

सोनम आणि राजाच्या प्रकरणामुळे पुरुषांना सदोदित खलनायकाच्या स्वरूपामध्ये उभे करण्याच्या मिथकाला मोठा तडा गेला आहे. पतीचे वागणे प्रेमळ असूनही पत्नीचे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झाल्याची कितीतरी उदाहरणे समोर आलेली आहेत. त्यामुळे विवाहाच्या नात्याला नैतिकतेच्या तराजूत तोलण्याऐवजी विवाहबाह्य संबंधांमध्ये जोडीदारांपैकी एकाची हत्या करणे हाच जोडीदारापासून सुटका मिळवण्याचा एकमेव मार्ग का वाटतो, याचा विचार गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे.
‘तब्बल 17 दिवसांनी पकडली गेली सोनम, प्रियकरासोबत पतीची हत्या करण्याचा रचला होता कट’, ‘सोनमने प्रियकर राजसाठी पती राजाला मारले’ अशा आशयाच्या मथळ्यांनी देशभरातील माध्यमे गेल्या काही दिवसांमध्ये व्यापून गेलेली दिसली. अर्थातच, ही बातमी दुःखद आणि वेदनादायक आहे; परंतु ती तितकीच खरीही आहे. मुळात इंदूरच्या राजा रघुवंशीचा मृतदेह शिलाँगजवळ सापडला, तेव्हाच या दुर्घटनेचा त्याच्या पत्नीशी किंवा तिच्यासोबतच्या नात्याशी काही तरी संबंध असणार, याबाबतचा अंदाज लावण्यात आला होता. दुर्दैवाने ही भीती खरी ठरली. खरे म्हणजे, एखादी असामान्य प्रवृत्ती सामान्य म्हणून स्वीकारली जाणे हे निरोगी समाजाचे निदर्शक असू शकत नाही. एका असामान्य प्रवृत्तीला सामान्य घटना म्हणून स्वीकारणे, जे कोणत्याही निरोगी समाजाचे लक्षण मानले जात नाही; पण गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांमुळे अशी लक्षणे वारंवार दिसू लागली आहे.
चालू वर्षाच्या सुरुवातीला मार्चमध्ये उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका पत्नीने तिच्या पतीची हत्या केल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणातील महिलेने पतीच्या मृतदेहाचे 15 तुकडे करून ते ड्रममध्ये ठेवले होते आणि तो ड्रम सिमेंटने बंद केला होता. अशा प्रकरणांची एक मोठी यादी सांगता येईल. ही यादी पूर्वग्रहदूषित द़ृष्टिकोनातून पुरुषांना खलनायक म्हणून दाखवल्या जाणार्या प्रत्येक मिथकाला तोडून टाकणारी आहे.
‘व्हेन शी वॉज बॅड : व्हायोलंट विमेन इन द मिथ ऑफ इनोसेन्स’ या पुस्तकात प्रसिद्ध लेखिका पॅट्रिशिया पिअर्सन यांनी सामाजिक विकृती आणि हिंसक कृत्यांना केवळ पुरुषांशीच जोडू पाहणार्या सामाजिक धोरणांमधील कमतरतांवर प्रकाश टाकला आहे. त्यातून त्यांनी महिला या निसर्गतःच सोशिक असतात आणि भयावह गुन्हेगारी वर्तन करण्यास असमर्थ असतात या पारंपरिक समजाला पॅट्रिशिया यांनी छेद दिला आहे. त्या ठामपणे सांगतात की, महिला आक्रमक आणि हिंसक असू शकतात. त्यामुळे आक्रमकता आणि हिंसाचार यामध्ये लिंगभेद केला जाऊ नये किंवा पुरुषी स्वभावगुण म्हणून त्यांकडे पाहिले जाऊ नये. तसे मानणे हा सामाजिक न्यायव्यवस्थेतील एक मोठा अडथळादेखील आहे.
‘विवाह संस्था कोसळत आहे’ हा निश्चितच एक संवेदनशील विषय मानला जात आहे आणि सामाजिक आणि मानसिक चर्चेत स्थान मिळवत आहे. कारण, जर विवाहसंस्थाच टिकली नाही, तर हळूहळू समाजही कोसळेल. विवाहबाह्य संबंध हादेखील सामाजिक चर्चेचा विषय राहिला आहे; परंतु ही चर्चा पुरुषांबद्दलचा पक्षपात स्पष्टपणे दर्शवणारी असते. यामध्ये नेहमीच केवळ पुरुषच विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करतात, ही धारणा रूढ झालेली दिसते. त्यामुळे एखाद्या विवाहित महिलेचे विवाहबाह्य संबंध असले, तरीही त्याकडे समाज पतीचा काही तरी दोष असावा, अशा अनुषंगाने पाहतो. वास्तविक पाहता, पतीचे वागणे प्रेमळ असूनही पत्नीचे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झाल्याची कितीतरी उदाहरणे समोर आलेली आहेत. त्यामुळे या नात्याला नैतिकतेच्या तराजूत तोलण्याऐवजी विवाहबाह्य संबंधांमध्ये जोडीदारांपैकी एकाची हत्या करणे हाच जोडीदारापासून सुटका मिळवण्याचा एकमेव मार्ग का वाटतो, याचा विचार गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे.
या संबंधामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे की, हे खून तत्काळ उद्भवलेल्या रागातून किंवा क्षणिक आवेशातून केले जात नाहीत, तर नियोजनबद्ध पद्धतीने केले जाताहेत. यामुळे असाही प्रश्न उद्भवतो की, असे घृणास्पद गुन्हे केल्यानंतर आपले जगणे जवळजवळ अशक्य आहे किंवा दुष्कर बनणार आहे, याची या महिलांना कल्पना नसेल का? की आपण बनवलेल्या योजना अत्यंत सुनियोजित आणि निर्धोक असल्याने पोलिसांना याचा सुगावाही लागणार नाही, अशा भ्रमात त्या राहतात? आजच्या काळात तांत्रिक कौशल्य आणि आधुनिक कार्यप्रणालीने सुसज्ज असलेल्या पोलिस यंत्रणेत गुन्हेगारांना दीर्घकाळ लपून राहणे किंवा गुन्हा उघडकीस न येणे हे तितकेसे सोपे राहिलेले नाही.
‘डिसिजन सायन्स, रिस्क परसेप्शन अँड इनफिडेलिटी’मध्ये निकोल मेरी जॅपियन डिसिजन सायन्स मॉडल जजमेंट’ वर चर्चा करताना आपण कोणत्या पद्धतीने निर्णय घेतो, विशेषतः जोखीम असलेले निर्णय कसे घेतो, ही बाब उघड करतात. त्यांच्या मते, सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील संबंधांमध्ये घेतलेल्या निर्णयांचे परिणाम विचारात घेतले जातात; परंतु हे मॉडेल महत्त्वाच्या वैयक्तिक निर्णयांवर प्रभावी नाही. निकोल यांच्या या संशोधनातून स्पष्टपणे दिसून येते की, स्वतःच्या आणि समाजाच्या भल्यासाठी आवश्यक असूनही विवाहबाह्य संबंधांचे परिणाम विचारात घेतले जात नाहीत. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, विवाहबाह्य संबंध केवळ जोडीदाराच्या हत्येनेच का संपतात? दुसरा कोणताही मार्ग नाही का? जोडीदार हा आपल्या विवाहबाह्य प्रेमसंबंधात अडथळा ठरत असेल, तर त्याला सोडून देणे हा एक चांगला पर्याय नाही का?
निकोल मेरी गॉटफ्राईड यांनी ‘जर्नल ऑफ फेनोमेनोलॉजिकल सायकॉलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द बिगिनिंग ऑफ अॅन एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर : अ डिस्क्रिप्टिव्ह फेनोमेनोलॉजिकल सायकॉलॉजिकल स्टडी अँड क्लिनिकल इम्प्लिकेशन्स’ या शोधनिबंधामध्ये म्हटल्यानुसार समाज आधुनिक असो वा पारंपरिक, वैवाहिक संबंधांपासून मुक्तता सोपी नाही आणि वैवाहिक संबंधांच्या गुंतागुंतीमुळे व्यक्तीचे व्यक्तित्व विस्कळीत होते.
निश्चितच, आजही भारतीय समाजात वैवाहिक संबंधांपासून वेगळे होणे हे एक कलंक मानले जाते आणि त्यासाठीचा दीर्घ भावनिक, आर्थिक आणि सामाजिक संघर्ष जीवनाला वेदनादायक बनवतो. कदाचित, यामुळेच विवाहबाह्य संबंधात अडकलेली व्यक्ती आपल्या जोडीदाराची हत्या करून स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग शोधते; पण खरोखरच स्वातंत्र्याचा हा मार्ग आहे का? स्वतःचे जीवन संपवून स्वातंत्र्य कधीच मिळू शकत नाही, याचा विचार करणे आवश्यक आहे. समाज अनैच्छिक संबंध जिवंत ठेवण्यासाठी दबाव का आणतो, हेदेखील गंभीर चिंतनाचा विषय आहे. विशेषतः पालकांनी ही बाब समजून घ्यायला हवी की, आपल्या मुलाच्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती असूनही त्यांचा विवाह दुसर्या मुलगा अथवा मुलीशी करून देणे हे अंतिमतः मुलामुलींच्या जीवनाचा नाश करणारे ठरते. आपल्याला असा समाज निर्माण करावा लागेल जिथे लग्नातून सन्मानाने बाहेर पडण्याचा मार्ग खुला असेल आणि असे झाले नाही, तर खुनाकडे उपाय म्हणून पाहण्याची प्रवृत्ती थांबवणे कठीण होईल. मेरठ, जयपूर, इंदूर, बेंगळुरूसारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी याबाबत प्रामाणिकपणे विचार होणे आवश्यक आहे.