

मूळ संस्कृत वाल्मीकी रामायण ही अतिशय देखणी साहित्यकृती आहे. वाल्मीकी रामायणातील श्रीराम हळुवार मनाचा आहे; सामर्थ्यशाली आहे; धीरगंभीर आहे. वेळप्रसंगी कोमल भावनांच्या आहारी जातानाही दिसतो. त्याचेही डोळे आसवांनी भरून आलेले दिसतात. म्हणूनच देवत्व पावलेला राम सामान्य माणसालाही जवळचा वाटतो. रामायणावर ग्रंथ लिहिले गेले, तसे लोकसंस्कृतीतदेखील रामायण स्त्रियांच्या ओठी खेळत राहिले आहे. आज (दि. 6 एप्रिल) रामनवमी. त्यानिमित्ताने...
वाल्मीकी रामायण हे महाकाव्य भारताचा राष्ट्रीय आणि सांस्कृतिक ठेवा आहे. जनमानसाशी रामायणाचं नातं विलक्षण जिव्हाळ्याचं आहे. या महाकाव्यावर आधारित असंख्य पुस्तके, दीर्घकाव्ये लिहिली गेली. चित्रपट आणि दूरदर्शन मालिका आल्या. राम-सीतेच्या सत्त्वशील वर्तणुकीचं परीक्षण केलं गेलं. रामाच्या देवत्वाची कारणं शोधण्याचा प्रयत्न झाला. सियारामाच्या व्यक्तिमत्त्वावर काहींनी काही प्रश्न उभे केले.
मूलतः संस्कृत भाषेत असणारी रामकथा वास्तवात होती किंवा कशी होती, यावर अभ्यासकांचे अनेक विचार व्यक्त झालेले आहेत. मूळ संस्कृत वाल्मीकी रामायण अतिशय देखणी साहित्यकृती आहे. नंतर भर घातल्या गेलेल्या प्रसंगांना बाजूला काढून श्रीरामांसह अनेक व्यक्तिरेखांचा जर आपण आढावा घेतला, तर त्यांच्या जीवनातील चढ-उतार, भावनांचे हेलकावे आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या मनाला अधिक भिडतात. वाल्मीकी रामायणातील श्रीराम हळुवार मनाचा आहे; सामर्थ्यशाली आहे; धीरगंभीर आहे आणि वेळप्रसंगी कोमल भावनांच्या आहारी जातानाही दिसतो. त्याचेही डोळे आसवांनी भरून आलेले दिसतात. म्हणूनच देवत्व पावलेला राम सामान्य माणसालाही जवळचा वाटतो. राजा दशरथापर्यंत चालत आलेली बहुपत्नीत्वाची प्रथा श्रीराम आणि अन्य भावंडांनी थांबवलेली दिसते. एकपत्नीव्रताचा आदर्श त्यांनी घालून दिला, हा सामाजिक बदल निश्चित महत्त्वाचा होता. युद्धाच्या संदर्भात विविध प्रदेशातील विविध जनसमूह एकत्रित आले, ही बाब एकात्मतेच्या धाग्यातील महत्त्वाचा भाग आहे. श्रीरामांनी सांगितलेली आदर्श राज्य चालविण्याची पद्धती मूळ संस्कृत ग्रंथातून अभ्यास करण्यायोग्य आहे.
