

राजमाता जिजाऊंच्या 12 जानेवारी रोजी असलेल्या 427 व्या जयंतीनिमित्ताने त्यांचे पुण्यस्मरण...
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवनात अनेक संकटे आली. निजामाच्या दरबारात वडील लखूजीराजे आणि बंधूंची हत्या झाली. खंडागळे यांचा हत्ती पिसाळला, त्याप्रसंगी आप्तस्वकीयांत जीवघेणा संघर्ष झाला. दीर शरीफजीराजे, ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे रणमैदानात धारातीर्थी पडले. पुत्र शिवाजीराजे यांना जीवे मारण्यासाठी अफजलखान आला, पन्हाळा वेढा, आग्रा कैद, पुरंदरचा तह, राज्याभिषेकाचे राजकारण असे अनेक प्रसंग जिजाऊ माँसाहेब यांनी अनुभवले. पण अशा कठीण प्रसंगी जिजाऊ माँसाहेब डगमगल्या नाहीत, हतबल झाल्या नाहीत, त्यांनी धीर सोडला नाही. संकटाने त्या गर्भगळीत झाल्या नाहीत. याउलट संकटसमयी जिजाऊ लढणार्या होत्या, रडणार्या नव्हत्या. संकटाला संधी समजून त्यावर त्यांनी यशस्वी मात केली.
राजमाता जिजाऊ कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. त्या जितक्या संवेदनशील मनाच्या होत्या, तितक्याच त्या स्वाभिमानी आणि लढवय्या होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. त्यांनी शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमध्ये स्वराज्याची ज्योत पेटवली. जिजाऊ माँसाहेब या स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ आहे.
पती निधनानंतर सती न जाता जिजाऊ आपल्या पुत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्वराज्यनिर्मितीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. पारंपरिक अनिष्ट प्रथांना त्यांनी लाथाडले. सती प्रथासारख्या क्रूर, अमानुष प्रथेला लाथाडणार्या जिजाऊ क्रांतिकारक आहेत. त्या ग्रंथप्रामाण्यवादी नव्हत्या, म्हणूनच त्या अशी हिंमत करू शकल्या. आदिलशहाचा सरदार मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून भूमिपुत्रांत भय निर्माण केले होते. त्याच पुण्यात बाल शिवबाला हाताशी धरून जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवून भूमिपुत्रांत अभय निर्माण केले. यावरून स्पष्ट होते की, जिजाऊ बुद्धिप्रामाण्यवादी अर्थात प्रयत्नवादी होत्या. यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागेल, रणांगण गाजवावे लागेल, चातुर्य पणाला लावावे लागेल, हे त्यांनी ओळखले होते. जपमाळ ओढून आणि नामजप करून स्वराज्य स्थापन करता येणार नाही, हे वास्तव ओळखणार्या जिजाऊ प्रागतिक विचारांच्या होत्या. त्या भाबड्या किंवा प्रवाहपतीत नव्हत्या. त्या देवभोळ्या-धर्मभोळ्या तर अजिबात नव्हत्या. त्यांचा विश्वास कर्तृत्वावर होता, यज्ञ, होम-हवन, ज्योतिष-पंचांगावर नव्हता.
जिजाऊ माँसाहेबांना अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड होती. त्या गरीबाप्रती अत्यंत कारुण्यमूर्ती होत्या. त्यामुळे त्या निर्भीड आणि लढवय्या होत्या. बाल शिवबाला मांडीवर बसवून महिलांवर अत्याचार करणार्या रांजे गावच्या बाबाजी गुजरला त्यांनी कठोर शिक्षा ठोठावली. आपल्या राज्यातील सर्व स्त्रिया आणि लहान मुले यांचे रक्षण झालेच पाहिजे, हा नियम जिजाऊंनी घालून दिला. आपले राज्य नीतिमूल्यांची जोपासना करणारे असले पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता. त्या अत्यंत न्यायनिष्ठूर होत्या. त्यांनी शिरवळ परगण्यातील मुजेवी येथील लखो विठ्ठल आणि पुणे परगण्यातील बहेरखेड येथील गणोजी गुरव यांना जमिनीच्या खटल्यात योग्य न्याय दिला. आपल्या राज्यात कोणावरही अन्याय होणार नाही आणि अन्याय करणारा मोकळा सुटणार नाही याची काळजी जिजाऊंनी घेतली.
