

मिलिंद सोलापूरकर
जगभरातील प्रबळ सत्तांचे नेते केवळ त्यांच्या धोरणांमुळेच नव्हे, तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केल्या जाणार्या अत्याधुनिक साधनांमुळे आणि विलासी राहणीमानामुळेही चर्चेत असतात. या साधनांपैकी सर्वात आकर्षक ठरतात त्या त्यांच्या खास बनवलेल्या अधिकृत गाड्या. अलीकडेच झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या वेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या ‘औरस सेनट’चे दर्शन नव्याने जगाला घडले आणि या कारची सर्वदूर चर्चा झाली.
जगभरातील सत्ताधीशांच्या गाड्या नेहमीच चर्चेत असतात. अमेरिकेचे अध्यक्ष असोत, फ्रान्स वा ब्रिटनचे नेते असोत, त्यांची अधिकृत मोटार केवळ वैयक्तिक प्रवासाचे साधन नसते, तर ती त्यांच्या देशाच्या सुरक्षिततेची, तांत्रिक सामर्थ्याची आणि प्रतिष्ठेची प्रतीकात्मक ओळख बनते. अलीकडे चीनमधील तियानजिन शहरात झालेल्या शांघाय सहकार्य परिषदेच्या वेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या ‘औरस सेनट’ लिमोझीन या गाडीने अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधून घेतले.
रशियाच्या औरस मोटर्स या कंपनीने रशियन वैज्ञानिकांच्या मदतीने तयार केलेली ही बख्तरबंद कार पुतीन यांची खास अभिरुची मानली जाते. अमेरिकेच्या ‘बिस्ट’ नावाच्या कारप्रमाणे रशियाला स्वतःची खास लिमोझीन हवी, या संकल्पनेतूनच औरस सेनटचा जन्म झाला. या कारमध्ये 4.4 लिटरचे ट्विन-टर्बो व्ही 8 इंजिन बसवले असून सुमारे 600 अश्वशक्ती निर्माण करण्याची क्षमता आहे. इतके प्रचंड वजन असूनदेखील केवळ सहा सेकंदांत ही कार शंभर किलोमीटर प्रतितास वेग गाठते. कमाल गती 250 किलोमीटर प्रतितास आहे, तर ऑल व्हिल ड्राईव्ह प्रणालीमुळे कोणत्याही हवामानात वा रस्त्यावर तिचे नियंत्रण शाबूत राहते.
पुतीन यांच्या कारला ‘चालताफिरता अभेद्य किल्ला’ का म्हटले जाते, याची अनेक कारणे आहेत. ही संपूर्ण गाडी बुलेटप्रूफ असून काचेवरही विशेष थर दिलेला आहे. ग्रेनेड हल्ले सहन करण्याची क्षमता तिच्यात आहे. गाडीखाली बॉम्ब फुटला, तरी आतील प्रवासी सुरक्षित राहतील, अशी अंडरबॉडी संरचना केली आहे. रन-फ्लॅट टायर्समुळे टायर निकामी झाले, तरी गाडी काही अंतर सहज धावू शकते. आग लागल्यास तत्काळ नियंत्रणासाठी आगनिवारण यंत्रणा असून आणीबाणीच्या प्रसंगी प्रवाशांना श्वसनासाठी स्वतंत्र ऑक्सिजन पुरवठा करता येतो. याशिवाय गाडीत विशेष संचार प्रणाली असून अध्यक्षांना आतूनच सैनिकी आदेश देणे वा थेट देशकारभार चालवणे शक्य आहे. म्हणजेच ही मोटार एक छोटेसे मोबाइल कार्यालयच आहे.
सुरक्षेबरोबरच पुतीन यांच्या लिमोझीनमध्ये विलासीपणाचा एक वेगळाच पैलू दिसतो. आसने उत्तम प्रतीच्या चामड्याने बनवलेली असून गरजेनुसार फिरवता किंवा समायोजित करता येतात. प्रवासादरम्यान वापरता येतील अशी दुमडता येणारे टेबल, मोठ्या माहिती स्क्रीन, मिनी फ्रिज या सुविधा उपलब्ध आहेत. चालकाच्या आसनावरदेखील आधुनिक संचार साधने बसवलेली आहेत. विशेष म्हणजे, ही कार चालवणारा चालक सामान्य नसतो, तर तो रशियन सुरक्षा यंत्रणेत प्रशिक्षित अधिकारी असतो.
