Raghav Chaddha | ‘आप’चा जखमी शिलेदार

Raghav Chaddha
Raghav Chaddha | ‘आप’चा जखमी शिलेदार
Published on
Updated on

डॉ. सुकृत खांडेकर

ज्या वेगाने तरुण, कार्यक्षम, बुद्धिमान व पक्षाचा ‘थिंक टँक’ म्हणून ओळखले जाणारे राघव चढ्ढा यांचा आलेख आम आदमी पक्षात उंचावला गेला, त्याच वेगाने पक्षाने त्यांची आता कोंडी सुरू केली आहे. पक्षाने केलेल्या कारवाईनंतर चढ्ढा कमालीचे अस्वस्थ झाले. आपले काहीही चुकले नाही, आपण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न संसदेत मांडत होतो, त्यामुळे पक्षाचे काय नुकसान झाले, असा प्रश्न ते विचारत आहेत.

पक्षाचा अजेंडा राबवायचा की विमानतळावरील सामोसे आणि मोबाईल रिचार्ज करण्याचे दर महागडे का, असा प्रश्न विचारायचा, यावरून आम आदमी पक्षाचे बॉसेस आणि राज्यसभेतील पक्षाचे उपनेते राघव चढ्ढा यांच्यात मोठे शीतयुद्ध सुरू आहे. पक्षाचे सर्वोच्च नेते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा अटक झाल्यानंतर राघव चढ्ढा रस्त्यावर उतरले नाहीत, पक्षाने केलेल्या निदर्शनात सामील झाले नाहीत, त्यांनी केंद्राचा साधा निषेधही नोंदवला नाही. मग, त्यांना उपनेतेपदावर ठेवायचे कशाला? या मुद्द्यावरून पक्षात खदखद वाढत गेली व त्याची परिणती चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून अचानक हटविण्यात आले. एवढेच नव्हे, तर राज्यसभेतील चर्चेमध्ये पक्षाच्या वतीने त्यांना भाषणाची संधी देण्यात येऊ नये, असेही पक्षाने राज्यसभा सचिवालयाला कळवून टाकले.

ज्या वेगाने तरुण, कार्यक्षम, बुद्धिमान व पक्षाचा ‘थिंक टँक’ म्हणून ओळखले जाणारे राघव चढ्ढा यांचा आलेख आम आदमी पक्षात उंचावला गेला, त्याच वेगाने पक्षाने त्यांची आता कोंडी सुरू केली आहे. पक्षाने केलेल्या कारवाईनंतर चढ्ढा कमालीचे अस्वस्थ झाले. आपले काहीही चुकले नाही, आपण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न संसदेत मांडत होतो. त्यामुळे पक्षाचे काय नुकसान झाले, असा प्रश्न ते विचारत आहेत. पक्षातील ज्यांनी मला पदावरून हटविण्याचे कारस्थान रचले, त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो, ‘मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना, में वो दरिया हूं, जो वक्त आने पर सैलाब बन जाता हैं, खामोश कराया, हारा नहीं हूं मै.’ राघव चढ्ढा यांनी आपल्या साईटवर अमेरिकन लेखक रॉबर्ट ग्रीन याच्या पुस्तकातील एका प्रकरणातील पानाचा संदर्भ दिला आहे. लेखकाने म्हटले आहे, आपले मालक किंवा बॉस यांच्यापेक्षा आपण कोणी मोठे आहोत, असे समजून चमकोगिरी करू नका. आपल्या वरिष्ठांना नेहमीच ते आपल्यापेक्षा उत्तम व श्रेष्ठ आहेत, असे वाटले पाहिजे. असे जर आपण वागाल, तरच आपण प्रगती करू शकाल. चढ्ढा यांनी हे पुस्तक वाचतानाचा फोटो व्हायरल केला आहे. त्यांच्या टीकेचा रोख थेट त्यांचे सुप्रीम बॉस केजरीवाल यांच्यावरच आहे.

राघव चढ्ढा म्हणतात, विमानतळावर खाद्यपदार्थांच्या किमती खूपच आहेत. झोमॅटो किंवा ब्लिंकीटच्या डिलिव्हरी रायडर्सचा मुद्दाही संवेदनशील आहे, बँकांकडून अतिरिक्त दर आकारणी होते आहे, मध्यमवर्गीयांवर करांचे ओझे सतत वाढत आहे, आरोग्य विम्यावरील जीएसटी, पॅटर्निटी लिव्ह (पितृत्व रजा), बँक खात्यात किमान रक्कम ठेवण्याचे निर्बंध, टेलिकॉम कंपन्या बारा महिन्यांत तेरा वेळा रिचार्ज करायला लावतात हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आपण संसदेत मांडले, तर आम आदमी पक्षाचे काय नुकसान झाले? चढ्ढा यांना हटवून पक्षाचे दुसरे खासदार अशोक मित्तल यांची नेमणूक उपनेतेपदावर करण्यात आली आहे. ‘आप’ने दिल्लीतील सत्ता गमावली, संसदेत आप विरोधी पक्षात आहे. आपचे चार बडे नेते दोन-दोन वर्षे जेलची हवा खाऊन बाहेर आले आहेत. दिल्ली विधानसभेत दिल्लीकरांनी भाजपला जनादेश दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा संपलेला नाही. असे असताना आम आदमी पक्षात सारे काही अलबेल नाही, हेच राघव चढ्ढा यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या दहा खासदारांपैकी एक खासदार म्हणून यापुढे चढ्ढा यांना राज्यसभेत बसावे लागणार आहे.

