पावसाचे नैसर्गिक संकेत!

झाडे, पशू आणि पक्षी यांचे निसर्गाशी नाते घट्ट असल्याने त्यांनी दिले पावसाचे संकेत
Rain prediction by nature
पावसाचे नैसर्गिक संकेत!Pudhari File Photo
Published on
Updated on
डॉ. व्ही. एन. शिंदे

यावर्षी नेहमीच्यावेळी चांगल्या पावसाला सुरुवात होईल. तो तसाच पुढे पडत राहील. काही भागांत पूरस्थिती उद्भवण्याइतका जोरात पाऊस पडेल आणि यावर्षीच्या पावसात सातत्य असेल. पिकांची चांगली वाढ होण्यासारखी उघडीप असेल; मात्र शेतकर्‍यांना फार सावध राहण्याची गरज असेल. मानवाने निसर्गाशी असणारे नाते तोडले असले, तरी झाडे, पशू आणि पक्षी यांचे नाते तसेच घट्ट असल्याने त्यांना पावसाचे संकेत कळतात आणि ते जे सांगतात, ते आपण समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी निसर्ग जपायला हवा, समजून घ्यायला हवा.

यावर्षी पावसाळा सुरू झाल्याप्रमाणे मे महिन्यातच पाऊस पडू लागला आहे. असाच पाऊस पडावा आणि बळीराजा खूश राहावा, ही प्रत्येकाची इच्छा असते. शेतकर्‍याच्या शेतात पीक भरपूर आले, तर ते स्वस्तात उपलब्ध होऊ शकते, हा शहरातील लोकांचा द़ृष्टिकोन असतो; मात्र शेती चांगली पिकली की, शेतकरी खूश असतो. दरवर्षीप्रमाणे एप्रिलच्या सुरुवातीस 95 ते 100 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला. दरवर्षी सुरुवातीचा अंदाज आल्यानंतर पुढे पावसाचे प्रमाण कमी वर्तवण्यात येत असते; मात्र मे महिन्यात पाच टक्क्यांनी हे प्रमाण वाढणार आहे, असे हवामान खाते सांगत आहे. गतसाली पाऊस भरपूर पडला. धरणे तुडुंब भरली आणि अखेर उन्हाळ्यात अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. यावर्षी आपण पाणी मुरवण्यासाठी काम करू, असे ठरवून मेपर्यंत झोपलेल्या अनेकांच्या योजनांवर आताच पाणी पडू लागले आहे. हवामान खाते त्यांच्या गणितानुसार, मॉडेलनुसार आपला अंदाज व्यक्त करत असते. ही मॉडेल्स तर्कावर आधारित अंदाज व्यक्त करत असतात. त्यांच्या स्वत:च्या काही मर्यादा असतात. त्यामुळे अनेकदा फसगत होते. त्याचे उत्तम उदाहरण 2023 चा पाऊस होय. 2023 मध्ये हवामान खात्याच्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडणार होता. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मान्सून अंदमान निकोबार, केरळ, गोवा आणि मुंबईपर्यंत अगदी आज्ञाधारक मुलाप्रमाणे वागत राहिला; मात्र अरबी समुद्रात अचानक बिपरजॉय वादळ आले आणि संपूर्ण पाऊस उत्तर भारताकडे सरकला.

