

डॉ. विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार आणि ज्येष्ठ विचारवंत
देशभक्ती हा केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आठवण्याचा विषय नसून तो रोज जगण्याचा विषय असला पाहिजे, ही संघाची मुख्य भूमिका आहे. शाखा हे देशभक्ती आपल्या वर्तनव्यवहारातून प्रतिबिंबीत व्हायला हवी, याची आठवण करून देणारे उपकरण आहे आणि ते एकमेवाद्वितीय आहे. संघाच्या संघटनशास्त्रात आपले परस्पर संबंध आणि पारस्पारिकता (म्युच्युअॅलिटी) यांना खूपमहत्त्व आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बरोबरीने अनेक संघटना स्थापन झाल्या. कम्युनिस्ट पक्षही स्थापन झाला. त्या आधी 40-45 वर्षे काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. इतरही काही संस्था स्थापन झाल्या; पण शतकभर संघटना शाबूत राखणं, ती वर्धिष्णू ठेवणं आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तिचा ठसा उमटवणं ही बाब फक्त संघालाच शक्य झाली आहे. संस्था जीवनाचा विचार केल्यास आपल्याकडे दोन-दोनशे वर्षांपासून चालत आलेल्या संस्था आहेत. उदाहरणच घ्यायचं, तर मुंबईची एशियाटिक सोसायटी 225 वर्षे जुनी आहे. संस्था चालवणं तुलनेनं सोपं आहे; पण सामाजिक संघटन बांधताना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विचारभिन्नता असणार्या लोकांना एका पद्धतीनं विचार करण्यास प्रवृत्त करणं हे महद्कठीण असतं; मात्र संघानं ते सहजगत्या करून दाखवलं आणि हा संघाच्या यशाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
यामागे हजारो स्वयंसेवकांचे निःस्पृह योगदान आहे. मूलतः संघाची जी सहजशैली आहे, त्यामध्ये कुठलंही अवडंबर किंवा कर्मकांड नाही. कुठेही खूप कठोर नियम नाहीत. संघानं नेहमीच लवचिकता ठेवली आणि त्यामुळंच हे शक्य झालं. ही लवचिकता स्वीकारताना आपला मूळ गाभा, मूळ ओळख याच्याशी तडजोड होणार नाही, याची दक्षताही संघानं सदैव घेतली. त्यामुळं संघ हा संघ राहिला आणि कालौघात खूप बदल होऊनही ते सहजगत्या संघाला पचवता आले.
देशभक्ती हा केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आठवण्याचा विषय नसून तो रोज जगण्याचा विषय असला पाहिजे, ही संघाची मुख्य भूमिका आहे. शाखा हे आपल्या राष्ट्राविषयीची आपली भक्ती, आपली निष्ठा हे सर्व आपल्या वर्तनव्यवहारातून प्रतिबिंबीत व्हायला हवे, याची आठवण करून देणारे उपकरण आहे आणि ते एकमेवाद्वितीय आहे. ‘संघ म्हणजे शाखा आणि शाखा म्हणजे कार्यक्रम ’ असं म्हटलं जातं. शाखा हा संघाचा प्राण आहे. कोव्हिडच्या काळामध्ये जेव्हा शाखा बंद कराव्या लागल्या, त्यावेळी इंटरनेटच्या माध्यमातून सायबर शाखा चालवल्या गेल्या. परदेशातही अनेक ठिकाणी त्या चालल्या. अर्थात, सायबर शाखा पूर्वीपासूनच सुरू आहेत. कारण, एकत्रित येण्यासाठी हवामान अनुकूल नसतं, त्यावेळी स्वयंसेवक आपापल्या घरातून जॉईन होतात आणि व्हर्च्युअल मीटिंगप्रमाणं सायबर शाखा भरते. हा जो अडचणींवर मात करून पुढं जाण्याचा संकल्प आहे, निर्धार आहे आणि चिवटपणा आहे, तो संघाच्या कार्यपद्धतीचा उल्लेखनीय पैलू आहे.
