Online Betting Scam | ऑनलाईन बेटिंग स्कॅमचा विळखा

ऑनलाईन सट्टेबाजी आता कायद्याने गुन्हा ठरणार
Online Betting Scam |
Online Betting Scam | ऑनलाईन बेटिंग स्कॅमचा विळखाPudhari File Photo
Published on
Updated on

सूर्यकांत पाठक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, ग्राहक पंचायत

ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर झाल्याने ऑनलाईन सट्टेबाजी आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे. भारतात सुमारे 22 कोटी लोक बेटिंग अ‍ॅप्सचा वापर करतात. तेलंगणामध्ये दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेनुसार, ऑनलाईन सट्टेबाजीमध्ये पैसे गमावल्याने 1,023 हून अधिक जणांनी आत्महत्या केली आहे. ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप्सचे व्यसन हे केवळ वैयक्तिक समस्या नसून एक व्यापक सामाजिक आरोग्याचे संकट आहे.

अलीकडच्या काळात भारतात मोबाईल इंटरनेटचा प्रसार, डिजिटल पेमेंटची सोय आणि मनोरंजनाच्या नव्या माध्यमांचा उदय यामुळे ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप्सचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. हे अ‍ॅप्स प्रामुख्याने क्रिकेट, फुटबॉल, टेनिस अशा क्रीडा प्रकारांवर पैज लावण्याची संधी देतात. याशिवाय काही अ‍ॅप्समध्ये कॅसिनो गेम्स, पत्त्यांचे खेळ किंवा स्लॉट मशिन प्रकारचे जुगारही उपलब्ध असतात. ‘कमी पैशांत मोठा नफा’ या लालसेवर आधारित या अ‍ॅप्सचे जाळे इतके वेगाने पसरत आहे की, त्याचे व्यसन अनेक तरुणांना अगदी किशोरवयीन मुलांनाही आहारी नेत आहे. या व्यसनाची मुळे मानसशास्त्रीय आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर शोधली जाऊ शकतात. मानसशास्त्रीय द़ृष्टिकोनातून पाहता ऑनलाईन बेटिंगमध्ये अनिश्चित बक्षीस हा घटक फार महत्त्वाचा ठरतो. खेळाडू कधी जिंकणार आणि किती जिंकणार, हे निश्चित नसते; पण जेव्हा एखादा वेळेस जिंकतो, तेव्हा मिळणारा आनंद आणि उत्साह हा इतका तीव्र असतो की, तो अनुभव पुन्हा मिळवण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होते. हेच पुन्हा-पुन्हा घडून शेवटी ते सवयीच्या पलीकडे जाऊन व्यसनात परिवर्तित होते.

आर्थिक बाजूने पाहिले, तर भारतात बेरोजगारी, अस्थिर नोकरी, कमी पगार, ग्रामीण भागातील मर्यादित उत्पन्नाचे स्रोत या सर्व घटकांमुळे लोकांना जलद पैसा कमवण्याची लालसा जास्त भासते. ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप्स ही लालसा भांडवलशाहीच्या नव्या तंत्रांनी खेळवतात. रंगीत ग्राफिक्स, जलद पेमेंट, साईनअप बोनस, रेफरल कॅश आणि 24 बाय 7 उपलब्ध असणारे प्लॅटफॉर्म्स हे सर्व मिळून वापरकर्त्याला सतत सक्रिय ठेवतात. याचा परिणाम वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जाणवू लागला आहे. या खेळांमध्ये सुरुवातीला मोफत पॉईंटस् देऊन खेळायला लावले जाते. जिंकण्याची सवय झाल्यावर हळूहळू खर्‍या पैशाने खेळायला प्रवृत्त केले जाते. एकदा पैसे लावण्याची सवय लागली की, हळूहळू मोठे दांव लावण्यास भाग पाडले जाते. शेवटी खेळाडू पैसे गमावतो आणि कर्जात बुडतो. यामध्ये अनेकदा नेपाळ आणि दुबईमध्ये बसलेले हॅकर्स सहभागी असतात. ते भारतातील तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा थेट मेसेज पाठवून ‘अर्न मनी फ्रॉम गेम्स’ सारख्या प्रलोभनांनी फसवतात.

