

‘त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?’ ‘सहज सख्या एकटाच येई सांजवेळी’ यांसारखी मधुर गीते लिहिणारे प्रख्यात भावकवी डॉ. सूर्यकांत खांडेकर यांची जन्मशताब्दी दि. 2 एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या काव्य आणि जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा लेख...
सुमारे 50 वर्षांपूर्वी... 1975च्या आगेमागे असलेला काळ. आज वयाची साठी ओलांडून गेलेली पिढी तेव्हा 12-13 वर्षांची होती. हा काळ पकडण्याचं कारण असं की, नव्यानं कविता स्फुरत असलेली पोरवयातील कवींची एक पिढी तेव्हा आपण लिहिलेल्या कविता शिक्षकांना दाखवत होती, जवळच्या मित्रांना दाखवत होती. शिक्षक त्यांना ‘वाचन करा’ असं सांगत होते. बा. सी. मर्ढेकर, नामदेव ढसाळ, दि. पु. चित्रे, अरुण कोलटकर, अर्जुन डांगळे, वसंत आबाजी डहाके इत्यादी कवींच्या नवकविता, साठोत्तरी कविता, दलित कविता, समांतर कविता वाचण्याचं, कळण्याचं किंवा त्या पचनी पडण्याचं त्या कवींचं वय नव्हतं. पाठ्यपुस्तकात असलेल्या कविता ज्या कवींच्या आहेत, त्या बालकवी, ग. ह. पाटील, बी, भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, इंदिरा संत इत्यादींच्या कविता वाचण्याचा आणि समजून घेण्याचा हे नवखे कवी तेव्हा प्रयत्न करीत असत. अर्थात बाजारात कुणाचे कवितासंग्रह सहजासहजी मिळण्याचा तो काळ नव्हता. ग्रंथालयात काही संग्रह मिळत होते. ज्यांच्या पालकांचे अशा ग्रंथालयात सदस्यत्व असायचं, ते वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, कुमुदिनी रांगणेकर, ज्योत्स्ना देवधर, बाबा कदम, सुहास शिरवळकर इत्यादी लेखकांची पुस्तकं वाचायला आणायचे. बालवयात कविता लिहू लागलेल्या कवींची, त्याचप्रमाणे रसिक मनांची अभिरुची जोपासण्याची साधनं मर्यादित होती. वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्या, साप्ताहिकं, मासिकं, दिवाळी अंक यांमधून रसिक मनांचं आणि वाचनप्रिय लोकांचं मनोरंजन होत असे. लोकांचं प्रबोधन आणि निखळ रंजन करणारं आणखी एक महत्त्वाचं आणि प्रभावी माध्यम त्या काळात होतं, ते म्हणजे आकाशवाणी...
आकाशवाणीवर भावगीतांच्या कार्यक्रमात खूपच लोकप्रिय म्हणून वारंवार लागणारं एक भावगीत होतं...
त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?
त्या प्रकाशी तारकांच्या ओतीसी तू तेज का?
त्या नभाच्या नीलरंगी सांग तू आहेस का?
गात वायूच्या स्वरांनी सांग तू आहेस का?
ह्या अत्यंत सुमधुर आणि अजरामर गीताचे कवी आहेत डॉ. सूर्यकांत खांडेकर! पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध करून गायलेल्या भावगीताला आकाशवाणीच्या कितीतरी मैफिलींमध्ये अग्रक्रम मिळत असे. मंगेशकरांच्या ‘भावसरगम’मध्ये हे भावगीत चांगलाच ‘भाव’ खाऊन जात असे. जे काही वैश्विक चैतन्य आहे, जे सार्या विश्वाला व्यापून राहिलेलं आहे, त्या ईश्वरी तत्त्वाचा शोध कवी ह्या गीताच्या माध्यमातून घेत आहे. हे चैतन्य कुठे कुठे आहे, कशाकशात आहे, हे भावस्पर्शी प्रत्ययानं कवीनं सांगितलेलं आहे. प्रतिभेचा परिसस्पर्श होऊन प्रकट झालेल्या शब्दांतून सर्व चराचरात वसलेल्या ईश्वरी तत्त्वाचे दर्शनच कवीने घडवलेलं आहे. भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या तलम पोत असलेल्या स्वरांनी ते अधिकच सुंदर झालेलं आहे. गीतामधला भाव रसिकांच्या कानातून मनात ओतण्याची किमया कवी आणि गायकानं केलेली आहे.
मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का?
आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का?
