भारतविरोधाची वाढती खुमखुमी

Terror Threat
भारतविरोधाची वाढती खुमखुमी
Published on
Updated on

डॉ. योगेश प्र. जाधव

कोणत्याही देशाची राजधानी हा त्या देशाचा मानबिंदू असतो. भारतामध्ये राजधानी दिल्लीमध्ये संसद, राष्ट्रपती भवन, लाल किल्ला यासह अनेक अतिमहत्त्वाची आणि संवेदनशील ठिकाणे आहेत. साहजिकच, अशा क्षेत्रामध्ये सुरक्षा यंत्रणा तुलनेने अत्यंत काटेकोेर आणि अत्याधुनिक असते. असे असूनही सुरक्षा दलांचे कडेकोट कुंपण भेदून राजधानीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न यशस्वी होत असेल, तर ती बाब निश्चितच अतिगंभीर ठरते. यावरून देशाविरोधात कटकारस्थाने रचणार्‍यांची मजल कुठवर गेली आहे आणि त्यांची पडद्यामागून कारस्थाने कशाप्रकारे सुव्यवस्थित सुरू आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

भारतात आजवर झालेल्या दहशतवादी कारवायांचा इतिहास पाहिला असता, त्यामध्ये पाकिस्तानचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हात असल्याचे दिसून येते आणि दिल्लीतील स्फोटही त्याला अपवाद नाही. यामध्ये एक चिंताजनक बाब म्हणजे, पूर्वी पाकिस्तान हा एकट्याने भारताविरुद्ध ‘ब्लीड इंडिया विथ थाऊजंड कटस्’ या रणनीतीनुसार प्रॉक्सी वॉर किंवा छद्मयुद्ध खेळत होता. नंतरच्या काळात चीनचा वरदहस्त पाकिस्तानला लाभला आणि तो आजतागायत कायम आहे. यामध्ये आता भारताचा शेजारी देश बांगला देशाचीही भर पडली आहे.

शेख हसीनांचा पाडाव केल्यानंतर बांगला देशामध्ये अमेरिकेचे हस्तक म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद युनूस यांचे हंगामी सरकार सत्तेत आले आहे. युनूस यांनी सत्ताग्रहण केल्यापासून भारतविरोधी कारवायांना सुरुवात केली आहे. मागील काळात चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या चरणाशी जाऊन भारताच्या ईशान्येकडील राज्यांविषयी त्यांनी केलेली वक्तव्ये याची साक्ष देणारी ठरली. दुसरीकडे, भारताच्या मदतीने ज्या पाकिस्तानमधून फुटून बांगला देशची निर्मिती झाली, त्याच पाकिस्तानच्या हातात हात घालून बांगला देशातील लष्कर भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीतील स्फोटाच्या आधी सोशल मीडियावर ‘लष्कर-ए-तोयबा’चा म्होरक्या मौलाना हाफिज सईद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये तो भारतावर नवीन हल्ल्याची तयारी करत आहे, असा दावा करत होता. विशेष म्हणजे, या हल्ल्यासाठी लाँचपॅड म्हणून तो बांगला देशचा वापर करण्याची योजना आखत असल्याचे समोर आले. ‘लष्कर’चा वरिष्ठ कमांडर सैफुल्लाह सैफ यानेच हाफिज सईद बांगला देशमार्गे भारतावर हल्ला करण्याची तयारी करत आहे, असा दावा केला आहे. तो म्हणतो, आमचे दहशतवादी आधीपासून बांगला देशमध्ये सक्रिय आहेत आणि आता ते ‘ऑपरेशन सिंदूर’च्या बदल्यासाठी तयार आहेत. यादरम्यान, हाफिज सईदने आपल्या जवळच्या सोबत्याला बांगला देशात पाठवल्याचे आणि तिथल्या युवावर्गाला दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहितीही समोर आली आहे.

पाकिस्तान आणि बांगला देश यांच्यातील वाढत चाललेली जवळीक ही केवळ माध्यम चर्चा किंवा अंदाज राहिलेले नाहीत. पाकिस्तान नौदलाची एक युद्धनौका अलीकडेच बांगला देशमधील चट्टोग्राम (चितगाव) बंदरावर चार दिवसांच्या तथाकथित ‘गुडविल व्हिजिट’साठी दाखल झाली. 1971 नंतर प्रथमच पाकिस्तानच्या नौदल जहाजाची बांगला देशात अधिकृत उपस्थिती दिसून आली. पाकिस्तान आणि बांगला देश यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या या नाट्यमय बदलामुळे भारताच्या चिंता वाढल्या आहेत. कारण, बंगालच्या उपसागरात पाकिस्तानची उपस्थिती निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग असून, त्याचा थेट भारताच्या सागरी सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. बांगला देश नौदलाने आपल्या निवेदनात या सद्भावना भेटीमुळे दोन्ही देशांच्या नौदलांमधील मित्रत्वाचे संबंध आणखी द़ृढ होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

