Pandhari Wari 2025 | विठोबा लोभ असो देई

महाराष्ट्रीय संस्कृतीचा एक वैभवशाली सोहळा म्हणजे पंढरीची वारी
Pandhari Wari 2025
Pandhari Wari 2025 | विठोबा लोभ असो देईPudhari File Photo
Published on
Updated on

भागवत साळुंके, आळंदी

पंढरीकडे येतानाची वाटचाल जितकी महत्त्वाची तेवढंच महत्त्व माघारी जाण्याच्या प्रवासालाही आहे. माहेरवाशीण सासरी जाताना तिच्या अंतःकरणात जी कालवाकालव असते, पांडुरंगाचा निरोप घेऊन पंढरपूर सोडताना तीच अवस्था वारकर्‍यांची होते. भक्ताची देवाशी भेट होण्याआधीची अवस्था म्हणजे पूर्व राग. देव व भक्ताचा संगम म्हणजे मिलन. मिलनानंतर परस्परांहून वेगळे होणे म्हणजे विरह. विरहाच्या नंतर घडणार्‍या मिलनात प्रेमाचा परमोत्कर्ष असतो. त्यामुळेच विठूच्या विरहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

महाराष्ट्रीय संस्कृतीचा एक वैभवशाली सोहळा म्हणजे पंढरीची वारी. लाखोंच्या संख्येने वारकरी ज्ञानोबा-तुकोबादि संतांच्या पालख्यांसमवेत मजल-दरमजल करत विठुरायाच्या भेटीला प्रतिवर्षी जात असतात. सर्व स्तरांतील प्रसिद्धी माध्यमांच्याही आस्थेचा हा सोहळा झाल्याने तो सार्‍या जगभर पोहोचलाही आहे. काही परदेशी लोकांचा वारीतील सहभाग हे त्याचेच द्योतक होय. ‘वारी म्हणजे एखाद्या ठिकाणी वारंवार जाणे व परत येणे. हे वारीचे स्थूलस्वरूप होय. यानुसार कोणाची-कशाचीही वारी असू शकते. ‘येरझारा’, ‘खेट्या’ असे पर्यायी शब्द याच क्रियेचे होत. यानुसार पंढरीला जाणारे व येणारे ते पंढरीचे वारकरी!

जाणे व येणे या दुहेरी क्रियांचा अंतर्भाव ‘वारी’ या प्रक्रियेमध्ये आहे. आषाढ शुद्ध एकादशी हा या समारंभाचा मुख्य दिवस. आदला दिवस दशमीचा. दशमीच्या दिवशी पालखी सोहळा पंढरपुरात पोहोचतो. दशमीपर्यंतच्या प्रवासाचा कालावधी आपापल्या अंतरानुसार प्रत्येकाचा भिन्न आहे. म्हणजे, ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्याची वाटचाल अठरा दिवसांची, तुकाराम महाराज एकोणीस दिवस, निवृत्तीनाथ अठ्ठावीस, तर मुक्ताई छत्तीस दिवस इ.... दशमी ते चतुर्दशी असे एकूण पाच मुक्काम कररून पौर्णिमेला पालखीच्या परतीचा प्रवास सुरू होतो.

पंढरपूर वास्तव्याच्या काळात एकादशीला नगर प्रदक्षिणा संपन्न होते. आळंदी ते पंढरपूर प्रवासाची जी संरचना असते जसे की, पालखी येत असल्याची चाहूल देणारा नगारा असणारी बैलगाडी अर्थात नगारखाना, मागे अश्व, त्यामागे भजन करणार्‍या वारकरी दिंड्या, पालखी रथ, रथाच्या मागील दिंड्या. याच पद्धतीने पंढरपूरनगराची प्रदक्षिणा केली जाते. विठुरायासाठी आपण पंढरपुरात आलो. तथापि, त्या नगरात वास करणार्‍या अन्य ज्या देवता आहेत. जसे की, पुंडलिक, चंद्रभागा इ. त्यांचीही प्रसन्नता आपल्यावर असावी, यासाठी त्या सर्वांच्या ओळीने भेटी घेत घेत त्यांच्या वर्णनाचे अभंग त्या-त्या स्थळी म्हणत नगराला, जिथून सुरुवात केली त्या बिंदूपर्यंत गोलाकार उजव्या दिशेने वळणे घेत पूर्ण केलेली फेरी म्हणजे प्रदक्षिणा. जवळपास सर्वच तीर्थक्षेत्रांना असा प्रदक्षिणा मार्ग निर्धारित केलेला आहेच.

