

प्रमोद बेरी
आपल्या देशात वेळोवेळी वेगवेगळ्या ‘अवतारात’ ध्वनी प्रदूषण प्रकट होत असते. एक ‘अवतार’ आहे तो आपल्या देशातील रस्ता वाहतुकीच्या प्रदूषणाचा! ट्रॅफिकमध्ये उगीचच हॉर्न वाजवणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, असे बहुतांश लोक समजतात.
गणपती उत्सव काळात ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला होता. ध्वनी प्रदूषण करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, असे बहुतेक भारतीयांना वाटत असल्याने हा गुंता सहजासहजी सुटणार नाही असे दिसते. ध्वनी प्रदूषणावरून खूप पूर्वीची एक घटना आठवली! मी अमेरिकेहून पदवी प्राप्त करून भारतात आल्यावर काही दिवस माझ्यावर पाश्चिमात्य सार्वजनिक शिस्तीचा व शांत व्यवहारांचा पगडा होता. परत कोल्हापूरला आल्यावरच्या पुढच्याच आठवड्यात आमच्या घरापासून २०० मीटरवर असलेल्या चौकातून सर्व ताराबाई पार्कला ऐकू येईल अशी आरती ऐकू येत होती. मी तेथे पोहोचलो विचारले, 'काय चालू आहे?' चंद्रावरून आलेली कुणीतरी असामी असावी असे समजून मला त्याने समजावले, 'ही संतोषीमातेची आरती चालू आहे.' ‘ते ठीक आहे’, मी म्हणालो; ‘पण सर्व पंचक्रोशीला ऐकू जाईल अशी उच्च स्वरात आरती का लावली आहे?'
तो केविलवाण्या नजरेने म्हणाला, 'आम्ही सण साजरा करीत आहोत ते जगाला आणि मुख्यकरून देवीला समजायला नको का?' या वाक्याने माझा ‘असंतोष’ मात्र उफाळून आला होता; पण न जाणो संतोषीमातेचा कोप होईल म्हणून मी माघार घेतली.
असो, अलीकडच्या काळात येऊया! काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील एका अब्जपतीच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला आम्ही दोघे गेलो, तेेव्हा तेथे नेहमीची कथा होती. वधू-वर गायब होते; पण लोक बुफेतील पदार्थांची रेलचेल असलेल्या जेवणावर मात्र येथेच्छ ताव मारत होते. तेवढ्यात एक झकपक ड्रेस घातलेली व नखशिखांत सजलेली एक ‘अनोळखी’ ललना माझ्याजवळ आली आणि गोड हसली व म्हणाली. 'बेरीसाहेब सर्व काही ठिक-ठाक आहे ना?' तिचे वाक्य संपेपर्यंत प्लेटमध्ये सौ काहीतरी भरून घेऊन आली व त्या शॅनेल फाईव्हचा सुवास दरवळणार्या सुंदरीला म्हणाली, 'हॅलो..... ताई तुम्ही बरेच दिवस नाना-नानी पार्कमध्ये फिरताना दिसला नाहीत?'
ती हसीना गायब झाल्यावर मी सौ ला विचारले, 'ही सौंदर्यललना कोण?'
'अहो, आपण नाना-नानी पार्कमध्ये फिरायला जातो तिथे नेहमी दिसते तीच ही सुंदरी!' मी स्मार्ट असल्याने अनोळखी सुंदरी माझ्याकडे येऊन हास्य करते, हा माझा भ्रमाचा भोपळा फटकन फुटला. तथापि, मनातल्या मनात काहीतरी आभासी जादूने सुंदर्या तयार करणार्या ब्युटीपार्लर्सना मी सलाम ठोकला!
तेवढ्यात......... स्पीकर्सच्या प्रचंड आवाजात, स्ट्रोब लाईटच्या लखलखात वधू-वराचे आगमन झाले. वधू मेण्यात होती, तिच्यासमोर दहा पर्या कर्कश्य हिंदी गाण्यांवर नाचत होत्या. सिनेमा सेटप्रमाणे दृश्य होते. माझे कान पूर्णतः २० मिनिटे एवढे बधिर झाले होते की, मी काय खातो आहे, हेही कळत नव्हते.