परमेश्वरी चैतन्य कशाकशात वसते आणि ते मानवाला कसे तारते, मानव्याचे कसकसे पोषण करते हे सांगताना पुढे आईचे दूध, कष्टकर्यांच्या नेत्रातील आत्मसन्मानाचे रंग, बालकांचे हास्य अशा ‘इथे’ आणि ‘तिथे’ हे चैतन्य आहे; किंबहुना मूर्तिमंत मानव्य म्हणजेच ते चैतन्य आहे, असं कवीची तरल प्रतिभा सांगते.
कोल्हापूर शहरापासून जवळ असलेल्या हळदीच्या आसपास कुर्डू हे गाव आहे. खांडेकर घराणे हे त्या गावचे. ते कोल्हापुरात जगण्यासाठी आले. सूर्यकांत यांचे वडील रामचंद्र यांनी कालांतरानं शहरातील नाथा गोळे तालमीजवळचं एक घर विकत घेतलं. त्या गल्लीचं नंतर खांडेकर गल्ली असं नामकरण झालं. सूर्यकांत हे शाळेत असतानाच त्यांनी ‘पतंगास’ ही पहिली कविता लिहिली. त्यांचं प्राध्यापक होईपर्यंतचं आयुष्य बरंचसं कष्टात गेलं. मॅट्रिक झाल्यानंतर शिकवण्या घेऊन राजाराम महाविद्यालयातून पदवी मिळवली. त्यांना ना. सी. फडके, पां. ना. कुलकर्णी, द. सी. पंगू, प्रिं. वि. कृ. गोकाक अशा निष्णात प्राध्यापकांचं मार्गदर्शन मिळालं. रेखीव अक्षरामुळं ना. सी. फडके यांनी त्यांना आपलं लेखनिक नेमलं. फडके हे त्यांना दरमहा 25 रुपये द्यायचे. 1948 मध्ये फडके वाराणसीला गेले. त्या महिन्याचे 25 रुपये बुडले. पुढच्या महिन्यात बरीच ओढाताण होऊनही त्यांंनी कसलीही कुरकुर केली नाही.
त्या काळात ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर या साहित्यिक बंधूंशी कवींचा परिचय झाला. ते गदिमांचेही लेखनिक झाले. गदिमांचे सगळ्यात लहान बंधू अंबादास यांच्याशीही सूर्यकांत यांचं मैत्र जुळलं. असं वाङ्मयीन वातावरण लाभल्यामुळं खांडेकर जोमानं लिहायला लागले. भावगीत, संचलन गीत, पोवाडे, बालगीत अशा अनेक काव्यप्रकारात त्यांनी लिहिलं. तथापि त्यांच्यावर ठसा उमटला तो भावकवी म्हणूनच!
शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक यांचे सूर्यकांत खांडेकर हे मावसभाऊ. पिराजीराव हे सूर्यकांत यांच्यापेक्षा 17 वर्षांनी मोठे. त्यांचा सहवास आणि शाहिरीचा स्पर्श झाल्याने खांडेकर यांचा भावगीताबरोबरच शाहिरी वाङ्मयाकडे ओढा राहिला. मात्र खड्या आवाजाची देणगी लाभल्याने पिराजीराव हे पोवाडे गायनात रमले, तर सूर्यकांत हे लेखनात रमले. त्यांनी वीररसाचा परिपोष करणारे अनेक पोवाडे लिहिले. संचलन गीतेही लिहिली.
1955 मध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. त्यावेळी खांडेकरांनी -
श्रीशिवबाच्या मर्द मराठी महाराष्ट्र देशा
शाहिराचा मुजरा माझा देशांच्या देशा!
हरहर महादेव रणमर्दांचा ओळखीचा साद
कडेकपारी मावळखोरी घुमवितात नाद!
शिवशाहीच्या पराक्रमाचे घुमती झंकार
नम्र वंदने महाराष्ट्रा रे तुला लाखवार!
हा पोवाडा लिहिला. तो खूप गाजला.
दुर्गा भागवतांच्या अध्यक्षतेखाली कराडच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उपस्थित मान्यवर साहित्यिकांची नावे काव्यात्मतेनं गुंफून खांडेकरांनी अतिशय सुरस पोवाडा लिहिला. तो पिराजीरावांनी खड्या आवाजात तडफेनं गायिला.
आपली पत्नी अनुराधा ह्या शिक्षिका असलेल्या विद्यापीठ हायस्कूलसाठी त्यांनी -
जागृतीत एक स्वप्न स्फूर्ति देत अंतरा
‘ज्ञानपीठ’ हे समूर्त भूषवी चराचरा!
