

इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्याची पद्धत आणि पहलगाममधील हल्ल्याची पद्धत यामध्ये साधर्म्य आहे. त्यामुळे आता उत्तरही इस्रायल स्टाईलनेच द्यायला हवे. पाकिस्तानलाही याची कल्पना आहे की, आजचा भारत पूर्वीचा भारत नाहीये. तो घरात घुसून ठोकणारा आहे. प्रत्यक्ष युद्ध झाले तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडून जाईल.
पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला म्हणजे पाकिस्तानला झालेली ‘विनाशकाले विपरीत बुद्धी.’ पाकिस्तानबाबत असं म्हटलं जातं की, इतर देशांना सैन्य असतं; पण पाकमध्ये सैन्याला देश आहे. पाकिस्तानातील तथाकथित लोकशाही ही फसवी आहे. पाकिस्तानातील लोकप्रतिनिधी किंवा पंतप्रधानांना वेगळे अधिकार नाहीत. त्यांना लष्करप्रमुखांचं ऐकावं लागतं. पाकिस्तानचा सध्याचा लष्करप्रमुख म्हणजेच तेथील खरा राज्यकर्ता जनरल असीम मुनीर काही दिवसांपूर्वी असं म्हणाला होता की, पाकिस्तान मुस्लिम म्हणून आम्ही वेगळे राष्ट्र आहे. आपण हिंदूंबरोबर राहू शकत नाही, म्हणून आपल्या पूर्वजांनी फार मोठा संघर्ष केला आणि पाकिस्तान निर्माण केला. पहलगामचा हल्ला होण्याच्या आधीही आणि नंतरही मुनीरचं हे भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेलं आहे. मी त्यावेळीही म्हटलं होतं की, मुनीरचं भाषण हे पाकिस्तानसाठी नाही, बांगला देशसाठीही नाही, तर ते भारतासाठी आहे. जर भारतामध्ये असे काहीजण असतील जे भारताच्या भूमीवर असूनही त्यांची निष्ठा भारताशी नाही, त्यांच्यासाठी दिलेला तो सिग्नल होता. मुनीरच्या त्याच भाषणामध्ये उल्लेख होता की, काश्मीरला आम्ही कधीही एकटं पडू देणार नाही. तोही एक प्रकारचा सिग्नल होता. त्यापाठोपाठ घडलेली पहलगामची घटना ही जोडून पाहावीच लागेल. ती पाहिल्यास हा हल्ला केवळ दहशतवादी हल्ला नसून त्यामागे पाकिस्तान, तेथील लष्कर आणि ‘आयएसआय’ यांचं पद्धतशीर नियोजन आहे. आता तर त्यांचा मंत्री ख्वाजा अब्बास स्वतःच म्हणतोय की, ही कारवाई पाकिस्तानच्या लष्करानं केली असून, याबाबत आम्हाला अंधारात ठेवण्यात आलं. या सगळ्यामध्ये सूक्ष्म फरक शोधावे लागणार आहेत. खरे तर एकानं मारल्यासारखं करायचं आणि दुसर्यानं रडल्यासारखं करायचं, असा हा प्रकार आहे; पण ते काहीही असलं तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की, आताचा भारत हा गप्प बसून ऐकून घेणारा नाही.
आज पाकिस्तानची स्थिती हालाखीची आहे. अर्थव्यवस्था कोलमडल्यात जमा आहे. ‘आयएमएफ’कडून मदत मिळाल्याशिवाय पाकिस्तानचा डोलारा टिकूही शकत नाही इतक्या डगमगणार्या अवस्थेत आहे. पाकिस्तानच्या चार प्रमुख प्रांतांपैकी तिघांना पाकिस्तानात राहायचंच नाहीये. खैबर पख्तुनख्वा (केपीके), ज्याचं रूढ नाव नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्सेस. तेथे तालिबानशी लढाई सुरू आहे. तेथील फार मोठ्या भागावर पाकिस्तानचं नियंत्रणही नाहीये. सिंधमध्येही पाकिस्तानपासून वेगळं होण्याची ‘जियो सिंध चळवळ’ सुरू आहे. बलुचिस्तानमध्ये तर पाकिस्तानातून फुटण्यासाठीच्या कारवाया कमालीच्या वाढलेल्या आपण पाहतो आहोत. इतक्या सगळ्या भीषण स्थितीत भारताबद्दलचा द्वेष, तोही हिंदूंबद्दलचा, ‘काफिर’ म्हणून इस्लामच्या आधारावर हा उरलेला एकमेव रस्ता पाकिस्तानकडे शिल्लक होता. त्यामुळं यातील स्ट्रॅटेजिक थिंकिंग समजून घ्यावं लागेल की, ठरवून, नियोजन करून केलेला हा हल्ला होता. म्हणजेच मी लावलेला त्याचा अर्थ असा की, पाकिस्तानला एकत्र राहण्यासाठी शत्रू म्हणून भारत हवा आहे. त्यामुळं आता घडवून आणलेला, केलेला हल्ला हा इस्लामच्या नावाने पाकिस्तान एकत्र राहावा यासाठीही करण्यात आला होता. मुस्लिम म्हणून आम्ही वेगळे आणि त्यासाठी आम्ही संघर्ष केला, हे दाखवण्याचा हा प्रयत्न. प्रत्यक्षात पाकिस्ताननं काहीही संघर्ष वगैरे केलेला नाही. ब्रिटिशांच्या मदतीनं घडलं पाकिस्तान; पण आताच्या स्थितीमध्ये भारत आणि त्यातल्या हिंदूंबद्दलचा द्वेष, काफिर... ही पाकिस्तानला मुस्लिम म्हणून एकत्र आणण्यासाठीची जनरल मुनीरची खेळी आहे.