पूर्वी लग्नाच्या आधीची संगीत पार्टी एखाद्या कलाकाराला बोलावून मृदू संगीतात साजरी व्हायची. आता तिच्या बदली ‘डिस्को’ने जागा घेतली आहे.
आपल्या देशात वेळोवेळी वेगवेगळ्या ‘अवतारात’ ध्वनी प्रदूषण प्रकट होत असते. एक ‘अवतार’ आहे तो आपल्या देशातील रस्ता वाहतुकीच्या प्रदूषणाचा! ट्रॅफिकमध्ये उगीचच हॉर्न वाजवणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, असे बहुतांश लोक समजतात.
रस्त्यावर समोर हळू चालणारी ट्रॅक्टर-ट्रॉली दिसत असली, तरी त्याच्या मागचे कमीत कमी चार वाहनधारक जणू काही आपल्या गाडीने हॉर्न दिला, तर ट्रॉली चार पट वेगाने पुढे जाईल, अशा आविर्भावात सतत हॉर्न वाजवत राहतात. त्यातच ट्रॅफिक लाईट बंद असेल, तर चौकात ‘जंगलराज’ असते. ट्रकसारखी ‘सिंह’ वाहने पुढे जातात व आपल्यासारखी आम जनतेची सेंट्रोसारखी ‘हरणे’ वाहने मागे राहतात. शिवाय ट्रॅफिक लाईट एकदाचा हिरवा झाला की, 'पळा, पळा, पाहू कोण पुढे जातो' या शर्यतीप्रमाणे घरी किंवा ऑफिसला पोहोचणे ही राष्ट्रीय आणीबाणी आहे, असे समजून सर्वजण वाहने दामटतात.
नेहमीच्या ट्रॅफिकच्या या गोंधळात समजा एखादा ‘VIP’ किंवा ‘मिनिस्टर’ जाणार असेल, तर अर्धा तास थांबणे तर भागच पडते; पण पोलिस सायरन व ताफ्यातील गाड्यांच्या हॉर्नचा ऑर्केस्ट्रा ऐकण्याचे भाग्य लाभते. याशिवाय मधूनमधून रस्ता रोको, घोड्यावरचे नवरे, महापुरुषांच्या जयंत्या व देवांच्या मिरवणुका ढोल-ताशांच्या गजरात त्याच ट्रॅफिकच्या गोंधळात पुढे सरकत असतात.
माझा मित्र विजयने मला परवा खात्रीलायक वदंता सांगितली की, बॉलीवूडमधील एका नटीच्या ‘पोरशे’ गाडीमध्ये ३८ स्पीकर आहेत आणि ती रात्री मरीन ड्राईव्हला गाडी उभी करून मैत्रिणींसोबत डिस्को डान्स करत असते. हे बिभत्स दृश्य नजरेसमोर येऊनच माझ्या अंगावर शहारे आले.
आणि एक खास अवतार आहे तो म्हणजे विमानातून परदेशी जाणार्या प्रवाशांच्या ग्रुपचा! अशा विमानात जर १५-२० जणांचा एखादा बंगाली ग्रुप असेल, तर तुमचा सत्यानाश असतो. हे विमान त्यांनीच ‘चार्टर’ केलेले आहे, अशा आविर्भावात खाद्यपदार्थ फिरत राहणे, जोरजोरात गप्पा मारणे चालू असते अशावेळी इतर प्रवाशांना या अनाकलनीय तोंडात लहान गोटी ठेवून बोलल्यासारखा बंगालीं भाषेचा भडिमार विमान लँड होईपर्यंत सहन करण्याखेरीज पर्याय नसतो.
कोल्हापुरात कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यावर चहूकडच्या आवाजाची पातळी उच्च कंपनांची असते. सवयीने हे आपल्या अंगवळणी पडले आहे. तथापि, त्यात भर म्हणून जर मचमच खाणारे, भुरके मारणारे, मोबाईल जोरात लावून सर्व रेस्टॉरंटला ऐकवणारे फॅमिली ग्रुप्स शेजारी असतील, तर प्रसंग कठीण असतो.
