आखाती युद्धाचा भडका

इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाचा नवा अध्याय
outbreak of the Gulf War
आखाती युद्धाचा भडका Pudhari File Photo
Published on
Updated on
डॉ. योगेश प्र. जाधव

वस्तुतः, अलीकडील काळात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातसारख्या देशांचे इस्रायलसोबतचे संबंध सुधारण्याची सुरुवात झाली होती. अमेरिकेच्या पुढाकाराने काही करारही द़ृष्टिपथात होते. ते पूर्णत्वाला गेले असते, तर आखातात शांततेचे वारे वाहू लागले असते. परंतु, वर्षभरातील धुमश्चक्रीमुळे आखातातील शांततेची प्रक्रिया आता पुन्हा मागे पडली आहे. इस्रायलची एकंदर भूमिका पाहता, हा देश इतक्यात तरी या युद्धाची सांगता करेल, असे दिसत नाही.

आठ ऑक्टोबर रोजी इस्रायलविरुद्ध ‘हमास’ या संघर्षाला एक वर्ष पूर्ण होत आहे. गतवर्षी याच दिवशी ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर 5,000 हून अधिक रॉकेट डागून आणि घुसखोरी करून केलेल्या भीषण हल्ल्यामुळे इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला होता. वर्षभरामध्ये गाझापट्टीवरील धुमश्चक्रीत 40 हजारांहून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, यामध्ये महिला व बालकांचाही समावेश आहे. युरोपच्या भूमीवर सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाप्रमाणेच या युद्धातही मोठ्या प्रमाणावर दारूगोळा, बॉम्ब, क्षेपणास्त्रे यांचा वापर झाल्याने प्रचंड वित्तहानी झाली आहे. वास्तविक पाहता, हा संघर्ष एक-दोन महिने चालेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता; परंतु ‘हमास’ने केलेला हल्ला हा केवळ भीषणच नव्हता, तर तो इस्रायलच्या सार्वभौमत्वावर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अभेद्य व शक्तिशाली बनलेल्या त्यांच्या सुरक्षा यंत्रणेवर, सामरिक सामर्थ्यावर आणि जगभरात प्रख्यात असणार्‍या त्यांच्या ‘मोसाद’ या गुप्तचर यंत्रणेच्या दरार्‍यावर प्रश्नचिन्ह उभे करणारा होता. त्यामुळेच या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आरपारची लढाई आरंभली.

पहिल्या महायुद्धापूर्वी पॅलेस्टाईनवर ऑटोमन साम्राज्याचे राज्य होते. ऑटोेमन साम्राज्याचा पराभव झाल्यानंतर ब्रिटनने पॅलेस्टाईनचा ताबा घेतला. येथे ज्यू आणि अरबांची लोकवस्ती होती. अल्पसंख्याक ज्यू आणि बहुसंख्य अरबांव्यतिरिक्त, इतर काही वांशिक गटदेखील येथे राहत होते. 1917 मध्ये, ब्रिटिश परराष्ट्र सचिव आर्थर बालफोर यांनी जगातील अनेक भागांमध्ये छळ होत असलेल्या ज्यू धर्मीयांना स्वतंत्र देश देण्याचे वचन दिले होते. ब्रिटनने पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांसाठी एक देश निर्माण करण्याची कल्पना मांडली आणि 1920 ते 1940 पर्यंत, युरोप आणि जर्मनीतून स्थलांतरित झालेले ज्यू पॅलेस्टाईनमध्ये पोहोचले. त्यामुळे या भागात ज्यूंची संख्या वाढली. दुसर्‍या महायुद्धानंतर इस्रायलच्या स्थापनेचे काम वेगाने सुरू झाले. 