Political impact on cricket | राजकारणाच्या पटावर क्रिकेटचा ‘पराभव’

Political impact on cricket
Political impact on cricket | राजकारणाच्या पटावर क्रिकेटचा ‘पराभव’Pudhari File Photo
Published on
Updated on

विवेक कुलकर्णी

क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा भारत-पाकिस्तान हे कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने भिडतात, त्यावेळी तो केवळ एक सामना नसतो तर भावभावनांचा, अभिमानाचा आणि अपेक्षांचा हल्लकल्लोळ असतो; मात्र आशिया चषक स्पर्धेत हेच संघ आमने-सामने भिडत गेले. अंतिम फेरीत एकमेकांसमोर आले. त्यावेळी एक अशी सीमारेषा ओलांडली, जिथे खेळाच्या मैदानावर राजकारण भारी ठरले आणि क्रिकेटच्या इतिहासातील एक अभूतपूर्व; पण दुर्दैवी अध्याय लिहिला गेला.

पदाचा संघर्ष कुठवर पोहोचू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे यंदाचा आशिया चषक! भारताने स्पर्धा जिंकली खरी; पण चषक स्वीकारण्यापूर्वी खरे नाट्य सुरू झाले. आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हेच पीसीबीचे अध्यक्ष असल्याने आणि त्यांनी पूर्ण स्पर्धेदरम्यान भारताविरुद्ध निषेधार्ह वक्तव्ये करण्याचा सपाटाच लावला असताना अशा व्यक्तीकडून चषक स्वीकारणे भारताला कदापि मान्य नव्हते आणि तिकडे नक्वी माझ्याशिवाय आशिया चषक कोणीही देणार नाही, अशा हट्टाग्रहावर कायम राहिल्याने हे खरे नाट्य घडले.

भारताने चषक जिंकल्यानंतर पाकिस्तानचा संघ मुळात तासभर मैदानावर आलाच नाही आणि ज्यावेळी आला, त्यावेळीही त्यांची बॉडी लँग्वेज हेच सांगत होती की, त्यांचा पराभव झालेला आहे; पण माज उतरलेला नाही. नक्वी यांना आपली उपस्थिती आक्षेपार्ह आहे, हे कळत होते; पण त्यांनी व्यासपीठ सोडण्याचे सौजन्य दाखवले नाही. पाक कर्णधार उपजेतेपदाचे बक्षीस स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आला; पण त्याने नंतर ज्या बेपर्वाईने तो धनादेश फेकून दिला, ते अर्थातच धक्कादायक होते. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी होते आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नक्वी. त्यांची भूमिका केवळ क्रिकेट प्रशासकापुरती मर्यादित नव्हती, तर ते पाकिस्तानचे गृहमंत्रीदेखील होते. पदांचा हा संघर्षच या वादाची मूळ ठिणगी ठरला. काही काळापूर्वी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत प्रत्युत्तराची कारवाई केली होती. या कारवाईनंतर पाकिस्तानचे गृहमंत्री म्हणून मोहसिन नक्वी यांनी भारताची खिल्ली उडवणारी आणि विरोधात गरळ ओकणारी वक्तव्ये सोशल मीडियावर केली होती. त्यामुळे भारतीय संघ आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली होती.

मैदानावरचे नाट्य आणि भूमिकांचा संघर्ष

अंतिम सामना भारताने जिंकला. खेळाडूंच्या चेहर्‍यावर विजयाचा आनंद होता; मात्र बक्षीस वितरण समारंभात जेव्हा मोहसिन नक्वी चषक देण्यासाठी मंचावर आले, तेव्हा भारतीय कर्णधाराने तो स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. बीसीसीआय आणि भारतीय संघाची भूमिका स्पष्ट होती. जी व्यक्ती आमच्या देशाविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरतेे, आमच्या लष्करी कारवाईची खिल्ली उडवतेे, त्याच्या हातून आम्ही आमच्या राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेला चषक स्वीकारणार नाही. भारतासाठी हा निर्णय खेळापेक्षा देशाच्या स्वाभिमानाचा होता.

दुसरीकडे, पाकिस्तानी कर्णधाराने आणि प्रशासनाने भारताच्या या कृतीला स्पर्धेचा आणि पदाचा अपमान ठरवले. त्यांचा युक्तिवाद होता की, नक्वी हे एसीसीचे अध्यक्ष या नात्याने चषक देत होते, पाकिस्तानचे गृहमंत्री म्हणून नव्हे. तुम्ही चषक स्वीकारला नाहीत, तर तो तुम्हाला कसा मिळेल, हा त्यांचा सवाल भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत होता. या राजकीय रस्सीखेचीत क्रिकेटचा मूळ उद्देशच हरवून गेला. सूर्यकुमार यादवची ‘मी माझ्या आयुष्यात असे कधीच पाहिले नाही’ ही हताश प्रतिक्रिया खेळाडूंची मानसिकता दर्शवण्यासाठी पुरेशी होती.

खेळाडू आणि खिलाडूवृत्तीचा पराभव

राजकारणाचे हे विष केवळ अधिकार्‍यांपुरते मर्यादित राहिले नाही, तर ते मैदानावर खेळाडूंमध्येही झिरपले. स्पर्धेदरम्यान ‘नो हँडशेक पॉलिसी’ पाळली गेली. अंतिम सामन्यानंतर अर्शदीप सिंगने पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमदच्या सेलिब्रेशनची नक्कल करत त्याची खिल्ली उडवणारा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला; पण त्याने दोन देशांच्या खेळाडूंमधील वाढती कटुताही जगासमोर आणली. एकेकाळी प्रतिस्पर्धी असूनही एकमेकांचा आदर करणारे खेळाडू आता एकमेकांची टर उडवू लागले होते. या सर्व प्रकारात ‘स्पिरिट ऑफ द गेम’ म्हणजेच खिलाडूवृत्तीचा अक्षरशः पराभव झाला.

भविष्यातील धोके आणि दिग्गजांची चिंता

या घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केलेली चिंता अत्यंत बोलकी आहे. ‘माध्यमांनी आणि आपण सर्वांनी राजकारणाऐवजी खेळावर लक्ष केंद्रित करायला हवे. एक खेळाडू म्हणून मला वाटते की, आपण खेळापुरतेच मर्यादित राहायला हवे’ या त्यांच्या शब्दांतून या समस्येची तीव्रता अधोरेखित होते.

एकंदरीत, यंदाचा आशिया चषक भारताने मैदानावर जिंकला असेल; पण या स्पर्धेचा खरा विजेता कोणीच नव्हता. राजकारणाच्या हव्यासापोटी खेळाच्या आत्म्याचाच बळी गेला. विजयाचा आनंद चषकाशिवाय अपूर्ण राहिला आणि खेळाडूंच्या मनात विजयाच्या गोडव्याऐवजी कटुतेची भावना घर करून राहिली. ही घटना एक धोक्याची सूचना आहे. देशोदेशींचे राजकीय वैर अशाच प्रकारे मैदानावर येऊ लागले, तर एक दिवस खेळ संपून जाईल आणि फक्त वैरच उरेल. क्रिकेटला ‘जेंटलमन गेम’ म्हणून टिकवून ठेवायचे असेल, तर त्याला राजकारणाच्या या विषापासून दूर ठेवावेच लागेल. अन्यथा, पावलोपावली क्रिकेटचा असा पराभव होत राहील आणि आपण पाहत राहण्याशिवाय, काहीच करू शकणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news