मोहासमोर देशनिष्ठा कवडीमोल!

पैशाचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही, असे म्हणतात. त्याचेच एक अलीकडील प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे निकोलस पूरन.
Nicholas Pooran
मोहासमोर देशनिष्ठा कवडीमोल! Nicholas Pooran(Pudhari Photo)
Published on
Updated on
विवेक कुलकर्णी

पैशाचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही, असे म्हणतात. त्याचेच एक अलीकडील प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे निकोलस पूरन. निकोलस पूरन हा खरं तर विंडीजचा धडाडीचा खेळाडू. सामना एकहाती जिंकून देण्याची क्षमता निर्विवाद; पण अशा दिग्गज खेळाडूलाही जेव्हा देशापेक्षा पैसा अधिक प्यारा वाटू लागतो, त्यावेळी तो देशाचा संघ सोडतो आणि एका रात्रीत गर्भश्रीमंतीचे गलेलठ्ठ पॅकेज पटकावण्यासाठी एखाद्या फ्रँचायझी क्रिकेट संघाशी करारबद्ध होतो, ही जणू आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी धोक्याची घंटाच!

वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरन अवघ्या 29 वर्षांचा.. हे वय असे की, जिथे आता कुठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपल्या मधल्या टप्प्यात पोहोचत असते, फुलत असते; पण याच टप्प्यावर पूरनसारखा दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा मार्ग स्वीकारतो, त्यावेळी निश्चितपणाने ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी धोक्याची घंटा ठरते.

Nicholas Pooran
Bahar article : कोटीत कमाई, बोटीत एन्जॉय

आश्चर्य म्हणजे, निकोलस पूरनने इंग्लंडमधील आंतरराष्ट्रीय मालिकेतून मुक्त करण्याची आणि आयर्लंडविरुद्ध मालिकेसाठीही विचार न करण्याची विनंती केली होती. यामागचे कारण म्हणजे, दोन महिन्यांची आयपीएल खेळून तो कंटाळला होता आणि त्याला पुरेशी विश्रांतीची गरज होती; पण आश्चर्य म्हणजे, याला काही दिवस होतात न होतात, तोच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली आणि सर्वांनाच कारण लक्षात आले, ही तर फ्रँचायझी स्तरावरून मिळणारी मोहमायेची निष्ठा! पण, हाच निर्णय एक मोठा प्रश्न समोर उभा ठाकून जातो. तो म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अस्त तर आता फार दूर नाही ना?

व्यापक द़ृष्टीने विचार करता आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून गर्भश्रीमंतीचे ताट वाढून देणार्‍या फ्रँचायझींकडे आकृष्ट होणारा पूरन हा काही एकटाच खेळाडू अजिबात नाही. गेल्या काही वर्षांत जगभरातील अनेक नामांकित खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करत लीग क्रिकेटच्या दिशेने वळण घेतले आहे आणि ही एक-दोन अपवादात्मक प्रकरणं नसून, वाढत चाललेली एक चिंताजनक प्रवृत्ती आहे. गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंड वाढत असून, अनेक नामवंत क्रिकेटपटू राष्ट्रीय कर्तव्यापेक्षा फ्रँचायझी क्रिकेटला अधिक महत्त्व देत आहेत. दुर्दैवाने, हे थांबवण्यासाठी फारसे काही करता येईल, अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही.

Nicholas Pooran
डार्क पॅटर्न सायबरविश्वातील अदृश्य सापळे

खेळाडू देश सोडून फ्रँचायझी का निवडत आहेत?

आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा फ्रँचायझी क्रिकेटकडे झुकणे हा भावनिक निर्णय अजिबात नसून त्यामागे व्यावसायिक, आर्थिक गणिते आहेत, हे ओघानेच येते. आता या क्लबस्तरीय क्रिकेटकडे झुकण्याचीही तीन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, कमी वेळेत अधिक पैसा! आजकाल अधिक पैसा, तोही कमी कष्टात कोणाला नको असतो? प्रत्येकाला हवा असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्षभर प्रवास, सराव, सामने आणि मालिकांचा तणाव असतो. त्याच्या तुलनेत टी-20 लीग फक्त काही आठवड्यांची असते आणि त्यात मिळणारे पैसे कोट्यवधीच्या घरात असतात. उदाहरणार्थ, इंग्लंडचा जेसन रॉय याने 60 हजार पौंडांचा ईसीबी करार सोडून अमेरिकेतील मेजर लीगमध्ये थोडेथोडके नव्हे, तर दीड लाख पौंड मिळवले, तेही केवळ एका सत्रात!

दुसरे कारण म्हणजे, कमी होणारा ताण. याचे कारण म्हणजे, लीग क्रिकेट खेळाडूंना एकाच जागी राहून खेळता येते. सतत प्रवास आणि वेगवेगळ्या हवामानात खेळणे टाळता येते. यामुळे खेळाडूंच्या शरीरावरील ताण कमी होतो आणि कौटुंबिक आयुष्यही सुरळीत राहतं. अनेक खेळाडूंनी स्पष्ट सांगितलं आहे की, त्यांना आता देशासाठी खेळण्यात तेवढा आनंद राहत नाही आणि याचे हेच उघड गुपित आहे. याशिवाय, तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, मोकळीक आणि स्वातंत्र्य! फ्रँचायझी लीगमध्ये खेळताना खेळाडूंवर फारसा राष्ट्रीय दबाव नसतो. तेथे त्यांना ‘मला खेळावं लागेल’ असा नैतिक ताण नसतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र देशाच्या अपेक्षा, चाहते, माध्यमांचं लक्ष आणि सततचा निकालाचा ताण असतो.

