China Honey Trap | चिनी ‘हनी ट्रॅप’चा भेसूर चेहरा

China Honey Trap |
China Honey Trap | चिनी ‘हनी ट्रॅप’चा भेसूर चेहरा
Published on: 
Updated on: 

अनिल टाकळकर

एनव्हिडियाचे प्रमुख जेन्सेन हुआंग हे ॲलीस हुआंग या सुंदर स्त्रीच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याने नुकतेच आपल्या पदावरून पायउतार झाले. यामुळे एआय क्षेत्राला तसेच अमेरिका-चीन संबंधांना आणखी मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. एआयमध्ये महासत्ता होण्याच्या संघर्षात चीनची आक्रमक रणनीती यातून स्पष्ट होते. चीन या क्षेत्रात कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे हे ठळक उदाहरण म्हणावे लागेल.

जेम्स बाँडच्या एखाद्या हॉलीवूड थरारक गुप्तहेरपटात असावे असे कथानक प्रत्यक्षात अमेरिकेच्या तंत्रज्ञानविश्वात घडत असून त्यामुळे केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही प्रचंड खळबळ उडालेली दिसते. जगातील एआय क्षेत्रातील सर्वांत प्रभावशाली तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या एनव्हिडियाचा प्रमुख म्हणजे या कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ जेन्सेन हुआंग एका चिनी महिलेच्या ‘हनी ट्रॅप'मध्ये अडकल्याने हे वादळ उद्‌भवलेले आहे . ही चाळिशीतील तरुण सुंदर स्त्री ॲॅलीस हुआंग चीनच्या गुप्तचर यंत्रणेची हस्तक असल्याचा अमेरिकी गुप्तचर संस्थांना संशय असून त्याचे व्यावसायिक संबंध अत्याधुनिक संगणक चिप्सच्या खरेदी-विक्रीशी जोडलेले आहेत. त्याच चिप्सच्या आधारे चीन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अमेरिकेला आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे. प्रेम, पैसा, राजकारण, हेरगिरी आणि तंत्रज्ञानाचे जागतिक वर्चस्व अशा अनेक धाग्यांनी विणलेले हे कथानक एखाद्या थरारपटालाही लाजवेल असेच म्हणावे लागेल; मात्र या चित्रपटातील पात्रे काल्पनिक नसून जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकणारी खरीखुरी माणसे आहेत.

जेन्सेन हुआंग यांनी एका चिनी विवाहबाह्य संबंधांची जाहीर कबुली दिली असली, तरी त्यांनी आपल्या या मैत्रिणीचे नाव घेतलेले नाही. आता किंबर्ले पॉवेल या आपल्या कंपनीतील व्हाईस प्रेसिडेंट महिलेशीही त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे उघड झाले आहे. हुआंग या महिलेचे चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालयासाठी (एमएसएस) काम करणाऱ्या गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा अमेरिकी अधिकाऱ्यांना संशय आहे. चीनने हे आरोप फेटाळले आहेत. एनव्हिडियाने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशय आणि वस्तुस्थिती यातील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला ५ लाख कोटी डॉलर्सचे उद्दिष्ट गाठावयाचे आहे. एवढ्या मोठ्या आकाराचे बाजारपेठीय मूल्य एनव्हिडिया या एका कंपनीचे असून या वादळाने एआय क्षेत्राच्याच नव्हे, तर अमेरिकन अर्थव्यवस्थेलाही हादरा बसू शकतो.

ॲलिस हुआंग यांचा सध्या ठावठिकाणा लागत नसून त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकाधिक गडद होत चालले आहे. ॲॅलीस मेगास्पीड या सिंगापूर कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी होत्या. ही कंपनी एनव्हिडियाच्या प्रगत चिप्सची ग्राहक होती. त्यामुळे जेन्सेन हुआंग यांच्याशी असलेली त्यांची जवळीक केवळ वैयक्तिक संबंधांपुरती मर्यादित होती का, की त्यामागे तंत्रज्ञानविषयक माहिती मिळविण्याचा उद्देश होता, हा तपासाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुप्तचरविश्वात 'हनी ट्रॅप' हा पूर्वीपासून वापरला जाणारा प्रकार असून प्रभावशाली व्यक्तींशी प्रेमसंबंध किंवा भावनिक जवळीक निर्माण करून त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळविणे, त्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकणे किंवा त्यांना दबावाखाली आणणे, हा त्यामागील उद्देश असतो. चीनसह अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणांवर अशा पद्धती वापरल्याचे आरोप झाले आहेत. चीनच्या बाबतीत मात्र व्यावसायिक, राजकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींना लक्ष्य करण्याची व्यापक रणनीती असल्याचा अमेरिकी यंत्रणांचा आरोप आहे.