मी सुरुवातीला जे विनाशकाले विपरीत बुद्धी असा उल्लेख केला होता, तो याच अर्थानं की, रिअॅक्शनल किंवा द्वेषमूलक - हिंदूंबद्दलचा द्वेष दाखवण्यासाठी पाकिस्ताननं जरी ही कृती घडवून आणली असली, तरी त्यांच्या पाठीशी कोण उभं राहणार? ऑगस्ट 2024 च्या बांगला देशच्या घडामोडींनंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगला देश-पाकिस्तान मैत्रीच एक पर्व चालू झालंय. पाकिस्तानी अधिकार्यांनी बांगला देशला भेट देऊन झाली. आपल्या चिकन्स नेकवर त्यांनी आणि ‘आयएसआय’ने सर्व्हे करून झाला. बांगला देश चीनला ‘आम्हाला तुमची क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रे द्या’ असं सांगतोय. म्हणजेच चीनशी जवळीक साधतोय. भारतातील ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणजेच ईशान्येकडील सात राज्ये ही ‘लँडलॉक्ड’ आहेत, हे बीजिंगमधलं युनूस यांचं विधान खोडसाळपणाचं होतं. पाकिस्तान-बांगला देशच्या इस्लामी शक्तींची एकजूट. आतापर्यंत भारताच्या संरक्षण व्यवस्थेचा अभ्यास करणार्या जाणकारांनी ‘टू अँड हाफ फ्रंट वॉर’ ही संकल्पना मांडली होती; पण 5 ऑगस्ट 2024 च्या संध्याकाळी मी असं म्हटलं होतं की, आता हे ‘थ्री अँड हाफ फ्रंट वॉर’ बनलं आहे. भारताला पाकिस्तान आणि बांगला देश या दोन्ही बाजूंनी धोका असून, त्यांच्या मागे ‘छू’ करण्यासाठी चीन आहेच! पण पहलगामच्या घटनेनंतर युनायटेड नेशन्समध्ये चीननं पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही. त्याचं कारण स्पष्ट आहे. अमेरिकेविरुद्धचे चालू टॅेरीफ वॉर आणि त्यामुळं झालेली अडचण. यामुळंच चीनला आता सुचू लागलंय की, ड्रॅगन अँड एलिफंट शुड डान्स विथ टुगेदर. असं असलं तरी चीनची सर्व पावलं सरळसरळ भारतविरोधीच आहेत. पूर्वीच्या काळी जिओस्ट्रॅटेजिक विचार करणार्यांनी फार छान वाक्य वापरलं होतं की, चायन विल फाईट इंडिया टू लास्ट पाकिस्तान. पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती भारताविरुद्ध चालवण्याचा चीनचा डाव आहे. त्यामुळं चीनकडूनही पाकिस्तानला सिग्नल असू शकतो आणि ख्वाजा अब्बास जे म्हणतोय ती नौटंकी असण्याची शक्यता आहे. आर्मीकडून सिग्नल आल्याशिवाय तेथील मंत्री असं विधान करणारच नाही. पहलगाम हल्ल्यानंतर मुनीरचं कसलंही वक्तव्य समोर आलेलं नाही. यामागचा उद्देश हा हल्ला आम्हीच केला आहे, हे दाखवणं.