भारतातील विविध राज्यांमध्ये रामकथा प्रादेशिक भाषांचं लेणं घेऊन व्यक्त झाली. रामकथांच्या या संस्करणांमध्ये काही बदल झाले. उपकथांची भर पडली. मूळ संस्कृत वाल्मीकी रामायणात नसलेल्या कथा समाजात प्रचलित झाल्या. त्यांचे अस्तित्व रामकथेशी बेमालूमपणे जुळून गेलं. उदाहरणार्थ- लक्ष्मणरेघेचा प्रसंग. रावण हा यतिवेशानं आलेला आहे, हे सीता ओळखते. अतिथी धर्म पाळायचा म्हणून ती त्याला फळं देते. त्याच्या प्रश्नांना उत्तरं देते. नंतर रावणासारख्या बलाढ्य व्यक्तीकडून सीतेचं अपहरण होतं आणि सीतेचा प्रतिकार अपुरा पडतो. असा कथाभाग वाल्मीकी रामायणात आहे; पण सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मण हा रामाच्या साहाय्याला जाण्याआधी रेघ मारतो; रावण ही रेघ ओलांडायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यातून अग्नी येतो, हा प्रसंग मात्र अन्य भाषेतील रामायणातून मिसळला. सेतू बांधावयाच्या वेळी एका खारुताईनं केलेल्या मदतीचा प्रसंग कम्ब रामायणातून आला. मूळ संस्कृत वाल्मीकी रामायणात शबरीचा उल्लेख आहे तो एक वयस्कर, संन्यासिनी, तपस्विनी म्हणून. शबरीच्या बोरांची कथा नंतर कधी तरी भरीस घातली गेली. एवढचं काय, तर अगदी गर्भवती सीतेच्या त्यागाचा प्रसंगही संस्कृत भाषेतच प्रक्षिप्त म्हणजे, नंतर भर घातलेल्या अध्यायांमध्ये येतो. कारण की, ज्या ठिकाणी युद्ध संपते आणि रावणाचा वध होतो हा प्रसंग ज्या अध्यायात येतो, तो अध्याय संपताना संस्कृत साहित्यातील रीतीला अनुसरून रामायण ग्रंथाची फलश्रुती आढळते. नंतरच्या उत्तरकांडात अचानक काही प्रसंग वर्णिले गेलेले दिसतात. मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ज्या श्रीरामांचं वर्णन केलं जातं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर सीतात्यागाच्या प्रसंगाला ग्राह्य धरून काही आक्षेप घेतले गेले. मूळ ग्रंथ न पाहिल्यामुळे आधारहीन गोष्टींना मात्र ठळक जागा मिळाली.
मूळ संस्कृत रामायणातील सीता सुशिक्षित आहे, करारी आहे, धाडसी आहे, श्रीराम वनवासात गेले तर ती राज्य सांभाळेल, असं म्हणणार्या स्त्रिया दरबारात दिसतात. श्रीरामांना वनवासातील कठीण काळातही साथ देणारी सीता आहे. आवश्यकता नसताना वनात शिकार करायची तरी कशाला, हे विचारणारीही सीताच आहे. रामायणावर ग्रंथ लिहिले गेले, तसं लोकसंस्कृतीतदेखील रामायण स्त्रियांच्या ओठी खेळत राहिलं, ‘मर्हाटी स्त्री - रचित रामकथा’ हे डॉ. उषा जोशी यांनी संपादित केलेलं पुस्तक लोकवाङ्मयाचा उत्कृष्ट नमुना आहे. प्रख्यात लेखक कै. डॉ. ना. गो. नांदापूरकर यांनी मोठ्या कष्टानं या ओव्यांचा संग्रह केला. या ओव्यांची भाषा साधी, सरळ आहे, क्वचित ओबडधोबड आहे; पण त्यांच्या ठायी आशयाची समृद्धी आहे, ओघ आहे, अनौपचारिकता आहे, काट्यांना स्वीकारण्याची जिद्द आहे, जीवन सांभाळून घेण्याची कणखरता आहे. आपण काही ओव्यांची ओळख करून घेऊ. कौशल्याच्या पोटी रामाचा जन्म होतो, त्याचं वर्णन या ओवीत पाहा.
“कौसल्या बाळातीन। तिच्या नहानीला तापता।
राम घेतला इकत। चंद्र सूर्य उगवता॥
जलमले रामराय। त्रिभुवनाचं पांघरूण।
माता झळके बाळत्यानं। कौसल्याबाई माजी॥”
रामाचं बालपण, शिक्षण अशा प्रवाहात ओव्या पुढे सरकतात. सीतास्वयंवराचं वर्णन फार चित्रमय आहे. सीता कशी? ती तर जगाची माय.
“सीतेला माघनी। संभरावरी बारा।
रामाचा डऊल न्यारा। गरुड घाली वारा॥”
रामरायांच्या आयुष्यावर संकटांची सावली पडू लागते. वनवासाचा निर्णय होतो अन् अयोध्यानगरी दुःखात बुडून जाते.