हे संचलन गीत लिहिलं, तर-
प्रभो वाहतो भावफुलांची ओंजळ तव पाउली,
असो शिरावर तुझी उदारा मायेची साउली!
ही मधुर सायंप्रार्थना लिहिली. दरम्यान त्यांना चित्रपटात गीतलेखन करण्याची संधी मिळाली. अनेक चित्रपटांत त्यांनी गीते लिहिली आणि ती लोकप्रियही झाली.
मराठी विषयात एम. ए. झाल्यानंतर 1951 मध्ये जुना राजवाडा परिसरातील महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स विद्यालयात खांडेकरांना शिक्षकाची नोकरी मिळाली. तिथं सेवारत असतानाच 1955 मध्ये त्यांचा ‘सावली’ हा पहिला काव्यसंग्रह निघाला. पुढे कॉमर्स कॉलेजमध्ये अर्धवेळ अध्यापन केलं. पण अशा काही ठिकाणी मराठी विषय शिकवायला पुरेसा वाव नव्हता, म्हणून ते समाधानी नव्हते. पुढे इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ते दाखल झाले. तिथं त्यांची कारकीर्द फुलून आली. पण घरापासून दूर राहावं लागत असल्यामुळं नाइलाजानं ते कोल्हापूरला परतले. 1964 मध्ये ते कोल्हापूरच्या कीर्ती महाविद्यालयात रुजू झाले. नंतर कीर्ती महाविद्यालयाचे राजर्षी शाहू छत्रपती महाराज असं नामकरण झालं. हे महाविद्यालय नंतर कदमवाडीत स्थलांतरित झालं. 1971 मध्ये त्यांनी ‘मराठी पोवाडा ः एक वाङ्मयीन अभ्यास’ ह्या विषयावर विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही पदवी प्राप्त केली. नंतर त्यांची बदली विट्यास झाली. पण आईवर अपार प्रेम असल्यानं ते अस्वस्थ राहू लागले. त्याच वर्षी नव्यानं स्थापन झालेल्या प्रिन्स शिवाजी बोर्डिंगच्या न्यू कॉलेजमध्ये रा. कृ. कणबरकर प्राचार्य म्हणून रुजू झाले आणि सूर्यकांत खांडेकर हे तिथं स्थिरावले. पण स्थैर्याचा हा कालावधी त्यांना बराच कमी मिळाला. ‘सावली’नंतर ‘पानफूल’आणि ‘छुमछुम’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले. त्यांनी दहा संगीतिका आणि अनेक कविता लिहिल्या. त्यांचा ‘मराठी पोवाडा ः एक वाङ्मयीन अभ्यास’ हा प्रबंध शिवाजी विद्यापीठानं प्रकाशित केला. खांडेकर मितभाषी होते. खूप कमी बोलायचे. मात्र कोणताही विषय सोपा करून सांगण्याची हातोटी होती. त्यांच्या पत्नी अनुराधा खांडेकर माझ्या शिक्षिका होत्या. 15 जून 1979 ह्या दिवशी सूर्यकांत खांडेकर यांचे हृदयविकाराने निधन झाले...ते अवघे 54 वर्षांचे होते.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या प्रेरणेतून राजर्षी शाहू जन्मशताब्दी गीताची निर्मिती
1974 ही राजर्षी शाहू महाराजांची जन्मशताब्दी! दै. ‘पुढारी’चे तत्कालीन कार्यकारी संपादक आणि विद्यमान मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव हे राजर्षी शाहू महाराज जन्मशताब्दी सोहळ्याचे कार्याध्यक्ष होते. त्यांना ह्या औचित्याने राजर्षी शाहू महाराजांच्यावर एक छानसं गीत असावं, असं वाटत होतं. त्यांनी कविवर्यांशी चर्चा केली... आणि सूर्यकांत खांडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून शब्द उमटले...
हिरे माणके सोने उधळा जयजयकार करा...
जय राजर्षी शाहूराजा तुजला हा मुजरा!
ख्यातनाम संगीतकार वसंत देसाई यांनी हे गीत स्वरबद्ध केलं आणि सामूहिक स्वरूपात ते गायिलं गेलं. 23 फेब्रुवारी 1976 ह्या दिवशी राजर्षी शाहू जन्मशताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, राज्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हे गीत मोठ्या जल्लोषात हजारो श्रोत्यांच्या समोर सादर करण्यात आलं. राजर्षी शाहूराजांशी संबंधित प्रत्येक सोहळ्यात हे गीत आजही गायलं जातं!