उत्तर भारतात महापुराची परिस्थिती उद्भवली. महाराष्ट्र मात्र अवर्षणसद़ृश स्थितीत अडकला. पावसाळ्यातही अनेक गावांना पाणीटंचाई भेडसावत राहिली. त्यावर्षी याच पुरवणीत पाऊस महाराष्ट्रात उशिरा येणार आणि अल्प प्रमाणात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. जागतिक तापमानवाढीचा परिणाम म्हणून पावसामध्ये अनियमितता येणार असल्याचे जागतिक पातळीवर या क्षेत्रात कार्य करत असणार्‍या सर्वच संस्था आणि संशोधक यांनी मान्य केलेली बाब आहे; मात्र एकूणच पाऊस कसा असेल, हे निसर्ग अचूक सांगतो. यावर्षीचे निसर्ग संकेत अगदी मार्चपासून मिळण्यास सुरुवात झाली. यातून पाऊस लवकर येणार, हे निश्चित झाले होते; मात्र इतर सर्व निसर्ग संकेतांची खात्री करणे गरजेचे होते. या निसर्ग संकेतांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास झालेला नाही. त्यामुळे कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही; मात्र पावसाचे ठोकताळ्याने वागणे निसर्ग संकेतानुसार अचूक असते. निसर्गातील पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वनस्पती यांच्याकडून पावसाचे संकेत मिळतात. यावर्षी पावसाबाबत असणारे संकेत आनंददायी असे आहेत, तरीही या पावसाळ्यामध्ये सावधानतेने राहणे गरजेचे आहे. यावर्षी बहावा झाडाचे फुलणे अगदी मार्चपासून सुरू झाले.

बहावाचे फुलणे त्याच्या लौकिकास साजेसे होते. पिवळ्याधमक पाकळ्यांमध्ये हिरवा कोवळा शेंगांचा दांडा घेऊन दिवसा जागोजागी लावलेले निसर्गाचे हे झुंबर अधिकच खुललेले होते. बहावाचे असे लवकर फुलणे आणि नितांतसुंदर फुलणे पाऊस वेळेवर आणि समाधानकारक येणार असल्याचे संकेत देतात. बहावाच्या काही झाडांना उशिराने फुले आली; मात्र 2023 प्रमाणे बहावाचे एकही झाड वागताना दिसले नाही. 2023 मध्ये बहावाच्या झाडांचे नेहमीप्रमाणे झुंबर टांगल्यासारखे फुलणे अपवादाने दिसले होते. यावर्षी बहावाच्या फुलण्याइतकाच चांगला पाऊस पडणार आहे. धामण आणि पांढरफळी ही इतर दोन झाडे आपल्या फुलण्यातून पावसाबाबत आपले संकेत देत असतात. यातील धामणीची झाडे पाऊस लवकर येणार की उशिरा एवढेच सांगतात. अर्थात, ती भरपूर फुलांनी सजली, तर पाऊस चांगला पडतो असे बुजुर्ग सांगतात; मात्र धामणीच्या फुलांना आणि फळांना खाणारी तोंडे जास्त असल्याने कळ्या, फुले यांचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास पाऊस कसा असेल, याचा अंदाज येतो; मात्र कधी फुलते यावरून पाऊस कधी येणार, हे अचूक सांगता येते. यावर्षी धामण अगदी मार्चपासून फुलू लागली आणि पाऊस जूनमध्ये येणार असे सांगत आहे. पांढरफळीची झाडे बहावाच्या मार्गाने जाणारी असतात. पांढरफळीच्या फुलांकडे सहज लक्ष जाण्याचे कारण नसते. एकतर ती छोटी असतात. प्रत्यक्षात ती झाडे नाही, तर झुडपे असतात. फुलांचा रंग हा पांढरट पिवळसर असतो. फुलांना फार सुगंध असतो असेही नाही; मात्र या पांढरफळीच्या फुलांवर येणारे कीटक आणि मधमाश्या इतका दंगा करत असतात की, आपले सहज त्यांच्याकडे लक्ष जाते. यावर्षी पांढरफळीची झाडे मार्चपासून फुलावयास सुरुवात झाली आहे. गर्द फुललेल्या झुडुपाजवळून जाताना सहज धक्का लागला, तर मधमाश्यांच्या आवाजाने पळून जावे अशी परिस्थिती निर्माण होते.

