

2025 च्या सुरुवातीला लक्ष्मण उतेकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाने ‘छावा’ रीलिज केला. या सिनेमाने अनेक नव्या चर्चांना आणि वादांना तोंड फोडलं; पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा भारतभर पोहोचवण्यात यशस्वी ठरला. आता या यादीत महात्मा जोतिबा फुले यांच्यावर आधारित ‘फुले’ या चरित्रपटाचीही भर पडली असून महाराष्ट्रातले दुर्लक्षित नायक आता महाराष्ट्राबाहेर पोहोचताहेत.
सिनेसृष्टी, मग ती मर्यादित प्रभाव असलेली प्रादेशिक सिनेसृष्टी असो वा बॉलीवूड, हॉलीवूडसारखी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी झालेली असो, ही इतिहासाला कायमच आपलं एक चलनी नाणं समजत आली आहे. इतिहासपटांना एक हक्काचा प्रेक्षकवर्ग असतो. तो प्रशंसक अथवा टीकाकारही असू शकतो; पण कुठल्याही भूमिकेत असला, तरी तो हा इतिहासपट मोठ्या उत्सुकतेने बघतो. फार मोजक्या दिग्दर्शकांना आपल्याला इतिहास मांडायचा आहे, कल्पनारंजन नाही, याची जाणीव असते; पण बहुतांश दिग्दर्शकांचा होरा हा प्रेक्षकांची अस्मिता कुरवाळत त्यांचा खिसा रिकामा करणं, याकडेच असतो. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत अशाच गल्लाभरू इतिहासपटांचं प्रस्थ वाढीस लागलेलं आहे. इतिहास आहे तसा मांडण्यापेक्षा आपापल्या विचारसरणीनुसार सोयीस्कररीत्या मांडणं, हा मतप्रवाह सध्या सिनेक्षेत्रात प्रबळतेने दिसून येतो.
पण, सिनेमा हा एकसुरी प्रबोधनापेक्षा भरमसाट मनोरंजन करणारा असावा, ही सर्वसामान्य प्रेक्षकांची मागणी असते आणि हीच मागणी लक्षात घेऊन इतिहासपटांना अधिकाधिक रंजक बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचे तोटे बरेच असले, तरी अशी मांडणी इतिहासातल्या अनेक दुर्लक्षित पानांवर प्रकाश टाकून ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवत असते, हे मान्य करावंच लागेल. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ आणि ‘फुले’ या सिनेमांचं उदाहरण याबाबतीत फार बोलकं आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा सिनेमा यावर्षीच्या फेब्रुवारीमध्ये रीलिज झाला. बॉलीवूडच्या नव्या फळीतला एक आघाडीचा अभिनेता असलेला विकी कौशल या सिनेमात कथानायकाच्या अर्थात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला. लोकप्रिय साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर बेतलेल्या या सिनेमाने अल्पावधीतच बॉक्स ऑफिसवर आपलं बस्तान मांडलं. मूळचा हिंदी सिनेमा नंतर तेलुगू भाषेतही डब केला गेला.
‘छावा’ची तिकीटबारीवरची कामगिरी ही फक्त त्याच्या व्यावसायिक यशाचं निर्देशक आहे, असं मानणं सयुक्तिक ठरणार नाही. हे व्यावसायिक यश फक्त पैशांत मोजता येणारं नाही. पिंक व्हिलाच्या एका बातमीनुसार, ‘छावा’ने पावणेतीन कोटींचा फूटफॉल नोंदवलाय. याचाच अर्थ हा सिनेमा महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांमध्ये यशस्वीरीत्या पोहोचला आणि तो लोकांकडून बघितलाही गेला. महाराष्ट्राबाहेर शंभूराजेंची नवी ओळख निर्माण करण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला.
शिवपुत्र संभाजी ही शंभूराजेंची महाराष्ट्राबाहेरची मर्यादित ओळख पुसण्याचा पुरेपूर प्रयत्न या सिनेमाने केला असं यावरून निश्चितच म्हणता येतं. एक कुशल योद्धा, कविमनाचा विद्वान मित्र, पत्नीला प्रेमादराने वागवणारा पती, जनहितदक्ष राजा, कर्तव्यनिष्ठ पुत्र अशी शंभूराजांची अमराठी प्रेक्षकांना अपरिचित असलेली रूपं या सिनेमातून समोर आली, हेही नसे थोडके.