वास्तविक, शेख मुजीब यांच्या हत्येनंतरच्या पाकिस्तानप्रेमी सरकारांच्या काळातसुद्धा किंवा ‘बीएनपी’च्या सत्ताकाळातही पाकिस्तानची युद्धनौका बांगला देशात आलेली नव्हती. हे जहाज चीनमध्ये बनलेले आहे आणि चिनी तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यामुळे चीनला बांगला देशमध्ये लष्करी प्रवेश मिळू शकतो. या घडामोडीपूर्वी पाकिस्तान आणि बांगला देशच्या लष्करप्रमुखांमध्ये ढाकामध्ये एक बैठक पार पडली होती. ही बैठक दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य द़ृढ करण्याच्या दिशेने एक मोठी पायरी मानली जाते. पाकिस्तानच्या ‘जॉईंट चिफ ऑफ स्टाफ कमिटी’चे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी अधिकृत भेटीदरम्यान बांगला देशचे लष्करप्रमुख जनरल वाकर-उज-जमान यांची ढाका येथील लष्कर मुख्यालयात भेट घेतली होती. बांगला देश आणि पाकिस्तान यांच्यात 1971 नंतर सतत तणावाचे संबंध राहिले होते. मात्र, अलीकडच्या काळात दोन्ही देशांच्या संरक्षण नेत्यांमधील वाढत्या संपर्कामुळे भारतासाठी पूर्वेकडील किनारपट्टीवरील सुरक्षा धोरण अधिक मजबूत करण्याची गरज वाढली आहे.

बांगला देश केवळ लष्करी पातळीवरच नव्हे, तर आर्थिक व व्यापारी पातळीवरही भारताला शह देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मध्यंतरी, युनूस यांनी भारतातून खरेदी केल्या जाणार्‍या सोयाबीनला पर्याय म्हणून अमेरिकेसोबत एक करार केला आहे. त्यानुसार आता बांगला देशची सोयाबीनची गरज अमेरिकेकडून पुरवण्यात येणार आहे. जानेवारी 2025 मध्ये झालेल्या एका करारानंतर पाकिस्तानने बांगला देशला 50,000 मेट्रिक टन तांदळाची निर्यात केली.

वास्तविक, आजचा बांगला देश हा कधीकाळी पाकिस्तानचा ‘पूर्व पाकिस्तान’ म्हणून ओळखला जात होता. पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारांमुळे आणि पश्चिम पाकिस्तानकडून होणार्‍या भेदभावामुळे तेथील लोकांनी बंड पुकारले. भारताच्या लष्करी साहाय्याने 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानचा पराभव करून बांगला देशाची निर्मिती झाली. गेल्या सात दशकांत भारताने अनेकदा स्वतःचा तोटा सहन करूनसुद्धा या शेजार्‍याला मदतीचा हात दिला आहे. 2006 मध्ये भारताने एकतर्फी निर्णय घेत सिगारेट आणि मद्य वगळता बांगला देशातून येणार्‍या सर्व वस्तूंवरील आयात शुल्क शून्यावर आणले. यामुळे बांगला देश चीनकडून फॅब्रिक घेऊन भारताला कपडे निर्यात करू लागला. याचा आपल्या देशांतर्गत वस्त्रोद्योगावर परिणाम होत असूनही भारताने ही सवलत कायम ठेवली; पण याच बांगला देशाच्या युनूस सरकारने भारतातून येणार्‍या सुताच्या आयातीवर बंदी घातली आहे. कोरोना काळात भारताने