यावर्षी आलेला झाडांचा बहर हा नजर लागण्याइतका जोरात आला आहे. बरे, हा बहर सर्व झुडुपांना एकाचवेळी आलेला नाही. टप्प्याटप्प्याने ही झाडे फुलली; मात्र बहर जोरात आलेला होता आणि आहे. या झुडुपातील काहीची फळे आता पक्व झाली आहेत. हे सांगते की, पाऊस जोरात तर आहेच शिवाय पूर्ण कालावधीत पडेल. काही दिवसांची उघडीपसुद्धा मिळेल; मात्र या काळात पीक काढून घेण्याचे काम शेतकर्‍यांना फार काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. अन्यथा जागतिक तापमानवाढीच्या परिणामस्वरूप पडणारा पाऊस आलेल्या पिकांचे चांगलेच नुकसान करू शकतो. चिंचेची झाडे यावर्षी वेगवेगळ्या काळात फुलली आहेत. आताही काही झाडांना फुले आलेली दिसतात. फुलोरा जास्त आलेला आहे. अर्थातच पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे. बिबा, खैर आणि शमीच्या झाडांना मात्र कमी फुले आलेली आहेत. यांचे कमी फुलणे जास्त पावसाचे संकेत देत आहेत. यावर्षी महाराष्ट्रापुरते तरी आंब्याचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी होते आणि पाऊस जास्त आहे असे आंब्याचाही संकेत आहे. पक्ष्यांमध्ये पावसाचे अचूक अंदाज सांगणारे काक महाशय वेळीच सावध झाले आहेत. त्यांनी आपले घरटे जाड फांद्यांच्या बेचक्यात बांधायला घेतली आहेत. जाड फांद्यांच्या बेचक्यातील घरटी म्हणजे खालच्या बाजूला आहेत आणि ती वादळी आणि जास्त पावसाचे संकेत देत आहेत. कावळा साधारण पाऊस येण्याचा काळ जवळ आला की, घरटे बांधतो.

यावर्षी त्यांची घरे बांधायला सुरुवात झाली आहे. अर्थात, पावसाळा जवळ आला आहे. पावसाबद्दल सर्वाधिक अचुकता सांगणारा पक्षी म्हणजे टिटवी. यावर्षी टिटवीने आपली घरटी बांधून त्यातून पिलांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू केले आहे. यावर्षीही टिटवीने चार अंडी घातलेली दिसून आली आहेत. चार अंडी घालणे म्हणजे भरपूर पाऊस पडणार आहे. टिटवीची अंडी मागील वर्षी तळ्याच्या पात्रात आढळून आली होती. यावर्षी शेताच्या बांधावर आणि तळ्याच्या बंधार्‍यावर दिसून आली आहेत. याचाच अर्थ पावसाळा लवकर आहे. पाऊस भरपूर पडणार आहे आणि तळी, तलाव लवकर भरून जाणार आहेत. तित्तर पक्षी मोठमोठ्याने आवाज करत लवकरच पाऊस पडणार, हे सांगत आहेत. तातडीचा पावसाचा अंदाज मुंग्या आणि पाकोळ्या देतात. काळ्या मुंग्यांचा समूह तोंडात अंडी घेऊन स्थलांतर करू लागले की, लवकरच मोठा पाऊस पडतो. वाळवीला पंख फुटून ती हवेत उडताना दिसल्यास लवकरच पाऊस पडतो. तसेच पाऊस जोरात येणार असल्यास सरपटणारे प्राणी सुरक्षित जागी जातात. चिमण्या धुळीत अंग घुसळताना दिसल्या की, दोन-तीन दिवसांत पाऊस पडतो. हे सर्व संकेत दिसू लागले आहेत. जागतिक तापमानवाढीचा मोठा परिणाम जलचक्रावर झाला आहे. उन्हाचा तडाखा वाढून पाण्यांच्या साठ्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. हवेची स्वत:ची बाष्प साठवण्याची एक क्षमता असते. हवेत त्यापेक्षा जास्त वाफ येत असल्यास पाऊस पडणार, हे निश्चित आहे. त्यानुसार पर्जन्यचक्रामध्ये अनपेक्षित आणि मोठे बदल होत आहेत. कमी काळामध्ये जास्त पाऊस, काही ठिकाणी अवर्षण, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आहेच. या दोन्हीमुळे शेतीचे मोठे नुकसान संभवते. त्यामुळेच पर्जन्याशी संबंधित सर्वच घटकांनी सावध राहणे अगत्याचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news