटक पाहताना प्रेक्षक एकमेकांकडे पाहायलाही विसरतात इतकं प्रभावी सादरीकरण. मराठी रंगभूमी टिकवायची असेल, तर भाषा, फॉर्म आणि सादरीकरणात धार आवश्यक आहे, हे या नाटकातून पुन्हा सिद्ध होतं. वास्तवाचा आरसा दाखवणारी नाटकं समाजाला दिशा देतात. तेंडुलकरांचं लेखन आजच्या काळातही काटेरी प्रश्न विचारतं आणि त्यांची उत्तरे शोधण्यासाठी प्रेक्षकाला अंतर्मुख करतं. म्हणूनच पन्नास वर्षांनंतरही ‘सखाराम बाइंडर’ ही कलाकृती तेवढीच धारदार आणि जिवंत आहे.