आता तर परदेशातही अनेक ठिकाणी संघाशी संबंधित कार्यकर्ते हिंदू स्वयंसेवक संघ किंवा तत्सम संघटनांच्या माध्यमातून समाज बांधणीचे प्रारूप परदेशातही घेऊन जात आहेत. तिथल्या शाखांमध्ये काम करणारे कार्यकर्ते असं सांगतात की, उदाहरणार्थ आम्ही आफ्रिकेमध्ये शाखा लावतो तेव्हा भारतीय नागरिक त्यामध्ये सहभागी होतातच; पण त्या शाखेचं स्वरूप पाहून, त्यातील पारस्पारिकता आणि खेळीमेळीचे वातावरण पाहून आफ्रिकन लोक ‘आम्हालाही बोलवा, आम्हीही शाखा चालवतो’ असं सांगतात. शाखा या उपकरणाचं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यातील सहजता, सातत्यपूर्णता, त्यातून सर्वांप्रती व्यक्त होणारा स्नेहभाव, सामूहिकता, निरपेक्षता याविषयी समाजामध्ये मोठं आकर्षण आहे. कारण, असं वातावरण दुर्दैवानं कुठंही, कुणालाही मिळत नाही. शाखा हे आपलेपणानं एकमेकांशी जोडलं जाण्याचं प्रभावी आणि कालजयी तंत्र म्हणून सिद्ध झालेलं आहे.
संघाच्या यशाची चर्चा करायची, तर गेल्या 100 वर्षांमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांनी संघाचा संस्कार समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत ज्यापद्धतीनं नेला, त्यातून विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, वनवासी आश्रम अशा अनेक संघटना निर्माण झाल्या; पण या समूह संघटनांच्या पलीकडेही असे हजारो कार्यकर्ते आहेत, जे संघप्रेरित कोणत्याही संघटनेशी औपचारिकपणे जोडलेले नाहीत. कारण, कुठलीही संघटना म्हटलं की, तिथे नियम असतात. काही अपेक्षा असतात. त्या सर्वांनाच सर्वकाळ पचत नाहीत. त्यामुळे औपचारिक संघटनेच्या पलीकडे जाऊन आणि काहीसे बाजूला राहूनही मूळ ऊर्मी कायम ठेवत ज्यांनी सेवाकार्य सुरू ठेवले आहे, अशांची संख्याही खूप मोठी आहे. ते संघातूनच प्रेरणा घेऊन गेलेले आहेत आणि आपापल्या ठिकाणी त्याच पद्धतीनं काम करण्यामध्ये रममाण आहेत. हाही संघाच्या यशाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
संघाने वेगवेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये आपला ठसा उमटवला. उदाहरणच घ्यायचं, तर संघाची गीतं पाहिली, तर त्याचा अर्थवाहीपणा, गेयता वैशिष्ट्यपूर्ण आहे; पण त्याबरोबरीनं त्यामध्ये एक अनामिकता आहे. ते पद्य कोणी रचलं, हे कोणालाच समजत नाही. कारण, त्याखाली कुणीही ‘कवी’ म्हणून आपलं नाव लिहित नाही. इतक्या निश्रेयस पद्धतीनं किंवा ‘इदं न मम’ या वृत्तीनं काम करणं हे केवळ संघामध्येच दिसतं. इतरत्र अनेक थोरामोठ्यांनी चालवलेल्या सामाजिक संघटनांमध्येही वरिष्ठ मंडळींकडून त्यांच्याच कुटुंबातील तरुणांनी सूत्रे हातात घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. ही एक प्रकारची घराणेशाहीच आहे; पण अशी रचना संघामध्ये दिसत नाही, हेही उल्लेखनीय! संघाच्या लोकांनी जे काही साधलं आहे, त्यामध्ये साधेपणा, शिस्त, काटेकोरपणा, विशिष्ट पद्धतीनं आणि समर्पित भावनेनं काम करणं ही भारतीय जीवनमूल्ये आहेत. सार्वजनिक जीवनातून ही मूल्यं हद्दपार होत असताना ती टिकवून ठेवणं हे एक आव्हानच होतं; पण संघानं ते टिकवून ठेवण्यात यश मिळवलं आहे.