देशभरातून आलेल्या वारकर्‍यांना दर्शनासाठी संतांच्या पादुका चार दिवस उपलब्ध असतात. प्रदक्षिणेदरम्यान ‘चंद्रभागा स्नान’ हा विधी घडलेला असतोच. तितकाच महत्त्वाचा दुसरा भाग म्हणजे हरिकथा. नित्योपचारांमध्ये काकडा, भजन, कीर्तन व जागर अशी विठोबाची वाङ्मयीन पूजा पादुकांच्या साक्षीने वारकरी मंडळी अतीव प्रेमाने करतात.

आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा हा संतांनी विठोबाचा निरोप घेण्याचा दिवस. सकाळी सकलसंतांच्या पादुका व विठोबा यांच्या भेटीचा सोहळा पार पडतो अन् परतीचा प्रवास सुरू होतो. पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास हा येण्याच्या कालावधीपेक्षा निम्म्याच दिवसांचा असतो. त्यामुळे साहजिकच चालण्याचा वेग हा अधिकच असतो. जाताना असलेल्या दैनंदिनीत येताना काही बदल असतात. धुपारती, समाज आरती या गोष्टी दोन्ही बाजूंनी सारख्याच असतात; मात्र परत येताना पालखी तळावर कीर्तन व जागर हे वजा असते. पंढरीकडे जाताना जी संख्या असते, त्या तुलनेत परतवारीत लोक खूप कमी असतात. विणा हे स्वरवाद्य वारकरी दिंडीतील महत्त्वाचा घटक आहे. तो धारण करून चालणारा वारकरी म्हणजे विणेकरी. दिंडीतील भजनाचे नियमन किंबहुना एकूणच नियंत्रणाचा अधिकार हा विणेकर्‍याचा. पालखी सोहळ्याची यंत्रणा जेव्हा दिंड्यांची हजेरी घेते तेव्हा विणेकरी उपस्थित असेल, तरच त्या दिंडीची हजेरी ग्राह्य धरण्यात येते. वारीच्या परतीच्या प्रवासात सोहळ्यातील प्रत्येक दिंडीचा विणेकरी असणे हे अनिवार्य आहे. त्यामुळे परतीचा सोहळा तुम्ही पाहाल, तर एकूण उपस्थितीत विणेकर्‍यांची संख्या लक्षणीय असते. एक विणेकरी म्हणजे एक दिंडी असा थोडक्यात अर्थ!

पंढरीकडे येतानाची वाटचाल जितकी महत्त्वाची तेवढंच महत्त्व माघारी जाण्याच्या प्रवासालाही आहे. प्रकाशझोतात फक्त येतानाचीच मार्गक्रमणा आहे; मात्र वारीची पूर्णता ही जिथून निघालो तिथे जाऊन थांबण्यात आहे. भक्त व भगवंत या दोन घटकांमध्ये घडणारी क्रिया म्हणजे भक्ती. परमप्रेमाचे प्रतीक म्हणजे भक्ती. भक्त व भगवंत एकरूप झाल्यानंतरही हे प्रेम अबाधित राहावे, यासाठी पुन्हा भक्त व भगवंताने आपापल्या जागी जाणे, विभक्त होणे. म्हणून वारकर्‍याने देवाचा निरोप घेऊन परत फिरण्यातही भक्तियोगाच्या द़ृष्टीने एक अर्थ आहे. ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायात या आशयाचा एक संदर्भ येतो.

