

मंगेश कश्यप
मानवी संस्कृतीचा इतिहास लिहायचा झाला, तर त्यातील अनेक महत्त्वाची प्रकरणे नद्यांच्या काठावरच सापडतील. सिंधू, नाईल, युफ्रेटिस, टायग्रिस आणि गंगा या नद्यांच्या खोऱ्यांनी मानवी सभ्यतांना जन्म दिला, त्यांचे पोषण केले आणि त्यांच्या विकासाला दिशा दिली. म्हणूनच सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नदीचे पर्यावरणीय आरोग्य, मानवी संस्कृती आणि आपल्या विकासाच्या संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.
वेगवेगळ्या नद्यांच्या काठावर वसलेली गावे पुढे शहरे बनली, व्यापाराचे मार्ग निर्माण झाले, शेती समृद्ध झाली आणि सामाजिक-सांस्कृतिक जीवनाची वीण घट्ट होत गेली. म्हणूनच नदी ही केवळ भौगोलिक रचना नसून मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीचा एक मूलभूत आधार आहे. भारतीय संस्कृतीत तर नदीला विशेष स्थान आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि कावेरी या नद्या केवळ जलस्रोत नाहीत, त्या श्रद्धा, परंपरा, लोकसाहित्य, उत्सव आणि सामूहिक स्मृतींचा अविभाज्य भाग आहेत. नदीकाठची तीर्थक्षेत्रे, घाट, यात्रांचे सोहळे, लोकगीते, कृषी परंपरा आणि स्थानिक व्यवसाय यांमधून नदीशी असलेले मानवी नाते पिढ्यान्पिढ्या व्यक्त होत आले आहे. महाराष्ट्रात गोदावरीच्या काठचे नाशिक, कृष्णेच्या काठची सांगली आणि कराड, तर पंचगंगेच्या काठचे कोल्हापूर ही त्याची परिचित उदाहरणे आहेत.
मात्र, आज या नद्यांकडे पाहताना एक अस्वस्थ करणारे वास्तव समोर येते. ज्या नद्यांनी संस्कृती घडवली, त्याच नद्यांचे अस्तित्व आपण आपल्या विकासाच्या प्रक्रियेत धोक्यात आणत आहोत. शहरांचे सांडपाणी, औद्योगिक प्रदूषके, नदीपात्रांवरील अतिक्रमणे, वाळूचे अनियंत्रित उत्खनन आणि नदीच्या नैसर्गिक प्रवाहातील हस्तक्षेप यांमुळे नद्यांचे पर्यावरणीय आरोग्य ढासळत आहे. नदीच्या पाण्याची गुणवत्ता खराब झाली की, त्याचा परिणाम केवळ जलचरांवर होत नाही, तर नदीवर अवलंबून असलेल्या शेतकरी, मच्छीमार, स्थानिक कारागीर आणि नदीकाठच्या समुदायांच्या उपजीविकेवरही होतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) २०२५ च्या अहवालानुसार, देशातील २७१ नद्यांवर २९६ प्रदूषित नदी प्रवाह क्षेत्रे (Polluted River Stretches) आढळली आहेत. महाराष्ट्रात अशा ५४ प्रदूषित क्षेत्रांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालांमध्ये मुळा-मुठा, गोदावरी, पंचगंगा, इंद्रायणी आणि पवना यांसारख्या नद्यांच्या प्रदूषित प्रवाह क्षेत्रांचाही उल्लेख आहे. पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात मुळा-मुठा नदीचे उदाहरण या प्रश्नाचे गांभीर्य स्पष्ट करते. नदीकाठचा शहरी विकास आणि नदीचे आरोग्य यांचा समतोल राखण्यात आपण किती मागे आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
नदीचे प्रदूषण म्हणजे तिच्या सांस्कृतिक अस्तित्वावरही होणारा आघात आहे. नदीतील पाणी स्नान, शेती किंवा धार्मिक विधींसाठी अयोग्य झाले, तर त्या नदीशी जोडलेल्या परंपरांचे स्वरूपही बदलते. नदीकाठचे पारंपरिक व्यवसाय नष्ट होतात, जैवविविधता कमी होते आणि स्थानिक समुदायांचा नदीशी असलेला भावनिक व सामाजिक संबंध हळूहळू कमकुवत होतो. नदीचे पात्र शिल्लक राहते; पण तिच्याभोवती विकसित झालेली जीवनपद्धती हरवू लागते. म्हणून नदीचे संवर्धन म्हणजे केवळ पाणी स्वच्छ ठेवणे नव्हे, तर त्या नदीवर आधारलेल्या संपूर्ण जीवनव्यवस्थेचे संरक्षण करणे होय. संयुक्त राष्ट्राच्या UNESCO च्या २०२४ च्या World Water Development Report मध्ये पाणी, समृद्धी आणि शांतता यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करण्यात आला आहे. पाण्याचे शाश्वत आणि न्याय्य व्यवस्थापन हे केवळ आर्थिक विकासासाठीच नव्हे, तर सामाजिक स्थैर्य आणि समुदायांच्या समृद्धीसाठीही आवश्यक आहे. हीच भूमिका नदी व्यवस्थापनातही लागू होते. नदीकडे केवळ पाणी वाहून नेणारा प्रवाह म्हणून न पाहता, तिच्या संपूर्ण खोऱ्याचा विचार करणारी River Basin Management ही संकल्पना स्वीकारणे गरजेचे आहे.
यासाठी नदीच्या उगमापासून संगमापर्यंतच्या संपूर्ण प्रवाह क्षेत्राचे एकात्मिक व्यवस्थापन आवश्यक आहे. सांडपाण्यावर शास्त्रीय प्रक्रिया, औद्योगिक प्रदूषणावर कठोर नियंत्रण, नदीपात्रातील अतिक्रमणांना प्रतिबंध, पूर मैदानांचे संरक्षण, नदीकाठच्या वृक्षसंपदेचे संवर्धन आणि नैसर्गिक प्रवाह टिकवून ठेवणे या उपाययोजना एकत्रितपणे राबवाव्या लागतील. याबरोबरच नदीकाठच्या गावांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि नागरिकांना नदी व्यवस्थापनात सक्रिय भागीदार बनवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नमामि गंगे अभियानाने नदी पुनरुज्जीवनाकडे केवळ प्रदूषण नियंत्रण म्हणून न पाहता जैवविविधता, वृक्षारोपण, जनसहभाग आणि नदीकाठच्या समुदायांचा सहभाग अशा व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशा एकात्मिक दृष्टिकोनाची गरज महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, भीमा, मुळा-मुठा आणि पंचगंगा यांसारख्या नद्यांसाठीही आहे.
शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नदी ही आपल्या पूर्वजांकडून मिळालेली केवळ नैसर्गिक संपत्ती नाही, तर पुढील पिढ्यांसाठी जतन करावयाचा सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारसा आहे. नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली, तिचा नैसर्गिक प्रवाह जिवंत राहिला आणि तिच्या काठावरील परिसंस्था सुरक्षित राहिल्या, तरच नदीशी जोडलेले मानवी जीवन समृद्ध होईल. कारण, नदीचे पाणी आटते तेव्हा तहान निर्माण होते. नदीचे पर्यावरण नष्ट होते तेव्हा जीवनव्यवस्था कोलमडते; पण नदीशी जोडलेली संस्कृती हरवते तेव्हा एका समाजाच्या अस्मितेचाच महत्त्वाचा भाग हरवतो. नदी वाचवणे म्हणजे केवळ निसर्ग वाचवणे नाही, तर आपल्या संस्कृतीचे भविष्य सुरक्षित करणे आहे.