संघाला कुठल्याही विषय हा अविषय नाही. समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांत आज संघाच्या विचारांच्या व्यक्तींचा संचार आहे. वैचारिक आणि बौद्धिक क्षेत्रातही संघानं आता खूप मोठी भरारी घेतली आहे. नियतकालिकं, मासिकं, परिसंवाद, चर्चासत्रं यांबरोबरीन चित्रपटाच्या क्षेत्रातही संघाच्या संस्था काम करताहेत. शंभर वर्षांपूर्वी संघाची स्थापना झाली त्यावेळी कुणी याची कल्पनाही केली नव्हती. नित्य नूतन, चीर पुरातन हे जसं भारतीय संस्कृतीचं व्यवच्छेदक लक्षण आहे, तसंच ते संघाच्या, काळाच्या कसोटीवर उतरलेल्या कार्यपद्धतीचंही आहे. संघात नेहमीचं म्हटलं जातं की, आपलं काम सर्वस्पर्शी, सर्वग्राही आणि सर्वग्राह्य असं असलं पाहिजे. म्हणजेच सर्वांना ते आपलंसं वाटलं पाहिजे. सगळ्यांना बरोबर घेता आलं पाहिजे.
संघानं एक संघटनशास्त्र विकसित केलं आहे. त्यातील एक प्रमुख सूत्र म्हणजे ‘ऑल आर इक्वल, बट नो बडी इज इनडिस्पेन्सिबल’ अर्थात, सगळ्यांचं समान महत्त्व आहे आणि कोणीही अपरिहार्य नाही. हे संघाचं पायाभूत तत्त्व आहे. दुसरं तत्त्व म्हणजे, प्रत्येक माणूस हा भावी कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता बनवण्यासाठी त्याला कमी-अधिक प्रमाणात तुमच्या स्नेहाची ऊर्जा देणं गरजेचं आहे; पण प्रत्येकात कार्यकर्ता दडलेला आहे. प्रत्येक जण आपला आहे. कुणीही टिकाऊ नाही किंवा फुली मारून त्याला नाकारावं असा नाही, हा संघाच्या संघटनशास्त्राचा एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहे. दुसरं म्हणजे, संघामध्ये नेहमी सांगितलं जातं की, माणूस जसा आहे तसा घ्यावा आणि तो जसा घडायला हवा तसा आपण त्याला घडवावा. त्यासाठी आपण मेहनत घ्यावी, ज्यामुळं तो कार्यकर्ता होईल. इतक्या परिश्रमानं माणसं जोडणं आणि घडवणं हेसुद्धा संघाचं आदर्शवत वैशिष्ट्य आहे.
संघाच्या संघटनशास्त्रात आपले परस्पर संबंध आणि पारस्पारिकता (म्युच्युअॅलिटी) यांना खूप महत्त्व आहे. आपल्या संबंधांमध्ये पारदर्शिता, उत्तरदायित्व असलं पाहिजे. कोणतीही ‘एक्सक्लुझिव्हिटी’ असता कामा नये, या सूत्रांमुळे इतक्या विस्कळित झालेल्या हिंदू समाजाला संघ संघटित करू शकला. यामागचा सिद्धांत असा की, विविधता ही आपल्या एकतेची विविध रूपं आहेत. मूळ आपण एक आहोत. एकता प्रकट होताना वेगवेगळ्या पद्धतीनं प्रकट होत असल्यामुळं ती विविधता दिसते. विविध आहोत म्हणून एक नसून, एक आहोत म्हणून विविध आहोत. (शब्दांकन ः हेमचंद्र फडके)