भगवान कृष्ण व भक्तराज अर्जुन यांचा संवाद अत्यंत रंगात आला. आनंदाने बेहोश होऊन श्रीकृष्णाने अर्जुनाला आलिंगन दिले. अर्जुनाला मिठीत घेऊन कृष्ण बोलले, ‘जसे दोन ओठ, पण बोलणे एक. पाय दोन, पण चालणे एक. याप्रमाणे अर्जुना, आम्ही व तू एकरूप आहोत. याप्रसंगी व्याख्यान करणारा उपदेशक मी व प्रश्न करणारा श्रोता तू असे तत्त्वतः दोघेही एकच आहोत.’ अशारीतीने प्रेमाने भुलून जाऊन देव जो अर्जुनाला मिठी मारून राहिले; मग एकदम बिचकले व मिठी सैल करत म्हणाले की, ‘हे ऐक्याचे प्रेम या ठिकाणी बरे नव्हे!’ कोणत्याही पदार्थात मीठ टाकले असता त्या पदार्थाला रुची येते; पण उसाच्या रसापासून बनलेल्या गुळाच्या ढेपीला रुचीकरता मीठ लावणे योग्य नाही. कारण, त्यामुळे गुळाला चव न येता गुळाच्या असलेल्या गोडीचा नाश होईल. त्याप्रमाणे ऐक्याचे प्रेम हे चांगले आहे; परंतु संवादाच्या प्रसंगी ते चांगले नाही. कारण, त्यामुळे संवादसुखाची असलेली गोडी नाहीशी होईल. आम्ही नारायण व हा अर्जुन नर असल्यामुळे आम्हा दोघांमध्ये मूळचाच भिन्नपणा नाही; पण ही माझी ऐक्यप्रेमाची उकळी माझ्या ठिकाणी आता नाहीशी होवो!

ऐसें म्हणौनि आलिंगिलें। कृपादृष्टी अवलोकिलें ।

मग देवो काय बोलिले । अर्जुनेंसीं ॥

पैं दोहीं वोठीं एक बोलणें । दोहीं चरणीं एक चालणें ।

तैसें पुसणें सांगणें । तुझें माझें ॥

एवं आम्हीं तुम्हीं येथें। देखावें एका अर्थातें ।

सांगतें पुसतें येथें । दोन्ही एक ॥

ऐसा भुलला देवो मोहें । अर्जुनातें आलिंगूनि ठाये ।

मग बिहाला म्हणे नोहे। आवडी हे ॥

जाले इक्षुरसाचे ढाळ। तरी लवण देणें किडाळ ।

जे संवादसुखाचें रसाळ । नासेल थितें ॥

आधींच आम्हां यया कांहीं। नरनारायणा सिनें नाहीं ।

परी आतां जिरो माझां ठाईं । वेगु हा माझा ॥

भक्तीच्या तीन अवस्था सांगितल्या जातात. पहिली पूर्व राग, दुसरी मिलन राग व विरह राग ही तिसरी. भक्ताची देवाशी भेट होण्याआधीची अवस्था म्हणजे पूर्व राग. देव व भक्ताचा संगम म्हणजे मिलन. मिलनानंतर परस्परांहून वेगळे होणे म्हणजे विरह. विरहाच्या नंतर घडणार्‍या मिलनात प्रेमाचा परमोत्कर्ष असतो. त्यामुळे विरहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकरी विठोबाचा निरोप घेतात तो पुन्हा मिलनासाठी. या वारकरी भक्तांची विठोबालाही प्रीती असल्याने आषाढीला निरोप घेणार्‍या आपल्या प्रिय सुहृदांना तो कार्तिकीला येण्याचा आग्रह धरतो. ‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज...’ असे वारंवार तो केवळ बजावतच नाही, तर ‘वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तातडी उतावीळ ॥’

पंढरीहून माघारी फिरलेला वारकरी हा अन्यत्र कुठे जाण्यासाठी परत फिरलेला नसतो. आपल्या उपास्य पांडुरंगाशी तो अनन्य आहे. चातकाची मेघाशी, कमळाची चंद्राशी, माशाची पाण्याशी तद्वत वारकर्‍याची अनन्यता विठोबाशी! वारकरी कोणत्या प्रांतातला, वयोगटातला, कुळातला, जातीतला नव्हे-नव्हे कोणत्या धर्माचा याला कवडीची किंमत नाही. विठोबाशी निष्ठा हाच वारकर्‍यांचा धर्म.

भीमा नदीच्या काठावर वसलेलं एक नगर की, जेथे विठ्ठलाचं वास्तव्य आहे. हे पंढरपूरचं अत्यंत ढोबळ वर्णन आहे. वारकर्‍यांच्या भावद़ृष्टीने त्याकडे पाहायचे झाल्यास,

हे माहेर संतांचे । नामया स्वामी केशवाचे ॥

पंढरी हे आमचं माहेर आहे. कुटुंबव्यवस्थेत मुलीला माहेर किती प्रिय असते, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. माहेरवाशीण सासरी जाताना तिच्या अंतःकरणात जी कालवाकालव असते, पांडुरंगाचा निरोप घेऊन पंढरपूर सोडताना तीच अवस्था वारकर्‍यांची होते.

कन्या सासुर्यासी जाये । मागें परतोनि पाहे ॥

तैसें झालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news