Rajasthan Political News | राजस्थानात का पलटली बाजी?

Rajasthan Political News |
Rajasthan Political News | राजस्थानात का पलटली बाजी?
Published on: 
Updated on: 

पोपट नाईकनवरे, राज्यशास्र अभ्यासक

राजकारणात सत्तेची ताकद आणि लोकप्रियतेचा दावा यांची खरी परीक्षा निवडणुकीच्या मैदानातच होते. राजस्थानमध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनी भाजपला याची जाणीव करून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे नेतृत्व आणि सत्तेतील ताकद असूनही ग्रामीण मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघापासून मंत्र्यांच्या प्रभावक्षेत्रापर्यंत भाजपला बसलेले धक्के पक्षाच्या संघटनात्मक आणि प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. विधानसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा अवकाश असला, तरी या निकालांनी भाजपला सावध केले आहे. राजस्थानचा हा कौल काँग्रेससाठी पुनरागमनाची संधी ठरतो की भाजपसाठी आत्मपरीक्षणाचा इशारा, हे आगामी राजकीय घडामोडी ठरवतील.

राजस्थानमधील पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनी या राज्यातील सत्ताधारी भाजपपुढे गंभीर राजकीय प्रश्न उभे केले आहेत. विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवूनही ग्रामीण भागातील मतदारांचा विश्वास कायम राखण्यात भाजपला अपयश आले, हे या निकालांनी स्पष्टपणे दाखवून दिले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा सांगानेर मतदारसंघ, मंत्री आणि पक्षातील बड्या नेत्यांचे प्रभावक्षेत्र अशा ठिकाणीही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. काँग्रेसने ग्रामीण भागात मोठी आघाडी घेतली, तर हनुमान बेनीवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने (आरएलपी) तिसरी शक्ती म्हणून आपले अस्तित्व ठळक केले. या निकालांचे महत्त्व आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातही आहे. राजस्थानमध्ये अजून दोन वर्षांनी विधानसभा निवडणूक होणार असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रियतेचा आणि संघटनात्मक ताकदीचा अंदाज घेण्याची संधी दिली आहे. भाजपला आता फक्त पराभवाची कारणे शोधून चालणार नाही; ग्रामीण भागातील राजकीय पकड पुन्हा निर्माण करण्यासाठी नेतृत्व, प्रशासन आणि पक्षसंघटना या तिन्ही पातळ्यांवर बदल करावे लागतील.

निकालांचा तपशील

राजस्थानात काँग्रेसने २३ जिल्हा परिषदांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले, तर भाजपला केवळ ६ जिल्हा परिषदांमध्ये बहुमत मिळाले. पंचायत समित्यांच्या ३,७५८ जागा काँग्रेसने जिंकल्या. भाजपला २,२१३ जागांवर समाधान मानावे लागले. जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसने ७९४, तर भाजपने ३५७ जागा जिंकल्या. म्हणजेच जिल्हा परिषदांच्या जागांमध्ये काँग्रेसला भाजपच्या दुपटीपेक्षा अधिक यश मिळाले. २०२०-२१ मध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यातील मतांची टक्केवारी जवळपास समान होती. जिल्हा परिषदांमध्येही दोन्ही पक्षांमधील अंतर अत्यल्प होते. यंदा राज्यात २.७ कोटींपेक्षा अधिक मतदारांनी मतदान केले. त्यामुळे हा निकाल केवळ काही स्थानिक नेत्यांच्या लोकप्रियतेचा परिणाम मानता येणार नाही. ग्रामीण मतदारांमध्ये सत्ताधारी पक्षाविषयी निर्माण झालेल्या नाराजीचेही त्यातून संकेत मिळतात.

भाजपच्या बालेकिल्ल्यांनाही धक्का

या निवडणुकीतील सर्वांत लक्षवेधी बाब म्हणजे भाजपच्या बड्या नेत्यांच्या प्रभावक्षेत्रातही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात भाजपला तिसऱ्या क्रमांकावर जावे लागणे ही पक्षासाठी नामुष्की ठरली. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या भरतपूरमध्येही काँग्रेसने मुसंडी मारली. जयपूरच्या ग्रामीण भागातही काँग्रेसने भाजपला मागे टाकले. जयपूरमधील २२ पंचायत समित्यांपैकी भाजपला फक्त दोन ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळाले. मंत्र्यांच्या मतदारसंघांतील निकालांनीही भाजपची चिंता वाढवली. या निकालांमधून एक गोष्ट स्पष्ट होते. राज्यातील सत्तेचा फायदा स्थानिक निवडणुकांमध्ये आपोआप मिळत नाही. मंत्रिपद, राजकीय प्रतिष्ठा आणि सत्तेची ताकद यांपेक्षा स्थानिक प्रश्नांवर मतदारांशी असलेला संपर्क अधिक महत्त्वाचा ठरतो.

