‘डिसरप्टर’ इन्फ्लुएन्सर्स!
डॉ. आलोक जत्राटकर
लोकांना बदल हवा असतो. नवा, फ्रेश कन्टेन्ट हवा असतो, सादरीकरणात वैविध्य हवं असतं. मात्र, इन्फ्लुएन्सर तर त्याच्या चाकोरीत अडकलेला असतो. अशावेळी मग वेगळं काही करून आपले फॉलोअर्स वाढविण्याच्या नादात त्याच्याकडून ‘काहीतरीच’ होण्याची शक्यता असते. अशाच दबावाचा फटका रणवीरला बसलेला आहे.
इंटरनेट अथवा यूट्यूबवर सीरियस कन्टेन्टचे चाहते असणार्यांच्या सर्च किंवा व्ह्यू लिस्टमध्ये समय रैना (इंडियाज गॉट लेटेंट), अपूर्वा मुखिजा (रेबेल कीड), दिलिन नायर (रफ्तार), अभिजित गांगुली (जोकसिंग), आशिष चंचलानी किंवा जसप्रीत सिंग ही नावं असण्याची शक्यता फारच कमी. मात्र, कॉमेडीच्या, ब्लॅक ह्युमरच्या नावाखाली ज्यांना अश्लील कन्टेन्ट खूप ‘कूल’ वाटतो, असे लाखो लोक या नावांना फॉलो करतात आणि त्यांना कोट्यवधींची कमाई करून देण्यात ‘मोलाचा’ वाटा उचलतात. गेल्या रविवारपर्यंत प्रेरक यूट्यूबर, नेतृत्व प्रशिक्षक, आध्यात्मिक मार्गदर्शक वगैरे वगैरे म्हणून प्रसिद्ध असणार्या आणि ज्याला ‘नॅशनल क्रिएटर्स अॅवॉर्ड-2024’मध्ये ‘डिसरप्टर ऑफ दि इअर’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं, असा रणवीर अलाहाबादिया (बीअरबायसेप्स) हा तरुण आता या यादीत सामील झाला आहे. केवळ सामीलच झाला नाही, तर काहीतरी ‘सेन्सेशनल’ घडविण्याच्या नादात त्यांच्याही चार पावलं इतका पुढं गेला की, आपल्या विधानानं स्वतःसोबतच या सार्यांवरही मुंबई, दिल्ली आणि आसाम इत्यादी ठिकाणी थेट पोलिस तक्रारीच दाखल होण्यास कारणीभूत ठरला.
रणवीर या उपरोक्त मंडळींसह समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या लोकप्रिय (?) यूट्यूब शोमध्ये सहभागी झाला आणि त्यानं अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील स्वरूपाचा प्रश्न या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाला केला. खरं तर अपूर्वा मुखिजा हिनेसुद्धा आणखी एका स्पर्धकाला त्याच्या आईच्या अनुषंगाने अतिशय नीचस्तरीय कमरेखालची भाषा वापरलेली दिसते. म्हणजे या शोच्या स्पर्धकांत नव्हे, तर परीक्षकांत (?) खालचा स्तर गाठण्याची चढाओढ लागल्याचंच दिसून आलं. त्यातही इंटरनेटवर रणवीरच्या विरोधात गदारोळ अधिक उसळला, याचं कारण म्हणजे त्यानं या शोमध्ये आपणही अन्य परीक्षकांच्या तुलनेत खूपच ‘कूल’ आहोत, हे दाखविण्यासाठी त्याच्या आई-वडिलांच्या लैंगिक संबंधाविषयी जो काही प्रश्न विचारला, तो त्यानं काही उत्स्फूर्तपणे विचारलेला नव्हता.
अमेरिकी स्टँडअप कॉमेडियन चक्लोव्हिन्स्की यानं त्याच्या ‘वूड यू रादर...’ या शोमध्ये सहभागी कन्टेन्स्टंटला विचारलेला प्रश्न रणवीरनं जसाच्या तसा इथं विचारला. यावर वाद उद्भवल्यानंतर त्यानं भलेही ‘मला विनोद करता येत नाही; विनोद करण्याच्या नादात माझ्याकडून चूक झाली,’ अशा शब्दांत माफी मागितली असली, तरी ती त्यानं अत्यंत चलाखीनं, नियोजनबद्ध आणि जाणीवपूर्वक केलेली कृती होती, हे त्याच्या त्या क्षणीच्या एकूण बॉडी लँग्वेजवरून आणि तमाम उपस्थितांसमवेत खिदळण्यात सहभागी होण्यावरून सिद्ध होतं.