जिजाऊंचा गुप्तहेर खात्यावर अंकुश होता. त्यांची स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा होती. गुप्तचर यंत्रणेवर त्यांनी विशेष लक्ष दिले होते. शिवाजीराजे कोकण मोहिमेवर असताना खवासखान येत असल्याची बातमी जिजाऊंनी शिवरायांना पोच केली. जिजाऊ स्वतः युद्धकलेत निपुण होत्या. त्या घोडेस्वारीमध्ये तरबेज होत्या. त्या लढवय्या होत्या. त्यांच्या धैर्याचे, शौर्याचे, पराक्रमाचे आणि लढाऊ वृत्तीचे वर्णन त्यांना प्रत्यक्ष पाहणार्या समकालीन कवींद्र परमानंदाने ‘शिवभारत’ या ग्रंथात विस्ताराने पुढीलप्रमाणे केले आहे. राजगडावर राहणारी शिवाजीची माता जिजाऊ आपल्या गडाच्या रक्षणाच्या कामी दक्ष झाली (शिवभारत, अध्याय 26/5). शिवाजीराजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असताना जिजाऊ डोळ्यात तेल घालून गडांचे रक्षण करत होत्या, असे परमानंद म्हणतो.
प्रदीर्घकाळ शिवाजीराजे पन्हाळा वेढ्यात अडकले असताना जिजाऊ अस्वस्थ झालेल्या होत्या. त्या स्वतः शिवबाची सुटका करण्यासाठी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून निघतात, त्याप्रसंगी जिजाऊ काय म्हणतात त्याचे वर्णन परमानंद पुढीलप्रमाणे करतो. त्या माझ्या पुत्रास (शिवाजीस) स्वतः सोडवण्याचा मी प्रयत्न करीन आणि जोहराचे मुंडके आज युद्धातून घेऊन येईन (शिवभारत, अध्याय 26/14).
यावरून स्पष्ट होते की, कठीणप्रसंगी जिजाऊ स्वतः हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून युद्धास सज्ज असत. कठीण काळात त्या हतबल होऊन रडत बसल्या नाहीत, तर शस्त्र घेऊन रणांगण गाजवण्यास रणमैदानात उतरल्या. त्यात केवळ शहाजीराजांच्या महाराणी, शिवबाच्या माता, शंभूराजेची आजी एवढी मर्यादित ओळख नाही; तर त्या स्वतः महान योद्धा, शूर, मुत्सद्दी, धैर्यशाली, राजनीतिज्ञ होत्या. भारतीय परिप्रेक्षात पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखन अजून आलेले नाही. त्यामुळे कर्तृत्ववान स्त्रियांचे योगदान दुर्लक्षित झालेले आहे.
शिवाजीराजे आग्रा कैदेत असताना जिजाऊंनी स्वराज्याचे नेतृत्व केले. त्यांनी स्वराज्याची इंचभर भूमी देखील शत्रूला जिंकू दिली नाही. जिजाऊंनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. त्यामुळे शिवरायांना साथ देणारे सर्व जाती-धर्मातील मावळे नि:स्वार्थ आणि निर्भीडपणे पुढे आले. जिजाऊंनी मावळ्यांवर उदात्त विचारांचे संस्कार केले. त्यांच्यात नीतिमूल्यांची जोपासना केली. त्यांच्यात ध्येयवाद आणि आत्मविश्वास निर्माण केला.
जिजाऊंनी ज्याप्रमाणे शिवरायांना घडवले, तसेच नातू शंभूराजांना देखील घडविले. स्त्रीदेखील हिंमतवान, बुद्धिमान, कर्तृत्ववान, पराक्रमी, दूरदृष्टीची असते, हे जिजाऊंनी दाखवून दिले. जिजाऊ हे स्वराज्याचे विद्यापीठ आणि ज्ञानपीठ आहे. आपल्या सर्वांचे प्रेरणापीठ आणि संस्कारपीठ म्हणजे जिजाऊ माँसाहेब आहेत. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !