

संभाजी शि. लव्हटे
नुकताच प्रजासत्ताक दिन झाला. शहरात, गावात, शाळांमध्ये नेहमीचीच लगबग सुरू होती. चौकाचौकांत तिरंगे लागले होते. व्यासपीठांवर माईक तपासले जात होते. शाळांमध्ये मुले भाषणांचा सराव करत होती. याच उत्साहाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी घडलेली एक साधीशी घटना मनात रेंगाळत राहिली आहे. ती कुठलीही मोठी, नाट्यमय किंवा बातमी होण्यासारखी घटना नाही; पण ती अस्वस्थ करणारी आहे. कारण, ती आपल्याच शिक्षण पद्धतीकडे आणि लोकशाहीविषयीच्या आपल्या समजाकडे शांतपणे बोट दाखवते.
26 जानेवारीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना इयत्ता सातवीतला एक विद्यार्थी माझ्याकडे आला. हातात वही होती. चेहर्यावर संकोच आणि आवाजात घाई. सर, प्रजासत्ताक दिनाचं भाषण लिहून द्या, असे तो म्हणाला. हे वाक्य नवीन नव्हते. दर 15 ऑगस्ट आणि दर 26 जानेवारीला कुणीतरी असेच म्हणत असते. शाळांमध्ये ही एक रूढ, जवळजवळ अपेक्षित मागणी झाली आहे. त्या क्षणी मी त्याला थांबवले आणि विचारले, तुला काय वाटते प्रजासत्ताक दिनाबद्दल? तो काही क्षण शांत राहिला. मग, हळूच म्हणाला, मला चांगले भाषण लिहिता येत नाही. हे उत्तर माझ्या प्रश्नाचे नव्हते, ती एक कबुली होती. मी पुन्हा विचारले, मग माझे विचार तू कसे मांडणार, या प्रश्नावर तो अधिकच गोंधळला. त्याच्या चेहर्यावर एक साधा पण खोल प्रश्न स्पष्ट दिसत होता, विचार म्हणजे काय आणि ते माझे कसे असतात?
आपण मुलांना भाषण लिहून देतो, तेव्हा त्यामागचा हेतू चुकीचा नसतो. कार्यक्रम नीट पार पडावा, मुलाने आत्मविश्वासाने बोलावे, चूक होऊ नये ही सगळी कारणे रास्तच आहेत. शिक्षकही वेळेच्या, अपेक्षांच्या आणि व्यवस्थेच्या दबावाखाली काम करत असतात. त्यामुळे भाषण लिहून देणे ही चूक नसून काळाच्या ओघात निर्माण झालेली एक सोय आहे. पण, या सोयीस्कर पद्धतीचा एक परिणाम आपण फारसा लक्षात घेत नाही. भाषण म्हणजे आता स्वतःचा विचार मांडणे राहिलेले नाही. ते पाठांतराचे सादरीकरण झाले आहे. मुले शब्द लक्षात ठेवतात, कुठे थांबायचे आणि कुठे आवाज चढवायचा हे शिकतात; पण मला काय वाटते, हा प्रश्न कुणी त्यांना विचारत नाही आणि हळूहळू ते स्वतःलाही तो विचारणे थांबवतात.
यामुळे काहीतरी थेट बिघडते आहे असे म्हणता येणार नाही; पण काहीतरी घडतही नाही. आत्मविश्वास दिसतो, पण तो उधार असतो. आवाज असतो; पण तो स्वतःचा नसतो. व्यासपीठावर उभे राहण्याचे धाडस असते; पण विचार मांडण्याचे धाडस नसते. चूक होण्याची, हसले जाण्याची आणि ‘चुकले’ ठरण्याची भीती हळूहळू खोलवर रुजत जाते. प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो; पण तो समजून साजरा करतो का, हा प्रश्न इथे उभा राहतो. प्रजासत्ताक म्हणजे केवळ राजेशाही नसलेली व्यवस्था नाही. तो एक विचार आहे, सतत तपासायचा, प्रश्न विचारायचा आणि नव्याने समजून घ्यायचा. विचार करण्याचा अधिकार, मत मांडण्याची मोकळीक आणि असहमती व्यक्त करण्याची क्षमता हे त्याचे कणा आहेत.
आपल्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की, माझे मत महत्त्वाचे नाही, कोणी लिहून दिले तरच मी बोलू शकतो, तर आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असलो, तरी त्या प्रजासत्ताकाची सवय आपण त्यांना लावत नाही आहोत, असे म्हणावे लागेल. कारण, लोकशाही केवळ घोषणांनी टिकत नाही. ती रोजच्या सवयींतून घडत असते. आपली शिक्षण पद्धती उत्तरांवर उभी आहे. हे उत्तर बरोबर, हे लिहिले तर गुण, हेच उदाहरण योग्य या चौकटीत मुले लवकर बसतात; पण प्रश्न विचारणे, स्वतःचे मत मांडणे किंवा वेगळा विचार मांडणे यासाठी जागा किती आहे, हा प्रश्न क्वचितच विचारला जातो. परिणामी, विचार करणे ही एक अनावश्यक जोखीम वाटू लागते.
तो सातवीचा विद्यार्थी कदाचित अभ्यासात हुशार असेल; पण त्याला एक मूलभूत गोष्ट शिकवली गेली नव्हती, आपले मत अपूर्ण असले, गोंधळलेले असले, तरी ते मांडण्याचा अधिकार आपल्याला आहे. ही जाणीव शाळेत रुजली नाही, तर पुढे समाजात ती आपोआप निर्माण होईल, अशी अपेक्षा ठेवणे भोळेपणाचे ठरेल. लोकशाही भाषणांवर उभी नसते. ती संवादावर उभी असते. संवादासाठी विचार लागतो आणि तो मांडण्याचे धैर्य लागते. आपण मुलांकडून व्यासपीठावर उभे राहण्याचे धैर्य अपेक्षित धरतो; पण विचार करण्याचे धैर्य आपण त्यांना देतो का, हा प्रश्न इथे महत्त्वाचा ठरतो.
अनेक व्यासपीठांवरून देश, संविधान, कर्तव्य आणि अधिकार यांवर भाषणे ऐकू येतील. सगळे योग्य, सगळे आवश्यक; पण आज एक अस्वस्थ प्रश्न स्वतःला विचारायला हवा, जर आपल्या मुलांना स्वतःचे विचार मांडता येत नसतील, तर आपले जगणारे प्रजासत्ताक किती सक्षम आहे?
प्रजासत्ताक दिन हा एक दिवस आहे; पण प्रजासत्ताक ही रोज जगायची गोष्ट आहे. ती गोष्ट आपण शाळेत, वर्गात, अशा छोट्या संवादांतूनच शिकवत असतो. कधी नकळत, कधी दुर्लक्षातून. ती प्रक्रिया आपण मुलांपासूनच थांबवत नाही ना, या प्रश्नाचे उत्तर आपल्यालाच शोधायचे आहे.