कधीमधी माझ्या पाहण्यात काही स्टँडअप कॉमेडियनचे व्हिडीओ येतात, त्यामध्ये हिंदुस्थानी भाऊ - विकास पाठक, मीरा सिंह यांच्यासारखे वादग्रस्त इन्फ्लुएन्सर असतात, तसेच प्राजक्ता कोळी (मोस्टलीसेन), गौरव तनेजा (फ्लाईंगबीस्ट), निहारिका, विराज घेलानी असे काही स्वच्छ आणि निखळ अभिव्यक्ती असणारेही इन्फ्लुएन्सर आहेत. कोल्हापूरचा सुमीत पाटील हासुद्धा त्याच्या निखळ क्रिएटिव्हिटीसाठी मला आवडतो. आणखी एक म्हणजे, अश्लील अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध (?) असणार्या इन्फ्लुएन्सरमधले बहुतांश जण इंजिनिअरिंगचे पूर्व-विद्यार्थी आहेत, हा योगायोग समजावा की कम्पल्शन, हा मला आणखी एक पडलेला प्रश्न आहे; पण तो काही आताचा विषय नाही. त्याविषयी समाजशास्त्रज्ञांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी अधिक विश्लेषण करता आल्यास पाहावे.
आपण रणवीरविषयी आणि त्या अनुषंगानं समाजमाध्यमांवरील अभिव्यक्तीविषयी बोलू या. रणवीर हा त्याच्या चांगल्या कन्टेन्टसाठी प्रसिद्ध होता आणि त्यामुळंच त्याच्या शोमध्ये दिग्गज राजकारण्यांसह सामाजिक, शैक्षणिक तसंच ग्लॅमर इंडस्ट्रीतलेही अनेक जण सहभागी झाले, ज्याच्या परिणामी राष्ट्रीय पुरस्कार मिळविण्यापर्यंत त्यानं झेप घेतली. अगदी पंतप्रधानांनाही ‘तुम्ही मला फॉलो का करीत नाही?’ असं विचारण्याचं धाडस तो करू शकला. पंतप्रधानांच्या कानी त्यानं केलेल्या प्रतापाची बातमी गेली असल्यास ‘बरं झालं, याला फॉलो केलं नाही ते,’ असाच विचार त्यांच्या मनी आला असेल. रणवीरलाही त्याच्या स्टेटमेंटचा फटका असा बसला की, दोन दिवसातच त्याचे एक लाख 42 हजार फॉलोअर्स घटले. इतर कुठल्याही बाबीपेक्षा एका इन्फ्लुएन्सर म्हणून प्रस्थापित झालेल्या व्यक्तीसाठी यापेक्षा अन्य मोठा फटका दुसरा काही नसेल.
एका प्रश्नानं माझ्या मनाला घेरलं, ते म्हणजे या इन्फ्लुएन्सर्सवर अशा पद्धतीचं वर्तन करण्याची वेळ का बरं यावी? त्याचं उत्तर मला एकच सापडलं, ते म्हणजे लोकप्रियता टिकवून ठेवण्याची धडपड. एखाद्या यूट्यूबरचं, सोशल मीडिया वापरकर्त्याचं इन्फ्लुएन्सरमध्ये रूपांतर होतं म्हणजे काय होतं, तर त्यानं निर्माण केलेला कन्टेन्ट वापरकर्त्यांना आवडू लागतो. त्यात सातत्य असेल, तर ते त्याला लाईक, फॉलो आणि त्यापुढे जाऊन सबस्क्राईब करतात. अशा सबस्क्राईबर्सची, फॉलोअर्सची संख्या लाखाच्या घरात गेली की, एखादा कन्टेन्ट, व्हिडीओ क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होते. त्याच्या कन्टेन्टला लाखो लोक पाहतात म्हणून समाजमाध्यमे त्याला पैसे देतात. जाहिरातदार त्याने किंवा तिने आपली जाहिरात करावी, आपल्या प्रॉडक्टची माहिती त्याच्या सबस्क्राईबर्सपर्यंत पोहोचवावी, म्हणून त्याच्या मागं लागतात आणि त्याची ओळख सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून निर्माण होते.
सोशल मीडियावर ज्याला लोकप्रिय व्हायचं आहे, त्यानं किमान तीन बाबींचं व्यवधान सांभाळणं फार गरजेचं असतं, त्या म्हणजे कन्टेन्ट (आशय), क्रिएटिव्हिटी (सर्जनशीलता) आणि कन्सिस्टन्सी (सातत्य). या तिन्हीमधली एक गोष्ट जरी कमी पडली, तरी प्रभावहीनतेच्या दिशेने त्याची वाटचाल होऊ लागते. क्रिएटरच्या लोकप्रियतेची सुरुवात हीच मुळात त्याच्याकडील कन्टेन्टमुळे होते. कन्टेन्ट दर्जेदार आणि उत्तम असेल तर तो पाहिला जातो, शेअर केला जातो. पुढे प्रभाव वाढतो, तो कन्टेन्ट किती सर्जनशीलतेने सादर केला जातो, त्याने! या दोन्ही बाबींत सातत्य राखण्यात जो यशस्वी होतो, त्याची वाटचाल पुढे इन्फ्युएन्सर होण्याकडं होते. एकदा या ‘सर्वश्रेष्ठ’ लोकप्रिय पदापर्यंत झेप घेतली की, मग आता त्या इन्फ्लुएन्सरसमोर आव्हान असतं, ते म्हणजे ही लोकप्रियता टिकवून ठेवण्याचं आणि वृद्धिंगत करण्याचं. मीडिया व्हर्चुअल असला, तरी निसर्गनियम इथंही लागू पडतो. अल्गॉरिदमपासून कितीही गोष्टी मॅनिप्युलेट केल्या तरीसुद्धा एका विशिष्ट ठिकाणी फॉलोअर्सचा आकडा स्थिर होतो; मग तिथून पुढे या इन्फ्लुएन्सरची तो टिकविण्याची आणि वाढविण्यासाठीची तगमग सुरू होते.
