प्रश्न पुरुषी मानसिकता बदलण्याचा!

मुला-मुलींना समान वागणूक देऊन वाढवले पाहिजे
Equal treatment of boys and girls
प्रश्न पुरुषी मानसिकता बदलण्याचा!Pudhari File Photo
Published on
Updated on
जगदीश काबरे

आज आपल्यापुढचे आव्हान ‘कायद्याचा अभाव’ हे नाही, तर ‘कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांचा भ्रष्टाचार आणि पक्षपातीपणा’ हे आहे. घरातच मुला-मुलींना समान वागणूक देऊन वाढवले आणि एकमेकांचा आदर करायला शिकवले, तर पुढच्या पिढीत बलात्काराचे प्रमाण नक्की कमी होईल. हा उपाय दीर्घकाळाचा आणि सातत्याची मागणी करणारा असला, तरी भविष्यातील सुद़ृढ पिढी निर्माण होण्यासाठी आवश्यकच आहे.

एखाद्या गोष्टीवर बंदी घातली जाते तेव्हा ती गोष्ट पुनःपुन्हा कारावीशी वाटणे हा मानवी स्वभाव आहे. लोकांवर धर्माच्या नावाखाली संस्कार केले जातात, तेव्हा त्या माणसाच्या मनात वयात येतानाच धार्मिक व नैसर्गिक प्रवृत्तीमध्ये झगडा सुरू होतो. ते द्वंद्व त्याच्या मेंदूत तणाव निर्माण करते. तसेच लहान मुलांना आपण जेव्हा शिस्त लावण्याच्या नावाखाली ‘हे करू नको, ते करू नको, त्याला हात लावू नको,’ असे सतत नकारात्मक आदेश देत असतो तेव्हा तेच करण्याची त्या मुलात ऊर्मी दाटून येत असते. एखादा माणूस असंतुष्ट असेल, तर त्याच्याकडून संयमी वृत्तीची अपेक्षा करणे चूक नाही का? उलट ज्या गोष्टीवर बंधने नसतात त्याविषयीचे कुतूहलही संपलेले असते. कारण, ती गोष्ट सहज प्राप्य असते. बलात्कार हा बलात्कारच आहे. गुन्हा हा गुन्हाच असतो. कोणतीही आपत्ती ही आपत्तीच असते. तेथे टाळूवरचे लोणी कोणी खाऊ नये. झुंडीला हिंसाप्रवृत्त करण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ नये. परंतु, याचा अर्थ असा नव्हे की, नागरिकांनी त्या घटनांचा निषेधही करू नये वा त्याबाबत प्रश्नही उपस्थित करू नयेत. प्रश्न तर विचारले गेलेच पाहिजेत. त्याचबरोबर कायद्याचा धाकही असलाच पाहिजे; पण आज आपल्यापुढचे आव्हान ‘कायद्याचा अभाव’ हे नाही, तर ‘कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांचा भ्रष्टाचार आणि पक्षपातीपणा’ हे आहे. कारण, अशा प्रकारच्या गुन्ह्याकडे पाहताना बलात्कारी कोणत्या जाती-धर्माचा आहे, कोणत्या विचारसरणीचा आहे, एवढेच काय; पण कोणत्या पक्षाचा आहे, हे पाहून आपल्यासह सर्व शासकीय यंत्रणाही व्यक्त होऊ लागलेल्या आहेत. हे दुर्दैवी आहे.

जेव्हा बलात्कार होतो तेव्हा अशा बातम्यांच्या संबंधात चीड येणे, उद्वेग होणे, तिरस्कार वाटणे हे स्वाभाविक आहे. हे सर्व निर्भया व त्यापूर्वीदेखील बघितले... वाचले आहे. माझ्या मते, या सर्वांचा आपली संस्कृती, परंपरा, धर्म या गोष्टींशी काही प्रमाणात संबंध आहे. या गोष्टी घडतात; कारण भारताची सामाजिक परिस्थिती ही अतिशय बिकट आहे. लोकसंख्येचा प्रचंड विस्फोट झाला आहे व त्यामध्ये स्त्री व पुरुष यांचे प्रमाण अतिशय व्यस्त झाले आहे, मुलगा हा वंशाचा दिवा, तसेच मुलगा हा कामासाठी जास्त उपयुक्त या चुकीच्या समजुतीमुळे मुलींचे जन्मप्रमाण हे अनेक राज्यांत धोकादायक पातळीवर घसरले आहे, त्याचा परिणाम मुलांची लग्ने न होणे यात होत आहे. स्वाभाविकपणे त्यातून frustration वाढत आहे. त्यात पुन्हा पुरुषसत्ताक मानसिकतेमुळे स्त्रियांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, हे दर्शवण्यासाठी मर्दानगी दाखवणे हा पुरुषांचा गुण समजला जातो. परिणामी, पुरुषामध्ये स्त्री ही उपभोग्य वस्तू असून, आपल्याला हवी तेव्हा उपलब्ध झाली पाहिजे आणि नाही झाली तर तिच्यावर बळजबरी केली पाहिजे तरच आपले पौरुषत्व सिद्ध होते, असा विचार रुजलेला आहे. अशा मानसिकतेच्या नजरेतून मग तीन वर्षांची चिमुरडी असो की, तीस वर्षांची तरुणी की साठ वर्षांची म्हातारी... कोणीही सुटत नाही. कारण, जोपर्यंत पुरुषी मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत दिल्लीच्या निर्भया बलात्कारापासून कोलकाता, मुंबई, बदलापूरच्या अभया बलात्कारापर्यंत हे घडतच राहणार.