ही लिमोझीन प्रचंड आकारमानाची आहे. साधी आवृत्ती जवळपास 2700 किलो वजनाची, तर बख्तरबंद आवृत्ती तब्बल 6200 किलोंची आहे. लांबी 6.62 मीटर असून किंमत साधारण काही कोटींमध्ये आहे; परंतु सुरक्षाविषयक वैशिष्ट्ये पाहता ही किंमत केवळ प्रतीकात्मक आहे.
ताफ्याचे धोरण
पुतीन यांच्या ताफ्यात नेहमीच दोन लिमोझीन कार असतात. कोणत्या गाडीत अध्यक्ष प्रत्यक्ष बसले आहेत, हे शत्रूला कळू नये म्हणून दुसरी गाडी फक्त दिशाभूल करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय काही सिडान कार, शस्त्रसज्ज वाहने, छतांवर स्नायपर्स, आकाशातून निगराणी करणारे ड्रोन, मोबाईल कमांड सेंटर आणि जीपीएस जॅमिंग यंत्रणा अशी सुरक्षा व्यवस्था असते. पुतीन यांच्या विशेष कारमध्ये त्यांच्याच रक्तगटाचा अतिरिक्त साठा आणि वैद्यकीय साहाय्य उपलब्ध ठेवलेले असते.
तियानजिन परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांनी जवळपास 45 मिनिटांचा प्रवास या गाडीतून केला. त्यामुळे ही लिमोझीन केवळ सुरक्षेचे साधन न राहता दोन मोठ्या देशांच्या नेत्यांमधील संवादाची साक्षीदार ठरली.
शीतयुद्धानंतर अनेक दशके रशियाचा मोटार उद्योग परकीय तंत्रज्ञानावर अवलंबून राहिला होता; परंतु औरस सेनट ही पूर्णपणे रशियन अभियांत्रिकी कौशल्याची निर्मिती आहे. त्यामुळे ती रशियाच्या औद्योगिक आत्मनिर्भरतेचे आणि राष्ट्रीय अभिमानाचे द्योतक मानली जाते. अमेरिका, जर्मनी, जपान वा कोरिया या देशांनी जगभर मोटारींच्या बाजारपेठेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. रशियाने मात्र आपल्या राष्ट्रप्रमुखासाठी खास मोटार तयार करून औद्योगिक स्पर्धेत वेगळा ठसा उमटवला आहे.
अमेरिकन ‘बिस्ट’शी तुलना
अमेरिकेच्या अध्यक्षांची अधिकृत गाडी ‘द बिस्ट’ म्हणून प्रसिद्ध आहे. तिची मजबुती, बख्तरबंदी आणि गुप्त तंत्रज्ञान याबद्दल बरेच काही सांगितले जाते; परंतु रशियन औरस सेनट तिच्यापेक्षा कमी नाही.
जगातील महाशक्ती आपल्या नेत्याच्या सुरक्षिततेसाठी ज्या गाड्या बनवतात, त्या त्यांच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या पातळीचे प्रत्यक्ष प्रदर्शन असते. त्यामुळेच पुतीन यांची लिमोझीन केवळ वैयक्तिक सुरक्षिततेचे साधन न राहता आंतरराष्ट्रीय मंचावर रशियाच्या सामर्थ्याचा संदेश देत असते. एका राष्ट्रप्रमुखाच्या जीवनाला असलेले धोके, दहशतवाद, राजकीय अस्थैर्य आणि गुप्तहेरगिरी यांचा विचार करता ही यंत्रणा अपरिहार्य ठरते.
शीतयुद्धोत्तर काळात पाश्चात्त्य देशांवर अवलंबून राहिलेल्या रशियाने आता स्वतःचे स्वतंत्र अभियांत्रिकी सामर्थ्य दाखवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा पुतीन आपल्या या विशेष लिमोझीनमधून प्रवास करतात, तेव्हा ते फक्त सुरक्षा कवच नसते, तर जागतिक समुदायाला दिलेला एक संदेश असतो की, रशिया अजूनही प्रभावशाली राष्ट्र म्हणून जागतिक मंचावर आपले स्थान टिकवून आहे.