या ठिकाणी पोहोचता पोहोचता आपल्या फॉलोअर्सना अशाच प्रकारचा कन्टेन्ट आवडतो आणि आपण तो तसा नाही दिला, तर कदाचित ते आपल्यासोबत राहणार नाहीत, अशा विचारापर्यंत ते येऊन ठेपलेले असतात. नेमकी तिथेच त्यांच्या प्रयोगशीलतेला, कन्टेन्टच्या वैविध्यतेला खीळ बसते. अनेक लोकप्रिय टी.व्ही. शोमध्येदेखील तोच तो पणा आला की, दर्शकाला त्याचा कंटाळा येतो आणि तो नव्या कन्टेन्टकडे वळतो. त्यामुळे असे लोकप्रिय शोदेखील काही काळाची विश्रांती घेऊन नव्या स्वरूपात लोकांसमोर येतात आणि पुन्हा दर्शकांना जोडून घेतात. ही बाब सोशल मीडियाला तर अत्यंत प्रकर्षानं लागू होते. लोकांना बदल हवा असतो. नवा, फ्रेश कन्टेन्ट हवा असतो, सादरीकरणात वैविध्य हवं असतं. मात्र, इन्फ्लुएन्सर तर त्याच्या चाकोरीत अडकलेला असतो. अशावेळी मग वेगळं काही करून आपले फॉलोअर्स वाढविण्याच्या नादात त्याच्याकडून असं ‘काहीतरीच’ होण्याची शक्यता असते. अशाच दबावाचा फटका रणवीरला बसलेला आहे.
बर्याच तरुण इन्फ्लुएन्सरना असं वाटतं की, अश्लील, लैंगिक आणि सातत्यानं कमरेखालचे विनोद केल्यानं आपण खूपच ‘कूल’ ठरू. त्यांच्या शोमध्ये सहभागी होणारे आणि त्यांच्या तसल्या बहुतांशी व्हल्गर विनोदांवर खिदळणारे प्रेक्षक त्यांना तसं फिलिंग देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात; पण ते प्रेक्षक एखाद्या शोपुरते ‘मजा घेण्यासाठी’ आलेले असतात. ते येतात आणि निघून जातात. मात्र, जाताना इन्फ्लुएन्सरना त्यांच्या भ्रमात सोडून जातात आणि त्यांची पातळी घसरतच जाते. ती एकदा रसातळाला गेली की, पुन्हा वर उठण्याची शक्यता दुरान्वये नाही. याची जाणीव होईपर्यंत वेळ निघून जाते. अंतिमतः चांगला निखळ विनोदच माणसाला आवडतो, त्यात त्याला पुनर्प्रत्ययाचा आनंद लाभतो. हा आनंद अश्लील विनोदकर्त्यांच्या वाट्याला फार येत नाही. एक फेज असते, ती येते आणि निघून जाते. ती गेली की, वाट्याला निराशा येते.
अनेक इन्फ्लुएन्सर लोकप्रियतेचा एक विशिष्ट टप्पा गाठल्यानंतर अशा नैराश्यात जातात किंवा आता पुढं काय, असं एक भलं मोठं प्रश्नचिन्ह घेऊन कन्टेन्ट तयार करताना दिसतात. आपल्या पूर्वकन्टेन्टनं निर्माण केलेली प्रतिमा, ती प्रतिमा सांभाळण्याचं प्रचंड असं दडपण आणि अस्तित्व टिकविण्याची धडपड अशा तिहेरी चक्रव्यूहात ही मंडळी सापडतात. यावर उपाय एकच असतो, तो म्हणजे नव्यानं सुरुवात. ताजा आशय घेऊन पुन्हा नव्यानं दर्शकांना सामोरं जाणं; पण नेमक्या याच प्रयोगशीलतेपासून हे इन्फ्लुएन्सर दुरावतात, ते केवळ प्रभावहीन होण्याच्या भीतीपोटी. ही भीतीच त्यांना आणि दर्शकांना चांगल्या कन्टेन्टपासून दूर राखते आणि अभिरुचीहीन व्हल्गरतेच्या दिशाहीन मार्गावर घेऊन जाते. आपण ‘इन्फ्लुएन्सर’चे ‘डिसरप्टर’ (विध्वंसक) कधी झालो, हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. रणवीर अलाहाबादिया हे त्याचं आजचं केवळ एक उदाहरण. बाकी इतरही अनेक जण आहेतच रांगेत, त्यांचा नंबर लावण्याच्या अहमहमिकेत!
(लेखक शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आणि समाजमाध्यमांचे अभ्यासक आहेत.)