चढ्ढा यांच्यावर कारवाई होण्यामागे पक्षांतर्गत नाराजी हेच प्रमुख कारण आहे. दिल्ली सरकारचे मद्य धोरण व मद्य घोटाळा यामुळे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंह आदी नेत्यांना जेलमध्ये जावे लागले. त्यांची व ‘आप’ची चार वर्षे मोठी बदनामी झाली. पक्षाला दिल्लीतील सत्ता गमवावी लागली. या सर्वांची निर्दोष मुक्तता झाल्यावर पक्षाने मोठा जल्लोष केला; पण राघव चढ्ढा यांनी साधी प्रतिक्रिया दिली नाही किंवा आनंदोत्सवात सहभागी झाले नाहीत. स्वाती मलिवाल या पक्षावर आरोपांच्या फैरी झाडत असतानाही चढ्ढा हे नामानिराळे राहिले होते. पक्षाच्या अजेंड्यापेक्षा चढ्ढा हे वैयक्तिक पीआर (जनसंपर्क) आणि ब्रॉडकास्टिंगवर जास्त लक्ष देतात व स्वत:च्या प्रसिद्धीत अधिक मग्न असतात.

आपल्यावरील आरोप चुकीचे असल्याचे चढ्ढा सांगत आहेत. ते म्हणतात, मी संसदेत गोंधळ घालण्यासाठी, आरडाओरड करण्यासाठी, शिवीगाळ करण्यासाठी वा माईक तोडण्यासाठी आलेलो नाही. मी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार झालो आहे. आयकरापासून ते जीएसटीपर्यंत, पंजाबच्या पाण्यापासून ते दिल्लीतील प्रदूषित हवेपर्यंत मी प्रश्न मांडले आहेत. सरकारी शाळांच्या दुरावस्थेपासून ते रेल्वेतील प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडली आहे. संसदेतील माझ्या कामाचे मूल्यमापन करावे, माझ्या संसदीय कामामुळे पक्षाचे कोणते नुकसान झाले आहे? राधव चढ्ढा यांनी थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना, राष्ट्रीय प्रवक्ते अनुराग ढांडा, माजी मंत्री सौरभ भारद्वाज, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी चढ्ढांवर प्रश्नांचा भडिमार केला.

केजरीवाल यांना पुन्हा अटक झाल्यावर आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत निषेध केला, तेव्हा पोलिसांना लाठीमार केला; पण त्यावेळी चढ्ढा डोळ्याचे ऑपरेशन करायचे म्हणून लंडनला निघून गेले होते. संसदेत ते सरकारला किंवा पंतप्रधानांना थेट प्रश्न विचारत नाहीत. राष्ट्रीय मुद्द्यांऐवजी ते सामोसे किती महाग आहेत, असे प्रश्न उपस्थित करतात. तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगावर दिलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी स्वाक्षरीच केली नाही, संसदेत विरोधी पक्ष सभात्याग करतात, तेव्हा ते सभागृहात बसून राहतात, ते पंजाबमधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत; पण पंजाबचा ग्रामीण विकासाचा साडेआठ हजार पाचशे कोटींचा निधी केंद्राने रोखला तेव्हा त्यांनी सरकारला जाब विचारला नाही. जीएसटीमुळे पंजाबचे 60 हजार कोटींचे नुकसान झाले, त्याविषयी संसदेत ब्र काढला नाही. पंजाबमधे पूर आला तेव्हाही ते दिसले नाहीत. अतिशी म्हणतात, चढ्ढा संसदेत पंतप्रधान व भाजपाला घाबरतात. त्यांना प्रश्नच विचारत नाहीत. केजरीवाल यांना अटक झाली तेव्हा ते लंडनला पळून गेले.

राघव चढ्ढा हे चार्टर्ड अकौन्टंट आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनमिक्समधे त्यांचे उच्च शिक्षण झाले आहे. 2011- 12 मध्ये अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात ते सामील झाले होते. 2015 मधे दिल्लीत आपचे सरकार असताना त्यांनी अर्थमंत्र्यांचे सल्लागार म्हणून काम केले. 2020 मध्ये दिल्लीतून ते आमदार झाले. 2022 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीत ते सहप्रभारी होते. राघव चढ्ढा हे 2022 मध्ये पंजाबमधून राज्यसभेवर आले. त्यांच्या खासदारकीची मुदत 2028 पर्यंत आहे. अभिनेत्री परिणिती चोपडा या त्यांच्या पत्नी आहेत. चढ्ढा यांनी ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘घायल हूं, इसलिए घातक हूँ’ असा इशारा आम आदमी पक्षाला दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news