सांख्यिकीय माहितीप्रमाणे भारतात ऑनलाईन बेटिंगद्वारे दरवर्षी सुमारे 100 अब्ज डॉलरहून अधिक रकमेची उलाढाल होते. भारतात यातील मोठा भाग परदेशात पाठवला जातो. भारतात सुमारे 22 कोटी लोक बेटिंग अ‍ॅप्सचा वापर करतात. मध्यंतरी बंदी घालण्यात आलेल्या महादेव बेटिंग अ‍ॅपची उलाढाल तब्बल 40 हजार कोटींहून अधिक होती आणि रोजची कमाई 200 कोटी ! फेयरप्ले बेटिंग अ‍ॅप, प्रोबो अ‍ॅप, रेड्डी अन्ना बेटिंग अ‍ॅप यांसारख्या अ‍ॅप्सनी हजारो कोटींचा चुना आजवर अनेकांना लावला आहे. भारतातील काही राज्यांनी ऑनलाईन जुगार व बेटिंगला बंदी घातली असली, तरी इंटरनेटच्या सीमाहीन स्वरूपामुळे ही अंमलबजावणी फारशी प्रभावी ठरत नाही. तेलंगणामध्ये दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेनुसार, ऑनलाईन सट्टेबाजीमध्ये पैसे गमावल्याने 1,023 हून अधिक जणांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये विद्यार्थी, गृहिणी, बेरोजगार तरुण आणि रोजंदारीवर काम करणार्‍या कामगारांचा समावेश होता.

कायदेशीर द़ृष्टिकोनातून समस्या अशी आहे की, भारतात जुगार आणि कौशल्याधारित खेळ यातील फरकावर आधारित कायदे आहेत. अनेक ऑनलाईन बेटिंग कंपन्या त्यांच्या उत्पादनाला कौशल्याधारित म्हणून दर्शवतात, ज्यामुळे त्यांच्यावर बंदी घालणे कठीण होते. याशिवाय परदेशी सर्व्हरवर चालणारी अनेक अ‍ॅप्स भारतीय कायद्यांच्या कक्षेबाहेर राहतात. या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी फक्त कायदे पुरेसे नाहीत. त्यासोबत जनजागृती मोहिमा, शालेय व महाविद्यालयीन स्तरावर डिजिटल साक्षरतेचे धडे, कुटुंबीयांची आर्थिक जागरूकता आणि मानसिक आरोग्याविषयीची चर्चा आवश्यक आहे. माध्यमांनीही बेटिंग अ‍ॅप्सच्या जाहिरातींना प्रोत्साहन देणे थांबवणे गरजेचे आहे.

प्रचंड मोठा सामाजिक-आर्थिक प्रश्न बनलेल्या ऑनलाईन सट्टेबाजीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार ऑनलाईन गेमिंग विधेयक आणणार असून त्यानुसार ऑनलाईन सट्टेबाजी दंडनीय अपराध घोषित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकास मंजुरी दिली आहे. विविध अ‍ॅप्सना प्रसिद्ध व्यक्तींनी दिलेल्या जाहिरातींमुळे या प्रकारातील प्रकरणांना अधिक चालना मिळत असल्याचेही लक्षात आले आहे. अलीकडेच प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाची आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली. हा तपास अवैध सट्टेबाजी अ‍ॅप एक्सबेटसंदर्भातील मनी लाँडरिंग प्रकरणाशी निगडीत होता. शेवटी ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप्सचे व्यसन हे केवळ वैयक्तिक समस्या नसून एक व्यापक सामाजिक आरोग्याचे संकट आहे. यावर वेळेवर उपाययोजना न केल्यास पुढील पिढ्यांमध्ये आर्थिक, मानसिक आणि सामाजिक असंतुलन अधिकच वाढेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news