चीनची आक्रमक गुप्तचर रणनीती

चीनची हेरगिरीची पद्धत केवळ हनी ट्रॅपपुरती मर्यादित नाही. सायबर हल्ले, औद्योगिक गुपितांची चोरी, आर्थिक प्रलोभने, ब्लॅकमेल, व्यावसायिक भागीदारी आणि मानवी संपर्क अशा अनेक मार्गांचा वापर केला जात असल्याचे अमेरिकी आणि पाश्चिमात्य सुरक्षा संस्थांचे म्हणणे आहे. आपले इप्सित साध्य करण्यासाठी कोणतेही विधिनिषेध न बाळगता चीन साम, दाम, दंड, भेद त्यापलीकडेही कसा जातो याचे हे उदाहरण ठरू शकते . चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली गुप्तचर यंत्रणांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यात आला आहे. इथे राज्य सुरक्षा मंत्रालयाला अधिक आर्थिक स्रोत, तांत्रिक साधने आणि राजकीय महत्त्व मिळाले आहे. २०२२ मध्ये या मंत्रालयाचे तत्कालीन प्रमुख चेन वेनछिंग यांना चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च धोरणात्मक संस्थांपैकी असलेल्या पॉलिट ब्युरोमध्ये स्थान मिळाले. गुप्तचर यंत्रणेचे महत्त्व देशाच्या सर्वोच्च राजकीय नेतृत्वापर्यंत पोहोचल्याचे हे संकेत मानले जातात.

चीनची रणनीती तीन स्तरांवर कार्यरत असल्याचे दिसते. पहिली म्हणजे, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रांत मानवी संपर्कातून माहिती मिळविणे. दुसरी म्हणजे, सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून सरकारी, लष्करी आणि खासगी कंपन्यांच्या संगणक प्रणालींमध्ये प्रवेश करणे. तिसरी म्हणजे तंत्रज्ञान आणि व्यावसायिक गुपिते मिळवून स्वतःची औद्योगिक क्षमता वाढविणे. अमेरिकेतील सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजच्या (CSIS) अभ्यासानुसार, २००० पासून अमेरिकेत चीनशी संबंधित हेरगिरीच्या २२४ नोंदविलेल्या घटना आहेत. त्यात लष्करी, राजकीय, औद्योगिक आणि सायबर हेरगिरीचा समावेश आहे. शी जिनपिंग सत्तेवर आल्यानंतर या नोंदविलेल्या घटनांपैकी ६९ टक्के घटना घडल्याचे या अभ्यासात नमूद आहे.

चीनच्या प्रतिहेरगिरी यंत्रणेची आक्रमकता दाखविणारी एक अत्यंत गंभीर घटना २०१० ते २०१२ या काळात घडली. चीनमध्ये अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर संस्थेसाठी (सीआयए) काम करणाऱ्या खबऱ्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले. 'न्यूयॉर्क टाईम्स'च्या २०१७ मधील वृत्तानुसार, या काळात सीआयएचे १८ ते २० खबरे ठार मारण्यात आले किंवा तुरुंगात डांबण्यात आले. त्यापैकी किमान डझनभर जणांची हत्या करण्यात आली होती. या खबऱ्यांकडून चीनच्या सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार, लष्करी हालचाली आणि राजकीय निर्णयांविषयी महत्त्वाची माहिती अमेरिकेला मिळत होती. एका खबऱ्याला सरकारी इमारतीच्या आवारात सहकाऱ्यांसमोर गोळ्या घालून ठार करण्यात आले. इतर संभाव्य खबऱ्यांना इशारा देण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली. या गुप्तचर जाळ्याचा पर्दाफाश कसा झाला, याबाबत अमेरिकी यंत्रणांमध्ये मतभेद होते. सीआयएमधील एखाद्या अंतर्गत व्यक्तीने चीनला माहिती पुरविली असावी किंवा चीनने सीआयएच्या गुप्त संदेश व्यवस्थेत घुसखोरी केली असावी, अशी दोन प्रमुख शक्यता तपासण्यात आल्या. या घटनेमुळे चीनमधील अमेरिकी गुप्तचर यंत्रणेचे काम अनेक वर्षे विस्कळीत झाले. ही घटना चीन केवळ परदेशी गुप्तहेरांची माहिती मिळविण्यापुरता मर्यादित नसून, स्वतःच्या सुरक्षेला धोका मानणाऱ्यांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करू शकतो, हे दाखविणारी होती.