1947 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाईनचे विभाजन ज्यू आणि अरब राष्ट्रांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आणि जेरुसलेमला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यात आले. ज्यू नेत्यांनी ते मान्य केले; पण अरब राष्ट्रांनी त्यास कडाडून विरोध केला. 1948 मध्ये, ज्यू नेत्यांनी इस्रायलच्या स्थापनेची घोषणा करत त्याला ज्यूंसाठी सुरक्षित देश आणि मातृभूमी म्हटले. इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा मिळाला; पण शेजारील अरब देश यामुळे संतप्त झाले. त्यातूनच इजिप्त, इराक, जॉर्डन, लेबनॉन आणि सीरिया या पाच अरब देशांच्या सैन्याने नव्याने तयार झालेल्या इस्रायलवर हल्ला केला. ही लढाई एक वर्ष चालली; पण यामध्ये इस्रायलच वरचढ ठरला. इस्रायलने बहुतांश भागाचा ताबा मिळवल्याने मोठ्या संख्येने पॅलेस्टिनींना आपली घरे सोडावी लागली. 1967 मध्ये अरब देश आणि इस्रायलमध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले. ही लढाई फक्त सहा दिवस चालली; पण या काळात इस्रायलने पूर्व जेरुसलेम आणि वेस्ट बँक, सीरियन गोलान हाईटस्, गाझा आणि इजिप्तचा सिनाई द्वीपकल्प ताब्यात घेतला. तेव्हापासून इस्रायलने वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममध्ये वसाहती उभारून तेथे ज्यू धर्मीयांना वसवण्यास सुरुवात केली. या युद्धात 5 लाख पॅलेस्टिनी बेघर झाले. या युद्धाने मध्य पूर्वेतील संघर्षाचे स्वरूप बदलले. या युद्धात इस्रायलने इजिप्तला गाझा, सीरियाला गोलान हाईटस्मधून आणि जॉर्डनला वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधून बाजूला सारले. 1973 मध्ये इजिप्त आणि सीरियाला राजनैतिक मार्गाने त्यांची जमीन परत मिळाली नाही, तेव्हा त्यांनी पुन्हा इस्रायलवर हल्ला केला. त्यावेळी अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि संयुक्त राष्ट्रांनी संघर्ष थांबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर 1982 मध्ये इस्रायलने पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला त्याच्या तळांवरून हुसकावून लावण्यासाठी लेबनॉनवर हल्ला केला. 1987 मध्ये पॅलेस्टिनींनी एक जनआंदोलन सुरू केले जे लवकरच संपूर्ण प्रदेशात पसरले. या काळात इस्रायली सैनिकांवर दगडफेक केली जाऊ लागली; पण त्याला प्रत्युत्तरादाखल इस्रायली सुरक्षा दलांनी लष्करी प्रत्युत्तर देत अनेक पॅलेस्टिनींना ठार मारले.