आरएलपी, आदिवासी पक्षांचे वाढते महत्त्व

या निवडणुकीत हनुमान बेनीवाल यांच्या आरएलपीने तिसरी राजकीय शक्ती म्हणून आपले स्थान मजबूत केले. नागौर जिल्ह्यात पक्षाने जिल्हा परिषदेच्या ३७ पैकी १९ जागा जिंकल्या. राज्यभरात आरएलपीने पंचायत समित्यांच्या ४९७ आणि जिल्हा परिषदांच्या ५१ जागा जिंकल्या. विशेषतः नागौर आणि आसपासच्या भागांत पक्षाला मिळालेला प्रतिसाद भाजपसाठी चिंतेचा विषय आहे. राजस्थानच्या राजकारणात जाट मतदारांचे महत्त्व मोठे आहे. या मतदारांमध्ये बेनीवाल यांचा प्रभाव लक्षात घेता आरएलपीची वाढ भाजपच्या पारंपरिक मतपेढीला आव्हान देऊ शकते. काँग्रेस आणि आरएलपी यांच्यात काही काळापासून राजकीय मतभेद असले, तरी निकालानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी बेनीवाल यांचा पक्ष इंडिया आघाडीचा घटक असल्याचे स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रश्न, सामाजिक समीकरणे आणि विशिष्ट समुदायांतील नेतृत्व या आधारावर प्रादेशिक पक्ष मतदारांना आकर्षित करू शकतात, हे या निकालांनी दाखवून दिले.

भाजपच्या राजकीय प्रयोगाला मर्यादा

राजस्थानमध्ये पहिल्यांदाच आमदार झालेल्या शर्मा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवून भाजपने नेतृत्वबदलाचा प्रयोग केला. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या काळात राज्यातील राजकीय सत्ता मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाभोवती केंद्रित होती. त्यांच्याबरोबर अनेक प्रभावशाली प्रादेशिक नेतेही कार्यरत होते. त्यांना स्थानिक पातळीवर जनाधार होता आणि निवडणुकीत मतदारांना पक्षाच्या बाजूने वळवण्याची क्षमता होती. भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने वेगळी रचना उभी करण्याचा प्रयत्न केला. पक्षाचा मुख्य चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, स्थानिक नेत्यांपेक्षा पक्षसंघटना महत्त्वाची असेल आणि नेतृत्वाचे विकेंद्रीकरण केले जाईल, असा या प्रयोगाचा आशय होता. या प्रक्रियेत पूर्वी प्रभावशाली असलेल्या काही नेत्यांचे महत्त्व कमी झाले. नव्या नेतृत्वाला संधी मिळाली; मात्र त्याच वेळी अनुभवी स्थानिक नेत्यांची ताकद पक्षाला पुरेशा प्रमाणात वापरता आली नाही.

प्रशासनाच्या माध्यमातून पक्षाची पकड मजबूत करण्याचा प्रयत्नही झाला. मात्र प्रशासन आणि राजकीय नेतृत्व यांची भूमिका वेगळी असते. सरकारी यंत्रणा निर्णयांची अंमलबजावणी करू शकते; पण मतदारांशी संवाद साधून त्यांचा विश्वास मिळवण्याचे काम राजकीय नेतृत्वालाच करावे लागते. नोकरशाहीवर अवलंबून राहून पक्षसंघटनेतील कमतरता भरून काढता येत नाही. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयक्षमतेबाबत आणि महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांना होणाऱ्या विलंबाबाबतही टीका होत आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आणि स्थानिक नेत्यांना प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल, तर त्याचा परिणाम मतदारांशी असलेल्या त्यांच्या संपर्कावर होतो. अखेरीस त्याची किंमत निवडणुकीत पक्षाला मोजावी लागते.

काँग्रेसला संधी; पण आव्हानही मोठे

या निकालांमुळे काँग्रेसला निश्चितच राजकीय बळ मिळाले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ग्रामीण मतदारांनी सरकारला स्पष्ट संदेश दिल्याचे म्हटले. तथापि, या विजयाचे रूपांतर काँग्रेसने संघटनात्मक विस्तारात केले, तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रभावी आव्हान देता येईल. मात्र, स्थानिक निवडणुकीतील विजय म्हणजे विधानसभेतील विजयाची हमी नव्हे. काँग्रेससमोर गटबाजी, स्थानिक नेत्यांमधील मतभेद आणि सत्तेची संधी मिळाल्यास होणारी अंतर्गत स्पर्धा रोखण्याचे आव्हान आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन करताना निवडून आलेल्या सदस्यांना एकत्र ठेवणेही महत्त्वाचे ठरेल.

राजस्थानच्या या निकालांचा भाजपने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे असली, तरी ग्रामीण भागातील मतदारांनी दिलेला कौल दुर्लक्षित करता येणार नाही. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता, पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आणि सत्तेतील ताकद यांच्या जोरावर प्रत्येक निवडणूक जिंकता येईल, असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल. स्थानिक प्रश्न समजून घेणारे नेतृत्व, कार्यकर्त्यांशी संवाद आणि प्रशासनावर प्रभावी नियंत्रण या बाबींची कमतरता असेल, तर त्याचा फटका बसतोच.

राजकारणात विजयापेक्षा पराभव अधिक शिकवून जातो, असे म्हटले जाते. राजस्थानमध्ये भाजपला मिळालेला हा धक्का त्याच अर्थाने महत्त्वाचा आहे. काँग्रेसला संधी मिळाली आहे; पण ती टिकवण्यासाठी पक्षाला एकजूट दाखवावी लागेल. भाजपला आत्मपरीक्षण करावे लागेल. ग्रामीण मतदारांनी सत्ताधाऱ्यांना दिलेला संदेश स्पष्ट आहे . सत्तेचा अधिकार पाच वर्षांसाठी मिळतो; मात्र जनतेचा विश्वास प्रत्येक निवडणुकीत नव्याने संपादन करावा लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.