आजची परिस्थिती पाहता दिसणारी लक्षणं युद्धाच्या दिशेनं जाणारी आहेत, असं हळूहळू स्पष्ट होत चाललं आहे. पण प्रत्येक पावलाला वाटा अनेक असतात. त्यामुळं परिस्थिती युद्धाच्या दिशेनं जाईल की नाही, हे पहावं लागेल. पण सर्वसाधारण दिशा पाहिल्यास पाकिस्ताननं युद्धाची तयारी सुरू केली आहे आणि मी सूक्ष्म शोध घेतला असता असं आढळलं की, चीननंही तिबेटमधील विमानतळांवर एअरफोर्सची विमानं आणि तोफा आणून ठेवल्या आहेत. याचा अर्थ वाटचाल युद्धाच्या दिशेनं सुरू आहे. पण अशा विषयांमध्ये नेहमी दोन अधिक दोन बरोबर चार असं नसतं. म्हणूनच भारतानं काही महत्त्वाची पावलं उचलत हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. यातील पहिलं पाऊल म्हणजे सिंधु नदी पाणीवाटप कराराला स्थगिती दिली आहे. पाकिस्ताननं त्यापुढं जाऊन सिमला करार रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला; पण हा निर्णय म्हणजे बुडत्याचा पाय खोलात नेणारा आहे.
लोकांमधील आताचा आक्रोश आणि भावनांचा अतिरेक स्वाभाविक असला तरी युद्ध जिंकण्यासाठी भावनातिरेक कामाचा नसतो. त्याला पद्धतशीर नियोजन असावं लागतं. बालाकोटनंतर आता मी तपशील सांगतोय की, बालाकोटमधील 150-200 मोबाईल ट्रॅक केले होते. आपल्या डिजिटल रेकॉर्डस्मध्ये माहीत होतं की, हे लष्करे तैय्यबाचे अतिरेकी आहेत. ते सर्व एकत्र असल्याचं डिजिटल ट्रॅकिंगमुळं लक्षात आलं तेव्हा आपण बॉम्ब टाकून त्यांना मारलं. हीच योग्य पद्धत असते. अशा गोष्टी सांगून केल्या जात नाहीत. राजनैतिक पातळीवर ‘टिट फॉर टॅट’नुसार गोष्टी घडताहेत. पण यावेळचं प्रत्युत्तर हे वेगळं असलंच पाहिजे.
सध्या भारतानं स्थगित केलेल्या सिंधु नदी पाणी वाटप करारामुळं काय साधलं जाणार हे जाणून घेण्यासाठी आपण आधी हा करार समजून घेऊया. रावी, बियास, झेलम, चिनाब, सतलज या पाच मिळणार्या उपनद्या सिंधु नदीला जाऊन मिळतात. आपण नकाशात पाहिलं असता भारतातल्या काश्मीरच्या भागातून त्या ईशान्येकडून दक्षिणेकडे वाहताना दिसतात. या सहांमध्ये पूर्वेकडे वाहणार्या तीन नद्यांचं पाणी भारताला आणि पश्चिमेकडे वाहणार्या नद्यांपैकी सिंधु, झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाकिस्तानला असं या पाणीवाटप करारात ठरलं आहे. आंतरराष्ट्रीय संकेतांनुसार वाहतं पाणी वापरता येईल, वाहत्या पाण्यावर प्रकल्पही उभारता येतील, शेतीसाठी आवश्यक असणारं पाणी वापरता येईल; पण करारामध्ये ठरल्यानुसार पाकिस्तानच्या वाट्यात असणार्या नद्यांचं पाणी भारताला वापरता येणार नाही. मी पूर्वीपासून हा मुद्दा मांडत आलो आहे की, हा करार भारतासाठी अन्याय्यकारक आहे. आपली अतिउदारता, अतिसहिष्णुता यामुळं 80 टक्के पाणी पाकिस्तानला गेलं आणि 20 टक्के भारताच्या वाट्याला आलं. यामुळं भारताच्या कोणत्या राष्ट्रीय हितसंबंधांचं रक्षण झालं? 1960 च्या त्या करारापासून आजपर्यंतचा विचार केल्यास या काळात भारत-पाकिस्तान यांच्यात चार युद्धं झाली, अतिरेकी हल्ले झाले, तणाव निर्माण झाला, तरीही हा करार टिकून होता. कारण तो मोडण्यासाठी पाकिस्तान काही करु शकत नाही. तो निर्णय भारतालाच घ्यावा लागणार आहे. गेल्या 50 वर्षांत आपल्या वाट्याला असलेलं 20 टक्के पाणीही आपण वापरत नव्हतो. याचं कारण कलम 370 मुळं काश्मीरमध्ये विकास प्रकल्प उभे करणे, भांडवल आणणं, गुंतवणूक करणं खासगी क्षेत्राला अशक्य होऊन बसलं होतं. केवळ सरकार ते करु शकत होतं. दरम्यानच्या काळात तेथील किशनगंगासारख्या नद्यांवरील प्रकल्पांचे वाद न्यायालयात गेले होते. पण त्याचे निकाल आपल्या बाजूने लागले आहेत. पण 2019 नंतर ही परिस्थिती बदलली. आपल्या वाट्याचं 20 टक्के पाणी वापरण्यास आपण सुरुवात केली. त्यावेळीही पाकिस्तानने ओरडाआरड सुरु केली होती. पाकिस्तानचा भारत आणि हिंदूद्वेष इतका टोकाचा आहे की, पाकव्याप्तमध्ये जाणार्या किशनगंगा नदीला ते नीलम नदी म्हणतात. खरं तर नीलम हा शब्द मूळचा संस्कृतमधील आहे. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, पाकिस्तानकडे एक राष्ट्र म्हणून टोकाचा धर्मांध इस्लामिक हिंदू द्वेष यापलीकडे त्यांना एकत्र ठेवणारं काहीही नाहीये. त्यामुळंच तेथील राजकीय नेत्यांकडून ‘खुनशी लबाडी’ करुन पाकिस्तान धोक्यात येतो तेव्हा धर्मांध इस्लामिक हाक दिली जाते. आज आपण सिंधु करार मोडणार म्हणजे पाकिस्तानच्या वाट्याचं 80 टक्के पाणी अडवणार. हे लगेच शक्य नाही. त्यामुळं पाकिस्तानला तात्काळ याची झळ बसणार नाही. पण पाकिस्तानातीलच एका अभ्क्षासकाच्या मते भारताने पाणी अडवल्यास दीर्घकालीन दृष्ट्या पाकिस्तानला मोठी झळ बसू शकेल. अर्थातच, या गोष्टीला वेळ लागेल.
पण मूळचा मुद्दा आहे तो म्हणजे, जनरल असीम मुनीरनं केलेली वक्तव्ये आणि त्यातून दिसणारी येणार्या काळातील स्थिती. आम्ही मुसलमान आहोत आणि हिंदूंबरोबर कधीही राहू शकत नाही. कारण आमचा देव वेगळा आहे, मजहब वेगळा आहे आणि त्यासाठी आम्ही संघर्ष केला. लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, आज भारतातही अशा वैचारिक, राजकीय, व्यावहारीक शक्ती आहेत, ज्या ‘टू नेशनल थिअरी’ किंवा ‘द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांता’बाबतचा दोष सावरकरांना देतात. पण सावरकरांनी असलेली वस्तुस्थिती सांगितली होती आणि तीही 1923 च्या नंतर. आज जनरल मुनीरने आधुनिक काळातही ही वस्तुस्थिती कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. हे भयंकर धोकादायक यासाठी आहे की, आताच्या भारतात कोट्यवधी मुस्लिम आहेत; मग त्यांना तो फोडण्याचा प्रयत्न करतोय का? ते फुटतील का? पहलगामच्या घटनेतही आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म कोणता हे विचारले आणि जे हिंदू आहेत त्यांनाही मारलेे आणि एक ख्रिश्चन होता त्यालाही मारले. कारण त्यांच्या धारणेनुसार इस्लाम हा एकच धर्म, प्रेषित, पुस्तक. या टोकाच्या इस्लामिक धर्मांधतेचा पद्धतशीरपणाने घडवलेला आविष्कार म्हणजे पहलगामचा हल्ला आहे. यावर आपण आपली राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट करून पाकिस्तानच्या या धर्मांधतेचा पराभव केला पाहिजे. भारतीय संस्कृतीची मुळातली सहिष्णुता ही एकात्मता टिकवून ठेवेलच. तसेच इथले बहुसंख्य मुस्लिम हे पाकिस्तानच्या धर्मांधतेला बळी पडणारे अथवा त्याच्या बाजूने उभे राहणारे नाहीत. पण पीएफआय, झाकीर नाईक याच्यासारखे काही घटक आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. विदेशात पळून गेलेला झाकीर नाईक मुंबईतच होता. आज त्याला पाकिस्तान ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून बोलावत असतो. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेचे पीएफआय हे सिम्मी या संघटनेचं बदललेलं रुप आहे. त्यांच्या गणितानुसार भारतातील 10 टक्के मुस्लिम जरी धर्मांधतेकडे वळले तरी इथे मोठा उत्पात घडवून आणता येऊ शकेल. पण आजच्या सामाजिक स्थितीचे माझे आकलन असे सांगते की, पहलगाम हल्ल्यामुळे भारतात हिंदू-मुस्लिम तणाव घडण्याची शक्यता नाही. काही ठिकाणी पहलगामच्या घटनेचं सेलीब्रेशनही केलं गेलंय. पण पोलिसांनी त्यांना पकडलं आहे.