2006 मध्ये ‘हिजबुल्ला’ आणि इस्रायल यांच्यात घनघोर युद्ध झाले. ‘हिजबुल्ला’ ही शियापंथीय संघटना आहे. या संघटनेच्या उदयामध्ये इराणचा मोठा वाटा आहे. ‘हमास’नंतर इस्रायल ‘हिजबुल्ला’ला आपला सर्वात मोठा शत्रू मानतो. गेल्या वर्षभरात इस्रायलची सर्वाधिक हानी कोणी केली असेल तर ती ‘हिजबुल्ला’ने. ‘हिजबुल्ला’च्या हल्ल्यांमुळे उत्तर इस्रायलमध्ये सुमारे 60 हजार लोकांना विस्थापनाचा सामना करावा लागला आहे. ‘हिजबुल्ला’वर कारवाई न झाल्यास उत्तरेकडील सीमेवरील लोकांना शांततेत राहणे कठीण होईल, हे लक्षात आल्याने इस्रायलने अलीकडेच या संघटनेचा म्होरक्या हसर नसरुल्ला यालाच ठार मारले. तत्पूर्वी, ‘हमास’चा प्रमुख नेता इब्राहिम हनिये याला इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभाला गेलेला असताना इस्रायलने टिपले. ‘हिजबुल्ला’विरुद्ध इस्रायलच्या आक्रमकतेचे एक कारण म्हणजे तिची ताकद. ‘हमास’पेक्षा ‘हिजबुल्ला’ची ताकद जास्त आहे. या संघटनेला इराण आणि रशियाकडून आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवली जातात. या संघटनेकडे सुमारे एक लाख सैनिक असल्याचे सांगितले जाते. गोलान हाईटस्वरील हल्ल्याची योजना आखणार्‍या ‘हिजबुल्ला’ कमांडरलाही इस्रायलने ठार केले आहे. ‘हिजबुल्ला’ ही लेबनॉनमधील एक प्रमुख राजकीय शक्तीही आहे. लेबनॉनमधील गृहयुद्ध 1992 मध्ये संपले. यानंतर, पहिल्यांदाच ‘हिजबुल्ला’ने संसदीय निवडणुकीत आठ जागा जिंकल्या आहेत. लेबनॉनच्या मोठ्या भागावर ‘हिजबुल्ला’चे नियंत्रण आहे. त्यामुळे इस्रायलने ‘हिजबुल्ला’चे अस्तित्वच संपवून टाकण्याचा विडा उचलला. बेंजामिन नेतान्याहू यांनी वारंवार सांगितले आहे की, ते लवकरच ‘हिजबुल्ला’ला नष्ट करतील. अलीकडेच झालेल्या पेजर स्फोटांनी या संघटनेला जबरदस्त तडाखा बसला आहे. किंबहुना, हा पेजर अ‍ॅटॅक म्हणजे इस्रायलचा मास्टरस्ट्रोक मानला जातो. तसेच या हल्ल्यामुळे जगातील एकंदर युद्धनीतीला नवा आयाम जोडला गेला. आजवर कधी कुणी कल्पनाही केली नव्हती, असा हा थरारक हल्ला घडवून आणत इस्रायल आणि ‘मोसाद’ने आपण युद्धनीतीत बाप आहोत, हे जगाला दाखवून दिले. ‘हिजबुल्ला’कडे स्वतःचे फायबर आप्टिक्स नेटवर्क होते. या संघटनेचे दहशतवादी इस्रायलकडून आपले मेसेज व कॉल हॅक होऊ नयेत यासाठी पेजर आणि वॉकी-टॉकी वापरत होते. या पेजरमध्ये लिथियम बॅटरीचा वापर केला जात होता. मात्र, लिथियम बॅटरी तापविण्याचे विस्फोटक पेजरमध्येच घालण्याचा शोध ‘मोसाद’साठी हुकमी एक्का ठरला. संदेश यंत्रणेला सुरुंग लावतानाच ‘मोसाद’ने लेबनॉनला ‘तुम्ही आमच्या कक्षेबाहेर नाही’ हा थेट संदेश दिला. तथापि, या हल्ल्यामुळे आणि नसरुल्लाला ठार केल्याने इराण प्रचंड संतप्त झाला. कारण, हुती, ‘हिजबुल्ला’, ‘हमास’ या तिन्ही दहशतवादी संघटनांचा कर्ताकरविता इराणच आहे. इराण आणि इस्रायल एकमेकांना त्यांच्या अस्तित्वासाठीचा धोका म्हणून पाहत आले आहेत.

