Online Scam | ‘ओटीपी’ची एक क्लिक, लुटलं जाण्याची निश्चिती!

Online Scam |
Online Scam | ‘ओटीपी’ची एक क्लिक, लुटलं जाण्याची निश्चिती!
Published on
Updated on

कावेरी गिरी

ऑनलाईन फसवणूक ही फक्त वैयक्तिक समस्या नाही, ती सामाजिक समस्या आहे. आपण आपल्या घरातील ज्येष्ठांना, मुलांना, शेजार्‍यांना याबाबत माहिती दिली पाहिजे. एक साधा सल्ला, एक सावध सूचना एखाद्याची आयुष्यभराची कमाई वाचवू शकते.

‘मी तर कुठेही पैसे पाठवलेच नाहीत. ‘ओटीपी’चा मेसेज आला आणि एका क्षणात खातं रिकामं झालं!’ आज अशा वाक्यांची चर्चा घराघरांत, चहाच्या टपरींवर, कार्यालयांत आणि अगदी पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचली आहे. तंत्रज्ञानाने आपले आयुष्य जितके सोपे केले, तितकेच ते धोकादायकही झाले आहे. मोबाईल फोन, इंटरनेट, यूपीआय, नेट बँकिंग, ऑनलाईन खरेदी, यामुळे व्यवहार काही सेकंदात होतात. मात्र, याच वेगाचा गैरफायदा घेत ऑनलाईन फसवणूक करणारे टोळके सामान्य नागरिकांना लुटत आहे. आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू ठरतो - ‘ओटीपी.’

‘ओटीपी’ म्हणजे नेमकं काय?

‘ओटीपी’ म्हणजे ‘वन टाईम पासवर्ड.’ एकदाच वापरता येणारा, काही सेकंद किंवा मिनिटांसाठी वैध असलेला गुप्त क्रमांक. बँकिंग व्यवहार, यूपीआय पेमेंट, लॉगिन, पासवर्ड बदल, नवीन डिव्हाईस नोंदणी, यासाठी ‘ओटीपी’ वापरला जातो. ‘ओटीपी’ हे एक सुरक्षा कवच असायला हवे होते; पण आज तेच अनेकांसाठी धोका बनले आहे. कारण, जोपर्यंत ‘ओटीपी’ तुमच्यापुरताच मर्यादित असतो, तोपर्यंत तो सुरक्षित असतो. तो दुसर्‍याच्या हातात गेला की, तुमचं खातं, तुमची ओळख आणि तुमची मेहनतीची कमाई - सगळंच धोक्यात येतं.

एक क्लिक आणि सगळं संपतं!

ऑनलाईन फसवणूक करणारे लोक फार हुशार असतात. ते थेट पैसे मागत नाहीत. ते तुमचा विश्वास जिंकतात. कधी ते बँकेचे कर्मचारी बनून फोन करतात, कधी कुरिअर कंपनीचा प्रतिनिधी, कधी वीज वितरण कंपनी, तर कधी सरकारी अधिकारी किंवा पोलिस. तर कधी घरच्या मंडळींचेच मित्र.

‘तुमचं केवायसी अपडेट झालेलं नाही’, ‘तुमचं खाते ब्लॉक होणार आहे’, ‘तुमच्या नावावर बक्षीस लागलं आहे’, ‘तुमच्या खात्यातून संशयास्पद व्यवहार होत आहेत,’ अशा वाक्यांनी ते समोरच्याला घाबरवतात. घाबरलेला माणूस विचार न करता पुढचं पाऊल टाकतो आणि तिथेच तो ‘ओटीपी’ सांगतो किंवा आलेल्या लिंकवर एक क्लिक करतो. एका क्लिकमध्ये फसवणूक होते.

फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार

ऑनलाईन फसवणूक ही एकाच पद्धतीची नसते. ती सतत बदलत राहते.

1) फेक फोन कॉल

स्वतःला बँक कर्मचारी, कस्टमर केअर अधिकारी सांगून फोन केला जातो. ‘ओटीपी’ विचारला जातो आणि पैसे उडवले जातात.

2) फसवी लिंक

एसएमएस, व्हॉटस्अ‍ॅप किंवा ई-मेलवर लिंक येते. ती उघडताच बनावट वेबसाईटवर तुमची माहिती टाकायला सांगितली जाते.

3) ‘यूपीआय’ फसवणूक

पैसे येणार आहेत, रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा, असं सांगून प्रत्यक्षात पैसे काढले जातात.