स्वार्थी इतिहासकारांनी आपल्या सोयीनुसार शंभूगाथा रचून छत्रपती संभाजी राजांचं यथेच्छ चारित्र्यहनन केलं. बदफैली, व्यसनी राजा म्हणून शंभूराजेंना इतिहासकारांकडून बदनाम केलं गेलं. या सगळ्या कथनाला ‘छावा’ छेद देतो. कादंबरीवर आधारित असल्याने हा सिनेमा पूर्ण सत्यता मांडतो, असं म्हणता येत नाही; पण रंजकतेने का होईना शंभूराजेंची वेगळी बाजू मांडण्यात हा सिनेमा यशस्वी ठरतो. भारताच्या शहरी भागात सर्रास आढळणार्या ‘क्रॉसवर्ड’सारख्या पुस्तकांच्या दुकानात अगदी दर्शनी भागात ‘छावा’ कादंबरीच्या इंग्रजी भाषांतरित प्रती पाहायला मिळताहेत, हे या सिनेमाच्या यशाचं आणखी एक बोलकं निर्देशक.
अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा महात्मा जोतिबा फुले यांचा जीवनप्रवास मांडण्याचा प्रयत्न करतो. हा सिनेमा 11 एप्रिल अर्थात फुले जयंतीचं निमित्त साधून रीलिज केला जाणार होता; पण सिनेमातल्या ट्रेलरमुळे आमच्या भावना दुखावत असल्याचा आरोप ब्राह्मण संघटनांनी केल्यामुळे ‘फुले’चं प्रदर्शन रखडलं. या ट्रेलरमध्ये एक लहान ब्राह्मण मुलगा सावित्रीबाई फुलेंना दगड मारतो, अशा आशयाचा एक प्रसंग दाखवला गेला होता. त्यामुळे हा सिनेमा रीलिज झाला, तर ब्राह्मणांविषयी समाजात तेढ निर्माण होईल, अशी भीती ब्राह्मण संघटनांनी व्यक्त केली. साहजिकच, या वादामुळे ‘फुले’ला अनपेक्षितपणे लोकप्रियता मिळाली.
मुळात ‘फुले’ हा हिंदी सिनेमा असल्याने त्याबद्दल उत्सुकता होती. गेल्यावर्षी आलेल्या ‘सत्यशोधक’ या महात्मा फुलेंच्याच जीवनावर आधारित असलेल्या मराठी सिनेमाला अपेक्षित प्रतिसाद तिकीटबारीवर लाभला नव्हता. बॉलीवूडचं वर्चस्व असलेल्या या सिनेक्षेत्रात मराठी सिनेमांचं अतोनात नुकसान झालंय, हे काही आता लपून राहिलेलं नाही. त्यामुळे ‘सत्यशोधक’ या मराठी सिनेमाचं अपयश पचवून मंडळी ‘फुले’च्या स्वागताला सज्ज झाली. त्यात प्रतीक गांधीसारखा एक गुणी अभिनेता यात कथानायक म्हणजेच महात्मा जोतिबा फुलेंच्या भूमिकेत झळकणार असल्याने सिनेमाबद्दलच्या अपेक्षा अधिकच वाढीस लागल्या.