इस्लामिक क्रांतीपूर्वी इराण आणि इस्रायल हे मित्रदेश होते; पण इराणमध्ये धार्मिक सत्ता आल्यानंतर इस्रायलचे अस्तित्वच अमान्य करून इराणचे राष्ट्रीय धोरण ठरवण्यात आले. त्यानंतर अन्य अरब राष्ट्रांपेक्षाही इराणचा इस्रायलविरोध अधिक कडवा बनला. सीरिया, लेबनॉन, पॅलेस्टाईन, येमेनमधील ‘हमास’, ‘हिजबुल्ला’, हुती बंडखोरांना प्रशिक्षित आणि शस्त्रसज्ज करून त्यांच्यामार्फत इस्रायलला बेजार करण्याचे धोरण इराणने गेल्या काही वर्षांत राबवल्याचे दिसून आले. इराणचे रिव्होल्युशनरी गार्डस् आणि कडस् फोर्सचे कमांडर या मोहिमेत सक्रिय असतात. इस्रायलच्या प्रचंड सामर्थ्यशाली लष्करी ताकदीचा अंदाज असल्यामुळे इराणने आजवर उघडपणाने कधीही इस्रायलवर हल्ला केलेला नव्हता. परंतु, हनियेच्या हत्येनंतर इस्रायलवर इराणने 300 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. आताही इस्रायलच्या हवाई हल्ल्यात नसरुल्लाह ठार झाल्याचे समोर आल्यानंतर इराणने 100 हून अधिक क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागली; पण यामुळे कसलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही. याचे कारण इस्रायलची ‘आयर्न डोम’ ही क्षेपणास्त्ररोधक बचाव प्रणाली. भवताली असणार्‍या अरब राष्ट्रांशी सतत होणार्‍या संघर्षाची दखल घेत इस्रायलने ही बचावात्मक प्रणाली विकसित केली आहे. ‘आयर्न डोम’ जगातील सर्वाधिक लोकप्रिय हवाई संरक्षण प्रणाली आहे. या प्रणालीअंतर्गत संपूर्ण इस्रायलमध्ये ‘आयर्न डोम’ बॅटरी बसवण्यात आल्या आहेत. प्रत्येक बॅटरीत तीन ते चार लाँचर असून, त्यात 20 इंटरसेप्टर मिसाईल बसवण्यात आले आहेत. ही प्रणाली इस्रायलच्या हद्दीत आलेल्या रॉकेटचा मागोवा घेते आणि हल्ल्याला प्रत्युत्तर देते. इस्रायल सुरक्षा दलाच्या दाव्यानुसार, ‘आयर्न डोम’ 90 टक्के रॉकेट नष्ट करण्यास सक्षम आहे. त्यासाठीच्या ‘तामिर’ या क्षेपणास्त्रांची किंमत जवळपास 50,000 डॉलर प्रतिक्षेपणास्त्र म्हणजेच सुमारे 40 लाख रुपये इतकी असल्याचा दावा करण्यात येतो. यावरून इस्रायलची संरक्षण क्षेत्रातील गुंतवणूक किती असेल, याचा अंदाज येतो. याच सामरिक सामर्थ्यामुळे इस्रायल हा आजवर एकही युद्ध हरलेला नाही. आजही इस्रायलकडून गाझापट्टी, सीरिया, दक्षिण लेबनॉन आदी ठिकाणी प्रचंड हल्ले केले जात असतानाही, जगातील एकाही देशाला या छोट्याशा राष्ट्राविरुद्ध इराणच्या समर्थनार्थ मैदानात उतरण्याचे धाडस झालेले नाहीये.