त्याच वेळी हेही आवर्जून निदर्शनास आणून द्यावं लागेल की, पहलगाम हल्ल्यानंतर भलेही काश्मीरमध्ये त्याच्या निषेधार्थ बंद पाळला गेला असेल किंवा निदर्शने झाली असतील; पण त्याची कारणं आर्थिक आहेत. 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर टप्प्याटप्प्याने काश्मीरमधील दहशतवादी हिंसाचार कमी होऊन तिथे शांतता प्रस्थापित होत असल्याचे लक्षात येताच प्रचंड मोठ्या संख्येने पर्यटकांची पावले या नंदनवनाकडे वळली. गेल्या वर्षी तर कोटीच्या संख्येने पर्यटक तेथे गेल्याची नोंद झाली आहे. यातून तेथील अर्थकारणाला जबरदस्त चालना मिळाली. पण पहलगामच्या घटनेनंतर काश्मीरला गेलेले बहुतांश पर्यटक तात्काळ माघारी फिरले आणि जाऊ इच्छिणार्यांपैकी जवळपास 90 टक्के जणांनी बुकिंग रद्द केले. यामुळे या बंदच्या मुळाशी पर्यटकांच्या नाराजीमुळे पोटावर पाय येणार आहे, हा घटक आहे. अन्यथा, आज निषेध करणार्यांनी आणि बंद पाळणार्यांनी 1990 मध्ये ज्या काश्मिरी पंडितांना अनन्वित अत्याचार करून बाहेर काढले, त्यांना सन्मानानं आणि सुरक्षितरित्या परतता येईल अशी स्थिती निर्माण करायला हवी. तरच ही भूमिका खरी म्हणता येईल.
शेवटचा मुद्दा म्हणजे 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्राईलवर हमासने केलेल्या हल्ल्याची पद्धत आणि पहलगाममधील हल्ल्याची पद्धत यामध्ये साधर्म्य आहे. त्यामुळे आता उत्तरही इस्राईल स्टाईलनेच द्यायला हवे. पाकिस्तानलाही याची कल्पना आहे की, आजचा भारत पूर्वीचा भारत नाहीये. तो घरात घुसून ठोकणारा आहे. प्रत्यक्ष युद्ध झाले तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडून जाईल. मुनीरच्या आधीचा लष्करप्रमुख जनरल बावेजा असे म्हटले होते की, पाकिस्तानकडे टँकमध्ये घालण्यासाठी तेल नाहीये. पण युद्धशास्रामध्ये एक पद्धत अशीही वापरली जाते की, शत्रूचे डोके फिरवून, त्याला पद्धतशीरपणे आपल्या सोयीच्या मैदानात खेचले जाते. त्यामुळं याचा सामना करताना शिवरायांची युद्धनीतीच गरजेची आहे.
सध्या सर्व देशभरात चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे नेमकं भारताचं प्रत्युत्तर कसं राहील? छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती असं शिकवते की, कधी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढायचा असतो, कधी सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून जायचं असतं, तर कधी लाल महालावर छापा टाकून शाहिस्तेखानाची बोटं छाटायची असतात. शत्रूला कळता कामा नये की, तुझ्यावर काय मार्गानं आम्ही चालून येणार आहोत. याबाबत त्यांना सतत टेन्शनखाली ठेवणं, हाही एक रणनीतीचा भाग आहे. युद्धं ही कधीही गरम डोक्याने आणि भावनातिरेकानं चालून होत नाहीत. ती थंड डोक्यानं, आपल्या सोयीची वेळ, आपल्या सोयीचं गणित, आपल्या सोयीचं युद्धमैदान या सर्वांना मिळून मी शिवाजी महाराजांचा वारसा असं म्हणतो. तेव्हा पाकिस्तानच्या या कारवाईला उत्तर देताना भारत काय करेल, याबाबत ‘आगे आगे देखिये होता है क्या’ हेच योग्य ठरेल. बिहारमधल्या सभेत पंतप्रधानांनी मोजक्या शब्दांत योग्य तो इशारा दिलेला आहे. आम्ही हिशेब चुकता करू.