33 लाख ‘कोव्हिशिल्ड’ लसी बांगला देशला विनामूल्य दिल्या होत्या. गतवर्षी भारताने बांगला देशला 66 हजार कोटी रुपयांची लाईन ऑफ क्रेडिट उपलब्ध करून दिली. शेख हसीना पंतप्रधान असेपर्यंत भारत आणि बांगला देशातील संबंध अत्यंत घनिष्ट बनले होते. परंतु, ऑगस्ट महिन्यात हसीना यांचे सरकार उलथवून टाकण्यात आले आणि त्यानंतर आलेल्या युनूस यांनी लगेचच सप्टेंबर आणि डिसेंबर 2024 मध्ये पाकिस्तान दौरा केला आणि दोन्ही देशांतील मतभेद मिटवून संबंध द़ृढ करण्याचे आवाहन केले. तसेच, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सिक्युरिटी क्लिअरन्स रद्द करण्यात आला. याखेरीज युनूस सरकारने पाकिस्तानकडून 40,000 राऊंड दारूगोळा आणि 40 टन वजनाचे 2,900 आरडीएक्स मागवले आहे. सर्वात कहर म्हणजे, युनूस यांनी पाकिस्तानच्या ‘जॉईंट चिफ ऑफ स्टाफ कमिटी’चे प्रमुख शाहिद शमशाद मिर्झा यांना ‘ग्रेटर बांगला देश’ दाखवणारा वादग्रस्त नकाशा असलेला ग्रंथ भेट दिला. या नकाशात भारताचे ईशान्येकडील प्रदेश बांगला देशाचा भाग दाखवले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतीचे चक्र चालू ठेवण्यासाठी ‘आयएसआय’ने बांगला देशात शिक्षण घेणार्‍या काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. काश्मीरमधील तरुणांना ‘इस्लामच्या रक्षणा’च्या नावाखाली दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे उघड झाले आहे. सध्या बांगला देशात सुमारे 5,000 काश्मिरी विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्याशी ‘आयएसआय’चे एजंट आणि बांगला देशातील सक्रिय जिहादी संघटनांचे मोटिव्हेटर नियमित संपर्क साधत आहेत. काही विद्यार्थ्यांनी या हालचालींबद्दल आपल्या पालकांना कळवले असून, त्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांना सतर्क केले आहे. विशेष बाब म्हणजे, ज्यांच्याशी

संपर्क साधण्यात आला त्यातील बहुतेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेणारे आहेत. बांगला देशात पुन्हा एकदा ‘हरकत-उल-जिहाद-इस्लामी’ आणि काही अन्य जिहादी संघटना काश्मीर जिहादच्या नावाखाली सक्रिय झाल्या आहेत. पाकिस्तानची ‘आयएसआय’ही या संघटनांच्या नेटवर्कचा वापर करून आपला काश्मीर अजेंडा पुढे नेत आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये कार्यरत असणारे काही दहशतवादी बांगला देशात गेले होते. त्यांचा उद्देश नव्या भरतीचे आयोजन करणे आणि संपर्क वाढवणे हा होता. ‘आयएसआय’ व जिहादी संघटनांचे एजंट केवळ विद्यार्थ्यांशीच नव्हे, तर बांगला देशात कार्यरत काही काश्मिरी व्यापार्‍यांशीही संपर्क साधत आहेत. ते त्यांना धर्माच्या नावाखाली प्रलोभन देतात, तसेच पैसे, परदेशी स्थायिकतेचे आश्वासन आणि दहशतवादी नेटवर्क उभारण्याच्या गुप्त मिशनमध्ये सामील होण्याचे आवाहन करतात.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला नव्याने जबरी तडाखा दिला. तसेच, यापुढील प्रत्येक दहशतवादी कारवाई युद्धसमान कृती (अ‍ॅक्ट ऑफ वॉर) मानले जाईल, असा सज्जड दमही भरला. या भीतीने पाकिस्तान आता बांगला देशचा वापर करून भारताला छेडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

बांगला देशच्या भारतविरोधी कारवाया, पाकिस्तानशी त्यांची घनिष्ट बनलेली मैत्री आणि भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी सुरू झालेल्या सक्रिय हालचाली लक्षात घेता येणार्‍या काळात आपल्याला अत्यंत सजग राहण्याची गरज आहे. मागील काळात आपण ‘टू फ्रंट वॉर’ या संकल्पनेबाबत बोलत होतो. परंतु, आजचे द़ृश्य पाहिल्यास पाकिस्तान, चीन, बांगला देश, नेपाळ ही चारही राष्ट्रे भारतविरोधी बनली असल्याचे दिसत आहे. यामध्ये पाकिस्तान हा केंद्रस्थानी असून, ‘ऑपरेशन सिंदूर’चा बदला घेण्यासाठी पाकिस्तानी लष्कर, ‘आयएसआय’ उतावळे झाले आहे. हे लक्षात घेता, केंद्र सरकार, सुरक्षा यंत्रणा आणि सामान्य नागरिक या सर्वांनी सजग आणि सज्ज राहण्याची गरज आहे. बांगला देश असो किंवा पाकिस्तान त्यांची खुमखुमी उतरवण्यासाठी भारताचे राजकीय नेतृत्व आणि सामर्थ्यशाली लष्कर सक्षम आहे. परंतु, दहशतवादी हल्ला हे राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान असल्याने संपूर्ण देशाने एकजुटीने या लढाईमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news