एआय महासत्तेच्या संघर्षात ट्रम्प यांची कसोटी

अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्षाचा केंद्रबिंदू कृत्रिम बुद्धिमत्तेचे जागतिक वर्चस्व हा आहे. एनव्हिडियाच्या जीपीयू चिप्समुळे जगभरातील एआय क्रांतीला गती मिळाली आहे. चीनला हे तंत्रज्ञान मिळविण्याची गरज आहे, तर अमेरिकेला त्याचा लष्करी आणि सामरिक वापर रोखायचा आहे. चीन एआय क्षेत्रात अमेरिकेला टक्कर देण्याचा प्रयत्न करीत असला, तरी या देशाला एनव्हिडिया दर्जाच्या चिप्स अद्याप तयार करता आलेल्या नाहीत.

या पार्श्वभूमीवर हुआंग यांचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेले संबंध महत्त्वाचे ठरतात. चीनला एनव्हिडियाच्या चिप्स विकण्यावरील निर्बंध शिथिल करावेत, यासाठी हुआंग यांनी अमेरिकी प्रशासनाकडे लॉबिंग केले होते. त्यामुळे त्यांच्या कथित वैयक्तिक संबंधांचा आणि व्यावसायिक व्यवहारांचा एकमेकांशी काही संबंध होता का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची शेनझेन येथे होणारी आगामी भेट व्यापारयुद्धातील नाजूक युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. ट्रम्प यांनी या हेरगिरीचा मुद्दा शी जिनपिंग यांच्यासमोर उपस्थित करणार नसल्याचे संकेत दिले आहेत; मात्र अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणे सोपे जाणार नाही.

जागतिक परिणाम आणि भारतासाठी धडा

या प्रकरणामुळे एनव्हिडियाची विश्वासार्हता, शेअर बाजारातील मूल्य, अमेरिकी तंत्रज्ञान निर्यात धोरण आणि जागतिक चिपपुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो. अमेरिका चीनवरील निर्बंध अधिक कठोर करू शकते. त्याचा परिणाम जागतिक एआय उद्योगावरही होईल.

भारतानेही या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सेमीकंडक्टर, एआय आणि संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची गुंतवणूक वाढत असताना औद्योगिक गुप्तहेरगिरी, सायबर हल्ले आणि मानवी संपर्कांच्या माध्यमातून माहिती मिळविण्याचे धोके ओळखणे आवश्यक आहे.

हॉलीवूड किंवा बॉलीवूडच्या थरारपटात शेवटी गुप्तहेराचा मुखवटा गळतो आणि सत्य समोर येते; मात्र या वास्तवातील कथानकाचा शेवट अजून झालेला नाही. ॲलीस हुआंग यांची खरी भूमिका काय होती, एनव्हिडियाच्या तंत्रज्ञानाची माहिती चीनपर्यंत पोहोचली का आणि या व्यवहारांमागे चीनच्या गुप्तचर यंत्रणेचा किती सहभाग होता, याची उत्तरे तपासातूनच मिळतील. आजच्या जगात युद्ध रणगाडे आणि क्षेपणास्त्रांइतकेच डेटा, संगणक चिप्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी संबंधांच्या माध्यमातूनही लढले जाते. त्यामुळे जेन्सेन हुआंग यांचे प्रकरण ही केवळ एका उद्योगपतीच्या खासगी आयुष्याची सनसनाटी कहाणी नाही, तो भविष्यातील जागतिक सत्तासंघर्षाचा एक क्रूर चेहरा आहे.

७.५ अब्ज डॉलरच्या चिप्स चीनकडे

एनव्हिडिया प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे एनव्हिडियाच्या अत्याधुनिक चिप्स. ॲॅलिस हुआंग आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे ७.५ अब्ज डॉलर किमतीच्या चिप्स चीनमधील कंपन्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचा आरोप आहे. एच१००, एच२०० आणि ए१०० या चिप्सचा त्यात समावेश असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने चीनला प्रगत चिप्सच्या थेट निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. कारण, या चिप्सचा वापर एआय संशोधनाबरोबरच लष्करी संगणकीय क्षमता, सायबर युद्ध आणि अत्याधुनिक शस्त्र प्रणाली विकसित करण्यासाठी होऊ शकतो. सिंगापूरसारख्या तिसऱ्या देशांतील कंपन्यांच्या माध्यमातून हे निर्बंध धुडकावून लावले का, याची चौकशी आता महत्त्वाची ठरणार आहे.