बर्याच वादांनंतर आणि सेन्सॉर बोर्डच्या खोडसाळ हस्तक्षेपानंतर ‘फुले’ रीलिज झाला. प्रतीक गांधीचा अभिनय ही या सिनेमाची जमेची बाजू. महात्मा फुलेंचा बाणेदारपणा त्याने आपल्या देहबोलीतून मोठ्या सामर्थ्याने साकार केला आहे. पत्रलेखाने साकारलेली सावित्रीमाईंची भूमिकाही प्रभावी झाली आहे; पण ज्या कार्यासाठी जोतिबा फुलेंना आजही बहुजन आदर्श मानतात, ते जातिव्यवस्थेविरुद्ध केलेलं कार्य तितक्या प्रभावीपणे चित्रित झालेलं नाही. दिग्दर्शकाने सेन्सॉर बोर्डच्या आधीच जोतिबांचं कार्य सेन्सॉर केल्यासारखं वाटतं. त्यावर सेन्सॉर बोर्डच्या खोडसाळपणाने कळसच चढवलाय. असं असलं, तरी ज्यांनी अज्ञानी बहुजनांच्या मनात विद्रोहाचा अंगार फुलवला, ज्ञानाची ज्योत लावली अशा फुले दाम्पत्याचं संघर्षमय, प्रेरणादायी आयुष्य रूपेरी पडद्यावर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न यातून दिसून येतो. विशेषतः फुले दाम्पत्याचं एकमेकांविषयी असलेलं प्रेम, सहकार्य आणि आदर ठळकपणे जाणवतील, असे काही प्रसंग मनात घर करून जातात.
आपलं साहित्य आणि आपलं कार्य यातून महात्मा जोतिबा फुले यांचं नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेलं आहेच. महाराष्ट्राच्या वैचारिक वर्तुळातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्वसुरी म्हणून महात्मा जोतिबा फुले यांच्याकडे बोट दाखवलं जातं. अगदी अमराठी वैचारिक विश्वातही हीच परिस्थिती असली, तरी तिथं महाराष्ट्राइतकी लोकप्रियता महात्मा फुले यांना लाभलेली नाही, हेही खरं; पण ‘फुले’च्या निमित्ताने अमराठी वैचारिक विश्वाबाहेरही आता त्यांचं कार्य जनसामान्यांना समजू लागेल, अशी अपेक्षा करण्यात काही गैर नाही.
एखाद्या महनीय व्यक्तीचा जीवनपट अडीच-तीन तासांत दाखवणं तसं अवघडच काम. ‘छावा’ आणि ‘फुले’ या दोन्ही सिनेमांमधून ते अधिक प्रकर्षाने जाणवतं. त्यामुळे निवडक प्रसंगांतून त्या व्यक्तीच्या जीवनपटाची ओळख करून देणं ही दिग्दर्शकाची जबाबदारी असते. ‘छावा’मध्ये भव्यदिव्य सेटस्च्या झगमगाटात रायगडाच्या साधेपणाची श्रीमंती झाकून जाते. काही महत्त्वाचे प्रसंग घाईत उरकल्यासारखे वाटतात. ‘फुले’ हा तांत्रिकद़ृष्ट्या परिपूर्ण सिनेमा वाटत असला, तरी कथानकातला मवाळपणा अगम्य आणि असह्य वाटतो.
असं असलं तरी, महाराष्ट्राबाहेर दुर्लक्षित, अल्पपरिचित असलेले महाराष्ट्रीय आदर्श बॉलीवूडसारख्या मोठ्या सिनेजगतातून देशभर पोहोचवले जात आहेत, हेही नसे थोडके. माहितीपटांऐवजी व्यावसायिक सिनेमांच्या स्वरूपात हे नायक देशाच्या कानाकोपर्यांत सहजपणे पोहोचतील, हेही खरंय. सिनेमाला माध्यम म्हणून सत्य इतिहास मांडण्यात ज्या मर्यादा येतात, त्या लिखित स्वरूपातील माध्यमांचा वापर करून दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाऊ शकतो.
‘बाजीराव मस्तानी’मधून थोरले बाजीराव पेशवे, ‘तान्हाजी’मधून सुभेदार तानाजी मालुसरे, ‘पानिपत’मधून सदाशिवरावभाऊ, ‘हर हर महादेव’मधून बाजीप्रभू देशपांडे अशा महाराष्ट्रातील काही आदर्शांची ओळख अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न याआधीही झाला आहे. आता यात ‘छावा’ आणि ‘फुले’चीही भर पडलीय. महाराष्ट्रातून सिनेक्षेत्राला होणार्या आर्थिक लाभाचाही यात हात आहेच. असं असलं, तरी मराठी मातीतले हे आदर्श देशपातळीवर पोहोचताहेत, अमराठी लोकांना प्रेरणा देताहेत, ही गोष्ट सुखावह आहेच. त्याचबरोबर ती सिनेमा या माध्यमाची ताकद अधोरेखित करणारीही आहे.