उलटपक्षी बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत आपण करत असलेल्या संघर्षाचा जाहीरपणाने पुरस्कार केला. गेल्यावर्षी जेव्हा आपण संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले, तेव्हा आम्ही सौदी अरेबियाशी ऐतिहासिक करार करणार होतो; पण ‘हमास’ने आमच्यावर आक्रमण केले आणि तो करार थांबवला, असे सांगतानाच इस्रायल युद्धविरामाला सहमती देणार नाही. पर्ल हार्बर किंवा 9/11 च्या हल्ल्याच्या वेळी अमेरिकेची हीच परिस्थिती होती. यावेळी युद्धविरामाचा अर्थ असा होईल की, आपण ‘हमास’ आणि दहशतवादाला शरण जात आहोत. 7 ऑक्टोबरच्या भीषण हल्ल्यानंतर इस्रायल शत्रुत्व संपवू शकत नाही. हा युद्धाचा काळ आहे, असे इस्रायलने स्पष्टपणाने सांगितले. मानवतावादी दृष्टिकोनातून पाहिल्यास कोणत्याही प्रकारच्या युद्धाचे समर्थन करता येणार नाही. परंतु एका चिमुकल्या देशाच्या प्रमुखाने आपल्या भूमीच्या, राष्ट्राच्या आणि नागरिकांच्या रक्षणार्थ घेतलेली ही बुलंद भूमिका उल्लेखनीय म्हणावी लागेल. हा बुलंदपणा केवळ शाब्दिक नसून त्याला प्रचंड ताकदवान सामरीक सज्जतेची आणि त्याला पूरक असणार्‍या महानिष्णात गुप्तहेर संघटनेची जोड आहे. विदेशातील इस्रायली शत्रूंच्या वेचक हत्या घडवून आणण्यात मोसाद ही या देशाची गुप्तहेर संघना माहीर आहे. हमासने केलेल्या हल्यानंतर इस्रायलने जगात कुठेही लपून बसलात तरी हमासच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना आम्ही निश्चितपणाने ठार करू, अशी स्पष्ट धमकी दिली होती. त्यावेळी तो केवळ उद्विग्न संताप नव्हता. मोसादची सामरीक कार्यशैली आणि जवळपास प्रत्येक देशातील त्यांची खबर्‍या- मारेकर्‍यांची संख्या उल्लेखनीय आहे. युद्ध सुरू झाल्यापासून आजपर्यंत हिजबुल्लाहच्या 40 हून अधिक आणि हमासच्या 60 एजंटसना मोसादने युद्ध क्षेत्राबाहेर टिपले आहे. यातून मोसादने त्यांची कार्यपद्धत आणि सामरिक कार्यकुशलतेेची चुणूक दाखवून दिली आहे. अलीकडेच इराणचे माजी राष्ट्रपती मोहम्मद अहमदीनिजाद यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला असून इराणने इस्राईलच्या हेरगिरीचा सामना करण्यासाठी तैनात केलेल्या एका सिक्रेट सर्व्हिस युनिटचा प्रमुख स्वतःच इस्राईलचा गुप्तहेर होता असे म्हटले आहे. यावरुन इस्राईल गेल्या साडे सात दशकांपासून भवतालच्या शत्रूंना का पुरून उरतो आहे, हे सहज लक्षात येईल. वस्तुतः अलीकडील काळात सौदी अरेबिया, संयुक्त अरब आमिराती यांसारख्या देशांचे इस्राईलसोबतचे संबंध सुधारण्याची सुरुवात झाली होती. त्यासंदर्भात अमेरिकेच्या पुढाकाराने काही करारही दृष्टीपथात होते. ते पूर्णत्वाला गेले असते तर आखातात शांततेचे वारे वाहू लागले असते. परंतु यामुळे पॅलेस्टाईनचा मुद्दाच विरुन जाईल आणि या संघर्षाला पाठीराखेच उरणार नाहीत या धारणेने इराणने जाणीवपूर्वक हमासकरवी इस्राईलवर हल्ला केला. वर्षभरातील धुमश्चक्रीमुळे आखातातील शांततेची प्रक्रिया आता पुन्हा मागे पडली आहे. पण इस्राईलची एकंदर भूमिका पाहता हा देश इतक्यात तरी या युद्धाची सांगता करेल असे दिसत नाही. दुसरीकडे आर्थिक दृष्ट्या प्रचंड अडचणीत असलेल्या इराणला हा संघर्ष पुढे सुरु ठेवणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे आपल्या अजेयपदाचा इतिहास अबाधित ठेवण्यात इस्राईल पुन्हा एकदा यशस्वी होणार असे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news