या सार्‍या वाटचालीत झालेय असे की, लवकर निवृत्त होणार्‍या खेळाडूंची वाढती यादी मारुतीच्या शेपटासारखी वाढतच चालली आहे. दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डिकॉक याने वयाच्या 29व्या वर्षी कसोटीमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर वन-डे क्रिकेटलाही अलविदा केला. त्याचा सहकारी हेन्रीक क्लासेन यानेही 33व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडलं. क्लासेन म्हणाला होता की, देश जिंकला किंवा हरला, तरी आता काहीही वाटत नाही. याचमुळे प्रश्न निर्माण होतो, देशाप्रती संवेदना खरोखरच इतक्या बोथट होऊ शकतात?

न्यूझीलंडचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने 2022 मध्ये स्वतःचा केंद्रीय करार सोडून फ्रँचायझी लीगमध्ये सहभागी होण्याचे ठरवले. वेस्ट इंडिजचे सुनील नरेन आणि आंद्रे रसेल हे दोघेही अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. नरेनने 2023 मध्ये निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. त्यांनी फ्रँचायझी क्रिकेटलाच प्राधान्य दिले आहे. रसेल अजूनही आपल्या सोयीनुसार सर्वात लहान फॉरमॅटमध्ये देशासाठी खेळतो. या सर्वांचा रोख एकच आहे, कमी वेळेत, कमी मेहनतीत अधिक पैसा!

या सर्व निवृत्त्यांचा थेट परिणाम राष्ट्रीय संघांवर होतो. सर्वोत्तम खेळाडू वेळेआधीच मैदान सोडत असल्यामुळे जागतिक स्पर्धांचा दर्जा घसरतोे. याचाच परिपाक म्हणजे, आता कसोटी सामने आणि वन-डे सामने हे रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जाऊ लागतील. मुळातच कसोटीकडे चाहते पाठ फिरवताना दिसून येताहेत. साडेतीन तासांचे इन्स्टंट क्रिकेट उपलब्ध असताना पाच-पाच दिवस कोण कसोटी बघणार, हा परवलीचा प्रश्न ठरतोय आणि जणू खेळातील जानच हरवत चाललीय.

भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या श्रीमंत बोर्डांकडे अजूनही कडक नियंत्रण आहे; पण वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसारख्या बोर्डांकडे अशा फ्रँचायझी लीगच्या विरोधात उभं राहण्याची ताकद नाही. याचे पडसाद नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर उमटले नाहीत, तरच नवल!

तसे पाहता, निकोलस पूरनची निवृत्ती हे फक्त एका खेळाडूचं प्रकरण नाही. ती एका नव्या युगाची सुरुवात आहे, जिथे खेळाडू देशासाठी नव्हे, तर स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी निर्णय घेत आहेत. जसजसे अधिक खेळाडू हा मार्ग स्वीकारतील, तसतसे चाहते आणि क्रिकेट मंडळांना हे वास्तव स्वीकारावे लागेल की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अस्त आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक जवळ आहे. कसोटी क्रिकेटची लोकप्रियता टिकवून ठेवणे, द्विपक्षीय मालिकांचे महत्त्व अबाधित राखणे आणि खेळाडूंना राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची प्रेरणा देत राहणे, ही प्रशासकांपुढील सर्वात मोठी आव्हाने आहेत.

याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट केवळ नावापुरते उरेल आणि फ्रँचायझी लीगच क्रिकेटचे मुख्य केंद्र बनतील, ही भीती अनाठायी नाही. क्रिकेटप्रेमींनीही ही बदलती पार्श्वभूमी समजून घेण्याची गरज आहे. कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेट कायम राहील; पण ते जसं आजपर्यंत होतं, तसंच भविष्यात असेल का, हा यक्षप्रश्न आयसीसीला सोडवावा लागेल.

कुठे गेली ती देशनिष्ठा?

खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट का सोडत आहेत, यामागची कारणे तशी अगदी सरळ आहेत, पैसा आणि स्थैर्य. विविध देशांमध्ये खेळल्या जाणार्‍या टी-20 लीग, विशेषतः इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल), एसए20 (एस20) आणि मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) यासारख्या स्पर्धांमध्ये खेळाडूंना कमी कालावधीत प्रचंड पैसा मिळतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ताणतणावाच्या तुलनेत या लीगमध्ये दडपणही कमी असते. पूरनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्याने आंतरराष्ट्रीय संघाला अलविदा केला आणि त्याला 24 तास पूर्ण होतात न होतात, तोच मेजर क्रिकेट लीगमधील एमआय न्यूयॉर्क संघात तो डेरेदाखल झाला. त्यामुळेच प्रश्न उभा राहतो, कुठे गेली ती देशनिष्ठा?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news