अलीकडे फ्लॅट सिस्टीम कल्चर अनिवार्य झाले आहे. ३०-४० फॅमिलीज राहत असलेल्या फ्लॅट सिस्टीममध्ये कोणाचा तरी वाढदिवस, बारसे, साखरपुडा, मुंज यापैकी एकतरी स्कीमच्या सामाईक हॉलमध्ये साजरे होत असतात. त्याहून कठीण प्रसंग जर बेसूर आवाजात संगीत शिकणारा महाभाग नेमका तुमच्या शेजारी राहत असेल, तर तुमची धडगत नसते.
तुम्ही चुकून देवळाजवळच्या स्कीममध्ये फ्लॅट घेतला असेल, तर सहा महिन्यांत तुमच्या सर्व आरत्या पाठ होतातच, शिवाय देव अस्तित्वात आहे, यावरचा तुमचा विश्वास वाढतो.
त्यातही 'आधीच उल्हास व त्यात फाल्गुन मास' म्हणीप्रमाणे तुमच्या नवीन फ्लॅट सिस्टीममध्ये तुम्ही राहायला गेल्यावर तुमच्या स्कीमच्या काही महिन्यांतच शेजारच्या दोन्ही बाजूच्या रिकाम्या जागांवर काही बिल्डर्स आपली स्कीम बांधायला काढतात आणि पहिले चार महिने तळघर खोदण्यासाठी दिवसभर चालणार्या खडक ब्रेकरचा आवाज रात्री १० ला जरी थांबला, तरी रात्रभर तुमच्या कानात तो गुंजत राहतो.
अरे हो, कोल्हापूरची एक मोठी खासियत सांगायची राहून गेली! हिंदुस्थानातील कुठल्याही शहरापेक्षा तुलनेने कोल्हापुरात फटाके जास्ती खपतात. याचे कारण आपले कोल्हापूरकर फटाकेवेडे आहेत. फटाका वाजवायला आपल्याला फुसके कारणही पुरते. उदा. चार दिवसांनी नळाला पाणी आले...... वाजवा फटाके! गल्लीमध्ये चारवेळा नापास होणारा मुलगा यावर्षी दहावी पास झाला...... उडवा फटाके! मग, वाढदिवस असू दे , मंगळागौर असू दे, लग्न असू दे......... ॲटमबॉम्बचा आकाशी आविष्कार जवळजवळ दररोज पाहायला मिळतो.
अलीकडच्या बातम्यांकडे वळूया! आपल्या महाराष्ट्रात कितीही बापट किंवा पंडित आले, तरी आपले सर्व गणेशोत्सव कानठळ्या बसणार्या आवाजातच होणार, हे सांगायला काही ब्रह्मदेवाची गरज नाही.
वाचकहो, मला परवा एक भन्नाट कल्पना सुचली आणि मी ती अमलातही आणली. 'कौन बनेगा करोडपती'च्या प्रश्न तयार करणार्या पॅनेलला पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये विचारण्यासाठी खालीलप्रमाणे एक प्रश्न मी विचारण्यासाठी पाठवला आहे.
प्रश्न - चौकातला लाल स्ट्रीट लाईट लाल होऊन तुमची गाडी थांबली असेल, तर उपाय म्हणून तुम्ही जोरजोरात हॉर्न वाजवला, तर खालीलपैकी काय होऊ शकेल?
पर्याय : (अ) लाल लाईट गायब होऊन तुम्ही पलीकडे जाईपर्यंत अनंत काळ हिरवा लाईट चालू राहील.
(ब) रस्ता अधिक रुंद होईल
(क) हेलिकॉप्टरसारखी गाडी उडून पलीकडे जाऊन उभी राहील.
(ड) वरीलपैकी काहीही घडणार नाही
माझी खात्री आहे, आपले भारतीय स्पर्धक (अ) (ब) (क) या पर्यायांचीच उत्तरे देतील. त्यामुळे मी पुढील केव्हातरीच्या एपिसोडला हा प्रश्न आल्यावर काय घडणार आहे, त्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.