“अयोध्या नगरीचे। कळस लवंडले चारी।
वनवासा गेले हरी। सावळा रामसखा॥”
वनवासात असताना सीतेचं अपहरण होतं. राम सैरभैर होऊन जातात.
“सीता सीता म्हणुनी। रामाला लागं येडं।
यानं कवटाळिले झाड। करिती सर्वांचा
उद्धार॥”
हा सारा नशिबाचा खेळ असतो, हे सांगणारी ओवी म्हणते,
“संचिताच्या रेघा। ब्रह्मा लिहितो तातडी।
रेघ पडली वाकडी। सीतेच्या संचिताची॥”
अशाप्रकारे दोनशे प्रसंगांतून आणि जवळजवळ सहा हजार ओव्यांमधून रामकथा सांगितली जाते. जीवनातले परिचयाचे संकेत ओतून, कुठल्याही अभिनिवेशाशिवाय व्यक्त झालेली मर्हाटी रामकथा आपल्या मंथनावर रेंगाळत राहते, हे नक्की.
(लेखिका प्राच्य विद्या संशोधक आणि इला फाऊंडेशनच्या उपसंचालक आहेत. भारतीय मूलभूत ज्ञान या विषयावर गेली वीस वर्षे संशोधन करीत असून, त्यांची विविध विषयांवर 66 हून अधिक पुस्तके प्रसिद्ध आहेत.)
आदर्श राज्याला, राज्य कारभार चालविण्याला ‘रामराज्य’ अशी संकल्पना कशी रुजली याचे उत्तर आपल्याला मूळ रामायणात मिळते. संवेदनशील मनाच्या राजा श्रीरामांच्या अंतरंगात प्रजेबद्दल, तिच्या कल्याणाबद्दल यथार्थ चिंतन सातत्याने घडताना दिसते. वनवासात श्रीराम आणि भरत यांची भेट झाली, त्यावेळी श्रीरामांनी भरताला कुशल प्रश्नांच्या माध्यमातून केलेला राजनीतीविषयक उपदेश अयोध्या कांडातील शंभराव्या सर्गात वाचायला मिळतो. श्रीराम भरताला विचारतात, आपल्या राज्य शासनात देवता, गुरुजन, पितर, आदणीय, ज्ञानी, वृद्ध आणि आरोग्याचे जाणकार असलेल्या वैद्यांचा सन्मान राखला जातो ना? भरता, तू तुझ्या स्वतःसारख्या शूरवीर, ज्ञानवंत इंद्रिय संयमी, कुलीन आणि समोरच्या व्यक्तीच्या शरीरबोलीवरून त्याचे मन जाणणारे लोक, मंत्री म्हणून निवडले आहेस ना? तू स्वतः भलत्यावेळी उठणे, असं करीत नाहीस ना? उद्या अर्थसिद्धीसाठी काय काय केलं गेलं पाहिजे याचा विचार आदल्या रात्री करून ठेवतोस ना? गुप्त विषयांवर चर्चा करताना काळजी घेतोस ना? हजार मूर्ख माणसे संपर्कात असण्यापेक्षा एका विद्वान व्यक्तीचा सहवास कल्याणकारक असतो हे ध्यानात ठेव. जे लाच घेत नाहीत. निश्चल चरित्राचे असतात. आपल्याजवळ वाडवडिलांपासून काम करीत आलेले आहेत. स्वच्छ चारित्र्याचे आहेत, अशा माणसांना अमात्य पदावर नेमले आहेस ना? जिथे हत्तीसारखे विशालकाय प्राणी राहतात, अशी अरण्ये सुरक्षित राखली जात आहेत ना? आय-व्यय यांचा समतोल राहतो ना? अपात्र लोकांच्या हातात राज्य शासनाच्या खजिन्यातील धन जात नाही ना? तुझे सर्व दुर्ग, धन-धान्य, अस्त्र-शस्त्र, पाणी, यंत्रसाधणे शिल्पकार आणि धनुर्धर सैनिकांनी युक्त आहेत ना? देवस्थान, वृक्ष, तलाव सुस्थितीत ठेवले जात आहेत ना? यातील समाजाबद्दलच सर्व मुद्दे आजही उचित आहेत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी श्रीरामांचे चरित्र अभ्यासनीय, चिंतनीय आहे.