4) एनीडेस्क/स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप

तांत्रिक मदतीसाठी अ‍ॅप डाऊनलोड करा, असं सांगून मोबाईलचा ताबा घेतला जातो.

5) सोशल मीडिया हॅक

फेक लिंकवर क्लिक केल्यावर फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केलं जातं.

कोण होतात बळी?

फसवणूक फक्त अशिक्षित लोकांबरोबरच होते, हा मोठा गैरसमज आहे. आज डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, निवृत्त कर्मचार्‍यांपैकी अनेकजण बळी पडत आहेत. विशेषतः, ज्येष्ठ नागरिक, स्मार्टफोन नवीन वापरणारे, ऑनलाईन व्यवहारांची घाई करणारे, आपल्याबरोबर असं होणार नाही, असं समजणारे, फसवणूक करणारे लोक मानसशास्त्राचा अभ्यास करून लोकांना गंडवतात. ते भीती, हाव, घाई किंवा दया या भावनांचा फायदा घेतात.

‘ओटीपी’ सांगणं म्हणजे किल्ली देणं!

‘ओटीपी’ म्हणजे तुमच्या डिजिटल घराची किल्ली आहे. ती किल्ली कुणालाही दिली, तर घर लुटलं जाणारच. बँका, पोलिस, सरकार, कोणीही कधीही ‘ओटीपी’ फोनवर विचारत नाही. ‘ओटीपी’ सांगू नका, ही सूचना मेसेजमध्ये स्पष्टपणे दिलेली असते. तरीही लोक फसतात; कारण फसवणूक करणारे विश्वासू आवाजात बोलतात.

‘ओटीपी’ फसवणूक का वाढते आहे?

कारणे आणि वास्तव

ऑनलाईन फसवणूक अचानक वाढलेली नाही; ती हळूहळू विकसित झालेली गुन्हेगारी व्यवस्था आहे. डिजिटल व्यवहार वाढले, स्मार्टफोन स्वस्त झाले आणि इंटरनेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं - याच काळात सायबर गुन्हेगारांनी नवे मार्ग शोधले. ‘ओटीपी’ ही संकल्पना सुरक्षिततेसाठी निर्माण झाली; पण आज तीच फसवणुकीचं प्रभावी हत्यार बनली आहे.

‘ओटीपी’ का टार्गेट केला जातो?

‘ओटीपी’ म्हणजे व्यवहाराची शेवटची परवानगी. पासवर्ड माहिती नसला तरी ‘ओटीपी’ मिळाला, की व्यवहार पूर्ण होतो. त्यामुळे सायबर गुन्हेगारांसाठी ‘ओटीपी’ म्हणजे सोन्याची किल्ली आहे.

फसवणूक झाली तर काय कराल?

जर फसवणूक झाल्याचं लक्षात आलं, तर वेळ वाया न घालवता लगेच कृती करा. बँकेला त्वरित कळवा, वेळेत तक्रार केल्यास बँक ट्रान्झॅक्शन फ्रीज करू शकते, सायबर हेल्पलाईनवर फोन करा, सायबर विभागाच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा, नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्या.

लवकर तक्रार केल्यास काही वेळा पैसे परत मिळण्याची शक्यता असते.

स्वतःची काळजी कशी घ्याल?

‘ओटीपी’ कधीही कुणालाही सांगू नका, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, अनोळखी अ‍ॅप डाऊनलोड करू नका, सोशल मीडियावर जास्त माहिती शेअर करू नका, बँकिंग अ‍ॅपसाठी मजबूत पासवर्ड वापरा, फोनवर येणार्‍या प्रत्येक घरातील ज्येष्ठांना ‘ओटीपी’ काय आहे ते समजावून सांगा, मुलांना फेक लिंक ओळखायला शिकवा, ऑफिसमध्ये सायबर सेफ्टी चर्चा ठेवा, संशयास्पद कॉलची माहिती इतरांना द्या.

ऑनलाईन फसवणूक ही फक्त वैयक्तिक समस्या नाही, ती सामाजिक समस्या आहे. आपण आपल्या घरातील ज्येष्ठांना, मुलांना, शेजार्‍यांना याबाबत माहिती दिली पाहिजे. एक साधा सल्ला, एक सावध सूचना एखाद्याची आयुष्यभराची कमाई वाचवू शकते. डिजिटल युग अपरिहार्य आहे. तंत्रज्ञान थांबणार नाही; पण आपली जागरूकता वाढली पाहिजे. ‘ओटीपी’ हा आपला शत्रू

नाही; पण त्याचा गैरवापर करणारे लोक धोकादायक आहेत. सावधगिरी हाच सर्वोत्तम बचाव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news