त्याच्या जोडीलाच आपली शिक्षण व्यवस्था ही अतिशय कमकुवत बनली आहे, शालेय पातळीवर मूल्यशिक्षणाचा पूर्ण अभाव आहे, पुरेसा मोबदला मिळत नसल्याने चांगल्या व्यक्ती शिक्षकी पेशाकडे वळत नाहीत; मग जो गाळ (सन्माननीय अपवाद वगळून) उरतो त्याला पगारवाढ, शिकवण्या यातच फक्त रस असतो. याखेरीज अनेक भागांत शाळा या नाममात्र सुरू असतात. या सर्वाचा परिणाम विचारी, विवेकी पिढी तयार होण्याऐवजी, पैसा टाकून सर्व मिळेल, असा विचार करणारी किंवा काहीच मिळत नसल्याने ते मिळवण्यासाठी हिसकावून घेतले पाहिजे, असा हिंसक विकृत विचार करणारी पिढी आपण वाढवत आहोत. कायदा आणि व्यवस्थेचा धाक नसल्यामुळे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे आपल्याला दिसते आहे.

शेती ही झपाट्याने अनुत्पादक बनत आहे, त्यामुळे त्यावर अवलंबून असलेले लोक बेकार बनत आहेत. कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या वाढत्या लोकसंख्येला आपण रोजगार देऊ शकत नाही. त्यामुळे एक फार मोठा वर्ग अस्वस्थ, निराश, धुमसत्या अवस्थेत जगतो आहे. त्यात टी.व्ही.वरील मालिकांमधून सासू-सुनांची कारस्थाने दाखवून, स्त्री-पुरुषांना बाबाबुवांच्या भजनी लावून अंधश्रद्धा वाढवत आणि पुरुषी वर्चस्व दाखवत तसेच सिनेमांमध्ये आयटम साँग प्रसारित करून स्त्री ही पुरुषांच्या सर्व प्रकारच्या सुखासाठी आहे, हा समज वाढवला जात आहे. आज अनेक क्षेत्रांत स्त्रिया या पुरुषांपेक्षा पुढे जात आहेत, तो धक्का योग्य शिक्षणाअभावी पचवणे हे आपल्या पुरुषप्रधान समाजाला जड जात आहे. ही पुरुषी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. ‘पुरुष म्हणजे मर्द, रांगडा आणि स्त्री म्हणजे कोमल, नाजूक!’ हा विचार बदलणे आवश्यक आहे. या सर्व प्रश्नांवर जोपर्यंत उत्तरे शोधली जाणार नाहीत, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणे कठीण! आणि महत्त्वाचे म्हणजे उपाय शोधताना प्रश्नाचे सुलभीकरण करून उत्तरे शोधता येत नाहीत याचे भान ठेवायला हवे. जसे की, जागतिकस्तरावरील अनेक वर्षांच्या अभ्यासानंतरदेखील पॉर्न आणि बलात्काराचा संबंध स्पष्टपणे जोडता आलेला नाहीये. हे काहींना धक्कादायक वाटेल; पण सत्य आहे.

स्त्रियांनी आई झाल्यावर अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलांना वाढवताना मुलगा/मुलगी असा भेद खेळणी वा घरातील कामे यात करू नये. मुलांवर स्त्री ही पुरुषासारखीच एक व्यक्ती आहे, असे बिंबवून तिचा आदर करण्याचे संस्कार करायला हवेत. मुलींना स्वसंरक्षणाचे बाळकडू पाजायला हवे. मुलांना ‘तू बायल्यासारखा का वागतोस? हातात बांगड्या भरल्या आहेस का? मुलीसारखा मुळूमुळू काय रडतोस?’ अशा प्रकारचे स्त्रीला कमी लेखणारे, दुय्यम समजणारे आणि भेदभाव कारणारे संस्कार करू नयेत. वयात येणार्‍या मुला-मुलींना योग्य शब्दांत पालकांनीच शास्त्रीय माहिती दिली तर मुले, मुलींकडे फक्त शारीरिक द़ृष्टीने बघणार नाहीत. शारीरिक बदल ही एक नैसर्गिक घटना आहे, असे समजून एकमेकांकडे निकोप द़ृष्टीने पाहायला शिकतील. घरातील मुलींना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी पालकांनी मुलगी ही परक्याचे धन आहे, हा विचार मनातून काढून टाकला पाहिजे. पीडित मुलीच्या तक्रारीची त्वरित दखल घेऊन तिला मानसिक आधार दिला पाहिजे आणि समाजानेही पीडित मुलीला दोष देणे थांबवले पाहिजे. मुलींच्या कपड्यांवरून त्यांची मानसिकता जोखणे बंद केले पाहिजे. शाळेमध्ये आठवड्यातील काही तास मुला-मुलींसाठी पाककलेचे असले पाहिजेत. रोजच्या आहारातील खाद्यपदार्थ सर्व विद्यार्थ्यांना करता आलेच पाहिजेत. हा विषय सक्तीचा असावा. त्यात मुलगा-मुलगी असा फरक केला जाऊ नये. मुलीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला की, तिच्यात आत्मविश्वास निर्माण होईल आणि ती जगात खंबीरपणे उभी राहील. मुलाला लहानपणीच जर घरातील कामे करण्याची सवय लावली, तर त्याची पुरुषी वर्चस्वाची मानसिकता कमी होण्यास मदत होईल. अशा प्रकारे जर घरातच मुला-मुलींना समान वागणूक देऊन वाढवले आणि एकमेकांचा आदर करायला शिकवले, तर पुढच्या पिढीत बलात्काराचे प्रमाण नक्की कमी होईल. हा उपाय दीर्घकाळाचा आणि सातत्याची मागणी करणारा असला, तरी भविष्यातील सुद़ृढ पिढी निर्माण होण्यासाठी आवश्यकच आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news